भारतीय नागरिकांनी इराण सोडावं, तेहरानमधील भारतीय दूतावासाकडून आवाहन

इराणमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, तेहरानमधील भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे.

दूतावासानं म्हटलं आहे की, "इरामधील परिस्थिती लक्षात घेता, इराणमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांना (विद्यार्थी, यात्रेकरू, व्यावसायिक आणि पर्यटक) व्यावसायिक उड्डाणांसह सर्व उपलब्ध मार्गांनी इराण सोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे."

याव्यतिरिक्त, त्यांना आंदोलन स्थळांपासून दूर राहण्यास, इराणमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्यास आणि कोणत्याही प्रकारच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

इराणसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेनं आधीच आपल्या नागरिकांना इराण सोडण्याचं आवाहन करणारी सूचना जारी केली आहे.

एक दिवस आधी, कॅनडानंही आपल्या नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला होता.

गेल्या काही आठवड्यांपासून इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनं सुरू आहेत. मानवाधिकार संघटनांच्या मते, या निदर्शनांमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.

इराणमधील आंदोलक इरफान सुल्तानी यांना फाशी देण्याची शक्यता

इराणमधील आंदोलक इरफान सुल्तानी यांना बुधवारी (14 जानेवारी) फाशी देण्यात येईल अशी शक्यता त्यांच्या एका नातेवाईकांनी बीबीसीकडे व्यक्त केली आहे.

गेल्या आठवड्यात इराणी अधिकाऱ्यांनी इरफान यांना अटक केली होती.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 26 वर्षं वय असलेल्या सुल्तानी यांना तेहरानमध्ये झालेल्या निदर्शनांत सहभागी झाल्याचा आरोप ठेवून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

बीबीसी फारसीला त्यांचे एक नातेवाईक म्हणाले, सुल्तानी यांना गुरुवारी अटक केली होती, त्याच दिवशी निदर्शनं एकदम टिपेला पोहोचली होती.

जर कोणत्याही आंदोलकाला फाशीची शिक्षा दिली तर अमेरिका इराणविरोधात मोठी कडक कारवाई करेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.

इराणमध्ये शेकडो जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज

इराणमधील आंदोलकांवर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत 2 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची भीती एका मानवाधिकार संघटनेने व्यक्त केली आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी नागरिकांना 'लवकरच मदत येत आहे' असं आश्वासन दिलं आहे.

अमेरिकेतील ह्युमन राइट्स अ‍ॅक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सी (HRANA) या संघटनेनं म्हटलं की, इंटरनेट बंदी असूनही गेल्या 17 दिवसांत 1850 आंदोलक, सरकारशी संबंधित 135 लोक तसंच 9 नागरिक आणि 9 मुलांच्या मृत्यूची माहिती आतापर्यंत मिळाली आहे.

एका इराणी अधिकाऱ्यानेही रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं की, 2 हजार लोक मारले गेले आहेत. मात्र, या मृत्यूंसाठी 'कट्टरतावादी' जबाबदार असल्याचं म्हटलं.

'विरोध सुरू ठेवा'

इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या संदर्भात मंगळवारी (13 जानेवारी) रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्यं समोर आलं आहे.

त्यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडियावर लिहिलं की, "इराणच्या देशभक्तांनो, विरोध सुरू ठेवा. तुमच्या संस्था ताब्यात घ्या. मारेकरी आणि अत्याचाऱ्यांची नावं जपून ठेवा. त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल."

त्यांनी पुढे लिहिलं आहे, जोपर्यंत आंदोलकांच्या विनाकारण होणाऱ्या हत्या थांबत नाहीत, तोपर्यंत मी इराणच्या अधिकाऱ्यांबरोबरच्या सर्व बैठकी रद्द केल्या आहेत. मदत पोहोचतेच आहे."

तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बासी अरागची यांनी म्हटलं आहे की इराण अमेरिकेशी चर्चेला तयार आहे आणि "युद्ध करण्यासाठी देखील तयारआहे."

दरम्यान, इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांबाबत जर्मनीचे चान्सलर फ्रिड्रिख मर्त्ज मंगळवारी (13 जानेवारी) म्हणाले, "आता आपण इराणच्या सरकारचे शेवटचे दिवस आणि आठवड्यांचे साक्षीदार होत आहोत."

जर्मनीच्या चान्सलरच्या या वक्तव्यांना इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी उत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, "सर्व सरकारांमध्ये, 'मानवाधिकारां'च्या मुद्द्यावर बोलण्यासंदर्भात जर्मनीचं सरकार सर्वात वाईट स्थितीत आहे. यामागंच कारण स्पष्ट आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या दुहेरी मापदंडांमुळे त्यांची सर्व विश्वासार्हता संपली आहे."

