You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डिजिटल अरेस्टमुळे डॉक्टर महिलेला हार्ट अटॅक, धमक्यांचे मेसेज मृत्यूनंतरही सुरूच; नेमकं काय आहे प्रकरण?
हैद्राबादमधील 76 वर्षीय निवृत्त महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्टचा सामना करावा लागला. दुर्दैवाने, सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झालेल्या या पीडितेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
विशेष म्हणजे, या महिलेच्या मृत्यूनंतरही गुन्हेगारांकडून धमक्यांचे मेसेजेस येणं सुरुच होतं.
हैदराबादच्या सायबर क्राइम पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हैदराबाद सायबर क्राइम ब्रांचच्या डीसीपी तारा कविता यांनी या प्रकरणाबद्दल बीबीसीशी सविस्तर संवाद साधला.
"आम्ही या प्रकरणी 1669/2025 क्रमांकाखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास सुरू आहे," असंही त्या म्हणाल्या.
त्यांनी असंही नमूद केलं की पीडितेचं नाव आणि तिच्या कुटुंबियांची माहिती उघड करता येणार नाही. सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये पीडितांची ओळख नेहमीच गुप्त ठेवली जाते.
बनावट अकाऊंटमध्ये केले पैसे ट्रान्सफर
हैदराबाद शहरातील युसुफगुडा परिसरात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घडलेली ही घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पीडित महिला मलकपेट रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होती.
डीसीपी कविता यांनी बीबीसीला सांगितलं की, या महिलेला 5 ते 8 सप्टेंबर दरम्यान 'डिजिटल अरेस्ट' करण्यात आली होती.
या डिजिटल अरेस्टमध्ये त्यांना अनेक धमक्या देण्यात आल्या तसेच त्यांचा छळ झाल्याचंही आढळून आलं.
सायबर गुन्हेगारांनी त्यांना 5 सप्टेंबर रोजी पहिल्यांदा फोन केला होता, असं पोलीस तपासात आढळून आलं आहे.
पोलिसांचं असं म्हणणं आहे की, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी त्यांच्या बँक खात्यातून महाराष्ट्रातील एका बनावट खात्यात 6,60,543 रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
असं सांगितलं जातं की, सायबर गुन्हेगार फसवणूक करतात. त्यानंतर ते सर्वांत आधी हे फसवणूक केलेले पैसे बनावट खात्यात जमा करतात.
नंतर, हे पैसे ते इतर अनेक बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करतात.
शेवटी, ते पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित करून ते 'लाँडर' करतात.
लाँडर करणं म्हणजे बेकायदेशीरपणे जमवलेला पैसा परदेशी बँकांतील खात्यावर जमा करणं किंवा वैध उद्योगधंद्यात घालणं होय. ज्यामुळे तो पैसा कुठून आला हे इतरांना समजणार नाही. थोडक्यात काळा पैसा पांढरा करणं होय.
अंत्यसंस्कारानंतरही आले धमक्यांचे मेसेज
या मृत महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांना 8 सप्टेंबर रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोबाईल फोनवर काही मेसेज येत असल्याचं कुटुंबीयांना लक्षात आलं आणि त्या सायबर फसवणुकीला बळी ठरल्या असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांना आला.
त्यानंतर, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे आहे की, "सायबर गुन्हेगारांकडून होणारा छळ आणि धमक्या सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे."
"आम्हाला असं आढळलं की सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मृत्यूनंतरही त्याच्या फोनवर काही मेसेजेस पाठवले होते.
तसेच, त्यांना सुरुवातीला आलेल्या फोन नंबरपेक्षा वेगळ्या फोन नंबरवरून कॉल आले होते," असंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
या घटनेबाबत 'टाईम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, त्यांनी 'जयशंकर सर' या नावानं नवीन फोन नंबर सेव्ह केला होता.
असं म्हटलं जातंय की, व्हॉट्सअॅपवर बनावट कोर्ट नोटीस देखील पाठवण्यात आली होती आणि अनेक व्हीडिओ कॉलदेखील आले होते.
सध्याच्या परिस्थितीत, डीसीपी कविता यांनी स्पष्ट केलं की सर्व तपशील आता जाहीर करता येणार नाहीत आणि तपास पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण तपशील जाहीर केले जातील.
डिजिटल अरेस्ट व्यतिरिक्त या गोष्टींचीही काळजी घ्या
डिजिटल अरेस्ट तसेच इतर ऑनलाइन घोटाळ्यांपासून सावध कसे राहायचे याची माहिती देणारा व्हीडिओ सर्वप्रिया सांगवान ( एडिटर, डिजिटल व्हीडिओ ) यांनी केला आहे. त्या व्हीडिओतील माहिती पुढे देत आहोत. हा व्हीडिओ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.
डिजिटल अरेस्टशिवाय ऑनलाइन घोटाळ्याचे अनेक प्रकार आहेत. कधी एखाद्या अनोळखी क्रमांकावरून व्हीडिओ कॉल येतो. जर दोन तीन वेळा फोन करूनही तुम्ही फोन उचलला, तर स्क्रीनवर काहीच येत नाही. अचानक एक विवस्त्र महिला स्क्रीनवर येते आणि ब्लॅकमेलिंगची सुरुवात होते. पैसे पाठवले नाही, तर स्क्रीनशॉट पाठवू अशी धमकी देण्यात येते.
