हिंदुजा: ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत कुटुंबातील सदस्यांना 'या' प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा

अजय आणि नम्रता हिंदुजा

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, अजय आणि नम्रता हिंदुजा

ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत हिंदुजा कुटुंबातील सदस्यांना स्वित्झर्लंडच्या एका न्यायालयानं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

हिंदुजा कुटुंबातील प्रकाश आणि कमल हिंदुजा यांना प्रत्येकी साडेचार वर्ष, तर त्यांचा मुलगा अजय आणि सून नम्रता यांना प्रत्येकी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या चार सदस्यांविरोधात स्वित्झर्लंडमध्ये मानवी तस्करी आणि शोषणाचा खटला सुरू होता. घरातील नोकरांना अत्यंत कमी पगार देण्याच्या, नोकरांपेक्षा कुत्र्यावर अधिक खर्च करण्याच्या आणि कुठेही जाण्या-येण्यावर बंधनं घालण्याचे आरोप त्यांच्यावर होते.

या सर्वांनी भारतातून काही जणांना जीनिव्हातील त्यांच्या एका बंगल्यात काम करण्यासाठी नेलं होतं. या कर्मचाऱ्यांकडून हिंदुजा कुटुंबीयांनी जास्त वेळ काम करून घेतलं आणि फक्त 8 डॉलर प्रति दिन इतकाच पगार दिला.

स्वित्झर्लंडच्या प्रशासनानं हा देखील आरोप केला आहे की, हिंदुजा कुटुंबानं या लोकांचे पासपोर्ट स्वत:च्या ताब्यात घेतले. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना कुठेही जाण्या-येण्यास मनाई केली होती.

हिंदुजा कुटुंब हे आघाडीचे उद्योगपती आहेत. त्यांचं उद्योग साम्राज्य 47 अब्ज डॉलरचं आहे. इतकी प्रचंड संपत्ती असलेल्या हिंदुजा कुटुंबाच्या वकिलांन या प्रकरणासंदर्भात जो युक्तिवाद केला आहे तो वादग्रस्त ठरला आहे.

वकिलानं म्हटलं आहे की, कर्मचाऱ्यांच्या राहण्या आणि खाण्यावर होत असलेल्या खर्चाचासुद्धा विचार करण्यात आल्यामुळे वेतनाची रक्कम इतकी कमी होती.

हिंदुजा कुटुंबाच्या व्यवसायाचा जगभरातील विस्तार

हिंदुजा कुटुंबाची मूळं भारतात आहेत. हिंदुजा समूह प्रसिद्ध आहे. या समूहात अनेक कंपन्या आहेत.

हिंदूजा समूहाच्या व्यवसायाचा विस्तार बांधकाम, कापड, ऑटोमोबाइल, कच्चे तेल, बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्रात झालेला आहे.

परमानंद दीपचंद हिंदुजा हे हिंदुजा समूहाचे संस्थापक आहेत. त्यांचा जन्म फाळणीपूर्व भारतातील सिंध प्रांतातील शिकारपूर शहरात झाला होता.

परमानंद हिंदुजा भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (तेव्हाचे बॉम्बे) 1914 मध्ये आले होते.

हिंदुजा समूहाच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, परमानंद हिंदुजा यांनी लवकरच व्यापारातील बारकावे शिकून घेतले होते.

सिंधमध्ये सुरू झालेला व्यावसायिक प्रवास 1919 मध्ये इराणपर्यंत पोहोचला होता. त्यावर्षी त्यांनी इराणमध्ये एक कार्यालय सुरू केलं आणि आपला व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला.

विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे 1979 पर्यत इराणमध्येच हिंदुजा समूहाचं मुख्यालय होतं. नंतरच्या काळात ते युरोपला हलवण्यात आलं.

व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात व्यापारी बँकिंग आणि ट्रेंडिंग या व्यवसायांवर हिंदुजा समूहाचा भर होता.

हिंदुजा कुटुंबीय.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिंदुजा कुटुंबाला कमी पगार देण्याचा आणि शोषण करण्याच्या आरोपांना तोंड द्यावं लागतं आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हिंदुजा समूहाचे संस्थापक असलेल्या परमानंद दीपचंद हिंदुजा यांना तीन मुलं होती. श्रीचंद, गोपीचंद आणि प्रकाश हिंदुजा. नंतरच्या काळात या तिन्ही मुलांनी वडिलांच्या व्यवसायाची धुरा सांभाळली. त्यांनी परदेशात व्यवसायाचा विस्तार केला.

2023 मध्ये श्रीचंद हिंदुजा यांचं निधन झालं. त्यानंतर व्यवसायाचं नेतृत्व त्यांचे छोटे भाऊ गोपीचंद यांच्याकडे आलं. तेच हिंदुजा समूहाचे प्रमुख बनले.

स्वित्झर्लंडमध्ये मानवी तस्करी प्रकरणाला तोंड देत असलेले प्रकाश हिंदुजा यांच्या हाती मोनॅकोमधील व्यवसाय होता.

