दुर्मीळ वाहनांचा संग्रह, प्रायव्हेट विमानं आणि पाणबुडीत बदलणारी कार; इलॉन मस्क त्यांचे पैसे खर्च कसे करतात?

    • Author, टिफनी वर्दाइमर आणि एलिस डेव्हिस
    • Role, बीबीसी न्यूज

'टेस्ला'चे मालक इलॉन मस्क हे गेली अनेक वर्षे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात.

त्यांच्या संपत्तीत आता इतकी वाढ झालीय की, अर्धा ट्रिलियन डॉलर्सपर्यंत संपत्ती पोहोचलेले मस्क ते जगातील पहिले व्यक्ती ठरलेत. तसंच त्यांच्या प्रचंड पगाराच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली आहे.

पण असं असतानाही इलॉन मस्कअत्यंत साधेपणानं आयुष्य जगतात. 2021 मध्ये त्यांनी सांगितलं होतं की, ते अमेरिकेतील टेक्ससमध्ये सुमारे 50 हजार डॉलर्स किंमतीच्या घरात राहतात.

मस्क यांच्या दोन मुलांची आई आणि त्यांची माजी साथीदार ग्राइम्स यांनी 2022 मध्ये 'व्हॅनिटी फेअर' मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, लोक जसं समजतात, तसं मस्क ऐशोआरामाचं जीवन जगत नाहीत.

ग्राइम्स यांनी सांगितलं होतं की, "इलॉन अब्जाधीशासारखं आयुष्य जगत नाही. अनेकदा तो जणू गरिबीच्या परिस्थितीसारखा राहतो."

ग्राइम्स यांच्या मते, एकदा मस्क यांनी त्यांच्या गादीचा काही भाग फाटलेला असूनही, नवीन गादी घेण्यास नकार दिला होता.

मस्क यांचं दैनंदिन आयुष्य फार भव्यदिव्य नसलं तरी त्यांना अनोख्या गाड्यांचा छंद आहे. त्यापैकी एक कार तर पाणबुडीमध्येही रूपांतरित होऊ शकते. त्यांच्याकडे खासगी विमानांचाही संग्रह आहे, ज्यांची किंमत कोट्यवधी डॉलर्स आहे.

2022 साली त्यांनी सर्वात मोठी खरेदी केली. ही खरेदी कुठली कार किंवा एखादं अलिशान घर नव्हतं, तर एक्स प्लॅटफॉर्म म्हणजेच, पूर्वीचं ट्विटर प्लॅटफॉर्म. ही खरेदी तब्बल 44 अब्ज डॉलरला केली होती.

इलॉन मस्क यांचं अलिशान घर, जे नंतर त्यांनी विकलं

कधीकाळी इलॉन मस्क यांच्याकडे रिअल इस्टेटची बरीच अलिशान संपत्ती होती.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, मस्क यांनी 2019 पर्यंत सुमारे 10 कोटी डॉलर्समध्ये सात घरं विकत घेतली होती. ती प्रामुख्याने कॅलिफोर्नियातील बेल-एअर परिसरात एकमेकांच्या जवळ होती.

या घरांमध्ये स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, वाईन सेलर, खासगी वाचनालय आणि बॉलरूम अशा अनेक सुविधा होत्या. त्यापैकी एक घर प्रसिद्ध अभिनेता जीन वाइल्डर यांचं जुने रँच हाऊस होतं.

पण 2020 मध्ये मस्क यांचे विचार बदलले आणि ट्वीट करत त्यांनी सांगितलं की, "माझी जवळजवळ सर्व मालमत्ता विकत आहेत आणि आता माझ्याकडे कोणतंही घर राहणार नाही."

त्यांनी पुढे लिहिलं होतं, "मला पैशांची गरज नाही. आता स्वतःला मंगळ ग्रह आणि पृथ्वीला समर्पित करतो आहे. संपत्ती ही फक्त ओझं बनते."

