शेअर मार्केट गुंतवणुकीचा 'स्मार्ट स्कॅम'; 160 जणांची फसवणूक, एका संशयाने घोटाळा उघडकीस

    • Author, प्रियंका जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने तब्बल 20 ते 25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

जवळपास 150 ते 160 नागरिकांना आरोपींच्या टोळीनं लाखोंचा गंडा घातलाय.

शेअर मार्केटमध्ये बनावट ॲपद्वारे गुंतवणूक करायला सांगून जास्तीत जास्त नफा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

फसवणूक करून मिळवलेली रक्कम आरोपी बाहेरील देशातील साथीदारांना क्रिप्टोकरन्सी, यु.एस.डी.टी च्या माध्यमातून पाठवत असल्याची गंभीर बाब देखील पोलीस तपासातून समोर आली आहे.

आरोपींनी गुंतवणुकीच्या बहाण्याने पीडितांना जाळ्यात कसं ओढलं? पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली? अशा सायबर गुन्हेगारांपासून सावध कसं राहायचं? जाणून घेऊया.

गुंतवणुकीच्या बहाण्याने पीडितांना जाळ्यात कसं ओढलं?

फिर्यादीची ओळख उघड करता येणार नसल्यामुळे आपण त्यांना सोहम असं नाव देऊ.

तर, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सोहम हे फार्मा कंपनीत प्रोग्रामर म्हणून काम करतात.

एके दिवशी फेसबुक पाहत असताना शेअर मार्केट संदर्भात सोहम यांना एक जाहिरात दिसली. त्या जाहिरातीमध्ये शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर दररोज 10 ते 20 टक्के नफा मिळेल असं सांगितलं होतं.

इतका चांगला नफा मिळत असल्यामुळे सोहम त्या जाहिरातीकडे आकर्षित झाले. त्यांनी त्यात गुंतवणूक करण्याचा विचार केला.

त्या जाहिरातीमध्ये एक लिंक देण्यात आली होती. सोहम यांनी त्या लिंकवर क्लिक केले असता, त्यांचं नाव व नंबर रजिस्टर करून घेतला गेला, त्यानंतर त्यांना वेगवेगळया व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्ये अ‍ॅड करण्यात आलं.

ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सोहम यांना आरोपींनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्याच्या काही टिप्स दिल्या.

तसेच त्यांनी जर आरोपीनं सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक केली तर त्यांना 8 ते 25 टक्के नफा मिळवून देण्याचं आमिषही दाखवलं.

चांगले पैसे मिळत असतील तर आपण गुंतवणूक करायला हवी या विचारानं सोहम गुंतवणुकीसाठी तयार झाले.

त्यानंतर सोहम यांना "E11 Kotak helps you achieve your dreams" या WhatsApp ग्रुपमधील अ‍ॅडमिन श्रीपाल शाह व आरती भल्ला यांनी https://ff.xpkm.xyz/4ssexb ही लिंक पाठवली.

त्यानंतर त्यांनी, KOTAK QIB या बनावट शेअर मार्केट ट्रेडींग अ‍ॅपवर सोहम यांना पैसे गुंतवण्यास सांगितले.

फसवणूक झाल्याचं कसं कळलं?

सोहम यांनी आरोपींवर विश्वास ठेऊन त्यांच्या KOTAK QIB या बनावट शेअर मार्केट ट्रेडींग अ‍ॅपवर तब्बल 89,35,305/- रुपये इतकी रक्कम गुंतवली होती.

थोड्याच दिवसांत आरोपींनी सोहम यांना गुंतवलेल्या रक्कमेवर जवळपास 8,71,00,000/- रुपये इतका नफा झाला असल्याचं दाखवलं.

नंतर, आनंदी झालेल्या सोहम यांनी आपण गुंतवलेले पैसे आणि त्यातून मिळालेला नफा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, आरोपींनी सोहम यांना सगळ्या रक्कमेवर सर्विस टॅक्स भरावा लागणार असल्याचं कारण देत गुंतवणूक केलेली रक्कम आणि त्यावर मिळालेला नफा परत करण्यास टाळाटाळ केली.

यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचा संशय आल्यानं सोहम यांनी पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांकडे तात्काळ धाव घेतली.

तपास व आरोपींचा माग

सोहम याच्या तक्रारीची सायबर पोलीसांनी गंभीरपणे दखल घेतली.

सोहम यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले श्रीपाल शाह, आरती भल्ला, व्हॉटसअ‍ॅप क्रमांक धारक, बँकखातेधारक, अ‍ॅप्लिकेशन धारक त्यांना मदत करणारे साथीदार यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी, भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 316(2), 3(5) सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारीत) कायदा 2008 चे कलम 66 (सी), 66 (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

फसवणुकीचा हा गुन्हा दखल झाल्यानंतर सायबर सेलच्या पथकानं तपासाची चक्र फिरवली.

आरोपींनी कॉसमॉस बँकेत सोहम यांचे तब्बल 33,86,000 इतकी रक्कम ट्रान्सफर करून घेतल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं.

पोलिसांनी सदर बँक अकाऊंटची माहीती घेतली असता ते Trading Guru या नावानं असून, पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या यश भारत पाटोळे या 25 वर्षीय व्यक्तीचं असल्याचं समोर आलं.

सायबर पोलिसांच्या पथकानं या व्यक्तीचा शोध घेतला असता तो कोंढवा परिसरात, त्याच्या साथीदारांसोबत एकत्र मिळून अकाऊंट चालवत असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली.

तसेच त्यांचे अनेक साथीदार असल्याचंही या तपासातून समोर आलं. पोलिसांनी आरोपींच्या त्या टोळीला ताब्यात घेतले असता, त्यांना एक नवीन माहिती मिळाली.

दुसऱ्या देशातील साथीदारांना क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून पाठवले पैसे

टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून चीनी भाषा बोलणाऱ्या एका व्यक्तीचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचं समोर आलं.

आरोपी चीनी व्यक्तीसोबत मिळून वेगवेगळे बँक अकाऊंट मिळवून त्या बँक अकाऊंटचा वापर फसवणुकीसाठी करत होते.

त्यामध्ये फसवणुकीची रक्कम घेऊन ती रक्कम दुसऱ्या देशातील साथीदारांना क्रिप्टो करन्सी, यु.एस.डी.टी चे माध्यमातून पाठवत होते.

या पोलिसांनी आरोपींकडून, वेगवेगळे 9 मोबाईल, 15 सिमकार्ड, 4 सी.सी.टी.व्ही कॅमेरे, 8 चेक बुक, 20 ए.टी.एम/डेबीट कार्ड, 1 लॅपटॉप, 1 मेमरी कार्ड, 1 पासपोर्ट व 13550 इतकी रोख रक्कम ताब्यात घेतली आहे.

आरोपींच्या या टोळीनं आत्तापर्यंत जवळपास 150 ते 160 नागरिकाची अंदाजे 20 ते 25 कोटी रूपयांची फसवणूक केल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलेलं आहे.

त्यामुळे आर्थिक फसवणूकीच्या या प्रकरणात आणखी काय काय माहिती पोलीस तपासात समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'सेबी पुरस्कृत ॲप्लीकेशनचा वापर करावा'

या प्रकरणात आणखी जास्त नागरिकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलतना व्यक्त केली आहे.

अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकींचे प्रकार आता फक्त शहरांपुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते आता ग्रामीण भागांतही पोहचले आहेत.

त्यामुळे त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला. "त्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सेबी पुरस्कृत ॲप्लीकेशनचा वापर करावा. गुंतवणूक करताना आपण बनावट प्लॅटफार्मवर तर गुंतवणूक करत नाहीत ना? याची खात्री करून घ्यावी."

तसेच अशा प्रकारांमध्ये नागरिकांनी अडकू नये, यासाठी पोलीस प्रशासन म्हणून आम्ही वेळोवेळो लोकांना मार्गदर्शक सूचना देत असतो, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.