तुतानखामेनचा खजिना : मुखवटा, सिंहासनासह कबरीतून मिळालेल्या सगळ्या वस्तू आता एकाच ठिकाणी

फोटो स्रोत, Photo by AMIR MAKAR/AFP via Getty Images
- Author, केन पियरी
- Role, बीबीसी न्यूज
गीझाच्या महान पिरॅमिडजवळ बांधलेलं ग्रँड इजिप्शियन म्युझियम (संग्रहालय), हे प्राचीन जगातील शेवटचं उरलेलं आश्चर्य मानलं जातं. ते आता लोकांसाठी खुलं झालं आहे.
हे म्युझियम सुमारे 120 एकर म्हणजेच अर्धा चौरस किलोमीटर इतक्या मोठ्या परिसरात पसरलेलं आहे, आणि ते फ्रान्समधल्या लुव्र म्युझियमपेक्षा जवळपास दुप्पट मोठं आहे.
या म्युझियममध्ये 70 हजार ते 1 लाख पुरातन वस्तू दाखवण्यात येणार आहेत. यात राजा तुतानखामेनच्या कबरीतून मिळालेल्या आणि अद्यापही न पाहिलेल्या वस्तूंचा समावेश असेल.
या म्युझियमची घोषणा 2002 मध्ये झाली होती आणि ते 2012 मध्ये सुरू करण्याचं नियोजन होतं. पण खर्चात वाढ, राजकीय अस्थिरता, कोविड-19 महामारी आणि प्रादेशिक संघर्षामुळे त्याचं ते वारंवार पुढे ढकललं गेलं.
सुमारे 1.2 अब्ज डॉलर्स खर्चाच्या या मोठ्या प्रकल्पाचा बहुतांश भाग जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून (जेआयसीए) घेतलेल्या कर्जातून पूर्ण करण्यात आला आहे.
रहस्य आणि ज्ञानाची भूमी
कैरो विद्यापीठाच्या प्राध्यापिका सलीमा इकराम यांनी हिरवा पोलो-नेक टॉप, त्यावर पांढरा लॅब कोट आणि हातात ग्लोव्हज घातले आहेत. त्यांच्या कानात सोनेरी झुमके आहेत आणि पाठीमागे हिरवा बोर्ड दिसतो आहे.
प्राध्यापक इकराम गेल्या वीस वर्षांपासून ग्रँड इजिप्शियन म्युझियमसोबत काम करत आहेत.
इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मादबौली यांनी हे म्युझियम 'जगाला इजिप्तकडून भेट' असं म्हटलं आहे.
या म्युझियमचं उद्दिष्ट म्हणजे इजिप्तची महान संस्कृती आणि तिचा प्रभाव जगाला दाखवणं, तसेच देशाच्या कमकुवत अर्थव्यवस्थेला बळकटी देणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सलीमा इकराम म्हणतात, "प्राचीन इजिप्त प्रत्येकाला आपल्या जादूने सर्वांना मोहित करतो. अगदी ग्रीक, रोमन आणि फिनिशियन संस्कृतींनाही इजिप्त ही रहस्य आणि ज्ञानाची भूमी वाटत होती."
हे म्युझियम आजच्या इजिप्शियन लोकांना त्यांच्या प्राचीन वारशाशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत आहे.
प्राध्यापक इकराम म्हणतात, "यामुळे इजिप्तमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना आणखी मजबूत होईल. प्राचीन इजिप्त पुन्हा लोकांच्या दैनंदिन जीवनाचा आणि त्यांच्या ओळखीचा भाग बनेल."
तुतानखामेनचं 'पुनरागमन'
1922 मध्ये ब्रिटिश पुरातत्त्ववेत्ते हॉवर्ड कार्टर यांनी तुतानखामेनची विस्मृतीत गेलेली कबर शोधून काढल्यापासून तो लोकांच्या मनावर राज्य करत आहे.
आता, तुतानखामेनचा सोन्याचा मुखवटा, सिंहासन आणि त्याच्यासोबत पुरलेल्या 5 हजार पेक्षा जास्त वस्तू, ज्यातील अनेक वस्तू लोकांनी कधीच पाहिल्या नव्हत्या, पहिल्यांदाच एका ठिकाणी दाखवण्यात येणार आहेत.

