डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं चरित्र, जे गुजरातीत लिहिलं होतं आणि किंमत होती 'अमूल्य'

फोटो स्रोत, Getty Images/Amit Jyotikar
- Author, नामदेव काटकर आणि सुरेश गवानिया
- Role, बीबीसी प्रतिनिधी
'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोन जबरदस्त 'व्यसनं' होती – एक म्हणजे पुस्तकं खरेदी करण्याचं आणि दुसरं ती संपूर्ण वाचण्याचं. कालांतराने ही 'व्यसनं' वाढत गेली आणि त्यांच्या संग्रही सात ते आठ हजार निवडक ग्रंथांची संपत्ती झाली, ज्यांची किंमत सहजच तीस-चाळीस हजार रुपयांहून अधिक असेल.'
हा उल्लेख आहे 1940 साली लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रातला. होय, 1940 सालातलं चरित्र!
डॉ. आंबेडकरांच्या हयातीत लिहिलेलं हे पहिलं चरित्र आणि तेही गुजराती भाषेत.
28 ऑगस्ट 1940 — हा दिवस गुजरात, गुजराती भाषा आणि देशातील सर्व आंबेडकरवाद्यांसाठी ऐतिहासिक साक्षीदार बनला. कारण या दिवशी प्रकाशित झालेलं डॉ. आंबेडकरांचं हे चरित्र म्हणजे एखाद्या ऐतिहासिक दस्तवेजाहून कमी नाही.
'जीवन चरित्र : डॉ. बी. आर. आंबेडकर, एस्क्वायर', असं नाव असलेलं हे चरित्र यू. एम. सोलंकी यांनी लिहिलं आहे.
1940 पर्यंतचं डॉ. आंबेडकरांचं व्यक्तिमत्व यात रेखाटलं आहे. आंबेडकरांच्या सामाजिक कामाची दखल घेत, तत्कालीन स्थितीत आंबेडकर करत असलेलं काम आणि त्याबाबतची लोकांची भावनाही या चरित्रात नोंदवली गेलीय.
हे चरित्र आंबेडकरांच्या हयातीत लिहिलं गेल्यानं पहिलं चरित्र म्हणून जितकं हे ऐतिहासिक आहे, तितकीच या चरित्राच्या निर्मितीची आणि पुन:प्रकाशनाची गोष्टही रंजक आहे.
अशी आहे पहिल्या चरित्राची गोष्ट
बाबासाहेबांचं हे पहिलं चरित्र पुन्हा प्रकाशित करणाऱ्या अमित प्रियदर्शी ज्योतिकर यांच्याशी बीबीसीनं बातचित केली. त्यांनी मूळ चरित्राच्या प्रकाशनाची 1940 सालातली गोष्टही सांगितली.
अमित ज्योतिकर सांगतात की, कर्शनदास लेऊवा हे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शेड्युल कास्ट फेडरेशनचे गुजरातमधील मोठे नेते होते. बाबासाहेबांचं जीवनचरित्र लिहिलं जायला हवं, असं कर्शनदास यांना वाटलं. मात्र, ते लिहिणार कोण, असा प्रश्न उभा राहिला. कारण दलित समाजात तेव्हा शिकलेले लोक फार कमी होते आणि वाचणारे तर आणखी कमी.
मात्र, बाबासाहेबांचं चरित्र लिहिलं गेलं पाहिजे, यावर कर्शनदास ठाम होते आणि अखेरीस त्यांना अशी व्यक्ती सापडली, ती म्हणजे यू. एम. सोलंकी.
कर्शनदास यांनी मूळ चरित्राला म्हणजे 1940 साली प्रकाशित झालेल्या चरित्राला प्रस्तावनाही लिहिलीय आणि त्यात त्यांनी चरित्र लिहिण्यामागचा उद्देश आणि कल्पना कशी सूचली हे विस्तृतपणे सांगितलंय.

