अचानक नोकरी गेल्यास काय करावं? इमर्जन्सी फंड काय असतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नागेंद्र साई कुंदवरम
- Role, बिझनेस अॅनालिस्ट, बीबीसीसाठी
अलीकडच्या काळात अनेक नोकरदारांचं उत्पन्न वाढलेलं असलं तरी जीवनशैलीशी निगडित खर्चही वाढलेले असतात. त्यातच अनेकदा फक्त पगारवाढीवर लक्ष दिलं जातं. आर्थिक स्थैर्यासाठी आर्थिक नियोजन करण्याचा मुद्दा लक्षात घेतलेला नसतो. त्यामुळे अचानक मोठा खर्च आल्यास किंवा नोकरी गेल्यास अनेकांसमोर मोठं आर्थिक संकट निर्माण होतं. आर्थिक नियोजन कसं करावं, अचानक येणाऱ्या आर्थिक खर्च किंवा संकटांना तोंड कसं द्यावं, याचं मार्गदर्शन करणारा हा लेख.
गणेश हैदराबादमध्ये राहतात. ते एका नामांकित आयटी कंपनीत व्यवस्थापकीय पदावरील प्रमुख कर्मचारी आहेत. मागील 15 वर्षांपासून ते याच कंपनीत नोकरी करत आहेत. पदोन्नती मिळत ते आता व्यवस्थापकीय पदावर पोहोचले आहेत. त्यांचं वार्षिक पॅकेज 30 लाख रुपये आहे.
लग्न, मुलं, मुलांचं शिक्षण आणि जीवनशैलीत होत जाणारे बदल यासारख्या अनेक गोष्टी या कालावधीत त्यांच्या आयुष्यात झाल्या आहेत. या दरम्यान त्यांनी एक व्हिला, एक कार आणि शहराच्या परिसरात एक प्लॉट देखील घेतला आहे.
या सर्वांसाठीचा खर्च आणि ईएमआय यासाठी ते दरमहा 2 लाख रुपये खर्च करतात.
आयुष्यात सर्वकाही अपेक्षेनुसार होतं आहे, अशी गणेश यांना खात्री होती. मात्र अलीकडेच त्यांच्या आयटी कंपनीनं त्यांना एक धक्का दिला.
कंपनीनं त्यांना सांगितलं की त्यांनी कर्मचारी कपात करण्याचं ठरवलं आहे आणि त्यात गणेश यांचाही समावेश आहे. कंपनीनं गणेश यांना राजीनामा देण्यास सांगितलं.
नोकरी गमावल्याच्या या धक्क्यातून सावरण्यासाठी, तसंच कुटुंबीयांना ही गोष्ट सांगण्यासाठी आणि अनपेक्षितपणे अंगावर कोसळलेल्या या संकटाला तोंड देण्यासाठी सावरण्यास गणेश यांना बराच वेळ लागला.
ही काही फक्त गणेश यांचीच गोष्ट नाही. अलीकडच्या काळात गणेशसारख्या असंख्य नोकरदारांना याप्रकारच्या अनपेक्षितपणे समोर येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याची वेळ येते आहे.
नोकरकपातीत नोकरी गमावावी लागलेले काही कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांना ही गोष्ट सांगू शकलेले नाहीत. ते नवीन नोकरीचा शोध घेत आहेत.
पिंक स्लिपची किंवा नोकरकपातीची भीती
कोरोनाच्या संकटानंतर तंत्रज्ञान क्षेत्रानं चढउतार अनुभवले आहेत.
एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)ची भीती आणि दुसऱ्या बाजूला मंदीची भीती अशा परिस्थितीत आयटी कंपन्या खर्चात कपात करण्यासाठी पावलं उचलत आहेत.
आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांबरोबरच आयबीएम, सिस्को (CISCO), मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅपल सारख्या आघाडीच्या कंपन्यांनी त्यांच्या असंख्य कर्मचाऱ्यांना पिंक स्लिप दिली आहे. म्हणजेच नोकरीवरून काढून टाकलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एका अंदाजानुसार यावर्षीच्या मध्यापर्यंत जवळपास 1 लाख कर्मचाऱ्यांनी त्यांची नोकरी गमावली आहे. 2023 शी तुलना करता यंदाच्या वर्षी आयटी कंपन्यांनी 15 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे.
