गवताच्या गंजीत जाळला महिलेचा मृतदेह, पण 'मेलेली' बाई व्हीडिओ कॉलवर जिवंत कशी झाली?

मंगळवेढ्यात फिल्मी स्टाईल सस्पेन्स खुनाचा पर्दाफाश

फोटो स्रोत, Mustan Mirza

    • Author, मुस्तान मिर्झा
    • Role, बीबीसी मराठीसाठी

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात एका विवाहितेने आपल्या प्रेमप्रकरणासाठी आणि प्रियकरासोबत कायमचे पळून जाण्यासाठी स्वतःच्याच आत्महत्येचा बनाव रचून एका बेवारस महिलेची हत्या केल्याचा आरोप एका विवाहितेवर आणि तिच्या प्रियकरावर लावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

14 जुलै रोजी ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी विवाहिता आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

बीबीसी मराठीने संबंधित विवाहिता आणि तिच्या प्रियकराच्या कुटुंबीयांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकला नाही. तो झाल्यावर या बातमीत अपडेट करण्यात येईल.

काय आहे प्रकरण?

मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात राहणारी 23 वर्षीय विवाहिता किरण सावंत हिचे गावातीलच 20 वर्षीय निशांत सावंत याच्यासोबत प्रेमसंबंध होते.

किरणला दोन वर्षांची मुलगी असतानाही हे दोघे कायमचे पळून जाण्याचा कट रचत होते. यासाठी त्यांनी एक भयानक योजना आखली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरणने आत्महत्या केल्याचा बनाव रचायचा आणि त्यासाठी दुसऱ्याच कोणाचा तरी मृतदेह वापरण्याचा निर्णय घेतला.

आत्महत्येचा बनाव आणि हत्या

या कटासाठी किरण आणि निशांत यांनी एका बेवारस आणि गतिमंद महिलेचा शोध सुरू केला. आठ दिवसांच्या शोधानंतर त्यांना पंढरपूरच्या गोपाळपूरजवळ एका गतिमंद महिलेची माहिती मिळाली.

निशांतने तिला तिच्या मुलाला शोधून देतो असे सांगून पाटकळ गावात आणले. त्यानंतर दोन दिवसांनी गळा दाबून तिचा खून करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांसह अटकेतील दोन्ही आरोपी

फोटो स्रोत, Mustan Mirza

14 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास या महिलेचा मृतदेह किरणच्या शेतातील कडब्याच्या गंजीत ठेवण्यात आला आणि ती गंजी पेटवून देण्यात आली. आत्महत्येचा बनाव खरा वाटावा यासाठी किरणने आपला मोबाईल फोन मृत महिलेच्या अंगावर ठेवला होता.

गंजीला आग लावण्यापूर्वी किरण घरातून बाहेर पडून डाळिंबाच्या बागेत लपली. आग लागल्यानंतर परिसरातील लोक जमा झाले आणि गंजीत जळालेल्या मृतदेहावरून किरणनेच आत्महत्या केल्याचा समज पसरला. किरणचा पती नागेश सावंत आणि माहेरकडील मंडळीही तिथे दाखल झाली.

पोलिसांनी उघडकीस आणला गुन्हा

किरणच्या वडिलांना आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत संशय आल्याने त्यांनी पोलिसांना सखोल चौकशी करण्याची विनंती केली.

पोलिसांनी तपास सुरू केला असता, जळालेल्या मृतदेहाशेजारी सापडलेल्या मोबाईल फोनवरून त्यांना संशय आला.

फोनच्या सीडीआर वरून पोलिसांनी निशांत सावंतला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्याने सत्य कबूल केले.

मृत महिलेची ओळख पटविण्याचा तपास सुरु आहे.

फोटो स्रोत, Mustan Mirza

निशांतने पोलिसांना सांगितले की, "आत्महत्या करणारी विवाहिता मेलेली नाही, ती जिवंत आहे."

हे ऐकून पोलिसही अचंबित झाले. निशांतच्या मदतीने पोलिसांनी किरणला व्हिडिओ कॉल केला आणि ती जिवंत असल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. पोलिसांनी तत्काळ निशांत आणि कराड येथे गेलेल्या किरणला ताब्यात घेतले.

पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोरीगिड्डे, मंगळवेढा पोलीस ठाणे

फोटो स्रोत, Mustan Mirza

फोटो कॅप्शन, पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोरीगिड्डे, मंगळवेढा पोलीस ठाणे
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या प्रकरणाची माहिती देताना मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोरीगड्डे म्हणाले, "14 जुलै रोजी मौजे पाटकळ या गावी एक विवाहित महिला कडब्याच्या गंजीत होरपळून मरण पावल्याची माहिती पोलीस ठाण्याला मिळाली. त्या माहितीच्या आधारे आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

"घटना स्थळावरुन असं समजलं की मृत महिला ही किरण सावंत असून ती भाजून मयत पावली आहे. त्याबाबात किरण सावतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन अकस्मात मृत्यूची तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, त्या मृत्यूच्या तपासादरम्यान असं लक्षात आलं की मृत महिला ही किरण सावंत नसून ती दुसरीच अनोळखी महिला आहे. आणि किरण सावंत ही जिवंत आहे.

आणखी खोलात जाऊन तपास केला असता कळालं की, किरण सावंत आणि तिचा प्रियकर निशांत सावंत या दोघांनी पळून जाऊन कायमचे एकत्र राहण्यासाठी व नातेवाईकांना किरणचा मृत्यू झाला असं भासवण्यासाठी त्यांनी एकत्र कट रचला. आणि एका अनोळखी महिलेचा खून करून त्या मृतदेह घटनास्थळी कडब्याच्या गंजीमध्ये ठेवला. तसेच मृतदेहासोबत किरणचा मोबाईल ठेवून पेटवून दिला, आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

"सध्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून अनोळखी मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे," असे बोरीगड्डे यांनी सांगितले.

आरोपीसह सहसाथीदारावरही कठोरात कठोर कारवाई करून कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी किरणचे पती नागेश सावंत यांनी केली आहे.

फोटो स्रोत, Mustan Mirza

फोटो कॅप्शन, आरोपीसह सहसाथीदारावरही कठोरात कठोर कारवाई करून कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी किरणचे पती नागेश सावंत यांनी केली आहे.

या प्रकरणी बोलताना किरण सावंत हिचा पती नागेश सावंत यांनी सांगितलं की, "पहाटे आमची कडब्याची गंजी पेटली होती. गंजी पेटली असं सांगत आल्यावर आम्हाला कळालं तेव्हा तिकडे धावत गेलो आणि गंजी विझवण्याचा प्रयत्न करत असताना आम्हाला त्यात एक मृतदेह आढळून आला.

"तो मृतदेह माझ्या बायकोचा असेल असं वाटलं होतं. पण नंतर तो मृतदेह किरणचा नसल्याचं कळालं. आमचं कुटुंब भीतीच्या छायेत आहे. आरोपीसह सहसाथीदारावरही कठोरात कठोर कारवाई करून कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी आमची मागणी आहे," असं नागेश यांनी सांगितलं आहे.

निरापराध महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान

पोलिसांनी या प्रकरणात किरण सावंत आणि निशांत सावंत यांना अटक केली असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, जळीत अवस्थेत सापडलेल्या निरागस महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस तिच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.