एल्विश यादव : रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष का वापरतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, टीम बीबीसी गुजराती
- Role, नवी दिल्ली
यूट्युबर आणि बिग बॉस ओटीटीचा विजेता एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे.
एएनआय आणि पीटीआय या वृत्तसंस्थांनी हे वृत्त दिलं आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार नोएडा पोलिसांनी एल्विशला नोएडामधील सूरजपूर न्यायालयात हजर केलं आहे.
8 नोव्हेंबर 2023 ला नोएडा पोलिसांनी रेव्ह पार्टीमध्य सापाचं विष वापरल्याप्रकरणी एक एफआयआर दाखल केली होती. त्यामध्ये एल्विश यादवचं नाव आरोपी म्हणून होतं.
या प्रकरणात एल्विश आणि त्याच्यासह सात जणांवर एफआयआर नोंदवण्यात आला होता.
हा एफआयआर वन्यजीव संरक्षण कायदा,1972 नुसार दाखल झाला असून माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार मेनका गांधी यांच्या पीएफए संस्थेच्या तक्रारीनंतर तो दाखल करण्यात आला.
एफआयआरमध्ये ही संस्था म्हणते, 'आम्हाला एल्विश यादव नावाचा युट्यूबर सापाचं विष आणि जिवंत साप घेऊन आपल्या टोळक्यासह नोएडामध्ये फार्म हाऊसमध्ये रेव्ह पार्टी आणि व्हीडिओ शूट करतो. तिथं परदेशी युवतींना बोलावलं जातं त्यांच्यासह सापाचं विष तसेच इतर नशा आणणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं जातं. '
नशा करण्यासाठी सर्पदंशाचे प्रकार चीन, रशिया आणि पाश्चिमात्य देशांमध्ये अनेक वर्षांपासून होत आहेत. भारतातही आता पार्ट्यांमध्ये अशाप्रकारे सापाचं विष घेण्याचे प्रकार वाढत आहेत.
दुसरीकडं सापाच्या विषामुळं होणाऱ्या मृत्यूच्या प्रकरणांमध्ये भारत जगभरात आघाडीवर आहे. तरीही सर्पदंशाला 'गाव आणि गरीब' यांची समस्या म्हणून पाहिलं जातं.
रेव्ह पार्ट्यांमध्ये सर्पदंशाची नशा?
भारतातील विषारी सापांना चीन, रशिया आणि फ्रान्ससह पाश्चिमात्य देशांतून मोठी मागणी आहे. विदेशातही काही लोक खास असे साप पाळण्याचा छंद बाळगतात.
याची हवाई मार्गे होणारी तस्करी रोखण्यासाठी अबकारी विभागाकडून खास खबरदारी बाळगली जाते. पण नेपाळ आणि बांगलादेश सारख्या जमिनीवरील मार्गांनी सापाची तस्करी झाल्याचं पाहायला मिळालंय. अनेकदा असे रॅकेट्स उघडकीस आले आहेत.
भारतात रेव्ह पार्टी किंवा नव्या वर्षानिमित्तच्या पार्ट्यांमध्ये मजा-मस्तीसाठी सर्पदंशातून नशा करण्याचे प्रकार वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या जंगलांमधून विषारी साप मुंबईसारख्या शहरांत पार्ट्यांसाठी पाठवणाऱ्या रॅकेटचाही पर्दाफाश झालेला होता.
सुत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, नशेचं व्यसन असलेलेल्यांना मॉर्फीन किंवा अफू अशा मादक पदार्थांची सवय असते. पण वारंवार त्याचं सेवन केल्यामुळं त्यांना यातून नशा मिळणं बंद होतं.
त्यामुळं आणखी नशा करण्यासाठी ते धोकादायक अशा पदार्थांकडं वळतात. त्याचाच एक पर्याय आहे सापाचं विष. काही लोक पार्ट्यांमध्ये सापाची पिल्लं ठेवतात आणि त्यांना त्रास देऊन त्यांच्या दंशातून नशा किंवा आनंद मिळवतात.
अँटिडोटला विष का म्हणतात?
वेगवेगळ्या प्रजातींच्या सापाच्या दंशातून वेगवेगळ्या प्रमाणात विषाचा प्रसार होतो. म्हणजे एकाच प्रजातीच्या पण वेगवेगळ्या सापांमध्येही विषाचं प्रमाण अधिक असतं.
याचा अर्थ सापाचं वय लिंग किंवा वातावरण यामुळंही त्याच्या विषाची घातकता कमी-अधिक होऊ शकते. त्यामुळं सर्पदंशानंतर होणाऱ्या परिणामांची लक्षणंही वेगवेगळी असतात. म्हणूनच त्यावरील उपचार गुंतागुंतीचे ठरतात. तरीही सर्पदंशाच्या बाबतीत 'विषावर विषाने उपचार' असं म्हणणं खरं ठरत असतं.