फोटो स्रोत, Grand Egyptian Museum
सलीमा इकराम म्हणतात, "तुतानखामेनच्या कबरीतून मिळालेल्या सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी पाहणं ही खूपच अद्भुत अनुभूती असेल."
मँचेस्टर म्युझियममध्ये इजिप्त आणि सुदानचे क्युरेटर डॉ. कॅम्पबेल प्राइस, यांनी आधीच ग्रँड इजिप्शियन म्युझियमला भेट दिली आहे, ते म्हणतात, "माझ्या मते, भविष्यात बहुतेक पर्यटकांचं लक्ष तुतानखामेनच्या गॅलरींकडेच राहील, आणि उरलेलं म्युझियम खऱ्या इतिहासप्रेमी लोकांसाठी असेल."
ते म्हणतात, "मुख्य गॅलरीही खूप सुंदर आहे. प्रत्येक गोष्टीला इतकी जागा दिली आहे की, ती पूर्णपणे उठून दिसते. हा अनुभव माझ्या मनाला खूप भावला, तो एक भावनिक क्षण होता."

फोटो स्रोत, REUTERS/Mohamed Abd El Ghany
राजा तुतानखामेनच्या खजिन्यासोबत इतर अनेक ऐतिहासिक वस्तूही ठेवण्यात आल्या आहेत. त्यात रामेसेस द ग्रेटचा 3,200 वर्षे जुना भव्य पुतळाही आहे. तो म्युझियमच्या मुख्य हॉलमध्ये येणाऱ्यांचं स्वागत करतो.
हा पुतळा आणि त्याच्यासारख्या इतर 7000 इ.स.पूर्व काळातील प्राचीन वस्तू, एक दीर्घ प्रवास करून इथे पोहोचल्या आहेत.
हा पुतळा 51 वर्षे कैरो रेल्वे स्टेशनसमोर उभा होता, आणि नंतर त्याला म्युझियममध्ये आणण्यात आलं. त्याआधी त्याला संपूर्ण शहरात मिरवणुकीमधून फिरवण्यात आलं होतं.
म्युझियममध्ये राजा खुफूच्या सौर नौकेसाठी (सोलर बोटसाठी) एक विशेष विभाग तयार करण्यात आला आहे. ही 4,600 वर्षे जुनी नौका जगातील सर्वात जुनी आणि सर्वात संरक्षित नौका मानली जाते.
इजिप्तचा हरवलेला वारसा परत मिळवण्याचा प्रयत्न
इजिप्तचे प्रसिद्ध पुरातत्त्वतज्ज्ञ झाही हवास यांना लोक 'इजिप्तचे इंडियाना जोन्स' म्हणतात. त्यांच्यासाठी या म्युझियमचं उद्घाटन म्हणजे फक्त खजिन्यांचं प्रदर्शन नाही, तर ते इजिप्तच्या सांस्कृतिक शक्तीचं प्रतीक आणि आपला वारसा परत मिळवण्याचा संदेश देखील आहे.
ते म्हणतात, "आता वेळ आली आहे की, आपण आपल्या स्मारकांचा अभ्यास स्वतः वैज्ञानिक म्हणून करावा. किंग्स व्हॅलीत आतापर्यंत 64 राजेशाही कबरी सापडल्या आहेत, पण त्यापैकी एकाचेही उत्खनन इजिप्तच्या व्यक्तीने केलेले नाही."
हवास सांगतात की, इजिप्तमधील बहुतेक मोठे शोध, ज्यात तुतनखामेनची कबरीचाही समावेश आहे. ते जवळजवळ सगळे शोध परदेशी पुरातत्त्वतज्ज्ञांनीच लावले होते.
ते पूर्वीपासून सांगत आहेत की, इजिप्तच्या लोकांनी आपल्या वारशाचा अभ्यास आणि जतन करण्याची जबाबदारी स्वतः घ्यायला हवी. हाच विचार आता त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनलं आहे. इजिप्तने आपल्या भूतकाळाचं रक्षण स्वतः करावं, असं ते म्हणतात.
हे म्युझियम त्या दिशेने उचललेलं एक मोठं पाऊल आहे, असं लक्सर प्राचीन वस्तू विभागाचे महासंचालक डॉ. अब्देलगफ्फार वग्दी यांचं मत आहे