फोटो स्रोत, Amit Jyotikar
प्रस्तावनेत कर्शनदास यांनी लिहिलंय की, "1933 साली मला बाबासाहेबांच्या चरित्राची कल्पना सूचली. कारण अशा महान, बुद्धिमान आणि अग्रगण्य नेत्याबद्दल गुजरातमधील लोकांना काहीच माहिती नव्हती. 1937 साली आमच्या हाती 'कुमार' मासिकाचा एक अंक आला. त्या अंकातील संपादकीय लेखात डॉ. आंबेडकरांबद्दलच्या आठवणीत राहाव्या अशा प्रसंगांबद्दल अत्यंत प्रभावीपणे लिहिलं होतं.
"त्यानंतर मी माझे मित्र यू. एम. सोलंकी यांना माहिती संकलित करण्यास सांगितलं. त्यांनी स्वतःच्या कष्टाने काही सत्य घटना शोधून त्या सुधारित केल्या. काही भाग वाचकांसाठी मासिकात प्रसिद्ध केला."
मात्र, पुस्तक प्रकाशनासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता होती. आर्थिक मदत उभारणीसाठी धडपड सुरू असताना, कांजीभाई बेचरदास दवे हे धावून आले आणि त्यांनी आर्थिक मदत केली. ती आर्थिक मदतही अपुरी पडल्यानंतर प्रकाशनाची सगळीच जबाबदारी कर्शनदास लेऊवा यांनी उचलली.

फोटो स्रोत, Amit Jyotikar
या चरित्रात लेखक यू. एम. सोलंकी, मूळ कल्पना मांडणारे कर्शनदास लेऊवा आणि देणगीदार कांजीभाई दवे यांचे छायाचित्रही छापण्यात आले आहेत.
या तिघांच्या धडपडीतून आकारास आलेलं हे चरित्र अखेरीस 22 ऑगस्ट 1940 रोजी प्रकाशित झालं. चरित्राच्या पहिल्या पानावर भलामोठा मथळा होता – "डॉ. बी.आर. आंबेडकर एस्क्वायर – एम.ए., पीएच.डी., बॅरिस्टर ॲट लॉ, एम.एल.सी. अॅन्ड डी.एस.सी."
प्रकाशक होते, महागुजरात दलित नवयुवक मंडळ, दरियापूर, अहमदाबाद आणि छापण्यात आलं 'मन्सूर प्रिंटिंग प्रेस, ढलगरवाड, अहमादाबाद' इथे.
आणि या चरित्राची किंमत होती 'अमूल्य'. कारण किंमत ठरवण्यात आली नव्हती आणि किंमतीच्या जागी 'मूल्य : अमूल्य' असं छापण्यात आलं होतं.
लेखक यू. एम. सोलंकी कोण होते?
यू. एम. सोलंकी हे काही पूर्णवेळ लेखक नव्हते. मात्र, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी परिचित होते. किंबहुना, कर्शनदास लेऊवा यांच्यासोबत सोलंकी हेही आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते होते. त्यामुळे आंबेडकरांचं चरित्र लिहिताना त्यांचं भावनिक नातंही जुळलं होतं.
सोलंकी यांना गुजरातीसह इंग्रजी भाषेचीही चांगली जाण होती. त्यामुळे बाबासाहेबांच्या इंग्रजी लेखन-भाषणांचा चरित्रात उल्लेख करताना त्यांना फारशा अडचणी आल्या नाहीत. शिवाय, बाबासाहेबांचे विचार माहीत असल्यानं कुठे गफलत झाल्याचेही दिसून येत नाही.

फोटो स्रोत, Amit P. Jyotikar
पुनर्प्रकाशित चरित्राचे संपादक-अनुवादक अमित ज्योतिकर सांगतात की, "पूर्ण चरित्र यू. एम. सोलंकी यांनी हातानं लिहिलं होतं. भाषाशैली देखील सौम्य असली, तरीही अस्पृश्यतेवर तीव्र टीका केली आहे. पण कुठेही अपमानास्पद शब्द नाहीत. जिथे विरोध आवश्यक होता, तिथे आवर्जून केला आहे."
यू. एम. सोलंकी हे अहमदाबादचेच राहणारे होते. खानपूर रोड इथल्या राणीकुंजमध्ये ते राहत.
बाबासाहेबांच्या पहिल्या चरित्राचं पुन्हा प्रकाशन कसं झालं?
1940 साली प्रकाशित झालेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं हे पहिलं चरित्र 2023 मध्ये पुन्हा प्रकाशित करण्यात आलं.
पुन्हा प्रकाशित करताना, डॉ. अमित प्रियदर्शी ज्योतिकर यांनी मूळ गुजराती भाषेतील पुस्तकाला द्विभाषिक केलं. जेणेकरून अधिक वाचकांपर्यंत पुस्तक पोहोचेल. त्यांनी मूळ गुजराती भाषेतील पानं तशीच ठेवून, समोरच्या पानावर त्याच गुजराती भाषेतल्या पानाचं इंग्रजी भाषांतर केलं आहे.