लेऑफ्स डॉट कॉम एफवायआय (layoffs.fyi)नं गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी जगभरातील जवळपास 1,150 टेक कंपन्यांनी 2.6 लाख कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. यावरून नोकरकपातीची व्याप्ती लक्षात येते.
अर्थात प्रत्यक्षात नोकरी गमवावी लागलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या कितीतरी अधिक असू शकते.
पगारात घट
आयटी क्षेत्रात कर्मचारी किंवा मनुष्यबळात कपात होते आहे, याचा अर्थ आयटी क्षेत्र उतरणीला लागलं आहे असं नाही.
आयटी क्षेत्रातील कर्मचारी कपातीतून 'सर्व्हाइव्हल ऑफ द फिटेस्ट' म्हणजे 'सर्वात सक्षम लोकंच बचावतात' या सूत्राकडे लक्ष वेधलं जातं.
ज्या कर्मचाऱ्यांकडे मल्टीटास्किंग स्किल्स आहेत म्हणजे त्यांच्याकडे एकापेक्षा अधिक प्रकारची कौशल्ये आहेत आणि जे एकाच प्रकारचं साचेबद्ध काम न करता वेगवेगळ्या प्रकारची कामं करू शकतात, जबाबदाऱ्या हाताळू शकतात, तेच कर्मचारी आयटी क्षेत्रात तग धरू शकतात.
सध्याच्या काळात आयटी कंपन्या फ्रेशर्स म्हणजे महाविद्यालयं किंवा विद्यापीठांमधून बाहेर पडणाऱ्या अननुभवी तरुण उमेदवारांना अधिक प्राधान्य देत आहेत.
कारण व्यवस्थापकीय पदावर आणि वरिष्ठ पदांवर असलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून त्यांना दिल्या जात असलेल्या पगाराच्या 5-10 टक्के पगार देऊन कंपन्यांना या तरुण नवीन कर्मचाऱ्यांची भरती करता येते.
या क्षेत्राकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी जवळपास दीड लाख नवीन तरुण कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे.
आयटी क्षेत्रात होत असलेल्या घडामोडी या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याचे संकेत देत आहेत.
अशा वेळी अनपेक्षितपणे येणाऱ्या संकटाला किंवा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सदैव तयार किंवा सज्ज राहणं ही गोष्ट आपल्याच हाती असते. म्हणूनच योग्य प्रकारे केलेलं आर्थिक नियोजन तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरू शकतं.
मग हे आर्थिक नियोजन नेमकं कसं करावं?
1. इमर्जन्सी फंड
पर्सनल फायनान्सचं हे पहिलं सूत्र आहे. याच्या नावाप्रमाणेच इमर्जन्सी किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारा हा पैसा आहे. अनपेक्षितपणे येणाऱ्या आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी इमर्जन्सी फंड अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
जर दर महिन्याच्या पगाराच्याच दृष्टीकोनातून विचार केला तर किमान सहा महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम बाजूला काढून ठेवलेली असली पाहिजे.
म्हणजेच समजा तुमचा दर महिन्याचा पगार 50,000 रुपये असेल तर इमर्जन्सी फंड म्हणून तुम्ही किमान 3 लाख रुपयांची रक्कम बाजूला काढून ठेवलेली असली पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
अचानक नोकरी गेल्यास, एखाद्या अपघातात गंभीर दुखापत झाल्यास, गंभीर आजारपण उद्भवल्यास यासारख्या आणि इतर अनपेक्षितपणे येणाऱ्या संकटांमध्ये इमर्जन्सी फंड अतिशय उपयोगाचा ठरतो.
जर तुम्हाला या प्रकारे इमर्जन्सी फंडाची तजवीज करून ठेवता आली नाहीत तर अशा अचानक येणाऱ्या अडचणींच्या वेळेस दर महिन्याला भरावे लागणारे ईएमआय, घराचा महिन्याचा खर्च, घरभाडे आणि मुलांच्या शाळेची फी यासारख्या गोष्टींसाठी तुमच्याकडे पैसे असणार नाहीत. यामुळे तुम्ही संकटात सापडाल.
त्याचबरोबर इमर्जन्सी फंडच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. इमर्जन्सी फंडचा पैसा शेअर्स किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवता कामा नये.