त्यांनी हेही म्हटलं होतं की, जीन वाइल्डरचं घर "पाडणं किंवा त्याची आत्मा नष्ट करणं यास मनाई आहे."

मस्क यांनी हे तीन बेडरूमचं घर वाइल्डरचे पुतणे जॉर्डन वॉकर-पर्लमॅन यांना विकलं होतं आणि त्यासाठी त्यांनी स्वतः काही लाख डॉलर्सचं कर्जही दिलं होतं.

पण जून 2025 मध्ये मस्क यांनी हे घर पुन्हा स्वतःच्या नावावर केलं, कारण खरेदीदार त्या कर्जाच्या हप्ते फेडू शकत नव्हता.

2021 मध्ये मस्क यांनी सांगितलं की, त्यांचं 'मुख्य घर' टेक्ससच्या दक्षिण भागात असलेलं एक छोटंसं प्रीफॅब्रिकेटेड घर आहे, ज्याची किंमत सुमारे 50 हजार डॉलर्स आहे. इथूनच त्यांची कंपनी SpaceX चालवली जाते. या ठिकाणाला आता 'स्टारबेस' म्हटलं जातं.

त्यांनी या घराबद्दल लिहिलं होतं की, "हे खूप छान आहे."

पुढील वर्षी मस्क यांनी सांगितलं की, त्यांच्या नावावर आता कोणतंही घर नाही. यावरून लक्षात आलं की, अफाट संपत्ती असूनही ते तिचा किती कमी वापर करतात.

इलॉन मस्क जिथे जिथे जातात, तिथे मित्रांच्या घरात राहतात.

त्यांनी TED या माध्यमसंस्थेचे प्रमुख क्रिस अँडरसन यांना सांगितलं होतं की, "मी जिथे जातो, तिथे खरंच माझ्या मित्रांच्या घरी राहतो. जर मी बे-एरिया मध्ये गेलो, जिथे टेस्लाचं मुख्य उत्पादन होतं, तर मी मित्रांच्या मोकळ्या खोल्यांमध्ये फिरत राहतो."

ही गोष्ट नवीन नाही. 2015 मध्ये गूगलचे तत्कालीन सीईओ लॅरी पेज यांनी सांगितलं होतं की, "मस्क काहीसे बेघरासारखे आहेत. मस्क ईमेल करून विचारतात की, मला आज कुठे राहायचं माहिती नाही. मी तुझ्याकडे राहू शकतो का?"

वर्षानुवर्षे अशी अफवा उडत राहिली की, मस्क अमेरिकेत नवीन मालमत्ता घेत आहेत, पण सध्या टेक्ससमधील तेच लहान घर त्यांचा अधिकृत पत्ता मानला जातो.

दुर्मिळ चारचाकींचा संग्रह

इलॉन मस्क घरांवर फार खर्च करत नाहीत, पण गाड्यांच्या बाबतीत ते खूप शौकीन आहेत. टेस्लाचे मालक म्हणून त्यांच्या संग्रहात अनेक दुर्मिळ आणि ऐतिहासिक गाड्या आहेत.

त्यामध्ये फोर्ड मॉडेल-टी या गाडीचा समावेश आहे. ही स्वस्त गाडी विसाव्या शतकात सामान्य लोकांसाठी बनवली गेली होती आणि त्या काळात मोटार उद्योगात ही एक क्रांती मानली गेली.

मस्क यांच्या आणखी एक गाडी आहे, जी 1967 सालची जॅग्वार ई-टाईप रोडस्टर आहे. असं म्हटलं जातं की, ही गाडी मस्क यांना लहानपणापासूनच आवडायची.

1997 सालची मॅक्लारेन एफ-1 ही गाडी एकदा मस्क यांच्याकडून अपघातग्रस्त झाली होती. त्यांनी तिच्या दुरुस्तीसाठी खूप खर्च केला आणि नंतर ती विकली.

याशिवाय मस्क यांच्याकडे टेस्ला रोडस्टर गाडी आहे, जी टेस्लाची पहिली मॉडेल होती. हीच गाडी मस्क यांनी 2018 मध्ये अंतराळात प्रक्षेपित केली होती.

