ब्राझील : संसदेवरील हल्ल्याचं डोनाल्ड ट्रंप कनेक्शन काय आहे?

संसदेत तोडफोड, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनावर हल्ला बोल, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड… ब्राझीलच्या राजकारणानं असं हिंसक वळण घेतलंय.

8 जानेवालीला ब्राझीलच्या राजधानीत संसद, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनावर माजी राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांचे हजारो समर्थक चालून गेले.

काहींनी संसदेत तोडफोड केली तर काहींनी अध्यक्षांच्या खुर्चीवर चढून नव्या राष्ट्राध्यक्षांचा विरोध केला. ब्राझीलमध्ये हे सगळं का घडतंय? या वादाचं मूळ कुठेय? ऑक्टोबर महिन्यात ब्राझीलमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या. उजव्या विचाराचे जेअर बोल्सोनारो यांना लोकांनी दुसऱ्यांदा सत्ता दिली नाही, डाव्या विचारांचे लुला डा सिल्व्हा सत्तेत आले.

तेव्हापासून बोल्सोनारोंचे कडवे समर्थक राजधानीत आणि इतर अनेक ठिकाणी लष्कराच्या ठाण्यांसमोर येऊन निदर्शनं करत होते.

निवडणुकीत घोटाळा झाल्याचे त्यांचे आरोप आहेत. बोल्सोनारो यांनीही सार्वजनिकरित्या पराभव स्वीकारला नाही.

पण 8 डिसेंबरला त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं. ब्राझीलची राजधानी ब्राझिलियामध्ये असलेल्या लष्करी मुख्यालयापासून ही गर्दी हातात राष्ट्रध्वज घेऊन संसद भवन, राष्ट्राध्यक्ष भवन आणि सुप्रीम कोर्टावर चालून गेली.

ब्राझिलियाच्या एका प्रमुख चौकात या तिन्ही इमारती आहेत. या चौकातून थोडं पुढे गेलं की सगळी मंत्रालयं लागतात.

लष्कराचं मुख्यालय ते मंत्रालयांच्या इमारतींपर्यंतचं 8 किलोमीटरचं अंतर चालून जाताना त्यांना वाटेत कोणत्याच सुरक्षा यंत्रणेने अडवलं कसं नाही, हा प्रश्न सगळ्यांना गोंधळात टाकतोय. आंदोलनकर्त्यांनी संसदेच्या छतावर चढून तोडफोड केली, हजारो लोक रस्त्यांवर उतरले.

एवढंच नाही तर कॅबिनेट मंत्र्यांनी एक व्हीडिओ ट्वीट करत दावा केलाय की या हिंसक आंदोलनकर्त्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासातून हत्यारंही नेलीयेत.

हल्ला, गोंधळ आणि अखेर नियंत्रण

हा सगळा गदारोळ सुरू असताना सुरुवातीला ब्राझील पोलीस आणि लष्कर काहीच करत नव्हतं असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

काही काळानंतर जेव्हा पोलीस कारवाई सुरू झाली तेव्हा पोलिसांनी साधारण 200 आंदोलकांना ताब्यात घेतल्यांची माहिती मिळाली.

पोलिसांनी आंदोलकांना थांबवण्याठी अश्रुधुराचा मारा केला, लाठीमारही झाला आणि अखेर पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. गेल्या आठवड्यात ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून लुला डा सिल्व्हा यांनी शपथ घेतली. या शपथविधीनंतरच बोल्सोनारोंचे समर्थक आक्रमक झाले होते.

आता या सगळ्या प्रकरणाचा लुला त्यांनी निषेध नोंदवलाय. त्यांनी माजी राष्ट्राध्यक्षांच्या समर्थकांना कठोरात कठोर शिक्षा करू असं म्हटलं.

सोबतच रविवारी आमच्या शांत भूमिकेचा फायदा उचलला गेला, या हिंसाचाराची बोल्सोनारो यांच्या पक्षानं आणि वैयक्तिक त्यांनीही जबाबदारी घ्यायला हवी असंही ते म्हणालेत.

लुला घटनेनंतर साओ पाओलोचा दौरा सोडून तातडीने राजधानीत परत आले. मात्र 67 वर्षीय बोल्सोनारो यांनी या हिंसाचारापासून स्वत:ला दूर करत या प्रकाराचा निषेध केलाय. ते सध्या अमेरिकेत आहेत. राजधानी ब्राझिलियाचे गव्हर्नर इबानेइस रोखा यांना 90 दिवसांसाठी निलंबित करण्याक आलंय.

