You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात कराला आता चिनी ड्रॅगनचं जशास तसे उत्तर
- Author, पीटर हॉस्किन्स
- Role, बिझनेस रिपोर्टर
जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापारयुद्ध तीव्र होत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणखी काही देशांवर अतिरिक्त शुल्क लादण्याची धमकी देत आहेत.
दुसरीकडे, चीननंही अमेरिकेच्या काही वस्तूंवर आयात कर लावण्याची योजना आखली असून ती आजपासून (9 फेब्रुवारी) लागू होत आहे.
अमेरिकेने सर्व चीनी उत्पादनांवर 10 टक्के नवीन अतिरिक्त कर लागू केल्याच्या काही मिनिटांतच, 4 फेब्रुवारी रोजी बीजिंगनं ही योजना जाहीर केली होती.
दरम्यान, रविवारी (9 फेब्रुवारी) ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व स्टील आणि ॲल्युमिनियमवर 25 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला. याची अधिकृत घोषणाही सोमवारी (10 फेब्रुवारी) होईल असं सांगितलं जातंय.
याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, इतर देशांवरही परस्पर कर लागू करण्याची त्यांची योजना आहे. पण, या योजनेंतर्गत किती आणि कोणत्या देशांवर कर लावण्यात येईल, याबाबत स्पष्ट काही सांगितलेलं नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच चीनकडून येणाऱ्या सर्व मालावर जास्तीचा 10 टक्के आयात कर लादणं सुरू केलं होतं.
त्याआधी चीनकडून येणाऱ्या 800 डॉलर्स किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या मालावर कोणताही कर आकारला जात नव्हता.
मात्र, करातील पळवाटेचा फायदा घेऊन शीन आणि टेमूसारख्या चिनी ई-कॉमर्स कंपन्या लाखो अमेरिकन ग्राहकांशी थेटपणे व्यवहार करत होत्या.
त्यामुळे या 'डी मिनिमिस' कर नियमावर टीका केली जात होती.
हा नियम मोडीत काढला जात असून चीनवरून आलेल्या लहान मोठ्या सगळ्या मालावर कर लावला जाईल, असं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं.
चीनने अमेरिकन वस्तूंवर लावला कर
अमेरिकेला जशास तसं उत्तर देत चीननंदेखील अमेरिकन वस्तूंवर कर आकारण्याबाबत भूमिका घेतली आहे.
चीननं अमेरिकन कोळसा आणि लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) उत्पादनांच्या आयातीवर 15 टक्के सीमाशुल्क लावले आहे. यासह अमेरिकन कच्चे तेल, कृषी यंत्रसामग्री आणि मोठं इंजिन असलेल्या कारवरदेखील 10 टक्के कर लावला आहे.
गेल्या आठवण्यात चीनी अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या गुगल विरोधात अँटी-मोनोपॉली (एकाधिकारविरोधी) चौकशी सुरू केली.
तसेच, डिझायनर ब्रँड असलेल्या कॅल्विन क्लेन आणि टॉमी हिलफिगरची मालक कंपनी पीव्हीएच (PVH) ला बीजिंगच्या तथाकथित 'अविश्वासू' म्हणजेच यादीत टाकलं.
या व्यतिरिक्त चीननं 25 दुर्मिळ धातूंवर निर्यात नियंत्रणही लागू केले आहेत. त्यात अनेक विद्युत उपकरणं आणि लष्करी उपकरणांसाठीच्या महत्वाच्या घटकांचाही समावेश करण्यात आलाय.
डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात कॅनडा आणि मेक्सिकोवर 25 टक्के कर लावण्याचा निर्णय 30 दिवसांसाठी थांबवला होता.
घोषणेच्या काही दिवसांनंतरच ट्रम्प यांनी पुन्हा अमेरिकेत आयात होणाऱ्या स्टील आणि ॲल्युमिनियमवर 25 टक्के कर लावण्याची घोषणा केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या अध्यक्षीय कार्यकाळातही स्टीलवर 25 टक्के आणि ॲल्युमिनियमवर 10 टक्के कर लावला होता. मात्र, नंतर कॅनडा, मेक्सिको आणि ब्राझीलसह काही व्यापारी भागीदारांना करमुक्त कोटा दिला.