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात, "2002 पासून इजिप्तोलॉजीने एका नव्या आणि जलद टप्प्यात प्रवेश केला आहे. आता मालकीची भावना वाढली आहे आणि इजिप्तचे संशोधक अनेक मोठ्या उत्खनन प्रकल्पांचं आणि वारसा योजनांचं नेतृत्व करत आहेत."
जरी हे म्युझियम सर्व इजिप्तवासीयांसाठी तयार करण्यात आलं असलं, तरी काही लोकांसाठी तिकिटाची किंमत अजूनही जास्त आहे.
प्रौढांसाठी तिकिट 200 इजिप्शियन पाउंड (सुमारे 4 डॉलर्स) आहे, तर परदेशी पर्यटकांकडून 1,200 पाउंड (सुमारे 25 डॉलर्स) आकारले जातात. अनेक स्थानिक कुटुंबांसाठी ही किंमत अजूनही परवडणारी नाही.
सलीमा इकराम म्हणतात, "तुम्ही फक्त मृतांची काळजी घेऊ शकत नाही, जिवंत लोकांचीही काळजी घ्यायला हवी. हे म्युझियम सगळ्यांसाठी आहे. काही इजिप्तवासीयांसाठी तिकिटाची किंमत थोडी जास्त आहे."
पुरातत्त्वाचा नवा अध्याय
झाही हवास यांच्यासाठी ग्रँड इजिप्शियन म्युझियमचं उद्घाटन हे फक्त भूतकाळातील वारशाचं संरक्षण करण्याचं पाऊल नाही, तर इजिप्तला भविष्यात संशोधनाचं केंद्र बनवण्याच्या दिशेने घेतलेली एक महत्त्वाची सुरुवात आहे.
या म्युझियमच्या भव्य गॅलरींबरोबरच, त्याच्या परिसरात या भागातील सर्वात आधुनिक संरक्षण आणि संशोधन प्रयोगशाळाही आहेत.
इथे इजिप्तमधील आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या टीम्स पुढील अनेक दशकांपर्यंत अभ्यास, दुरुस्ती आणि नव्या शोधांवर काम करत राहतील.

फोटो स्रोत, Mohamed Elshahed /Anadolu via Getty Images
हवास म्हणतात, "मी सध्या लक्सरमधील किंग्स व्हॅलीमध्ये उत्खनन करत आहे, तसेच साक्कारामध्येही काम सुरू आहे. आतापर्यंत आपण आपल्या फक्त 30 टक्के स्मारकांचा शोध लावला आहे, अजूनही 70 टक्के स्मारकं वाळूखाली दडलेली आहेत."
म्युझियम आपले भव्य हॉल सर्वसामान्यांसाठी उघडत असताना, इजिप्तचा सर्वात मोठा खजिना अजूनही वाळवंटाखाली दडलेला आहे. तो शोधाची वाट पाहत आहे. पुरातत्त्वाच्या या नव्या युगाची सुरुवात आता झाली आहे.
(बीबीसी न्यूज अरबीच्या अतिरिक्त माहितीसह)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)