ते म्हणाले, "आम्हा सर्वांवर एक उपकार करा आणि थोडी लाज वाटू द्या."

अनेकांचे प्राण गेले

इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन अजूनही सुरू आहेत. सरकारविरोधात निदर्शनं करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईत आतापर्यंत दोन हजारापेक्षा जास्त लोकांचे प्राण गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही माहिती बीबीसी फारसीचे प्रतिनिधी जियार गोल यांनी दिली आहे.

जियार गोल सांगतात, "या आंदोलनात मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 2000 हून जास्त असेल हे निश्चित. याआधीही सरकारने आंदोलकांना दडपण्यासाठी बळाचा वापर केला होता. मात्र, यावेळेस जे झालंय, ते अगदीच वेगळं आहे."

रॉयटर्सने एका इराणी सुरक्षा अधिकाऱ्याच्या आधारे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या जवळपास दोन हजार असू शकते अशी माहिती दिलीय.

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार कार्यालयाचे प्रवक्ते जेरेमी लॉरेन्स यांनी जिनिव्हातील एका कार्यक्रमात सांगितलं, "मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत शेकडो लोकांचे प्राण गेलेत आणि हजारो लोकांना अटक झाली आहे. हा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या सूत्रांच्या माहितीवर आधारित आहे आणि ही सूत्रं विश्वासार्ह आहेत."

काल एका मानवाधिकार संघटनेने त्यांच्या माहितीनुसार, 650 लोकांचे प्राण गेल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर लॉरेन्स यांनी ही माहिती दिली आहे.

इराणमध्ये निदर्शनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा अचूक आकडा समजणं कठीण आहे. कारण गेल्या पाच दिवसांपासून इराणमध्ये इंटरनेट बंद आहे तसेच आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांना काम करण्यास मज्जाव केला आहे.

'ताबडतोब इराण सोडा'

इराणमधील अमेरिकेच्या व्हर्च्युअल दूतावासाने अमेरिकन नागरिकांना सुरक्षा इशारा जारी केला आहे. यानुसार त्यांना ताबडतोब इराण सोडण्याचे आवाहन केले आहे.

दुतावासाने म्हटले, "इराणमध्ये आंदोलनं वाढत आहेत आणि हिंसक होऊ शकतात. त्यामुळे अटकसत्र होऊ शकतं आणि लोक जखमी होऊ शकतात. कडक सुरक्षा उपाय, रस्ते बंद, सार्वजनिक वाहतुकीत व्यत्यय आणि इंटरनेट बंद होत आहे."

"इराणी सरकारने मोबाईल, लँडलाइन आणि इंटरनेट नेटवर्कवर निर्बंध लावले आहेत. इराणला जाणाऱ्या आणि येणाऱ्या फ्लाइट मर्यादित केल्या जात आहेत किंवा रद्द केल्या जात आहेत. अनेक विमान कंपन्यांनी 16 जानेवारीपर्यंत सेवा निलंबित केली आहे."

अमेरिकन नागरिकांना संपर्क करण्याचे इतर पर्यायी मार्ग शोधावेत आणि जर ते सुरक्षित असतील, तर त्यांनी आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे इराण सोडण्याचा विचार करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

याशिवाय "जर तुम्ही इराण सोडू शकत नसाल, तर सुरक्षित जागा शोधा. अन्न, पाणी, औषध आणि इतर आवश्यक वस्तूंचा साठा करा. आंदोलनं टाळा आणि तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव ठेवा," असाही सल्ला इराणमधील अमेरिकन नागरिकांना देण्यात आला.

इराणमध्ये अमेरिकेचा दुतावास नाही. स्वित्झर्लंड अमेरिकेसाठी 'प्रोटेक्टिंग पॉवर' म्हणून काम करतो. अमेरिकेचा परराष्ट्र विभाग इराणमधील अमेरिकन व्हर्च्युअल दूतावासाद्वारे (https://ir.usembassy.gov/) माहिती पुरवतो.

इराणमध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून सरकारविरोधी आंदोलनं सुरू आहेत. दरम्यान, इराणी सरकारच्या समर्थनार्थही रॅली काढल्या जात आहेत.

दरम्यान, इराणमधील सरकारविरोधी आंदोलनं चिरडण्याच्या प्रयत्नात इराण सुरक्षा दलांनी केलेल्या हिंसाचाराचे आणखी पुरावे समोर येत आहेत.

तेहरानमधील एका सूत्राने रविवारी (11 जानेवारी) सांगितले, "येथील परिस्थिती खूप वाईट आहे. आमचे अनेक मित्र मारले गेले आहेत. ते गोळीबार करत होते. जणू काही युद्धक्षेत्र आहे. रस्ते रक्ताने माखलेले आहेत. ते ट्रकमध्ये मृतदेह घेऊन जात आहेत."

