एका चेंडूवर 18 धावांची खैरात; जाणून घ्या नेमकं काय घडलं

फोटो स्रोत, TNPL
एका चेंडूवर किती धावा होऊ शकतात याचा तुमचा काही अंदाज? तुमचे सगळे अंदाज चुकवणारी ओव्हर टीएनपीएल अर्थात तामिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धेत पाहायला मिळाली आहे.
सालेम स्पार्टन्स आणि चेन्नई सुपर गिलीज यांच्यातील लढतीत हा प्रकार पाहायला मिळाला. चेपॉक सुपर गिलीज संघाची फलंदाजी सुरू होती.
डावातलं शेवटचं षटक टाकण्यासाठी अभिषेक तन्वर सज्ज झाला. अभिषेकच्या षटकात जे घडलं ते क्रिकेटरसिकांना अचंबित करणारं होतं.
अभिषेकच्या नोबॉल खैरातीमुळे एका चेंडूवर 11 धावा कुटल्या गेल्या. गिलीज संघाने अभिषेकच्या षटकात एकूण 26 धावा चोपून काढल्या.
या षटकात नेमकं काय झालं सविस्तर जाणून घ्या.
पहिला चेंडू- 1 धाव
अभिषेकच्या पहिल्या चेंडूवर उथिरासामी ससिदेवने एक धाव घेतली.
...........
दुसरा चेंडू- 4 धावा
अभिषेकच्या या चेंडूवर संजय यादवने चौकार वसूल केला.
.................
तिसरा चेंडू- 0 धावा
अभिषेकच्या यॉर्कर चेंडूवर संजयला काहीही विशेष करता आलं नाही.
.....................
चौथा चेंडू- 1 धाव
संजयने लाँगऑनच्या दिशेने तटवून काढत एक धाव घेतली.
...........................
पाचवा चेंडू- नोबॉल
अभिषेकचा हा चेंडू पंचांनी नोबॉल दिला. यॉर्कर म्हणजेच बुंध्यात टाकलेल्या या चेंडूवर ससिदेव त्रिफळाचीत झाला. पण नोबॉल असल्याने त्याला जीवदान मिळालं.
.......................
पाचवा चेंडू- 1 धाव
ऑफस्टंप बाहेरच्या फुलटॉसवर ससिदेवला एकच धाव काढता आली.
..........................
सहावा चेंडू- नोबॉल
संजय यादवने अभिषेकच्या यॉर्करवर डाऊन द ट्रॅक येत अक्रॉस फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला मोठा फटका लगावता आला नाही. पंचांनी अभिषेकचा पाय क्रीझच्या पुढे असल्याचं सांगत नोबॉल दिला.
........................
सहावा चेंडू- नोबॉल आणि षटकार
अभिषेकच्या हातातून फुलटॉस सुटला आणि संजयने खणखणीत षटकार खेचला. मिडविकेला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता पण तो निव्वळ प्रेक्षक ठरला. हा चेंडू टाकतानाही अभिषेकचा पाय निर्धारित रेषेच्या पलीकडे असल्याचं स्पष्ट झालं. पुन्हा एकदा फ्री हिट मिळाली.
..............................
सहावा चेंडू- नोबॉल आणि 2 धावा
अभिषेकने ऑफस्टंप बाहेर यॉर्कर टाकला पण या चेंडूवरही त्याचा पाय क्रीझच्या बाहेरच होता. पंचांनी पुन्हा एकदा नोबॉल दिला. फलंदाजांनी धावून 2 धावा काढल्या.
................................
सहावा चेंडू-वाईड आणि 1 धाव
नोबॉलची परंपरा अभिषेकने या चेंडूवर रोखली पण या खेपेस चेंडू वाईड गेला. लेगस्टंपच्या बाहेर असल्याने पंचांनी वाईड दिला.
..............................
सहावा चेंडू- 6 धावा
अखेर हा चेंडू वैध ठरला. यॉर्कर चेंडूवर संजय यादवने जोरदार षटकार लगावला.
अशा प्रकारे सहाव्या चेंडूवर 18 धावा निघाल्या. अभिषेकच्या षटकात 26 धावा कुटल्या गेल्या. गिलीज संघाने या षटकाच्या बळावर 217 धावांचा डोंगर उभारला.
अभिषेकच्या नोबॉलची चर्चा सोशल मीडिया आणि क्रिकेटवर्तुळात होऊ लागली. अनेक वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या मोहम्मद सामीने अशा पद्धतीचं षटक टाकलं होतं. अभिषेकने 4 षटकात एका विकेटच्या मोबदल्यात 44 धावा दिल्या. यापैकी बहुतांश धावा शेवटच्या षटकातच झाल्या.

फोटो स्रोत, TNPL
31वर्षीय अभिषेकने प्रथम श्रेणीचे 3 तर 10 ट्वेन्टी20 सामने खेळले आहेत. वयोगट स्पर्धांमध्ये हरयाणा आणि सौराष्ट्रचं प्रतिनिधित्व करणारा अभिषेक या स्पर्धेत लायका कोव्हाई किंग्ज, सिचीम मदुराई पँथर्स, व्हीबी थिरुवल्लूर वीरन्स या संघांसाठी खेळला आहे.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सालेम स्पार्टन्स संघाला 165 धावाच करता आल्या. चेपॉक सुपर गिलीज संघाने 52 धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रदोश रंजन पॉलने 55 चेंडूत 88 धावांची खेळी केली. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

फोटो स्रोत, chepauk super gillies
आयपीएलच्या यशानंतर देशभरात अनेक लीग सुरू झाल्या. त्यापैकी एक महत्त्वाची लीग म्हणजे टीएनपीएल. वॉशिंग्टन सुंदर, मुरुगन अश्विन, साई सुदर्शन, टी. नटराजन हे खेळाडू टीएनपीएलमध्ये चमकले.
या प्रदर्शनाच्या बळावरच आयपीएल संघांनी या खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं. दक्षिण भारतात या लीगची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी इंग्लंडमध्ये भारतीय संघाचा भाग असलेला रवीचंद्रन अश्विन मायदेशी परतताच टीएनपीएलच्या सामन्यासाठी खेळायला उतरला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








