जिवंतपणीच 'अंत्यसंस्कार': 61 दिवस शवपेटीत राहूनही हा माणूस जिवंत कसा राहिला?

    • Author, डालिया वेंटुरा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"ज्या माणसाला आधीच दफन करण्यात आले होते, त्याला आज मी पुन्हा दफन करत आहे. अशी वेळ माझ्यावर पहिल्यांदाच आली आहे."

माईक मिनी यांची मुलगी मेरी मिनी हिने आपल्या 'यू कांट ईट रोझेस मेरी' या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे. तिच्या मते, हे शब्द तिच्या वडिलांना शेवटचा निरोप देणाऱ्या धर्मगुरूचे होते.

माईक मिनी यांचे पहिले अंत्यसंस्कार त्यांचा खरोखर मृत्यू होण्याच्या 35 वर्षं अगोदर झाले होते. त्या वेळी तिथे फक्त मोठी गर्दीच नव्हती, तर आंतरराष्ट्रीय मीडियादेखील हजर होता. पण तेव्हा ते जिवंत होते.

हो, याचे कारण असे की, लोकांचे आणि मीडियाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रचलेला तो एक ड्रामा होता.

या विलक्षण गोष्टीची सुरुवात एका आयरिश पबमधून होते.

गोष्टीचा मुख्य नायक माईक मिनी एका शेतकऱ्याचा मुलगा होता. दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी तो कामाच्या शोधात इंग्लंडला गेला होता. वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन बनण्याचे त्याचे स्वप्न होते, पण त्याला मजूर म्हणून काम करावे लागले.

एका अपघातात त्याच्या हाताला दुखापत झाली आणि रिंगमध्ये यशस्वी होण्याचे त्याचे स्वप्न भंगले. पण त्याच काळात एका दुसऱ्या अपघाताने एका नवीन कल्पनेला जन्म दिला.

घडले असे की, तो एक बोगदा खोदत असताना त्याच्यावर माती कोसळली. असे म्हटले जाते की, ढिगाऱ्याखाली दफन असतानाच त्याच्या मनात एका नवीन स्वप्नाचे बीज रुजले: 'शवपेटीत जिवंत दफन होण्याचा विक्रम रचणे.'

अमेरिकेत अशा विचित्र स्पर्धांची फॅशनच आली होती. 1966 मध्ये एक खलाशी आयर्लंडमध्ये 10 दिवस दफन होता. एका अमेरिकन माणसाने टेनेसीमध्ये जमिनीखाली 45 दिवस काढले होते आणि हाच तो विक्रम होता जो माइकला मोडायचा होता.

लोक स्वतःला दफन का करून घ्यायचे?

इतिहासात जी छळाची एक पद्धत होती आणि आपल्यापैकी बहुतेकांसाठी जे एक भयानक स्वप्न आहे, असे काही करण्यासाठी लोक का हट्ट धरतात?

या 'अंत्यसंस्कार कलाकारांचे' उद्देश वेगवेगळे असायचे. कोणाला फक्त विक्रम मोडण्याचा आनंद हवा होता, तर काही जण पैसे कमावण्यासाठी हे करायचे.

एखाद्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सुद्धा असे केले जाई.

उदाहरणार्थ, ओडील नावाच्या माणसाने आपल्या आयुष्यात 158 वेळा स्वतःला दफन करून घेतले. त्याने अनेकदा जागांची किंवा वस्तूंची जाहिरात करून पैसे कमावले. पण 1971 मध्ये त्याने शेवटच्या वेळी पेट्रोलचे भाव कमी करण्याच्या योजनेला पाठिंबा देण्यासाठी असे केले. म्हणजे तो वेगवेगळ्या कारणांसाठी हे करत राहिला.