कारण जेव्हा गरज भासेल तेव्हा तुम्ही विकत घेतलेल्या शेअर्सची किंमत घसरलेली असल्यास तुम्हाला ते तसेच विकावे लागतील आणि तुमचं नुकसान होईल.
तर रिअल इस्टेटमध्ये पैसे असल्यास ती मालमत्ता काही लगेच विकली जात नाही. शिवाय पैशांची गरज असल्यास तुम्हाला ती मिळेल त्या किमतीला विकावी लागेल आणि त्यातूनही आर्थिक नुकसान होईल.
त्यामुळे इमर्जन्सी फंडासाठीची रक्कम बँकेच्या मुदतठेवी (फिक्स्ड डिपॉझिट), लिक्विड फंड्स (म्युच्युअल फंडाचाच एक प्रकार) आणि गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज-ट्रेडेड फंड्स) मध्ये गुंतवून ठेवावेत.
या प्रकारच्या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक केलेली असल्यास तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुमचे पैसे ताबडतोब काढून घेता येतील. शिवाय त्यातूनही तुम्ही व्यवस्थित परतावा कमावलेला असेल.
2. आधी बचत करा
रिटायरमेंट फंड, कॅश फ्लो किंवा खेळता पैसा आणि बचत हे देखील आर्थिक नियोजनातील महत्त्वाचे घटक असतात.
आर्थिक बाबतीत वॉरेन बफेंसारखे जगप्रसिद्ध गुंतवणूक गुरू जे पहिलं सूत्र सांगतात ते म्हणजे आधी बचत करा.
सर्वसाधारणपणे बचत करण्याचा मुद्दा आला की आपण विचार करतो की दर महिन्याला पगार हाती आल्यानंतर सर्व खर्च केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते ती म्हणजे बचत. आपल्या सर्व खर्चानंतर बचत करण्याचा प्रयत्न करतो. मात्र ते शक्य होत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
जर आपण आपल्या पगाराच्या 20 टक्के इतक्या रकमेची बचत करू शकत नसू तर परिस्थिती अवघड होऊ शकते. समजा तुम्हाला दरमहा 50,000 रुपये पगार आहे. अशावेळी दरमहा किमान 10,000 रुपयांची बचत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
अशा प्रकारे जी बचत केली जाईल ती रक्कम लग्नकार्य, मुलांचं शिक्षण, नवीन घर विकत घेताना लागणारे डाऊन पेमेंट, रिटायरमेंट फंड आणि इतर आवश्यक किंवा टाळता न येणाऱ्या खर्चासाठी उपयोगी पडेल.
दर महिन्याच्या पगाराच्या 50 टक्के इतकी रक्कम ईएमआय, घरगुती खर्च, मुलांचं शिक्षण यासारख्या आवश्यक बाबींसाठी खर्च करावी.
तर 30 टक्के रक्कम चित्रपट पाहायला जाणं, वीकेंडचा खर्च, सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणं, नवीन वस्तू विकत घेणं या बाबींवर केला पाहिजे.
उरलेल्या 20 टक्के रकमेची बचत भविष्यासाठीची तरतूद म्हणजे केली पाहिजे.
3. कर्जाची परतफेड करा किंवा ओझं कमी करा
क्रेडिट कार्ड लोन, पर्सनल लोन, अॅप वरून घेतलेली कर्जे यासारख्या गोष्टींपासून लांब राहा. कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यापूर्वी ती वस्तू किंवा गरज खरोखरंच आवश्यक आहे का, तिची खरोखरंच गरज आहे का की तशी गरज निर्माण करण्यात आली आहे, या गोष्टीचा नीट विचार केला पाहिजे.
त्याबद्दल तुमच्या मनात पुरेशी स्पष्टता असली पाहिजे.
अगदीच गरज नसल्यास उच्च व्याजदराची कर्जे घेऊ नका. बाजारातून किंवा मित्र परिवार, नातेवाईक यांच्याकडून जास्त व्याजाच्या रकमा उचलू नका. असं कधीही करू नका.

फोटो स्रोत, Getty Images
जर परिस्थिती फारच गंभीर असेल किंवा तुम्हाला खरोखरंच खूप गरज असेल तर सरकारी किंवा सहकारी बँकेतून गोल्ड लोन म्हणजे तुमच्याकडील सोन्यावर कर्ज घ्या.