सापाच्या विषातून मिळणारी अनेक रसायनं काही आजारांवरील उपचारांमध्ये फायदेशीर ठरू शकतात. विषाचा वापर केली जाणारी अनेक औषधं आजही वापरात आहेत. सापाच्या विषापासून अँटिडोट तयार केला जातो, पण अजून त्यावर संशोधन सुरू आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एखाद्या इंजेक्शनच्या सीरिंजनं विष काढून नंतर त्याचा वापर ‘अँटी-वेनम सीरम’ सारखा केला जातो. भारतात पारंपरिक पद्धतीनंही विष काढण्याचं काम केलं जातं. (तमिळनाडूमध्ये या प्रकारचं काम करणारी एक सहकारी संस्था आहे. ती कंपन्यांना विष विक्री करते.)
घोडे किंवा काही शेळ्या-मेंढ्या अशा काही जनावरांनाही नुकसान होणार नाही, एवढ्या प्रमाणात विष दिलं जातं. त्यामुळं त्यांच्या शरिरारत सापाच्या विषाविरोधात प्रतिकारक क्षमता तयार होते. त्यानंतर त्यांच्या रक्तातून अँटिबॉडीज काढून शुद्ध करून त्यापासून अँटी-वेनम व्हॅक्सिन तयार केली जाते.
सापाच्या विषाचा वापर उपयोग संधिवात, वेदना क्षामक आणि सूज घालवणाऱ्या औषधींमध्येही केला जातो.
वैज्ञानिकांच्या मते सापाच्या विषापासून वेदनाक्षामक औषधं तयार करता येऊ शकतात आणि त्याचे काही साईड इफेक्टही होऊ शकत नाहीत. त्यामुळं या दिशेनं सध्या संशोधन सुरू आहे.
काही सापांच्या एक लीटर विषाचे मूल्य एक कोटींपर्यंत असू शकतं. अनेकदा अँटिडोट तयार करणाऱ्या कंपन्या हे विष अवैध मार्गानं मिळवत असतात.
सापांच्या विषाचं चक्र
पावसाळ्यात विशेषतः ग्रामीण भागांमध्ये सर्पदंशाच्या घटना वाढत असतात. सर्पदंशावर त्वरित उपचार केले नाही तर मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते.
सर्पतज्ज्ञांच्या मते, ग्रामीण भागातील शेती आणि सापांच्या अंडी उबवण्याचा काळ ही पावसाळ्यात सर्पदंश वाढण्याची कारणं असू शकतात.
सापांचं विष विविध प्रकारचं असतं. काही सापांच्या विषानं लगेचचच मृत्यू होतो असतो तर काही सापांच्या दंशानंतर ते घातक ठरायला उशीर लागू शकतो.
काही साप चावा घेत धारदार दातांच्या माध्यमातून आपल्या शिकारीच्या शरीरात विष सोडतात. त्यामुळं ते विष थेट त्याच्या रक्तप्रवाहात मिसळलं जातं. पण मोझाम्बिक स्पिटिंग कोब्रासारखे
काही साप थुंकल्याप्रमाणं विष फेकतात.

फोटो स्रोत, Getty Images
ज्येष्ठ अभ्यासक डॉ. हेमंग जोशी 20 वर्षांपासून सर्पदंशाबाबत अभ्यास करत आहेत. त्यांनी याबाबत बीबीसी गुजरातीबरोबर संवाद साधला.
ते सांगतात,"कोब्रा आणि काळ्या सापांचं विष न्युरोटॉक्सिक असतं, तर घोणस आणि फुरसं यांचं विष हेमोटोटॉक्सिक असतं. न्युरोटॉक्सिक विष शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतं. त्यामुळं संबंधित व्यक्तीमध्ये अर्धांगवायू, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणं दिसतात. जेव्हा हेमेटोटॉक्सिक विष जेव्हा शरिरात प्रवेश करतं, तेव्हा ते रक्तात मिसळलं जातं. त्यामुळं शरीरातील अंतर्गत भागात रक्तस्राव (रक्त वाहिन्या फुटणं) होतो," असं त्यांनी सांगितलं.
"एखादा साप चावतो तेव्हा शरीरावर त्याच्या विषाचा परिणाम 10-15 मिनिटांत दिसू लागतो. पण 30-45 मिनिटांत विष सर्वाधिक धोकादायक ठरत असतं. काळा साप चावल्यानंतर अनेकदा त्याच्या विषाचा परिणाम होण्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागतो आणि चार ते सहा तासांत ते सर्वाधिक धोकादायक ठरत असतं.
फुरसं आणि खुळखुळ्या साप यांच्या विषाचा प्रभाव लगेचच होत नाही. त्यांच्या दंशानंतर दंश केलेल्या जागेवर सूज आणि प्रचंड वेदना होत असतात," असंही त्यांनी सांगितलं.
