जोडप्याने नवजात अर्भकाला बसमधून बाहेर फेकून दिल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठीसाठी
पुण्याहून परभणीकडे जात असलेल्या एका खासगी ट्रॅव्हल बसमधून प्रवास करताना नवजात अर्भकाला थेट बसमधून रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची तक्रार पोलिसांनी नोंदवली आहे.
पाथरी-सेलू दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर देवनांद्रा शिवारात 15 जुलैच्या सकाळी ही घटना घडली. आई-वडिलांनीच स्वतःच्या नवजात अर्भकाला धावत्या गाडीतून फेकून दिल्याचं पोलिसांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी एका जोडप्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर जोडप्याने आपण पती-पत्नी असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
नेमकं काय घडलं होतं? नवजात अर्भकाला का फेकून देण्यात आलं? जाणून घेऊयात.
नेमकं काय घडलं होतं?
15 जुलैच्या सकाळी नेहमी प्रमाणे, पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असणारे पोलीस अधिकारी अमोल जयस्वाल यांना तन्वीर शेख यांचा कॉल आला.
कॉलवर समोरील व्यक्ती घाईघाईत, 'सेलू रोडवर कॅनालच्या पुढे एका ट्रॅव्हल बसमधून एक नवजात अर्भक रोडच्या कडेला आताच कुणीतरी फेकलं आहे, आम्हाला लवकरात लवकर पोलिसांची मदत हवी आहे' असं म्हणत होती.
हे ऐकताच कामावर असलेले अमोल जयस्वाल तत्काळ त्या व्यक्तीनं सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले.

तन्वीर शेख यांनी पोलिसांना सांगितले की, 'आम्ही या ठिकाणी रोडच्या कडेला व्यायाम करत होतो, त्यावेळी बसमधून काहीतरी फेकल्याचं आम्हाला दिसलं. त्यानंतर ती बस 100 फूट अंतरावर जाऊन दोन ते तीन मिनिटं थांबली आणि मग पुढे निघून गेली.
'त्यानंतर गाडीतून काय फेकलंय हे पाहण्यासाठी मी त्या दिशेनं गेलो तर मला काळसर-निळसर रंगाच्या कपड्यात एक पुरुष जातीचे अर्भक पडल्याचं दिसलं,' अशी नोंद पोलीस तक्रारीत आहे
त्यांनी या वेळी बसवर असलेलं नाव देखील अमोल जयस्वाल यांना सांगितलं.
अमोल जयस्वाल यांनी पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांना तत्काळ या प्रकरणाबद्दल कळवलं तसेच अॅम्बुलन्सही बोलवली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश लांडगे, हवालदार विष्णू वाघ त्यांचं पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
अर्भकाला फेकून देणारे कसे सापडले?
घटनास्थळी दाखल झाल्यानंतर, त्यानंतर महेश लांडगे यांच्या पथकानं शोध मोहीम राबवत या प्रकरणातील बसचा शोध घेतला आणि बस मालक सुयोग आंबिलवादे यांना कॉल करून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. शिवाय त्यांची बस जिथं आहे तिथंच थांबवायलाही सांगितली. याबाबत बीबीसी मराठीनं बस मालक सुयोग आंबिलवादे यांच्याशी संपर्क केला.
तेव्हा त्यांनी सांगितलं, "15 जुलैच्या सकाळी 7.30 वाजता मला महेश लांडगे सरांचा कॉल आला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्या गाडीतून एका कुणीतरी एका अर्भकाला फेकून दिलंय. त्यामुळे तुमची गाडी आत्ता जिथं आहे तिथं थांबवा आणि आम्ही पोहचेपर्यंत गाडीतून कोणाला उतरू देऊ नका."

फोटो स्रोत, Getty Images
सुयोग आंबिलवादे गाडीजवळ पोहचले तेव्हा पोलीसही तिथं आलेले होते. सुयोग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्यांच्या गाडीची पाहणी केली आणि ज्यांनी त्या नवजात अर्भकाला फेकून दिलं होतं त्यांनाही ताब्यात घेतलं.
पोलिसांनी बाळाच्या आईला परभणीच्या सरकारी दवाखान्यात हलवलं तर त्याच्या वडिलांना ताब्यात घेतलं. गाडीतील इतर लोकांचीही चौकशी केली. पाथरी पोलीस ठाण्यात नेऊन गाडीचा पंचनामा केला आणि सगळं झाल्यानंतर गाडी सोडून दिली.
"तिथं गेल्यावर पोलिसांनी आम्हाला सांगितलं की, त्या महिलेची प्रसूती गाडीतच झाली होती. पण गाडीत कोणालाच काही कळलं नाही, कसला आवाज आला नाही," असं देखील सुयोग आंबिलवादे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
तसंच, पोलिसांनी पंचनामा करताना प्रसूतीसंदर्भातील गाडीतील सगळे पुरावे ताब्यात घेतल्यामुळे आम्हाला गाडीमध्ये नंतर काही आढळलं नाही.
अर्भकाला फेकून का दिलं गेलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणीतील रहिवासी 19 वर्षीय तरुणी आणि 21 वर्षीय तरुण पुण्यातील शिखरापूर वरून परभणीला जात होते. त्या प्रवासादरम्यान, तरुणीचं पोट दुखू लागलं आणि तिची प्रसूती झाली.

अमोल जयस्वाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीत, "तो मुलगा आम्हाला नको असल्यानं आम्ही त्याला गाडीतून फेकून दिला आहे," असा जबाब तरुणाने दिल्याचं म्हटलं आहे.
"मुलाचं पालन पोषण करू शकत नसल्यानं नुकतंच जन्माला आलेलं अर्भक त्यांनी एका काळसर-निळसर रंगाच्या कपड्यात गुंडाळून चालत्या गाडीतून कोणाच्याही न कळतपणे फेकून दिलं," अशी नोंद तक्रारीत आहे.
ते अर्भक मृत अवस्थेतच जन्माला आलं की फेकून दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला हे सगळे रिपोर्ट आल्यानंतरच समजेल, असं महेश लांडगे सांगतात.
संबंधित तरुणाला तंबी देऊन सोडले आहे, रिपोर्ट आल्यानंतर तरुणाला बोलवले जाईल असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितानुसार, कलम 94, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आला आहे. ( जन्मानंतर लहान अर्भकाच्या मृत शरीराला गुप्तपणे बेवारस सोडणे - यासाठी हे कलम आहे.)
या प्रकरणासंदर्भात बीबीसी मराठीनं या तरुणाची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला असता, समोरून कोणताही प्रतिसाद आला नाही.
त्यांची बाजू आल्यानंतर ती या बातमीत अपडेट करण्यात येईल.
( या बातमीसाठी अमोल लंगर यांनी अतिरिक्त वार्तांकन केले आहे.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