फोटो स्रोत, Amit Jyotikar
संपादक-अनुवादक डॉ. अमित ज्योतिकर याबाबत बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "हे पुस्तक माझ्या वडिलांच्या, म्हणजेच डॉ. प्रियदर्शी जी. ज्योतिकर यांच्या संग्रहातून मिळालं. त्यांच्या हयातीत या विषयावर चर्चा होत असे. त्यांनी संशोधकांना याच्या प्रती दिल्या होत्या.
"1940 ची चरित्राची मूळ प्रत आहे, तशीच आम्ही पुन्हा प्रकाशित करताना छापली आहे. भाषेतील चुकाही जशा होत्या, तशाच ठेवल्या आहेत. कारण हे चरित्र जागतिक स्तरावर महत्त्वाचं दस्तावेज आहे. जगाला कळले पाहिजे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले चरित्र गुजराती भाषेत लिहिले गेले."
विजय सुरवाडेंमुळे पुन:प्रकाशन झालं शक्य
यू. एम. सोलंकी लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं हे पहिलं चरित्र पुन्हा प्रकाशित होण्यास महाराष्ट्रातील आंबेडकरावादी लेखक विजय सुरवाडे यांचाही मोलाचा वाटा आहे.
विजय सुरवाडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्र आणि माहितीचे संग्राहक म्हणून प्रसिद्ध आहेत. तसंच, डॉ. आंबेडकरांच्या दुसऱ्या पत्नी सविता उर्फ माई आंबेडकरांचे अनेक वर्षे घनिष्ठ सहकारी होते.

फोटो स्रोत, Vijay Surwade
डॉ. आंबेडकरांच्या या पहिल्या चरित्राच्या पुन:प्रकाशनाबाबतची आठवण विजय सुरवाडेंनी प्रस्तावनेत लिहिलीय.
सुरवाडे सांगतात की, "प्रियदर्शी ज्योतिकर यांच्याशी माझा अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू होता. आयडीबीआय बँकेत ऑडिट विभागात माझी ट्रान्सफर झाल्यानंतर पहिला दौरा अहदाबादला झाला. त्यावेळी प्रियदर्शी ज्योतिकर यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली. त्यांच्याकडे डॉ. आंबेडकरांचे दुर्मिळ फोटो सुद्धा मिळाले."
"22 ऑगस्ट 1993 रोजी अहमदाबादला प्रियदर्शी ज्योतिकर यांच्या घरी गेलो असता, त्यांच्या संग्रहात मला यू. एम. सोलंकी लिखित डॉ. आंबेडकरांचं चरित्र सापडलं. मी लगेच त्याची फोटो कॉपी घेऊन ठेवली.
"2020 साली प्रियदर्शी ज्योतिकर यांचं निधन झालं. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांचे पुत्र अमित ज्योतिकर यांनी एकदा फोनवर मला सांगितलं की, ते डॉ. आंबेडकरांवरील यू. एम. सोलंकी लिखित चरित्र पुन्हा प्रकाशित करू इच्छित आहेत. मात्र, त्यांच्याकडची चरित्राची कॉपी वाचण्यायोग्य नव्हती. त्यामुळे मी माझ्याकडील कॉपी त्यांना दिली."
मात्र, सुरवाडेंकडीलही कॉपी तितकशी वाचण्यायोग्य राहिली नव्हती, मात्र स्कॅन करून छापण्यायोग्य बनवण्यात आली. आणि यातूनच बाबासाहेबांच्या पहिल्या चरित्राच्या पुन:प्रकाशनाचा मार्ग मोकळा झाला.
बाबासाहेबांवरील पहिल्या चरित्रात नेमकं काय आहे?
यू. एम. सोलंकी लिखित हे पहिलं चरित्र गुजराती भाषेत लिहिलं गेलंय आणि तेही 1940 साली.
भाषा ही मर्यादा नाही, मात्र कोणत्या साली लिहिलं ही निश्चितच आहे. कारण डॉ. आंबेडकर हे या चरित्राच्या प्रकाशनानंतर 16 वर्षे जगले. या पुढच्या 16 वर्षांत त्यांनी अनेक मोठी पदं भूषवली, आंदोलनं केली, राज्यघटना निर्मितीचं काम केलं, धर्मांतराचं कार्य पार पाडलं. एकूणच मोठ्या घटना पुढच्या 16 वर्षात घडल्यात. मात्र, तरीही 1940 च्या चरित्राचं महत्त्व कमी होत नाही. उलट आंबेडकरांच्या सार्वजनिक आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर हे चरित्र प्रकाशित झालंय. त्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त होतं.
या चरित्राची सुरुवातच सध्या नाशिक जिल्ह्यात असलेल्या येवल्यातील सभेतून होते. याच सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतिकारी घोषणा केली होती की, "मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही."
धर्मांतराची ही अधिकृत घोषणाच होती. ती पूर्णत्वास नेली, 1956 साली नागपुरात ऐतिहासिक धर्मांतर करून. यू. एम. सोलंकींनी या चरित्रात येवल्याच्या घटनेबद्दल वर्णन करून सुरुवात केलीय.