एका अभ्यासानुसार जगभरात सापाच्या विषामुळं होणाऱ्या मृत्यूपैकी 80 टक्के मृत्यू भारतात होतात. मृतांचा हा आकडा सुमारे 64,000 आहे. जगभरात चार लाख लोकांना सर्पदंशामुळं पक्षाघात, अंधत्व आणि इतर प्रकारचं कायमस्वरुपती अपंगत्व आलं आहे.
2000-2019 च्या दोन दशकांच्या कालावधीत सर्पदंशामुळं 12 लाख लोकांचा मृत्यू झाला. यापैकी अर्धे पीडित 30 से 69 वयाच्या दरम्यानचे होते. 25 टक्के मुलं होती, असंही अभ्यासातून समोर आलं आहे.
अभ्यासकांच्या मते, सरकारी कागदपत्रांमध्ये नोंदी असलेल्या आकड्याच्या तुलनेत प्रत्यक्षातील आकडा हा खूप मोठा असू शकतो. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश याठिकाणी ही समस्या गंभीर आहे.
2001-2014 दरम्यान बिहार, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि गुजरातची स्थिति गंभीर होती. गेल्या काही वर्षांपासून सापाचं विष याकडं एक समस्या म्हणून पाहत राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत या दिशेनं प्रयत्न केले जात आहेत.
खबरदारी हीच सुरक्षा
सर्पतज्ज्ञांच्या मते सर्पदंशापासून वाचण्यासाठी अगदी साध्या उपाययोजना करता येऊ शकतात. त्यातही सापाच्या वर्तनाबाबत माहिती घेतली असता, साप आणि मनुष्य दोघांचंही नुकसान टाळता येऊ शकतं.
अभ्यासकांच्या मते, विष हे सापांच्या शिकारीचं अस्त्र आहे. हे प्रभावी आणि फायदेशीर असल्यानं साप त्याचा अत्यंत कमी वापर करतात. म्हणजे काहीच पर्याय नसेल तेव्हाच साप याचा वापर करतात.
साप समोर आल्यास घाबरून जाऊ नका किंवा सापाला त्रास देऊ नका

फोटो स्रोत, Getty Images
पावसाळ्यात अंड्यांमधून सापाची पिलं बाहेर येत असतात. तसंच बेडूक, उंदीर, पाली हेही सहज आढळतात आणि मानवी भागांपर्यंत येतात. त्यामुळं या काळात अधिक काळजी घ्यावी.
स्वयंपाक घर, सामानाची खोली, गवताच्या गंज्या, कचरा ठेवण्याचं ठिकाण आणि अंधाऱ्या जागी विशेष काळजी घ्या. अशा ठिकाणी जाताना टॉर्च हातात ठेवा आणि हात लावण्यापूर्वी थोडा आवाज करावा.
शेतात किंवा मोकळ्या जागेत झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
साप किंवा इतर प्राणी हल्ला करण्यापूर्वी, चावण्यापूर्वी धारदार दात दाखवून किंवा आवाज करून त्यांच्या आक्रमकतेचे संकेत देत असतात. पण ब्लॅक कोब्रा असा इशारा देत नाही.
सर्पदंशानंतर काय करावे आणि काय करू नये?
- रक्तप्रवाह कमी करण्यासाठी साप चावलेल्या जागेवर बोटाएवढी पट्टी बांधा.
- कधीही एकदम घट्ट पट्टी बांधू नका. तसं केल्यास तो अवयव कापला जाऊ शकतो.
- शक्य तेवढ्या लवकर एमडी फिजिशियन डॉक्टर किंवा सरकारी रुग्णालयात जा. मांत्रिक-तांत्रिक, बुवा यांच्याकडं जाऊ नका.
- साप चावल्यानंर शरीर जास्त हलवू नका, तसं केल्यास शरिरात विष वेगानं पसरू शकतं.
- पाणी किंवा पातळ पदार्थ पिऊ नका.
- शरीरावरील दागिने, घड्याळ काढून टाका.
- शेतीत काम करताना लांब असे रबराचे बूट वापरा.
- घट्ट कपडे परिधान केलेले असतील तर ते सैल करा.
- तोंडाने चोखून रक्त काढण्याचा प्रयत्न करू नका. दंश झालेल्या ठिकाणी कापण्याचा किंवा तिथून रक्त काढण्याचा प्रयत्न करू नका.
- जखमेवर बर्फ किंवा रसायन असं काही लावू नका. दंश झालेल्या व्यक्तीला एकटं सोडू नका, त्याला धीर देत राहा.
- विषारी साप चावल्यानंतर त्याला पकडण्याचा किंवा त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करू नका. अगदी मृत सापालाही अगदी खबरदारीनं हाताळायला हवं.
- साप नुकताच मेला असेल तरी त्याच्या दातांमध्ये विष असू शकतं आणि ते घातक ठरू शकतं.