दर महिन्याला ईएमआय पेक्षा गोल्ड लोन ची परतफेड करणं सोपं असतं, कारण दरमहा त्यावर फक्त व्याजाचीच परतफेड करावी लागते.
जेव्हा तुमच्याकडे काही रक्कम असेल, बचत झाली असेल तर आधी कर्जाची परतफेड करा आणि बॅंकेकडून तुमचं सोनं परत मिळवा. बॅलन्स ट्रान्सफर, किमान पेमेंट आणि क्रेडिट कार्डवर ईएमआय घेणं, या आणि या प्रकारच्या पर्यायांपासून दूर राहा.
4. ईएमआय पगाराच्या 30 टक्क्यांहून अधिक नको
गृहकर्ज असो की वाहन कर्ज असो, कोणतंही कर्ज देताना बॅंका सर्वात आधी लक्षात घेतात ती म्हणजे ईएमआयची रक्कम. समजा तुमचा पगार 50,000 रुपये असेल तर अशावेळी तुमच्या ईएमआयची रक्कम 15,000 रुपयांपेक्षा अधिक असताना कामा नये.

फोटो स्रोत, Getty Images
होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोन...असं कोणत्याही प्रकारचं कर्ज असू द्या. त्यासाठीचं मूळ सूत्र हेच आहे की कर्जासाठीच्या ईएमआयची रक्कम तुमच्या दर महिन्याच्या पगाराच्या 30 टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये.
उर्वरित रकमेचं नियोजन तुमचा घरगुती खर्च, बचत आणि आपत्कालीन खर्चासाठी करावं.
5. गुंतवणुकीवरील परतावा महागाईदरावर मात करणारा असावा
भारतातील सध्याचा सर्वसाधारण महागाई दर साधारण चार टक्के आहे. मात्र असं म्हणता येऊ शकतं की अन्नधान्य, शिक्षण आणि आरोग्यसेवांशी निगडीत महागाईदर दहा टक्क्यांहून अधिक असेल.
त्यामुळे तुम्ही बचत केलेली रकमेवर मिळणारा परतावा हा महागाईदरा पेक्षा अधिक असला पाहिजे. तोच तुम्हाला मिळालेला खरा व्याजदर किंवा परतावा असतो.
समजा, सध्या बँका जवळपास 8 टक्के व्याजदर देत आहेत. त्यातून 4 महागाई दर वजा केल्यानंतर तुम्हाला मिळणारा खरा किंवा निव्वळ परतावा फक्त 4 टक्केच राहतो.
त्यामुळेच तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी पर्यायाचा समावेश केलेला असावा. म्हणजे शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे.
6. शेअर्स, म्युच्युअल फंड्स आणि सोन्यात गुंतवणूक करा
बँकाच्या मुदत ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट) यावर मिळणारा जास्तीत जास्त परतावा देखील घसरला आहे. म्हणजेच सध्या मुदतठेवींवरील व्याजदरातून जास्त परतावा मिळत नाही.
त्यामुळेच आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओ मध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी इक्विटी पर्यायाचा विचार केला पाहिजे. म्हणजे शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केली पाहिजे.
मात्र शेअर्समध्ये एकूण गुंतवणुकीतील किती टक्के रक्कम गुंतवली पाहिजे. कारण शेअर्स मधून अधिक परतावा मिळत असला तरी त्यात जोखीम देखील जास्त असते. त्यामुळे त्यासाठीचं सूत्र समजून घेऊया.
समजा तुम्ही 40 वर्षांचे आहात, तर 100 वजा 40 केले असता 60 ही संख्या येते. याचाच अर्थ या वयात तुम्हाला जर 100 रुपयांची गुंतवणूक करायची असेल तर त्यातील 60 रुपये तुम्हाला शेअर्समध्ये किंवा इक्विटी प्रकारात गुंतवता येतील.


इक्विटी किंवा शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स यामध्ये फक्त गुंतवणूक केली पाहिजे. याचाच अर्थ शेअर मार्केट म्हटलं की ट्रेडिंग देखील आलंच. मात्र अनेकदा सर्वसामान्यांना ट्रेडिंगविषयी कोणतंच ज्ञान नसतं किंवा त्यासाठीचं कौशल्य नसतं.