त्यांच्याकडे सर्वात अनोखी गाडी म्हणजे 1976 सालची लोटस एस्प्रिट. हीच गाडी जेम्स बॉन्डच्या The Spy Who Loved Me (1977) या चित्रपटात वापरली गेली होती.

चित्रपटात ही गाडी "Wet Nellie" या नावाने ओळखली जाते, जी पाणबुडीमध्ये रूपांतरित होते. मस्क यांनी ही गाडी 2013 मध्ये सुमारे 10 लाख डॉलर्समध्ये लिलावातून विकत घेतली होती.

मस्क म्हणाले होते की, त्यांना या गाडीची "सबमरीन क्षमता" पुन्हा कार्यरत करायची आहे.

विमानांचा वापर

विमानांवर करत असलेल्या खर्चामागे व्यवसायाचंच कारण असल्याचं ते सांगतात.

2022 मध्ये TED च्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, "जर मी विमान वापरलं नाही, तर माझ्या कामाचा खूप वेळ वाया जातो."

त्यांच्याकडे गल्पस्ट्रीम मॉडेलच्या अनेक खासगी जेट्स आहेत, ज्यांची किंमत कोट्यवधी डॉलर्समध्ये आहे.

ते या विमानांचा वापर अमेरिकेत SpaceX आणि Tesla च्या ठिकाणांदरम्यान प्रवासासाठी करतात, तसेच इतर देशांच्या प्रवासातही ही विमाने वापरतात.

दानधर्मातही अग्रेसर

अमेरिकन नियामक संस्थांच्या नोंदींनुसार, मस्क यांनी अब्जावधी डॉलर्सचे शेअर्स दान केले आहेत आणि इतर अनेक कारणांसाठी कोट्यवधी डॉलर्सचे योगदान दिले आहे.

मात्र, त्यांच्या या परोपकारी पद्धतीवर अनेकदा टीका झाली आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने लिहिलं होतं की, "त्यांचं दान अनियमित आणि स्वतःच्या फायद्याचा विचार करून दिलेलं असतं, ज्यामुळे त्यांना करात मोठी सूट मिळते आणि त्यांच्या व्यवसायालाही मदत होते."

त्यांची मस्क फाऊंडेशन ही समाजसेवी संस्था म्हणते की, "मानवतेच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक संशोधन, तांत्रिक नवकल्पना आणि महत्त्वाकांक्षी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही समर्पित आहोत."

पण न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, या फाउंडेशनने सलग तीन वर्षे आवश्यक दानरक्कम दिली नव्हती आणि त्याचे अनेक दान अशा संस्थांना गेले होते, ज्यांचा मस्कशी थेट संबंध होता.

या संदर्भात BBC ने एलन मस्क आणि मस्क फाऊंडेशनशी संपर्क साधला आहे.

जेव्हा मस्क यांना दानधर्माबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की, ते पारंपरिक "दान" या संकल्पनेबद्दल संभ्रमात आहेत.

2022 मध्ये त्यांनी क्रिस अँडरसन यांना सांगितलं होतं, "जर तुम्हाला चांगल्या कार्याच्या सत्याची काळजी असेल, त्याच्या प्रतिमेची नाही, तर परोपकार करणं खूप कठीण असतं."

मस्क यांच्या मते, त्यांचा व्यवसाय सुद्धा परोपकाराचा भाग आहे.

ते म्हणतात, "जर परोपकार म्हणजे मानवतेवरील प्रेम असेल, तर माझे सर्व व्यवसाय परोपकारच आहेत."

त्यांच्या मते, टेस्ला शाश्वत ऊर्जेला प्रोत्साहन देते, SpaceX मानवजातीच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी प्रयत्न करत आहे.

त्यांचं म्हणणं आहे की, न्यूरालिंक मेंदूच्या जखमा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांमुळे मानवी अस्तित्वाला निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी कार्यरत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)