You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर इंदिरा गांधींबद्दल इतकी चर्चा का सुरू झाली?
10 मे रोजी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू होता.
भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याने एकमेकांचे हल्ले हाणून पाडण्याबद्दल वेळोवेळी माहिती दिली होती.
या दरम्यान, सीमेच्या दोन्ही बाजूंनी झालेल्या नुकसानीचे फोटो आणि व्हीडिओ देखील समोर आले.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानमध्ये केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' आणि त्यानंतर पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष वाढतच गेला.
त्यानंतर 10 मे रोजी 5 वाजता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, "अमेरिकेच्या मध्यस्थीनं झालेल्या दीर्घ चर्चेनंतर मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्ताननं पूर्ण आणि तत्काळ शस्त्रसंधीवर सहमती दर्शवली आहे."
वाचा : जेव्हा अमेरिकेनं आपलं सातवं आरमार पाठवल्यावरही इंदिरा गांधी डगमगल्या नव्हत्या, काय होता 'तो' प्रसंग?
ट्रम्प यांनी हे जाहीर केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाच्या सरकारकडूनही काही वेळानं याबाबतची घोषणा करण्यात आली.
7 मे रोजी सकाळी भारतीय लष्करानं सांगितलं होतं की, 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत 6 आणि 7 मे रोजी रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक ठिकाणी हल्ले केले होते. त्यानंतर तणाव आणखी वाढू लागला.
अशा परिस्थितीत चार दिवसांत शस्त्रसंधी झाली, तेव्हा सोशल मीडियावरही त्याची चर्चा होत आहे.
काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षाचे समर्थक आणि काही सोशल मीडिया वापरकर्ते यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत आहेत.
इंदिरा गांधींबद्दल काँग्रेसनं काय म्हटलं?
काँग्रेसच्या अधिकृत X हँडलवरून इंदिरा गांधी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे.
या फोटोसोबत काँग्रेसनं लिहिलंय की, "इंदिरा गांधींनी निक्सन यांना सांगितलं होतं की, आमचा पाठीचा कणा सरळ आहे. आमच्याकडे प्रत्येक अत्याचाराला तोंड देण्याची इच्छाशक्ती आणि संसाधनं आहेत. तीन-चार हजार मैल दूर बसलेला देश भारतीयांना त्याच्या इच्छेनुसार वागण्याचे आदेश देईल, तो काळ गेला आहे."
काँग्रेसने पोस्टमध्ये लिहिलंय की, "हे धाडस होतं. भारतासाठी ठाम उभं राहणं आणि देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड न करण्याबद्दलचं ते धाडस होतं."
काँग्रेससह काही सोशल मीडिया वापरकर्ते यूपीएससी कोचिंग शिक्षक विकास दिव्यकीर्ती यांचा जुना व्हीडिओही शेअर करत आहेत.
या व्हीडिओमध्ये विकास दिव्यकीर्ती म्हणतात, "एक महिला पंतप्रधान बनली आणि तिने पाकिस्तानचे दोन तुकडे केले. इतर लोक म्हणत राहतात की, ते सर्जिकल स्ट्राईक करतील. पण इंदिरा यांनी असं म्हटलं नाही, तर थेट दोन तुकडे केले."
तर काही लोकांच्या मते, 1971 आणि 2025 ची तुलना करणं योग्य नाही.
पाकिस्तानशी युद्धानंतर 1971 मध्ये बांगलादेशची स्थापना झाली, तेव्हा सोव्हिएत युनियन होतं. पण 1991 मध्ये विघटन झालं आणि त्यानंतर रशियाची स्थापना झाली.
रशियाकडे आता सोव्हिएत युनियनसारखी शक्ती राहिली नाही आणि भारतासाठीही हा एक धक्का असल्याचं म्हटलं गेलं.
एकीकडे सोव्हिएत युनियननं भारताला पाठिंबा दिला, तर दुसरीकडे पाकिस्तान त्यावेळी अण्वस्त्रसज्ज देश नव्हता.
हंसराज मीणा यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, "अमेरिकेकडून धमक्या येत होत्या. जमिनीवरील परिस्थिती कठीण होती. पण इंदिरा गांधी घाबरल्या नाहीत. 1971 मध्ये त्यांनी केवळ भारताची प्रतिष्ठा वाचवली नाही, तर पाकिस्तानचे दोन भागात विभाजन करून एक नवीन देश निर्माण करून इतिहास रचला. त्या केवळ पंतप्रधान नव्हत्या, तर धाडसी आणि दृढनिश्चयी व्यक्ती होत्या."
तर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटलं की, "जोपर्यंत तुकडे होत नाही, तोपर्यंत सोडलं नाही."
पत्रकार रोहिणी सिंह यांनी लिहिलं की, "निवडणूक लढणं आणि युद्ध लढणं यात फरक आहे. कुणीही इंदिरा गांधी बनू शकत नाही."
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर केलं आणि लिहिलं, "12 डिसेंबर 1971 रोजी इंदिरा गांधींनी हे पत्र अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन यांना लिहिलं. चार दिवसांनी पाकिस्ताननं आत्मसमर्पण केलं."
