डुकरांच्या चरबीपासून बनवलेल्या इंधनामुळे वाढली चिंता

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मॅट मॅकग्राथ
- Role, बीबीसी पर्यावरण प्रतिनिधी
विमानासाठी लागणाऱ्या ग्रीन फ्युएल अर्थात ग्रीन इंधनात डुक्कर, गुरंढोरं आणि कोंबड्यांची चरबी वापरली जाते. पण या इंधनापासून पर्यावरणाला धोका असल्याचं एका नव्या अभ्यासात दिसून आलंय.
जनावरांची चरबी हा निरुपयोगी भाग म्हणजेच कचरा समजला जातो. त्यामुळे विमानाच्या इंधनात त्यांचा वापर करून कार्बन फूटप्रिंट कमी करता येतात.
त्यामुळे 2030 पर्यंत हे इंधन बनवण्यासाठी प्राण्यांच्या चरबीची मागणी तिप्पट होण्याचा अंदाज आहे. यातील मोठा भाग विमान कंपन्यांमध्ये वापरला जाईल.
पण तज्ञांच्या मते, यामुळे प्राण्यांच्या चरबीचा पुरवठा कमी होईल आणि कार्बन उत्सर्जनाचा मुख्य स्रोत असलेल्या पाम तेलावरील उद्योगांचं अवलंबित्व वाढेल.
दुसऱ्या बाजूला विमान कंपन्या जीवाश्म इंधन मोठ्या प्रमाणावर वापरत असल्याने कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी त्यांच्यावरही प्रचंड दबाव आहे.
ब्रुसेल्समध्ये स्वच्छ वाहतूक अभियान राबविणाऱ्या ट्रान्सपोर्ट अँड एन्व्हायर्नमेंट ग्रुपने त्यांच्या अभ्यासात म्हटलंय की, विमान कंपन्यांच्या मागण्या पूर्ण होतील इतकी जनावरं रोज मारली जात नाहीत.
ट्रान्सपोर्ट अँड एन्व्हायर्नमेंट ग्रुपच्या मॅच फिंच यांचं म्हणणं आहे की, "प्राण्यांच्या चरबीचा स्त्रोत अमर्याद नाहीये."
त्यांच्या मते, "विमान कंपन्यांकडून याची मागणी गरजेपेक्षा जास्त वाढली, तर यावर आधीपासून अवलंबून असणाऱ्या इतर उद्योगांना दुसरा पर्याय शोधावा लागेल. आणि हा पर्याय म्हणजे पाम तेल.
थोडक्यात विमान वाहतूक उद्योग पाम तेलाच्या वापरास अप्रत्यक्षपणे जबाबदार असेल."
चरबीपासून बायोडिझेल
कार्बन उत्सर्जनाचा आणि पाम तेलाच्या अतिवापराचा सहसंबंध आहे. कारण पाम तेलाच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली जाते.
प्राण्यांची चरबी इंधन म्हणून वापरली जाते, याचं बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल.
शतकानुशतके, मेणबत्त्या, साबण आणि सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी या चरबीचा वापर केला जातोय.
पण मागील वीस वर्षांपासून प्राणीजन्य पदार्थ किंवा स्वयंपाकाच्या तेलापासून बायोडिझेल बनवलं जातंय. ही प्रथा ब्रिटनमध्ये सुरू झाली आणि वाढली देखील.
एका नव्या अभ्यासानुसार, 2006 पासून संपूर्ण युरोपमध्ये प्राण्यांच्या चरबीपासून इंधनाच्या उत्पादनात अनेक पटींनी वाढ झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यातला सर्वात मोठा भाग ट्रक आणि चार चाकी वाहनांमध्ये बायोडिझेलच्या स्वरूपात वापरला जातो. या इंधनाला शाश्वत इंधनाच्या श्रेणीत ठेवलं गेलंय. आणि नियमांनुसार यातून कार्बन फूटप्रिंटचं प्रमाण कमी होतं.
परंतु ब्रिटन आणि युरोपियन महासंघांचे सरकार विमान वाहतूक क्षेत्राला आधिक स्वच्छ इंधन पुरवण्यासाठी यापैकी एक स्त्रोत वापरण्याच्या विचारात आहे.
त्यामुळे विमान कंपन्यांना त्यांच्या इंधनात एविएशन फ्यूल (एसएएफ) चं प्रमाण वाढवावं लागेल असे कायदे तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय.
तज्ञांच्या मते, 2030 पर्यंत हे इंधन वापराचं प्रमाण ब्रिटनमध्ये 10% आणि युरोपियन महासंघामध्ये 6% इतकं होईल. मात्र त्यांच्या या नियमांमुळे प्राण्यांच्या चरबीच्या बाजारपेठेवर दबाव वाढेल.