33 वर्षांच्या माईक मिनीकडे कोणतेही विशेष शिक्षण किंवा तो खूप प्रतिभावंत नव्हता. पण एखादी वेगळी कृती केल्याने त्याचे नाव 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये येऊ शकत होते आणि तो इतका श्रीमंत होऊ शकला असता की आयर्लंडमध्ये स्वतःचे घर बांधू शकेल.

त्याने जाहीर केले, "खऱ्या आयुष्यात मला कोणतेही विशेष चांगले भविष्य दिसत नव्हते. म्हणूनच मला माझी योग्यता सिद्ध करायची होती."

अशा प्रकारे त्याने चॅम्पियन बनण्याचे स्वप्न जिवंत ठेवले. बॉक्सर म्हणून तो हे करू शकला नसता, म्हणून त्याने या सहनशक्तीच्या खेळात सर्वोत्तम बनण्याचा आणि त्यावर पैज लावण्याचा निर्णय घेतला.

माइक मिनी उत्तर लंडनच्या एका वस्तीत राहायचा, जिथे त्याचे अनेक देशवासीय म्हणजे आयरिश लोक राहायचे. तिथे 'अ‍ॅडमिरल नेल्सन' नावाचा एक प्रसिद्ध पब होता, जो मायकल 'बटी' सुग्रो चालवायचा.

सुग्रो स्वतः आधी सर्कसमध्ये पैलवान होता आणि खुर्चीवर बसलेल्या माणसाला फक्त दातांनी उचलण्यासारखे प्रयोग करायचा. तो एक व्यापारी होता आणि त्याला बॉक्सिंगला प्रोत्साहन द्यायला आवडायचे. 4 वर्षांनंतर त्याने मोहम्मद अलीला कुस्तीसाठी डब्लिनला आणले होते.

जेव्हा माईक मिनीने दारू पिताना स्वतःला जिवंत दफन करण्याच्या कल्पनेबद्दल सांगितले, तेव्हा सुग्रोला ती आवडली.

माईकची मुलगी मेरी सांगते की, जेव्हा तिच्या आईने रेडिओवर ऐकले की एक माणूस 45 दिवसांपेक्षा जास्त काळ जमिनीखाली राहून रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा तिला समजले की हा तिचाच नवरा आहे आणि ती बेशुद्ध पडली.

त्याला हा प्रयोग आयर्लंडमध्ये करायचा होता, पण त्याच्या कुटुंबाने त्याला विरोध केला. त्यांना भीती होती की त्याचा भयानक मृत्यू होईल आणि कॅथोलिक चर्चलाही हे आवडणार नाही.

पण मेरीच्या मते 21 फेब्रुवारी 1968 रोजी त्याने ते करून दाखवलेच.

जमिनीच्या खाली

सुग्रोने यासाठी खूप मोठा शो आयोजित केला होता. त्याच्या मनात विचार आला की, शवपेटीचे झाकण बंद करण्यापूर्वी माईकने त्याचे 'शेवटचे जेवण' पबमध्ये आंतरराष्ट्रीय प्रेससमोर घ्यावे.

निळा पायजमा आणि टाइट्स घालून चॅम्पियन बनण्याची जिद्द उराशी बाळगून माइक 1.90 मीटर लांब आणि 0.78 मीटर रुंद शवपेटीत शिरला, जी खास याच चॅलेंजसाठी बनवण्यात आली होती.

त्याने सोबत एक क्रॉस आणि रोसरी घेतली होती. शवपेटी बंद होण्यापूर्वी त्याने जाहीर केले, "मी हे माझी पत्नी, मुलगी आणि आयर्लंडच्या सन्मानासाठी करत आहे."

या पेटीत दफन झाल्यानंतर तो लोखंडी पाईप्सच्या सहाय्याने श्वास घेऊ शकत होता. याच पाईप्समधून त्याला टॉर्चच्या प्रकाशात वाचण्यासाठी वर्तमानपत्रे, पुस्तके, तसेच जेवण, पेये आणि सिगारेट पाठवली जात असत.