युरोपियन युनियन (EU) वरील आयात करांचा प्रश्नही बायडेन प्रशासनानं व्हाईट हाऊसची जबाबदारी स्वीकारेपर्यंत अडकून होता.
दरम्यान, रविवारी ट्रम्प यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादात योजनेतील नवीन कर कोणत्या देशांवर लागू करण्यात येतील आणि कोणत्या देशांना सूट मिळेल जाईल, याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
ट्रम्प यांनी अमेरिकन वस्तूंवर लागू असलेल्या करांच्या तुलनेत इतर देशांवरही समान दराने कर लागू करण्याचे निवडणूक प्रचारातील आश्वासन पूर्ण करण्याचा मनसुबा स्पष्ट केला.
तसंच, वाहनांच्या आयात करांबाबत अंतिम निर्णय झालेला नसून, सर्वसाधारण कर सवलतींच्या पर्यायाचा विचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सोबतच, युरोपियन युनियनचे कर (EU) अमेरिकन कार्सच्या आयातीवरील करांपेक्षा खूप जास्त असल्याची तक्रारही नोंदवली आहे.
EU वस्तूंवरील कराबाबत ट्रम्प यांनी काय भूमिका घेतली?
मागील आठवड्यात, ट्रम्प यांनी बीबीसीसोबत साधलेल्या संवादात सांगितलं होतं की, युरोपियन युनियन (EU)वरही लवकरच कर लागू होऊ शकतो. परंतु ब्रिटनसोबत करारही होऊ शकतो असंही त्यांनी सूचित केलं होतं.
अमेरिकेच्या नवीन कराचा प्रभाव लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, बीजिंगनंही वॉशिंग्टनवर फेंटानिल या सिंथेटिक ओपिओइडच्या व्यापारात चीनच्या भूमिकेबाबत 'बिनबुडाचे आणि खोटे आरोप' करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
जागतिक व्यापार संघटना (WTO) कडे दाखल केलेल्या तक्रारीत चीननं म्हटलं की, अमेरिकेचे आयात कर 'भेदभाव करणारे आणि संरक्षणवादी' असून ते व्यापार नियमांचे उल्लंघन करतात.
परंतु, WTO चा वाद सोडवणारं पॅनल अद्याप कार्यरत नसल्यामुळे चीनच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता कमी असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
अलीकडच्या काही दिवसांत ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची अपेक्षा होती. परंतु ट्रम्प यांनी त्यांना तातडीने चर्चा घडवून आणायची घाई नसल्याचं म्हटलं.
20 जानेवारी रोजी पदभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी आणलेल्या अनेक उपाययोजनांमध्ये बदल झाले आहेत.
शुक्रवारी, त्यांनी करांसह 4 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आलेल्या अतिरिक्त 10 टक्के करांसह चीनमधून येणाऱ्या छोट्या पार्सल्सवरील कर स्थगित केले.
करांच्या स्थगितीची ही स्थिती तोपर्यंत कायम राहील जोपर्यंत "करावरील महसूल प्रभावी आणि जलद गतीने प्रक्रिया करण्यासाठी पुरेशी व्यवस्था तयार होत नाही."
या आदेशानंतर 800 (£645) डॉलरपेक्षा कमी किमतीच्या शिपमेंटवरील करमुक्त सवलत संपुष्टात आल्यानंतर, अमेरिकन पोस्टल सर्व्हिस (USPS) आणि इतर एजन्सींनीही त्या अनुषंगानं पालन करत काम करण्यास सुरुवात केली.
USPS ने तात्पुरते चीनमधून पार्सल स्वीकारणे थांबवले, पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 'यु टर्न' घेत हा निर्णय मागे घेण्यात आला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.