पण ब्रिटन आणि युरोपियन महासंघाच्या दृष्टिकोनात मोठा फरक आहे. ब्रिटन मध्ये प्राण्यांच्या चरबीच्या गुणवत्तेवर मर्यादा निश्चित करण्याबाबत चर्चा सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला युरोपियन महासंघाने याच्या वापरावर भर दिलाय. कारण या इंधनाच्या वापराने हरितगृह वायू कमी करण्याचं उद्दिष्ट पूर्ण होतं.
आता मागणी वाढली की किमतीही वाढतील. यातून ब्रिटनमधून होणारी निर्यात तर वाढेलच पण सोबत उद्योगात असणारी गुंतागुंतही वाढेल.
एका विमानाची टाकी भरण्यासाठी किती डुकरांना मारावं लागेल?
ट्रान्सपोर्ट अँड एन्व्हायर्नमेंट ग्रुपच्या मते, पॅरिस ते न्यूयॉर्क असा प्रवास करण्यासाठी विमानाला लागणारं इंधन 8,800 डुकरांच्या चरबी इतकं असतं.
पण ब्रिटन मधील विमान इंधनात प्राणीजन्य उत्पादने आणि स्वयंपाकाच्या तेलाचं प्रमाण निश्चित असल्याने या इंधनांमध्ये प्राण्यांची चरबी कमी असेल.
युरोपियन महासंघातील विमान कंपन्यांना 2030 पर्यंत 6% स्वच्छ किंवा ग्रीन इंधन वापरणं अनिवार्य आहे, त्यापैकी 1.2% ई-केरोसीन असेल. तर उर्वरित 4.8 % इंधन प्राण्यांच्या चरबीतून येतं असं गृहीत धरल्यास, प्रत्येक ट्रान्साटलांटिक उड्डाणासाठी 400 डुकरांची चरबी आवश्यक असेल.
विमान वाहतूक क्षेत्राने प्राण्यांच्या चरबीचा वापर वाढवला तर पाळीव प्राण्यांच्या खाद्य उत्पादक उद्योगांवर त्याचा सर्वाधिक परिणाम होईल.
सध्या, ब्रिटमधील 3.8 कोटी पाळीव प्राण्यांचं खाद्य बनवण्यासाठी उच्च दर्जाच्या प्राण्यांच्या चरबीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
ब्रिटन पेट फूडचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निकोल पॅले सांगतात की, "या उद्योगासाठी लागणारा हा महत्वाचा कच्चा माल आहे. आणि याच्यासाठी पर्याय शोधणं अवघड आहे. हा माल अतिशय टिकाऊ पद्धतीने वापरला जातो."
त्यांच्या मते, "त्यामुळे जैव इंधनासाठी देखील हाच कच्चा माल वापरला तर आणखीन समस्या निर्माण होतील. आणि विमान वाहतूक आमच्या प्रतिस्पर्ध्याच्या रूपात पुढे येईल. आणि जेव्हा किंमतींचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा पाळीव प्राणी खाद्य उद्योग विमान वाहतूक उद्योगाशी स्पर्धा करू शकणार नाही.
ब्रिटनमधील प्रमाण निश्चित करण्यावर विचार
युरोपियन महासंघाने या दिशेने पावलं टाकली आहेत. मात्र ब्रिटनमध्ये अजूनही विमान इंधनामध्ये प्राण्यांच्या चरबीचं प्रमाण निश्चित करण्यावर विचार सुरू आहे.
ब्रिटन सरकार विमान वाहतूक क्षेत्रात वापरली जाणारी प्राण्यांची चरबी आणि स्वयंपाकाच्या तेलावर बंदी आणण्याच्या किंवा त्यावर मर्यादा घालण्याच्या तयारीत आहे. त्यांना अनावश्यक परिणाम नको आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
प्रस्तावित बदलांमुळे प्राण्यांच्या चरबीचा पर्यायी वापर वाढेल अशी चिंता जैवइंधन उद्योगातील अनेकांनी व्यक्त केली आहे.
ब्रिटन आणि आणि युरोपमध्ये वेस्ट-आधारित बायोडिझेल उत्पादक असलेल्या अर्जेंट एनर्जीचे डेकॉन पॉसनेट सांगतात की, "जर विमानात प्राण्यांच्या चरबीचं आणि स्वयंपाकाच्या तेलाचं प्रमाण वाढवलं तर त्याचा इतर उद्योगांवर परिणाम होईल."
त्यांच्या म्हणण्यानुसार, "म्हणून विमान वाहतूक क्षेत्र टिकवून ठेवायचं असेल तर सरकारला लवकरात लवकर निर्णय घेऊन जलद गतीने काम करावं लागेल."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