त्याला चहा-टोस्ट, रोस्टेड बीफ आणि त्याची आवडती दारूही मिळत असे. शवपेटीच्या खाली केलेल्या एका छिद्राचा वापर टॉयलेटसाठी केला जाई.

तिथे एक डोनेशन बॉक्स ठेवला होता आणि पैसे देऊन लोक त्याच्याशी बोलू शकत होते.

या चॅलेंजने बॉक्सर हेन्री कूपर आणि अभिनेत्री डायना डोर्स सारख्या सेलिब्रिटींचे लक्ष वेधले, जे त्याला दफनभूमीवर भेटायला आले.

पेटीच्या आत बसवलेल्या टेलिफोनने तो बाहेरच्या जगाशी बोलायचा. ही लाईन 'अ‍ॅडमिरल नेल्सन' पबशी जोडलेली होती, जिथे सुग्रो प्रत्येक कॉलसाठी पैसे घ्यायचा.

काही काळ प्रेसने या बातम्या दिल्या, पण नंतर मोठ्या जागतिक घटनांमुळे ही बातमी मागे पडली. व्हिएतनाम युद्ध आणि मार्टिन ल्यूथर किंग यांची हत्या यामुळे जगाचे लक्ष दुसरीकडे गेले.

तरीही, जेव्हा माईकच्या बाहेर येण्याचा दिवस आला, तेव्हा सुग्रोने याची पूर्ण जगाला माहिती मिळेल याची काळजी घेतली.

प्रसिद्धीकडून विस्मृतीकडे

नर्तक, संगीतकार आणि पत्रकारांच्या उपस्थितीत 22 एप्रिल रोजी, दफन झाल्याच्या 8 आठवडे आणि 5 दिवसांनंतर शवपेटी बाहेर काढण्यात आली.

गर्दीमध्ये ट्रकवर ठेवलेल्या शवपेटीचे झाकण उघडताच, डोळ्यांचे प्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी माइकने सनग्लासेस लावले आणि तो हसला.

तो अस्वच्छ आणि विस्कटलेला दिसत होता, पण तो नक्कीच विजेता बनला होता. त्याने जाहीर केले, "मी इथे अजून 100 दिवस राहू इच्छितो."

वैद्यकीय तपासणीत तो पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगण्यात आले.

त्याची मुलगी मेरीच्या मते, त्याला 1 लाख पाउंड रोख आणि वर्ल्ड टूरचे आश्वासन दिले होते. त्या काळात ही खूप मोठी रक्कम होती. 1970 मध्ये डब्लिनच्या आलिशान भागात एका 3 मजली घराची किंमत साधारण 12 हजार पाउंड होती.

61 दिवस जमिनीखाली राहून माईकने जुना रेकॉर्ड खूप मागे टाकला होता. पण त्याला ना पैसे मिळाले ना वर्ल्ड टूरची संधी. खिशात एक पैसाही नसताना तो आयर्लंडला परतला.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनेही त्याच्या विक्रमाला कधीच अधिकृत मान्यता दिली नाही, कारण तिथे त्यांचा कोणताही प्रतिनिधी हजर नव्हता.

मात्र, आंतरराष्ट्रीय प्रेसचे पुरावे होते आणि त्याच्या 61 दिवसांच्या दाव्यावर कोणीही शंका घेऊ शकत नव्हते.

फक्त काही महिन्यांनंतर, त्याच वर्षी एमा स्मिथ नावाच्या एका ननने इंग्लंडमधील एका पार्कमध्ये 101 दिवस स्वतःला दफन करून घेऊन त्याचा विक्रम मोडीत काढला.

त्याच्या मृत्यूनंतर 2 दशकांनी, 2003 मध्ये, माईक मिनीची गोष्ट 'बरीड अलाईव्ह' नावाच्या डॉक्युमेंटरीच्या रूपात पुन्हा जिवंत झाली. हे पाहून त्याला नक्कीच खूप आनंद झाला असता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.