यावर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी लिहिलं की, "1971 चे युद्ध पाकिस्तानी सैन्याच्या आत्मसमर्पणानं संपलं. त्यानंतर झालेला शिमला करार रशिया आणि अमेरिका या दोघांच्याही दबावाखाली तयार करण्यात आला. भारतानं कोणत्याही धोरणात्मक फायद्याशिवाय 99 हजार युद्धकैद्यांची सुटका केली. पाकव्याप्त काश्मीर रिकामे करण्यासाठी कोणतीही अट घालण्यात आली नव्हती किंवा सीमारेषा औपचारिकपणे निश्चित करण्यात आली नव्हती.
"तसेच भारतावर लादलेल्या युद्धासाठी किंवा निर्वासितांच्या संकटासाठी कोणतीही भरपाई मागितली गेली नाही. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. तुमच्या सोयीनुसार गोष्टी सांगणे थांबवा."
वाचा : जेव्हा अमेरिकेनं आपलं सातवं आरमार पाठवल्यावरही इंदिरा गांधी डगमगल्या नव्हत्या, काय होता 'तो' प्रसंग?
1971, निक्सन आणि इंदिरा गांधी : संपूर्ण प्रकरण
अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि इंदिरा गांधी यांच्यातील मतभेद कोणापासूनही लपलेले नव्हते.
1967 मध्ये जेव्हा निक्सन दिल्लीत इंदिरा गांधींना भेटले तेव्हा 20 मिनिटांतच त्या इतक्या कंटाळल्या की, त्यांनी निक्सन यांच्यासोबत असलेल्या भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याला हिंदीत विचारलं, "मला त्यांना किती काळ सहन करावे लागेल?"
इंदिरा गांधींवर लिहिलेल्या पुस्तकांमध्ये अशी माहिती आढळते.
1971 पर्यंत या दोघांमधील संबंध हे असेच राहिले.
पूर्व पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अत्याचारांकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी इंदिरा गांधी नोव्हेंबर 1971 मध्ये अमेरिकेला गेल्या. निक्सन यांनी इंदिरा गांधींना बैठकीपूर्वी 45 मिनिटं वाट पाहण्यास सांगितलं.
व्हाईट हाऊसमधील स्वागत भाषणात निक्सन यांनी बिहारच्या पूरग्रस्तांबद्दल सहानुभूती व्यक्त केली, पण पूर्व पाकिस्तानचा उल्लेखही केला नाही.
बीबीसीचे प्रतिनिधी रेहान फजल यांनी काही वर्षांपूर्वी भारतीय परराष्ट्र सेवेचे वरिष्ठ अधिकारी महाराज कृष्ण रस्गोत्रा यांच्याशी संवाद साधला.
रस्गोत्रांनी बीबीसीला सांगितलं, "मी त्यावेळी तिथं होतो. निक्सन यांचा उद्देश इंदिरा गांधींना त्यांची जागा दाखवणं होता. ते इंदिरा गांधींचा अपमान करू इच्छित होते. सुरुवातीपासूनच संभाषण चांगले चालले नव्हते."
रस्गोत्रा पुढे म्हणाले, "त्या वेळी भारतात आलेल्या आणि आपल्यावर ओझे बनलेल्या आणि छावण्यांमध्ये उपासमारीने मरणाऱ्या दहा लाख बंगाली निर्वासितांबद्दल निक्सन यांनी एकही शब्द काढला नाही. आपण युद्ध घोषित करण्यासाठी आलो आहोत, अशी त्यांना कदाचित काही शंका असेल. त्यांनी इंदिरा गांधींशी जाणूनबुजून चुकीचं वर्तन केलं."
इंदिरा गांधींबद्दल रस्गोत्रा म्हणाले, "त्यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं. त्या खूप प्रतिष्ठित महिला होत्या. त्यांनी निक्सन यांना जे सांगायचं होतं ते सांगितलं. त्याचा सारांश असा होता की तुम्ही पूर्व पाकिस्तानमध्ये सुरू असलेला नरसंहार थांबवा आणि भारतात आलेल्या निर्वासितांनी पाकिस्तानात परत जावं. भारतात त्यांच्यासाठी जागा नाही."
अमेरिकन नौदल आणि 1971 चे युद्ध
1971 च्या युद्धादरम्यान अमेरिकेनं बंगालच्या उपसागराकडे आपला नौदल ताफा पाठवला होता.
इंदिरा गांधींनी नंतर इटालियन पत्रकार ओरियाना फलाची यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, "जर अमेरिकन लोकांनी एकही गोळी झाडली असती किंवा बंगालच्या उपसागरात थांबण्याऐवजी दुसरं काही केलं असतं तर तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकलं असतं. पण खरं सांगू का, ही भीती माझ्या मनात एकदाही आली नाही."
अॅडमिरल एस.एम. नंदा यांनी त्यांच्या 'द मॅन हू बॉम्ब्ड कराची' या आत्मचरित्रात लिहिलंय, "डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच सोव्हिएत युनियनचा एक विध्वंसक आणि एक माइनस्वीपर मलाक्काच्या खाडीतून या भागात पोहोचला होता. सोव्हिएत नौदलाचा हा ताफा अमेरिकन नौदलाचा ताफा तिथून निघून जात नाही तोपर्यंत म्हणजे जानेवारी 1972 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्याचा पाठलाग करत राहिला."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)