हाँगकाँग आगीची तीव्रता दाखवणारे 12 फोटो; पाहा कशी आहे परिस्थिती?

हाँगकाँगच्या ताई पो परिसरातील एका निवासी भागाला भीषण आग लागली असून या आगीत किमान 44 जणांचा मृत्यू झाला असून 45 जणांची प्रकृती गंभीर आहे. आणखी 279 जण बेपत्ता आहेत.

या आगीमुळे हाँगकाँगमधील हजारो लोकांवर मोठं अरिष्ट ओढवलेलं आहे. आगीनंतर हाँगकाँगमधील परिस्थिती कशी आहे, ते या छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा...

या आगीमुळे अनेकांनी आपलं कुटुंब गमावलं आहे तसेच अजूनही बरेच लोक बेपत्ता आहेत.

घटनास्थळावरून आलेल्या छायाचित्रांमध्ये धुराचे लोट, आगीच्या ज्वाळा, आग विझवण्यासाठी प्रयत्न करणारे अग्निशमन दलाचे जवान आणि गोंधळात पळणारे लोक स्पष्ट दिसत आहेत.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार ही आग हाँगकाँगमधील 'वांग फुक कोर्ट' नावाच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये लागली आहे. या कॉम्प्लेक्समध्ये आठ ब्लॉक्स असून एकूण दोन हजार फ्लॅट्स आहेत.

हाँगकाँग सरकारच्या माहितीनुसार, वांग फुक कोर्टमध्ये ही आग दुपारी सुमारे 2 वाजून 51 मिनिटांनी भडकली आणि त्यानंतर अग्निशमन विभागाला कळवण्यात आले.

या प्रकरणी मनुष्यवधाच्या संशयावरून तीन जणांना अटक करण्यात आली आहे . त्यापैकी दोन जण बांधकाम कंपनीचे संचालक असून एक जण अभियांत्रिकी सल्लागार आहे.

आगीचे नक्की कारण अद्याप समजलेले नाही. मात्र पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी खिडक्यांना अडथळा आणणारे पॉलीस्टायरीन बोर्ड आढळले आहेत. इमारतीत नूतनीकरणाचे काम सुरू होते आणि या बोर्डांमुळे आग वेगाने पसरली असावी. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आग बांबूच्या परांचीमुळे शेजारच्या इमारतींमध्येही झपाट्याने पसरली.

आज सकाळीही काही टॉवर ब्लॉक्समधून धुराचे लोट निघत आहेत. मात्र आठपैकी चार इमारतींमध्ये आग नियंत्रणात आली आहे.

अग्निशमन विभागाला ही आग पूर्णपणे विझवण्यासाठी संपूर्ण दिवस लागेल, असा अंदाज आहे.

शेकडो रहिवाशांना तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवण्यात आले असून ज्यांना स्थलांतराची गरज आहे त्यांच्यासाठी आपत्कालीन निवास युनिट्स उपलब्ध करून दिली जात आहेत.

हाँगकाँग अग्निशमन विभागाने या आगीला पाचव्या स्तराचा अलार्म दिला आहे. हा सर्वात गंभीर स्तर मानला जातो. हाँगकाँगमध्ये अशा प्रकारची आग 17 वर्षांपूर्वी लागली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

हाँगकाँगमधील हाऊसिंग सोसायट्या सामान्यतः लहान आणि दाटीवाटीच्या फ्लॅट्ससाठी ओळखल्या जातात, तिथे इमारतींमधील अंतर खूपच कमी असते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)