अशावेळी तुम्ही ट्रेडिंग मधून झटपट पैसे कमावण्याच्या मोहापासून दूर राहिलं पाहिजे. ट्रेडिंगमध्ये पैसा लावून हात पोळून न घेणंच शहाणपणाचं ठरतं. शेअर्समध्ये गुंतवणूक करणं आणि ट्रेडिंग करणं यातील फरक नीट लक्षात घेतला पाहिजे.
शेअर्समधील गुंतवणुकीतून मिळणारा अधिक असतो त्याप्रमाणेच त्यात जोखीम देखील अधिक असते. म्हणूनच शेअर्समध्ये दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. जेणेकरून जोखीम कमी होते.
याशिवाय सोन्याचाही तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये नक्कीच समावेश करा. तुमच्या एकूण गुंतवणुकीपैकी कमीत कमी पाच ते दहा टक्के रक्कम सोन्यामध्ये गुंतवा.
7. कर नियोजन
गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करताना आणि आर्थिक नियोजन करताना, कर नियोजन हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो.
मात्र एकूण आर्थिक नियोजनातील तो फक्त एक भाग आहे हे लक्षात ठेवलं पाहिजं. सर्व लक्ष करबचतीवर असता कामा नये.
त्यामुळे फक्त कर वाचवण्यासाठी किंवा कर वजावटीचा फायदा मिळवण्यासाठी पाच ते दहा वर्षांचा लॉक इन पीरियड असणाऱ्या ईएलएसएस (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम), टॅक्स सेव्हिंग्स बाँड्स, एनपीएस, युलिप (युनिट लिंक्ड इन्श्युरन्स पॉलिसी) या पर्यायांमध्ये गुंतवणूक करू नका.
अर्थात वार्षिक उत्पन्नानुसार तुम्ही नेमक्या कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये येता, कमाल किती कर भरावा लागणार आहे हे लक्षात घेऊन करनियोजन करणं श्रेयस्कर ठरतं.
8. स्वत:मध्ये गुंतवणूक करा: वैयक्तिक आणि करियरचा विकास
स्पर्धेत आणि सध्याच्या काळात टिकून राहण्यासाठी आर्थिक नियोजन हा महत्त्वाचा मुद्दा आहेच.
मात्र त्याचबरोबर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात तिथली मानकं काय आहेत, त्या क्षेत्राच्या आवश्यकता काय आहेत, तिथे कोणत्या प्रकारच्या कौशल्यांची, ज्ञानाची आवश्यकता आहे या गोष्टींबाबत नेहमीच सजग, सतर्क असलं पाहिजे.
स्वत:ला त्याबाबतीत अपडेट ठेवलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही नवीन कोर्सेसला प्रवेश घ्या, नवीन विषय किंवा कौशल्ये शिका. अगदी आवश्यक असल्यास एखादी नवीन भाषा शिका.
अलीकडच्या काळात अनेक विद्यापीठांद्वारे ऑनलाइन कोर्सेस देखील चालवले जातात. त्यामुळे तुम्ही नोकरी सांभाळून नवीन गोष्टी शिकू शकता.
जेव्हा तुम्हाला नवीन क्षेत्रात जायचं असतं, नवीन कंपनीत नोकरी करायची असते किंवा स्वत:चाच नवा व्यवसाय सुरू करायचा असतो, तेव्हा त्यासाठी आवश्यक ते ज्ञान मिळवणं, कौशल्य आत्मसात करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं.
त्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांबाबत जागरूक आणि सजग राहा. आधीच सावधगिरी बाळगा.
9. आयुर्विमा आणि आरोग्य विमा
आर्थिक नियोजनाची चर्चा करताना किंवा आर्थिक नियोजन करताना इतर विविध मुद्दे लक्षात घेत असताना सर्वाधिक आधी लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणजे आयुर्विमा आणि आरोग्यविमा. आयुर्विम्यामध्येही निव्वळ आयुर्विमा म्हणजे टर्म लाइफ इन्श्युरन्स घेणं महत्त्वाचं.
अनेकदा तुम्ही ज्या कंपनीत नोकरी करत असता ती कंपनी तुम्हाला आरोग्यविमा देखील पुरवते.
कंपनीची आरोग्यविमा पॉलिसी तुमच्या गरजांनुरूप आहे की नाही, त्यात काही टॉप अप करण्याची म्हणजे वाढ करण्याची आवश्यकता आहे की नाही, या गोष्टी तपासून घ्या.