काही लोकांना असे इमेल येतात जे एकदम सरकारी दिसतात, त्यावर सरकारी शिक्का असतो. सीबीआय किंवा तत्सम संस्थेने त्यांना नोटिस पाठवली आहे आणि आता तपासणी होणार असं त्यात सांगितलेलं असतं. हाही एका प्रकारचा घोटाळा आहे.
कर्ज देणाऱ्या ॲप्सचा तर प्रचंड सुळसुळाट झाला आहे. तिथे लोकांना सहज कर्ज उपलब्ध होतं, मात्र त्यानंतर त्यांना हप्त्यासाठी ब्लॅकमेल केलं जातं. या प्रकारामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. बीबीसीने यावर एक माहितीपट तयार केला आहे. तो तुम्ही इथे पाहू शकता.
या वर्षीच्या सुरुवातीला सरकारने 31 लाख लोकांनी सायबर क्राइमच्या तक्रारी दाखल केल्याची माहिती दिली होती.
लोकसभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितलं की, 2023-24 या काळात अशा घोटाळ्यामध्ये 177 कोटी रुपये लुटल्याची माहिती दिली. हे सगळं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट डेबिट कार्ड आणि बँकिग फ्रॉडच्या माध्यमातून केलं आहे. त्याशिवाय अनेक प्रकारांनी हे पैसे लुटले आहेत.
मग करायचं काय?
आता प्रश्न असा उरतो की असा प्रकार झाला तर करायचं काय?
केंद्र सरकारने https://cybercrime.gov.in/webform/Crime_NodalGrivanceList.aspx नावाचं एक पोर्टल तयार केलं आहे. तुमच्याबरोबर जर इंटरनेट, फोन, किंवा कोणत्याही पद्धतीने घोटाळा झाला असेल, तर तक्रार नोंदवता येते. प्रत्येक राज्यासाठी वेगळा क्रमांक दिला आहे. त्यामुळे फोनवरुनही तक्रार नोंदवू शकता.
महाराष्ट्रासाठी 022-22160080 हा क्रमांक आहे. दिल्ली पोलिसांनीसुद्धा 1930 क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे. याशिवाय थेट 112 क्रमांकावरही फोन करू शकता. अशा घोटाळ्यांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी सुरू झालेल्या हेल्पलाइनची माहिती घ्या आणि ते सगळे नंबर्स सेव्ह करा. आपल्या कुटुंबियांनासुद्धा असं करायला सांगा. जितकी लवकर तक्रार दाखल कराल, तितके पैसै परत मिळण्याच्या शक्यता वाढते.
बँक काय मदत करू शकते?
रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, तुमचं कार्ड क्लोन करून पैसै काढले असतील, तर तुम्ही पहिल्या तीन दिवसात बँकेला कळवलं तर तुमचे सगळे पैसे परत मिळतात. 4-7 दिवसांच्या आत सांगा. तुम्हाला जास्तीत जास्त 5000 ते 25000 पर्यंत नुकसान सोसावं लागतं. त्यातले कमीत कमी पैसे बँक स्वत:कडे ठेवते आणि इतर पैसे ग्राहकांना परत करते.
सात दिवसानंतर कळवलं तर मात्र एक रुपयाही परत मिळत नाही. तुम्ही ओटीपी दिला किंवा चुकीच्या व्यवहाराची माहिती बँकेला दिली नाही, तर त्याचं नुकसान तुम्हाला सहन करावं लागेल. ती ग्राहकाची जबाबदारी आहे की नाही, निष्काळजीपणा केला की नाही, हे सगळं सिद्ध करणं बँकेचे काम आहे.
मात्र आजच्या काळात हा धोका कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय हा शब्द परवलीचा झाला आहे. एआयचा वापर करून तुम्ही लोकांचा चेहरा बदलू शकता, आवाज बदलू शकता. म्हणजे एआयचा वापर करून तुम्ही आर्थिक अडचणीत आहात किंवा तुमचा फोन हरवला आहे असं खोटं सांगून तुमच्या आईवडिलांना किंवा नातेवाईकांना फोन केला किंवा पैसे मागितले तर? या धोक्यांना खरंतर काहीच सीमा नाही. त्यामुळे सरकारला एआयबाबत नियमावली आणणं आवश्यक आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं काही झालं तर थोडं थांबा, विचार करा, आपल्याबरोबर काही चुकीचं होत नाहीये ना हा विचार करा. घोटाळेबाजांच्या प्रश्नांना भांबावून जाऊन उत्तरं देऊ नका.
अशा प्रकरणात सजग राहण्याची अतिशय गरज आहे. जर तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करत असेल, तर त्याची तक्रार करा. हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. एकदा पैसे गेले की, पैसे परत आणणं पोलिसांना कठीण होतं. जे लोक हे घोटाळे करतात, त्यांचा माग घेणंही पोलिसांना अतिशय कठीण जातं. कारण हे लोक दुसऱ्या देशात असतात, कधी दुसऱ्या राज्यात असतात. त्यामुळे पोलिसांना कार्यक्षेत्राची समस्या येऊ शकते.
घोटाळेबाजांकडे वेगळ्याच व्यक्तीच्या नावाचे सिमकार्ड असतात. कधी सेकंड हँड फोन किंवा चोरीचा फोन असतो. वेगळ्याच आयडीने तयार केलेलं अकाऊंट असतं. एकदा पैसे मिळाले की, ते या सगळ्या गोष्टी नष्ट करतात. ज्या लोकांच्या नावाचं ॲड्रेस प्रुफ, फोटो वगैरे चोरला असतो, पोलीस त्यांच्याकडे जातात आणि गुन्हेगार तसेच मोकाट फिरत असतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)