युनायटेड किंगडम (युके) मध्ये हिंदुजा कुटुंबाच्या मालकीच्या महागड्या मालमत्ता आहेत.

सप्टेंबर 2023 मध्ये हिंदुजा समूहानं लंडनमध्ये रफ्फल्स नावाचं हॉटेल बनवलं होतं. विशेष म्हणजे लंडनच्या व्हाइटहॉलमध्ये असलेल्या ओल्ड वॉर ऑफिसमध्ये हे हॉटेल बांधण्यात आलं आहे. इथेच पूर्वी ब्रिटनचं संरक्षण मंत्रालय देखील होतं. या हॉटेलचं महत्त्वाचं वैशिष्टयं असं की, ते ब्रिटनच्या पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या 10 डाऊनिंग स्ट्रीट पासून काही मीटर्स अंतरावरच आहे.

कार्लटन हाऊसमध्ये देखील हिंदुजा समूहाचा मालकी हिस्सा आहे. याच इमारतीमध्ये अनेक कार्यालयं, घरं आणि इव्हेंट रुम आहेत. त्याचबरोबर ही इमारत जगप्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेसपासून खूपच जवळ आहे.

हिंदुजा समूहात जगभरातील विस्तारात एकूण 2 लाख लोक काम करत असल्याचं समूहाचं म्हणणं आहे.

जून 2020 मध्ये युकेच्या एका न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं होतं. या प्रतिज्ञापत्रानुसार हिंदुजा भावांचे आपापसातील संबंध फारसे चांगले नव्हते.

कागदपत्रांनुसार हिंदुजा भावांमधील सर्वांत मोठ्या श्रीचंद हिंदुजा यांनी आपल्या छोट्या भावाच्या विरोधात खटला दाखल केला होता. स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा येथील एका बँकेतील आपला मालकी हक्क परत मिळवण्यासाठी श्रीचंद हिंदुजा यांनी हा खटला दाखल केला होता.

कर्मचाऱ्यांपेक्षा कुत्र्यांवरच अधिक खर्च

जवळपास 6 वर्षांपासून हिंदुजा कुटुंबावर स्वित्झर्लंडच्या प्रशासनाचं लक्ष आहे. जीनिव्हामधील हिंदुजा कुटुंबाच्या मालकीच्या एका घरात आपल्या कर्मचाऱ्यांना हिंदुजा कुटुंब देत असलेल्या वर्तवणुकीविरोधात तिथल्या प्रशासनानं तपास सुरू केल्यापासून हे लक्ष ठेवण्यात येत होतं.

मागील आठवड्यात हिंदुजा कुटुंबानं पीडितांशी आर्थिक तडजोड केली होती. त्यामुळे शोषण करत असल्याच्या प्रकरणातून हिंदुजा कुटुंबाला न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता.

पण, तरीही या कुटुंबावर मानवी तस्करी केल्याचा आरोप होता. या प्रकरणातील आरोपी प्रकाश आणि कमल हिंदुजा यांना साडेपाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी स्विस वकिलांनी केली होती. इतकंच नव्हे तर त्यांचा मुलगा अजय आणि सून नम्रता यांना प्रत्येकी चार वर्षांची शिक्षा व्हावी अशीही मागणी करण्यात आली होती.

10 डाऊनिंग स्ट्रीट च्या जवळ असलेलं हिंदुजा समूहाचं हॉटेल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 10 डाऊनिंग स्ट्रीटच्या जवळ असलेलं हिंदुजा समूहाचं हॉटेल

सोमवारी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यानंतर आणि तपास यंत्रणांकडून हिंदुजा कुटुंबीयांवर आरोप करण्यात आल्यानंतर ब्रिटन आणि भारतातील प्रसारमाध्यमांचं लक्ष या प्रकरणाकडे वेधलं गेलं आहे.

ब्लूमबर्गमधील बातमीनुसार, सरकारी वकील य्वेस बेरतोसा यांनी न्यायालयात सांगितलं की, "हिंदुजा कुटुंबानं आपल्या एका कुत्र्यावर नोकरांपेक्षा जास्त खर्च केला आहे."

तिथल्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, हिंदुजा यांच्याकडे काम करणाऱ्या एका महिलेनं एका दिवसात तब्बल 18 तास काम केलं होतं आणि त्याबदल्यात तिला फक्त 7.84 डॉलर्सचा मोबदला मिळाला होता. तर कागदपत्रांनुसार हिंदुजा कुटुंबानं आपल्या एका कुत्र्याचा आहार, त्याची निगा राखणं यावर वर्षाकाठी 10 हजार अमेरिकन डॉलर्स खर्च केले होते.

अधिकाऱ्यानं सांगितलं की, अनेक नोकरांना आठवड्यातील सातही दिवस काम करावं लागत होतं. महत्त्वाचं म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये असूनसुद्धा फ्रॅंकऐवजी (स्वित्झर्लंडचं चलन) त्यांना पगार मात्र भारतीय रुपयातच दिला जात होता.