राजधानीत हा सगळा प्रकार घडत असताना गव्हर्नर शांत होते आणि काहीच कारवाई करत नव्हते असं केंद्राने सुप्रीम कोर्टाला सांगितल्यानंतर तिथल्या सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतलाय.

अशा हल्ल्याची कुणकुण असतानाही गव्हर्नर रोखा ब्राझिलियामध्ये राजकीय आंदोलनाचं समर्थन करणारी भाषणं करत होते.

अमेरिकेच्या कॅपिटॉल इमारतीत झालेल्या संघर्षाची आठवण

ब्राझीलमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारानंतर अनेकांना 6 जानेवारी 2021 मध्ये अमेरिकेच्या कॅपिटॉल इमारतीत झालेल्या संघर्षाची आठवण झाली.

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काही आठवड्यांनी त्यांच्या समर्थकांनी अशाचप्रकारे संसदेवर हल्ला चढवला होता.

ट्रंप यांनी अशा हल्ल्यासाठी भाषणांमधून चिथावणी दिली होती असे आरोप आणि त्यांची संसदीय चौकशीही झाली.

ट्रंप आणि बोल्सोनारो यांच्या अनेक भूमिका आणि धोरणांमध्ये साम्य आहे याकडेही अनेकांनी लक्ष वेधलं.

ब्राझीलला जागतिक पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो, संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांच्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण नेत्यांनी या हिंसाचाराचा निषेध केलाय.

ब्राझीलचे राष्ट्रपती लुला डा सिल्वा यांना टॅग करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, "ब्राझीलमध्ये झालेल्या दंगली आणि तोडफोडीच्या बातम्यांमुळे मी चिंतित आहे. लोकशाहीचा सर्वांनी आदर केला पाहिजे. आम्ही ब्राझील सरकारला पूर्ण पाठिंबा देतो."

डोनाल्ड ट्रंप कनेक्शन

बोलसोनारो आणि ट्रंप यांच्या आंदोलनाचं कनेक्शन आहे हे दाखवण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि बोलसोनारो यांच्या मुलाची फ्लोरिडा रिसॉर्टमध्ये नोव्हेंबर दरम्यान भेट झाल्याचा हवाला दिला जातोय.

वॉशिंग्टन पोस्ट आणि इतर वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्या दौऱ्यात इक्वार्डो बोलसोनारो यांनी बॅनन आणि ट्रंप यांचे सल्लागार जेसन मिलर यांच्याशीही चर्चा केली.

ब्राझीलमध्ये झालेल्या निवडणुकीवर टीका करणाऱ्यांनी 2020 च्या अमेरिकन निवडणुकांचा संदर्भ देत ब्राझीलच्या मतदान प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केलेत. ब्राझीलमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरण्यात आलं त्यावर संशय व्यक्त केला जातोय.

रविवारी आंदोलनकर्त्यांनी काही बॅनर्स झळकवले, यावर इंग्रजी आणि पोर्तुगालीमध्ये 'व्ही वॉन्ट सोर्स कार्ड' असं लिहिलं होतं. बोलसोनारोंचा पराभव व्हावा म्हणून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये छेडछाड केली असल्याचं या लोकांचं म्हणणं आहे.

बीबीसीच्या एका विश्लेषणानुसार, ब्राझीलमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर या निवडणुका नाकारणाऱ्या लोकांची ट्विटर खाती बंद करण्यात आली होती. मात्र इलॉन मस्कने ट्विटर खरेदी केल्यानंतर ही खाती परत सुरू केली गेली.

ब्राझीलमधील ट्विटरचे काही कर्मचारी "राजकीयदृष्ट्या पक्षपाती विचार" ठेवत असल्याचा आरोप इलॉन मस्क यांनी केला होता. यासाठी त्यांनी कोणताही तपशील किंवा पुरावा दिलेला नव्हता.

अमेरिकेतील ट्रंप यांच्या विरोधकांनी ब्राझीलमधील सध्याच्या अशांततेसाठी माजी अध्यक्ष बोलसोनारो यांना जबाबदार धरलंय.

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार आणि कॅपिटल दंगलीची चौकशी करणार्‍या समितीचे सदस्य जेमी रस्किन यांनी ट्विट करत म्हटलंय की, "फॅसिस्ट विचारसरणीचे लोक 6 जानेवारीच्या ट्रंप दंगलीसारखे दंगल घडवून आणत आहेत."

बीबीसीने बॅनन आणि अलेक्झांडर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचलंत का?