9 मिनिटांत अर्धशतक, 8 चेंडूंवर 8 षटकार, वेगवान अर्धशतकाचा विक्रम करणारा क्रिकेटपटू कोण?

फोटो स्रोत, ANI
मेघालयच्या आकाश चौधरीनं (9 नोव्हेंबर) इतिहास घडवला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगानं अर्धशतक करण्याचा विक्रम त्यानं केला आहे.
हा विक्रम करताना त्यानं 8 चेंडूंवर लागोपाठ 8 षटकारदेखील ठोकले.
अशी कामगिरी करून, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 6 चेंडूंवर लागोपाठ 6 षटकार लगावणारा आकाश तिसरा खेळाडू बनला आहे.
आकाश चौधरीनं हा विक्रम सूरतमध्ये होत असलेल्या रणजी ट्रॉफीच्या प्लेट ग्रुपमधील अरुणाचल प्रदेशच्या विरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी केला.
मेघालयची धावसंख्या 6 गडी बाद 576 धावा असताना आकाश आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता.
मेघालयनं 6 गडी बाद 628 धावा केल्यावर त्यांचा डाव घोषीत केला. त्यानंतर पहिल्या डावात अरुणाचल प्रदेशचा संपूर्ण संघ फक्त 73 धावांवर बाद झाला.
शास्त्री आणि सोबर्सच्या विक्रमाची बरोबरी
आकाशनं हा विक्रम करण्याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 6 चेंडूंवर लागोपाठ 6 षटकार लगावण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा गॅरी सोबर्स आणि भारताच्या रवि शास्त्रीच्या नावावर होता.
अर्थात दक्षिण आफ्रिकेच्या माइक प्रॉक्टरनंदेखील लागोपाठ 6 षटकार लगावले होते. मात्र ते दोन वेगवेगळ्या षटकांमध्ये करण्यात आले होते.
आकाशनं पहिल्या ओव्हरच्या पहिल्या तीन चेंडूंवर दोन धावा काढल्या. त्यानंतर डावखुरा स्पिनर, लिमार डाबीच्या एकाच षटकात आकाशनं लागोपाठ 6 षटकार ठोकले.
यानंतर पुढील षटकांतही आकाशनं ऑफ स्पिनर टीएनआर मोहीतला लागोपाठ दोन चेंडूंवर षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केलं.
याआधी हा विक्रम लीसेस्टरशायरच्या वेन व्हाईटच्या नावावर होता. 2012 मध्ये त्यानं एसेक्स विरुद्धच्या सामन्यात 12 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.
फक्त 9 मिनिटांत अर्धशतक
ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार वेळेचा विचार करता, आकाश चौधरीनं हे अर्धशतक फक्त 9 मिनिटांत पूर्ण केलं. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील हे दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक आहे.
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या माहितीनुसार सर्वाधिक वेगवान अर्धशतकाचा विक्रम अजूनही क्लाईव्ह इनमॅनच्या नावावर आहे.
त्यानं 1965 मध्ये लीसेस्टरशायरकडून नॉटिंघमशायरविरुद्ध खेळताना 13 चेंडूंमध्ये आणि फक्त 8 मिनिटांत अर्धशतक पूर्ण केलं होतं.
आकाश चौधरी उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आहे आणि उजव्या हातानं फलंदाजी करतो. त्याचा जन्म 28 नोव्हेंबर 1999 ला झाला होता.
त्यानं 30 प्रथम श्रेणी सामन्यांमधून 14.37 च्या सरासरीनं 503 धावा केल्या आहेत. तसंच त्यानं 29.97 च्या सरासरीनं एकूण 87 गडी बाद केले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
त्याच्या आधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान अर्धशतक करण्याचा भारतीय विक्रम बनदीप सिंह याच्या नावावर होता. त्यानं 2015 मध्ये जम्मू-काश्मीरकडून खेळताना त्रिपुराच्या संघाविरुद्ध 15 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.
6 चेंडूंवर 6 षटकार ठोकण्याचा विक्रम सर्वात आधी गॅरी सोबर्सनं केला होता. त्यानं 1968 मध्ये नॉटिंघमशायर आणि ग्लेमॉर्गनमध्ये झालेल्या एका काऊंटी सामन्यात मॅल्कम नॅशरच्या षटकात हा विक्रम केला होता.
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवि शास्त्रीनं 1984-85 मध्ये झालेल्या एका रणजी सामन्यात मुंबईकडून खेळताना बडोद्याच्या संघाविरुद्ध हा विक्रम केला होता. त्यावेळेस त्यानं तिलक राजच्या गोलंदाजीवर 6 चेंडूंवर 6 षटकार लगावले होते.
कोण आहेत आकाश चौधरी?
आकाश चौधरीच्या कामगिरीबद्दल, मेघालय क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नबा भट्टाचार्य, बीबीसीचे सहयोगी पत्रकार दिलीप कुमार शर्मा यांना म्हणाले, "आकाश चौधरीनं ही कामगिरी एकाच दिवसात केलेली नाही. तो सुरुवातीपासूनच मेहनती खेळाडू आहे. तो आमच्या संघाचा ओपनर गोलंदाज आहे."
मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये त्यानं प्रचंड मेहनत घेत अष्टपैलू म्हणून स्वतःला विकसित केलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आकाशनं अंडर-16 आणि अंडर-19 सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. तो 2021 पासून रणजी ट्रॉफीमध्ये खेळतो आहे."

आकाश चौधरीबद्दल नबा भट्टाचार्य पुढे म्हणाले की, "तो अतिशय साधारण कुटुंबातील आहे. आकाशचा जन्म आणि संगोपन मेघालयमध्येच झालं आहे. त्याचे वडील मेघालयातच केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत."
"आकाशनं शिलाँगच्या केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेतलं आहे. तो शालेय दिवसांपासूनच क्रिकेट खेळतो आहे. अर्थात मूलत: आकाशचं कुटुंबं बिहारमधील आहे. मात्र आता ते मेघालयचेच रहिवासी आहेत."
आकाशला लवकरच आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळेल, अशी आशादेखील नबा भट्टाचार्य यांनी आशा व्यक्त केली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











