हुंड्यासाठी सासरच्यांनी मुलीला मारल्याचा आरोप आणि त्यानंतर निर्घृण बदला

फोटो स्रोत, Ankit Srinivas
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी न्यूज, प्रयागराज
एका अत्यंत वाईट घटनेनं दोन कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तसंच या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला, तर सात जणांची तुरुंगात रवानगी झाली.
प्रयागराज (पूर्वीचे अलाहाबाद) मध्ये 18 मार्चच्या रात्री घडलेल्या घटनेनं वर्दळीच्या भागात राहणाऱ्या या दोन कुटुंबांच्या शेजाऱ्यांनाही प्रचंड मोठा धक्का बसला आहे.
इशारा : या लेखामधील मजकूर काही जणांसाठी विचलित करणारा ठरू शकतो.
"जवळपास रात्रीचे 11 वाजले होते त्यावेळी 60-70 लोक आमच्या घरात घुसले. अत्यंत वाईट पद्धतीनं त्यांनी आम्हाला मारहाण करायला सुरुवात केली," असं शिवानी केसरवानी म्हणाल्या.
घरात घुसलेल्या लोकांमध्ये अंशिकाचा ( हुंड्यासाठी ज्या मुलीची हत्या झाली असं म्हटलं जात आहे ) भाऊ, अंशिका यांच्या नातेवाईकांचाही समावेश होता, असंही शिवानी यांनी सांगितलं. हा प्रकार घडण्याच्या सुमारे तासाभरापूर्वी अंशिका यांचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला होता.
शिवानी आणि पोलीस अंशिका यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचं म्हणत आहेत. पण अंशिकाचे कुटुंबीय आणि शेजारी मात्र तिचा हुंड्यासाठी खून झाल्याचा आरोप करत आहेत.
केसरवानी यांच्या कुटुंबाचा लाकडाचा व्यवसाय आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब हे एकत्र राहतं. ते राहत असलेल्या इमारतीत तळघरात दुकान आणि तळमजल्यावर गोदाम आहे. तर वरच्या मजल्यांवर कुटुंबीय राहतात. प्रत्येक मजल्यावर एक बेडरूम आहे. एका वर्षापूर्वी लग्न झाल्यापासून अंशू पत्नी अंशिकासह सर्वात वरच्या मजल्यावर राहत होता. तर त्यांचे आई वडील पहिल्या मजल्यावर आणि बहीण शिवानी दुसऱ्या मजल्यावर राहत होती.
"अंशिका साधारणपणे रोज रात्री 8 वाजता जेवणासाठी खाली येत होती. पण घटनेच्या दिवशी त्या दिसल्या नाहीत. त्यामुळं त्यांना झोप लागली असेल असं आम्हाला वाटलं,"असं शिवानी यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
शिवानी यांचे भाऊ अंशू 10 वाजता दुकानातून आल्यानंतर ते पत्नीला कॉल करण्यासाठी वर गेले, असं तिनं सांगितलं.
"पण कॉल किंवा दरवाजा वाजवण्याला काही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्यानं दारावरील काच फोडली आणि दार उघडलं. त्यावेळी त्याला अंशिका मृतावस्थेत आढळली. तो जोरानं ओरडला आणि आवाज ऐकूण आम्ही वर धावलो."
सासू-सासऱ्यांचा होरपळून मृत्यू
अंशू आणि त्याच्या काकांनी घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलिसांना याबाबत माहिती कळवली. तसंच अंशिकाच्या आई वडिलांनाही त्याबाबत माहिती देण्यात आली.
पोलिसांच्या मते, जवळपास तासाभरानंतर अंशिकाच्या माहेरचे लोक अनेक नातेवाईकांबरोबर तिच्या सासरी आले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये प्रचंड वाद आणि हाणामारीही सुरू झाली.
शिवानी यांनी आम्हाला त्यांच्या फोनमधील एक व्हिडिओ दाखवला. त्यात काही जणांचा आरडा-ओरडा आणि एकमेकांना लाकडाने मारहाण करत असल्याचंही दिसत होतं. त्या सगळ्यांच्या मध्ये एक पोलीस कर्मचारीही होता. तो त्यांना अडवण्याचा, वाद संपवण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला यश येत नव्हते.

फोटो स्रोत, Ankit Srinivas
अंशिका यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी घराला आग लावली असंही पोलिसांनी सांगितलं.
तळमजला आणि त्यावरील मजल्यावर मोठ्या प्रमाणावर लाकूड होतं त्यामुळं आग वेगानं पसरली. तिनं महाकाय रूप घेतलं. या आगीत शिवानी, तिचे आई वडील आणि काकू अडकले.