वादग्रस्त वक्तव्य

बीबीसी जीनिव्हाच्या इमोजेन फोक्सच्या बातमीनुसार, हिंदुजा कुटुंबाच्या वकिलांनी कर्मचाऱ्यांचं वेतन कमी असल्याचे आरोप फेटाळले नाही. मात्र त्यांचा युक्तिवाद असा होता की, यामध्ये कर्मचाऱ्यांचं राहणं आणि जेवणं यांचाही समावेश होता.

याएल हयात या वकिलानं म्हटलं की, "तुम्ही वेतन कमी करू शकत नाही."

हिंदुजा कुटुंबानं कर्मचाऱ्यांना अधिक वेळ काम करायला लावण्याचे आरोपदेखील त्यांच्याकडून फेटाळण्यात आले. या मुद्द्याबाबत त्यांच्या एका वकिलानं म्हटलं होतं की, लहान मुलांबरोबर चित्रपट पाहण्यास काम करणं मानता येणार नाही.

हिंदुजा कुटुंबाच्या वकिलांचं म्हणणं आहे की, अनेक कथित पीडित कर्मचाऱ्यांनी अनेक प्रसंगी हिंदुजा कुटुंबाकडे काम केलं आहे. याचाच अर्थ ते सर्व काम करण्याच्या पद्धतीबद्दल, त्यांना दिल्या जाणाऱ्या वर्तणुकीबद्दल समाधानी होते.

हिंदुजा कुटुंबाची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी, हिंदुजा कुटुंबासाठी याआधी काम केलेल्या अनेक लोकांना साक्षीसाठी बोलावलं होतं.

न्यायालयात सुनावणीसाठी जात असताना हिंदुजा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, न्यायालयात सुनावणीसाठी जात असताना हिंदुजा

साक्ष देणाऱ्या या लोकांनी हिंदुजा कुटुंबाची वर्तवणूक चांगली असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर असंही सांगितलं की, हिंदुजा कुटुंब आपल्या कर्मचाऱ्यांना सन्मानानं वागवायचे.

हिंदुजा कुटुंबाच्या वकिलानं सरकारी वकिलावरच आरोप केले. सरकारी वकिलावर त्यांनी क्रौर्य आणि बदनाम करण्याचे आरोप केले.

बचाव पक्षाचा एक वकील म्हणाला, "इतर कोणत्याही कुटुंबाबरोबर असं झालेलं नाही."

मात्र, हिंदुजा कुटुंबासाठी काम करणाऱ्या नोकरांचे पासपोर्ट ताब्यात घेण्याचा आणि त्यांना कुठेही येण्या-जाण्यास मनाई करण्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. हा मुद्दा हिंदुजा कुटुंबासाठी चिंतेची मुख्य बाब आहे.

या कारणांमुळे स्वित्झर्लंडच्या कायद्यांनुसार या गोष्टीला मानवी तस्करी मानलं जातं.

त्यामुळेच बेरतोसा हे सरकारी वकील तुरुंगवासाच्या शिक्षेबरोबरच हिंदुजा कुटुंबीयांना 10 लाख डॉलर दंड आणि नोकरांना 40 लाख डॉलर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करत आहेत.

जीनिव्हा मधील आधीची प्रकरणं

जीनिव्हा हे काही सामान्य शहर नाही. या शहरात जगातील सर्वांत श्रीमंत लोकांचं वास्तव्य असतं. इतकंच नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालयं किंवा मुख्यालयं या शहरात आहेत. हिंदुजा कुटुंबाचं प्रकरण हे काही जीनिव्हातील या प्रकारचं पहिलंच प्रकरण नाही.

2008 मध्ये लिबियाचे माजी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांचा मुलगा हानिबल गद्दाफी याला अल्पाईन सिटी पोलिसांनी एका पंचतारांकित हॉटेलातून अटक केली होती. हानिबल गद्दाफी आणि त्याच्या पत्नीवर आपल्या नोकराला मारहाण केल्याचा आरोप होता.

ग्राफिक्स

स्वित्झर्लंडमध्ये हानिबल गद्दाफीला अटक झाल्याचे पडसाद लिबियामध्ये उमटले होते. त्रिपोलीमध्ये 2 स्विस नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्रिपोली ही लिबियाची राजधानी आहे. या प्रकरणामुळे प्रकरणामुळे लीबिया आणि स्वित्झर्लंड या दोन देशांमधील राजनयीक संबंधांना तडा गेला होता. त्यामुळे गद्दाफींचं प्रकरण बंद करण्यात आलं होतं.

मागील वर्षी संयुक्त राष्ट्रसंघातील एका राजदूताविरोधात 4 फिलिपिनी नोकरांनी तक्रार नोंदवली होती. आपल्याला अनेक वर्षांपासून पगार मिळाला नसल्याचा या नोकरांचा आरोप होता.