UPI पेमेंट, व्हॉट्सॲप ते वाहनांच्या किंमती, नवीन वर्षात 'या' 5 नियमांमध्ये बदल

2025 या नवीन वर्षाची सुरुवात होताच पहिल्या दिवसापासूनच अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. या बदललेल्या नियमांचा आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनावर कमी-अधिक परिणाम होणार आहे.

दैनंदिन व्यवहार, वाहनांची खरेदी विक्री, पेन्शनचे नियम, कृषी कर्ज आणि परदेश यात्रा या क्षेत्रातील नियमांमध्ये बदल झाले आहेत.

पण नेमके कोणते नियम बदलले आहेत? त्याचा लोकांच्या आयुष्यावर कसा परिणाम होईल? पाहूयात.

1) UPI पेमेंटची मर्यादा वाढली

फीचर फोनद्वारे (कीपॅड फोन) यूपीआय पेमेंट करणाऱ्यांना 1 जानेवारी 2025 पासून एकावेळी 10 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहे.

आधी ही मर्यादा 5 हजार रुपये होती.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ऑक्टोबर 2024 मध्ये यासाठी एक पत्रक जारी केलं होतं.

या नवीन बदलामुळे ज्यांच्याकडे इंटरनेट सुविधा कमी आहे आणि जे फीचर फोनचा वापर करतात अशा लोकांना फायदा होणार आहे.

2) पेन्शनधारकांसाठीही झाले 'हे' बदल

जानेवारी 2025 पासून ईपीएफओच्या पेन्शनधारकांसाठी एक नवीन नियम लागू झाला आहे.

आता पेन्शनधारकांना कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पेन्शन काढता येणार आहे.

महत्वाचं म्हणजे यासाठी कुठल्याही वेगळ्या व्हेरीफिकेशनची गरज नसेल.

सरकारनं 4 सप्टेंबर 2024 ला कर्मचारी पेन्शन योजना 1995 साठी केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली (सीपीपीएस) मंजूर केली होती. यामागे पेन्शनसंदर्भातील नियमांमध्ये आणखी सुलभता आणण्याचा सरकारचा उद्देश होता.

तसेच, बँक, शाखा किंवा तुमचं ठिकाण बदललं असेल तरी पेन्शनधारकांना कार्यालयात जाऊन अर्ज करण्याची गरज नाही. या प्रणालीमुळे निवृत्त झाल्यानंतर आपल्या मूळ गावी स्थायिक होणाऱ्या पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार असून त्यांची संख्या जवळपास 78 लाख आहे.

3) वाहनांच्या किंमतीत बदल

जानेवारी 2025 पासून अनेक कारसह इतर वाहनांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

यामध्ये छोट्या हॅचबॅकपासून तर लक्झरी मॉडेल्सपर्यंतच्या वाहनांचा समावेश आहे.

वाहनांवरील उत्पादन खर्च आणि ऑपरेशनल खर्चामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचं कार बनवणाऱ्या कंपन्यांचं म्हणणं आहे.

मारूती सुझुकी, हुंदाई, महिंद्रा आणि एमजी या मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमतीत दोन ते चार टक्क्यांनी वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे.

4) कृषी कर्जासंदर्भात काय आहे नवा नियम?

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बँक कर्जामध्येही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2025 पासून मोठा बदल केला आहे. त्यामुळे शेतकरी कुठल्याही हमीशिवाय बँकेतून 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकणार आहेत.

याआधी ही मर्यादा 1.60 लाख रुपये होती. यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेणं सोप्पं होणार आहे. शेतीसाठी वारेमाप खर्च होतो. त्याचा भार या कर्जामुळे कमी होण्याची शक्यता आहे.

5) अमेरिका, थायलंडच्या व्हिसा नियमात बदल

अमेरिकन दुतावासानं भारतातील व्हीसा प्रक्रियेत 1 जानेवारी 2025 पासून बदल केला असून व्हीसासाठी अर्ज करणाऱ्यांना कुठलंही अतिरिक्त शुल्क न आकारता पुन्हा एकदा अपॉइंटमेंट शेड्यूल करणाऱ्याची परवानगी दिलेली आहे.

याआधी अर्जदार तीनवेळा अपॉईंटमेंट शेड्युल करू शकत होते. त्यासाठी कुठलंही अतिरिक्त शुल्कही आकारलं जात नव्हतं. पण, आता या नियमात बदल झाला असून कुठल्या अर्जदांराना दुसऱ्यांदा अपॉइंटमेंट शेड्युल करायची असेल तर त्यांना नव्यानं अर्ज करायला लागेल आणि व्हीसाचं शुल्क भरावं लागेल.

याशिवाय थायलंडने सुद्धा आपल्या देशात येणाऱ्या पर्यटकांसाठी ई-व्हीसा सुविधा सुरू केली असून 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल. आता भारतासह सगळ्या देशांना आपली व्हीसा प्रक्रिया ऑनलाइन करता येणार आहे. यासाठी थायलंडच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल.

6) व्हॉट्सअपमध्येही मोठा बदल

व्हॉट्सअपमध्येही मोठा बदल दिसून येईल, खासकरून त्यांच्यासाठी जे जुने अँड्रॉईड फोन्स वापरत आहेत.

सॅमसंग, मोटोरोला, HTC, LG आणि सोनी सारख्या कंपन्यांचे असे फोन, जे अँड्रॉइडच्या किटकॅट किंवा त्यापूर्वीच्या व्हर्जनवर चालतात, अशा Android फोन्सवर WhatsApp काम करणं थांबेल.

7) GST च्या प्रक्रियेतही बदल

GST च्या प्रक्रियेतही मोठा बदल झाला आहे, ज्यानुसार आता GST पोर्टल् वापरणाऱ्या सर्व करदात्यांना Multifactor Authentication अर्थात MFA करणं अनिवार्य असेल.

यामुळे व्यवहारांची सुरक्षितता वाढेल, आणि फ्रॉडचा धोका कमी होईल, अशी आशा आहे.

याशिवाय ई-वे बिल तयार करण्यासाठीची कागदपत्र 180 दिवसांपेक्षा जुनी असायला नको.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)