शिवानी आणि त्यांच्या काकूनं एक काच फोडली आणि दुसऱ्या मजल्यावरून अथक प्रयत्नांनंतर त्या दोघी शेजारी असलेल्या काकांच्या घरी पोहोचल्या. पण त्यांचे आई वडील एवढे नशीबवान नव्हते.
अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागला.
जवळपास पहाटे तीन वाजेच्या सुमारास आग विझवल्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला तर, वृद्ध दाम्पत्यांचा अक्षरशः कोळसा झाला होता.
"माझ्या आईचा मृतदेह पायऱ्यांवर बसलेल्या अवस्थेत होता. एका गोनीमध्ये (पोतं) भरून तो शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता," असं शिवानी यांनी अश्रू पुसत सांगितलं.
'भावाच्या जीवाला धोका'
शिवानी यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत अंशिका यांच्या कुटुंबातील 12 सदस्यांची नावे होती. तसंच 60-70 अनोळखी लोकांचाही उल्लेख होता.
अंशिकाचे वडील, काका आणि त्यांची मुलं यांना अटक करण्यात आली असून ते तुरुंगातच आहेत, असं पोलीस अधिकाऱ्यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
अंशिका यांच्या वडिलांनीही अंशू त्यांचे आई-वडील आणि बहिणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. सासरची मंडळी अंशिकाचा हुंड्यासाठी छळ करत होती आणि त्यांनीच तिचा खून केल्याचे आरोप त्यांनी तक्रारीत केले आहेत.
शिवानी यांनी त्यांच्यासह कुटुंबावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. पण त्याचवेळी लग्नात त्यांच्या कुटुंबाला अंशिकाच्या कुटुंबानं कारसह काही भेटवस्तू दिल्याचं त्यांनी मान्य केलं होतं.
"त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार मुलीला जे काही द्यायचं होतं, ते त्यांनी दिलं. आम्ही काहीही मागणी केली नव्हती," असं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Ankit Srinivas
पत्नीचं निधन झालं त्या रात्रीपासून अंशू घरी परतलेले नाहीत. "अंशिका यांचे बहुतांश नातेवाईक तुरुंगाबाहेर आहेत. त्यांच्याकडून जीवाला धोका असल्यामुळं तो लपत आहे," असं शिवानी म्हणाल्या.
भारतात हुंडा देणं किंवा स्वीकारणं दोन्हीही 1961 पासून कायद्याने गुन्हा आहे. पण एका ताज्या सर्वेक्षणाचा विचार करता अजूनही 90 टक्के भारतीय विवाहांमध्ये हुंड्याची पद्धत प्रचलित आहेत.
पोलिसांना दरवर्षी महिलांच्या छळाच्या हजारो तक्रारी मिळतात. गुन्हेगारीसंदर्भातील आकडेवारीनुसार भारतात 2017 ते 2022 या काळात हुंड्याच्या कारणावरून 35,493 विवाहितांचा बळी गेला.
पण हुंड्याच्या प्रकरणात अशा प्रकारे भयंकर बदला घेतल्याचं प्रकरण मात्र ऐकिवात नाही.
शिवानी या सध्या जवळच असलेल्या त्यांच्या काकाच्या घरी राहतात. त्या आम्हाला त्यांचं घर आधी कसं होतं? हे दाखवण्यासाठी गेऊन गेल्या. त्या रात्री घडलेल्या भयावह घटनेच्या खुणा तिथं सर्वत्र आढळतात. भिंती आगीमुळं पूर्ण काळ्या झाल्या असून, खाली राखीचे थर साचलेले आहेत. फर्निचरचाही कोळसा झाला असून फक्त सांगाडे शिल्लक आहेत. तर मध्ये-मध्ये धातूची भांडी पडलेली आढळतात.
"मला न्याय हवा आहे. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, घर, कुटुंब काहीही शिल्लक राहिलेलं नाही. मला स्वतंत्र आणि निःपक्ष तपास हवा आहे. जे दोषी आढळतील त्या सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे," असं शिवानी म्हणाल्या.
"त्यांनी संपूर्ण घर का जाळले? आम्हाला आता पुरावा कसा मिळणार?" असंही त्या म्हणाल्या.
लग्नावर 50 लाखांचा खर्च
पोलिसांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. "आमच्या घराच्या बाहेर जवळपास दोन डझन पोलीस कर्मचारी होते. पण कोणीही माझ्या आई-वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. ते फक्त उभं राहून बघत होते," असं त्यांनी म्हटलं.
पोलिसांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळले. "हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असून सगळ्यांच्या भावना टोकाला पोहोचलेल्या होत्या. आम्ही घटनास्थळावरून अंशिकाचा मृतदेह बाहेर काढून तो रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पोहोचवण्यावर लक्ष केंद्रीत केलं होतं. आमचा उद्देश गर्दी कमी करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं हा होता," अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर बीबीसीला दिली.
"घर जाळून टाकलं जाईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. हे पूर्णपणे अनपेक्षित पाऊल होतं. आम्ही तातडीनं अग्निशमन दलाला बोलावलं. तसंच पाच जणांना वाचण्यासाठीही आम्ही मदत केली," असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, Ankit Srinivas
या दुहेरी घटनेनं अंशिकाच्या कुटुंबाला प्रचंड धक्का बसला आहे. त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या आई-वडिलांच्या घरीही भेट दिली. त्याच घरात अंशिका वर्षभरापूर्वी लग्न झालं त्याच्या आधीपर्यंत राहत होत्या. पण लोखंडी गेटवर मोठं कुलून लावलेलं होतं.
मृत अंशिका यांच्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावरच त्यांच्या काकाचं घर आहे. काका आणि त्यांच्या मुलाचा अटकेत असलेल्या नातेवाईकांमध्ये समावेश आहे. त्यांच्या कुटुंबानं माध्यमांशी बोलायला नकार दिला आहे.
आम्ही दार ठोठावलं तर अंशिका यांचे नव्वदी ओलांडलेले आजोबा जवाहरलाल केसरवानी बाहेर आले. त्यांच्या एका नातवानं प्लास्टिकची खुर्ची आणली आणि जोरानं श्वास घेत ते खाली बसले.
काही मिनिटांनंतर ते म्हणाले की, "मी तुम्हाला काय सांगणार? माझा मुलगा, नातू संपूर्ण कुटुंब तुरुंगात आहे."
"त्यांनी अंशिकाचा खून केला आणि आत्महत्या वाटावी म्हणून तिला लटकावलं," असंही ते म्हणाले.
अंशिकाचा विवाह सोहळा अत्यंत थाटात केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. "आम्ही लग्नात 50 लाख रुपये खर्च केले. घरात हवं असतं ते सर्वकाही आम्ही तिला दिलं. तसंच 16 लाखांची कारही दिली होती."
"अंशिका यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात घरी आली होती, तेव्हा तिचा छळ सुरू असल्याचं तिनं सांगितलं होतं. पण आम्ही तिला जुळवून घे, परिस्थिती बदलेल असं तिला सांगितलं होतं," असंही त्यांनी अत्यंत खेदानं आम्हाला सांगितलं.
अंशिकाच्या मृत्यूवर चर्चाच नाही?
केसरवानी या भागातील अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक आहेत. अत्यंत विनम्र, मनमिळाऊ आणि मदत करणारं हे कुटुंब असल्याचं त्यांच्याबाबत सांगितलं जातं. पण या घटनेनंतर त्यांच्या शेजाऱ्यांनाही प्रचंड धक्का बसला आहे.

फोटो स्रोत, Ankit Srinivas
"ते खूप चांगले लोक आहेत. हे सर्व कसं घडलं याचा विचारही आम्ही करू शकत नाही. अशा प्रकारच्या वादांमध्ये अडकणारे ते लोक नाहीत," असं त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहणारे एक शेजारी म्हणाले.
"ही आग कोणी लावली हे आम्हाला माहिती नाही. पण स्वतःच्या मुलीचा मृतदेह डोळ्यासमोर पाहिल्यानंतर कुणाचाही संताप होऊ शकतो," असंही ते म्हणाले.
या घटनेनंतर शेजारच्या एका महिलेनं म्हटलं की, "अंशिका खूप चांगल्या स्वभावाची मुलगी होती. तिचं कुटुंबही अत्यंत साधं होतं. त्यांच्यावर होत असलेल्या आरोपासारखा गुन्हा ते करू शकत नाहीत."
"तिचे सासू-सासरे या आगीत मारले गेले हे दुर्दैवी आहे," असंही त्या म्हणाल्या.
"पण, अंशिकाबरोबर नेमकं काय घडलं? तिचा मृत्यू कसा झाला? यावर कोणीच बोलत नसल्याचं सर्वांत जास्त वाईट वाटत आहे," असं मत त्यांनी व्यक्त केलं.
फोटो-अंकित श्रीनिवास