आयुर्विमा ही आर्थिक नियोजनातील अत्यंत महत्त्वाची बाब असते. त्यातही टर्म इन्श्युरन्स घ्या. कारण त्यासाठी लागणारा हफ्ता किंवा प्रीमियम तुलनेनं अतिशय कमी असतो आणि मिळणारं विमा संरक्षण अधिक असतं.
अनेकांना नेमका किती रकमेचा टर्म इश्युरन्स याबद्दल गोंधळ असतो.
त्यासाठीचं सूत्र असं की समजा तुमचं वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये आहे, तर तुम्ही त्याच्या किमान दहापट म्हणजे कमीत कमी 60 लाख रुपयांचा टर्म इन्श्युरन्स घेतला पाहिजे.
10. एक दिवसभर विचार करा आणि मगच निर्णय घ्या
दसरा, दिवाळी, नाताळ, नवीन वर्ष आणि इतर असंख्य सण, उत्सव....या काळात बाजारात तुम्हाला अनेक ऑफर्स दिसून येतात. तुम्हाला खरोखरंच एखाद्या वस्तूची गरज असो की नसो, या ऑफर्स तुमच्या फोन दिसल्या की लगेच ती वस्तू विकत घेण्याचा मोह होतो.
मात्र ऑफर कितीही आकर्षक वाटली तरी लगेच, घाईघाईनं खरेदी करू नका.
जेव्हा तुम्हाला कोणतीही वस्तू विकत घ्यायची असेल तेव्हा किमान 24 तासांचा अवधी घ्या. त्यावर विचार करा. त्यानंतर देखील जर तुम्हाला वाटलं की त्या वस्तूची तुम्हाला खरोखरंच आवश्यकता आहे तरच ती वस्तू विकत घ्या.
दसरा किंवा दिवाळीच्या काळात अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देतात. बोनसची रक्कम हाती आल्यानंतर लगेचच त्या रकमेचा वापर करून बरीच खरेदी किंवा शॉपिंग करण्याचा मोह अनेकांना होतो. अनेकदा तसंच केलंही जातं.
मात्र तसं करणं आर्थिकदृष्टया योग्य नाही. बोनसच्या रकमेपैकी कमीत कमी 60 टक्के रकमेची गुंतवणूक करा. उरलेली रक्कम तुम्ही मनोरंजन, मजा करणं आणि इतर आवश्यक बाबींसाठी खर्च करू शकता.
याप्रकारे नियोजन केल्यास भविष्यात अचानक येणाऱ्या आर्थिक संकटाला, आपत्कालीन परिस्थितीला किंवा अचानक नोकरी जाण्याच्या संकटाला तुम्ही योग्यप्रकारे सामोरं जाऊ शकाल आणि त्यातून लवकर सावरू शकाल.
मात्र जर अचानक आर्थिक संकट आलं किंवा तुमच्याकडे नोकरी नसेल आणि तुमच्यावर कर्ज असेल तर तुमची परिस्थिती आणखी बिकट होईल. तुमच्यावरील आर्थिक संकट अधिक गंभीर होईल.
त्यामुळे विचारपूर्वक खर्च केल्यास आणि आर्थिक नियोजन केल्यास एखादी समस्या उद्भवल्यास त्यावर मात करणं किंवा त्याला तोंड देणं सोपं होतं.
तुम्ही वेळीच केलेलं आर्थिक नियोजन कठीण काळातदेखील तुम्हाला तरून नेईल आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देईल.
हाती येणाऱ्या उत्पन्नानुसार किंवा दर महिन्याच्या पगारानुसार जर तुम्ही खर्चाचं नियोजन केलं, तर नोकरकपातीची किंवा नोकरी जाण्याची भीती असली तरी तुम्ही निर्धास्तपणे पुढील वाटचाल करू शकता.
लक्षात ठेवा, वेळीच योग्य आर्थिक नियोजन केल्यामुळे तुम्ही फक्त आर्थिकदृष्ट्या स्थिरच होणार नाहीत तर मानसिकदृष्ट्या देखील निर्धास्त व्हाल.
(या लेखात देण्यात आलेली माहिती सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी आहे. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