फोटो स्रोत, BOMBAY HIGH COURT
येवल्याच्या सभेचा जसा विशेष उल्लेख या चरित्रात आहे, तसाच लाहोरमधील जात-पात तोडक मंडळाचाही येतो. या मंडळानं डॉ. आंबेडकरांना 'जातिव्यवस्थेचे निर्मुलन' या विषयावर भाषण करण्यास आमंत्रित केलं होतं. मात्र, या मंडळाच्या काही सदस्यांना त्या भाषणातील काही मुद्दे 'आक्षेपार्ह' वाटल्यानं रद्द केलं. या घटनेचा उल्लेखही या चरित्रात येतो.
इथे नमूद करायला हवं की, हेच भाषण पुढे 'जातिव्यवस्थेचे निर्मुलन' हे पुस्तकरूपात प्रसिद्ध झालं आणि त्याची देश आणि जगभरातील विचारविश्वात चर्चा झाली.
या चरित्रात सर्वाधिक भर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणावर, देश-विदेशातील परिषदांना बाबासाहेबांनी लावलेल्या उपस्थितीवर, इतर नेत्यांशी झालेल्या चर्चांवर आहे.
विशेषत: गांधींजींसोबत ज्या ज्या मुद्द्यांवर डॉ. आंबेडकरांचे मतभेद होते, त्याचा उल्लेख या चरित्रात आढळतो. शिवाय, धर्म, जात यासंबंधीचे आंबेडकरांचे विचारही नमूद करण्यात आले आहेत.
हे पुस्तक गुजराती भाषेतील आणि आजच्या गुजरातमध्ये असलेल्या भागात प्रकाशित झालं. त्यामुळे असेल किंवा यू. एम. सोलंकी हे अहमदाबादस्थित असल्यानं असेल, यात डॉ. आंबेडकरांच्या अहमदाबाद भेटीचे प्रसंगही वर्णन करण्यात आले आहेत. या भेटीदरम्यान तिथं कोण उपस्थित होते, आंबेडकरांचं स्वागत कसं झालं, असं सगळं वर्णन या पुस्तकात येतं.

1940 साली प्रकाशित झाल्यानं आंबेडकरांच्या तिथवरच्या वाटचालीचाच आढावा जरी या चरित्रात येत असला, तरी पहिलं चरित्र म्हणून आणि आंबेडकरांच्या हयातीत प्रसिद्ध झालेलं चरित्र म्हणून या चरित्राचं वेगळेपण अबाधित आहे.
अर्थात, आंबेडकरांच्या हयातीत यानंतरही चरित्र प्रसिद्ध झाली आहेत.
1946 साली तानाजी बाळाजी खरावतेकर यांनी 'डॉ. आंबेडकर' हे चरित्र लिहिलं. हे कराचीतून प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर रामचंद्र बनौधा यांनी हिंदीत 'डॉ. आंबेडकर का जीवनसंघर्ष' हे चरित्र 1947 साली लिहिलं. चरित्रकार धनंजय कीर यांनी लिहिलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र विशेष गाजलं.
हे चरित्र 1954 साली लिहिलं गेलं, म्हणजेच आंबेडकर हयात असतानाच. तसंच, चांगदेव खैरमोडे हे आंबेडकरांचे सहकारीही होते. त्यांनी लिहिलेल्या 12 खंडांच्या चरित्रातील पहिला खंड आंबेडकर हयात असताना म्हणजे 1952 साली लिहिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर हयात असताना काही मोजके चरित्र आणि त्यांच्या हयातीनंतर गेल्या 70 वर्षात शेकडो चरित्रात्मक ग्रंथ लिहिले गेले. मात्र, यू. एम. सोलंकी लिखित पहिल्या चरित्राचं महत्त्व मोठं आहे आणि अबाधित आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)