बीबीसीने तेहरानजवळील एका शवागारातील फुटेजमध्ये अंदाजे 180 मृतदेहांच्या बॅग बघितल्या आहेत. अमेरिकेतील 'ह्युमन राइट्स अॅक्टिव्हिस्ट' या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, त्यांनी देशभरात 495 आंदोलक आणि 48 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची पुष्टी केली.

गेल्या दोन आठवड्यांच्या अशांततेत आणखी 10 हजार 600 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, असेही या वृत्तसंस्थेने म्हटले.

रविवारी (11 जानेवारी), इराण सरकारने "अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या लढाईत शहीद झालेल्यांसाठी" 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला.

दरम्यान, इराणची राजधानी तेहरान तसंच इतर शहरांमध्ये आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनांचे अनेक व्हीडिओही समोर आले आहेत.

धार्मिक सत्तेविरोधात शक्तिप्रदर्शन करणारी ही आंदोलनं असल्याचं व्हीडिओंमधून सांगितलं जात आहे.

या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

गुरुवारीही (8 जानेवारी) संध्याकाळी तेहरान आणि देशाच्या दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असलेल्या मशहदमध्ये शांततापूर्ण निदर्शनं झाली होती. सुरक्षा दलांनीही या आंदोलकांना अडवलं नाही. बीबीसी फारसीने या व्हीडिओंना दुजोरा दिला आहे.

यानंतर संपूर्ण देशात इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचं एका मॉनिटरिंग गटाने सांगितलं.

व्हीडिओ फुटेजमध्ये आंदोलक इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांना हटवण्याची मागणी करताना दिसत आहेत. तसंच देशाच्या शेवटच्या शाहचे निर्वासित पुत्र रझा पहलवी यांच्या परतण्याच्या घोषणा देताना ऐकू येतात. रझा पहलवी यांनी आपल्या समर्थकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.

देशातील ढासळत चाललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे या आंदोलनांना सुरुवात झाली होती. दरम्यान, हे आंदोलन गेल्या काही वर्षांतलं सर्वात मोठं आंदोलन ठरलं आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी काय म्हणाले?

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी म्हणाले की, सरकारविरोधी आंदोलन करणारे हे असे उपद्रवी आहेत, जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत.

खामेनी यांनी सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्यांना 'दंगलखोर' आणि 'गुंडांचा कळप' म्हटलं आहे. हे लोक केवळ "अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना खुश करण्याचा" प्रयत्न करत असल्याचं खामेनी म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत असल्याचं म्हटलं होतं. तर आता आंदोलनकर्त्यांची हत्या झाली, तर अमेरिका इराणवर "जोरदार हल्ला" करेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

खामेनी यांनी आंदोलनकर्त्यांवर सरकारी इमारती उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे.

खामेनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक पोस्टद्वारे आपली भूमिका मांडली असून, त्यामध्ये ट्रम्प यांच्यावरही थेट निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, "जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष संपूर्ण जगाबाबत अहंकाराने निर्णय घेतात, त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की फिरौन, निमरूद, मोहम्मद रझा पहलवी आणि अशा इतर हुकूमशहा व अहंकारी शासकांचा अंत तेव्हाच झाला, जेव्हा त्यांचा अहंकार शिगेला पोहोचला होता. त्यांचाही (ट्रम्प यांचाही) असाच अंत होईल."

खामेनी यांनी दावा केला, "आज इराण क्रांतीपूर्व काळाच्या तुलनेत अधिक सुसज्ज आणि सशस्त्र आहे. आमची आध्यात्मिक ताकद आणि पारंपरिक शस्त्रास्त्रे यांची तुलना आता जुन्या काळाशी होऊ शकत नाही.

पूर्वीप्रमाणेच आजही अमेरिकेचा इराणबद्दलचा समज चुकीचा आहे."

खामेनी म्हणाले की, लाखो सन्माननीय लोकांच्या बलिदानातून उभा राहिलेला इराण, देशाची नासधूस करणाऱ्यांसमोर कधीही झुकणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.

याआधी काय घडलं?

इराणमध्ये अनेक दिवसांपासून आंदोलनं सुरू आहेत. मानवाधिकार संघटनांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अजूनही देशात अशांतताच आहे.

इराणी चलनाच्या घसरणीमुळे निर्माण झालेल्या संतापानंतर या आंदोलनांना सुरुवात झाली. आंदोलनाचं हे लोण इराणच्या 31 प्रांतातल्या 100 हून अधिक शहरांमध्ये पसरलं.

या आंदोलनांदरम्यान इराणच्या इस्लामिक रिपब्लिकला संपवण्याची मागणी केली जात असून, काही लोक राजेशाही पुन्हा बहाल करण्याची मागणी करत आहेत.

मानवाधिकार संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनांतील हिंसाचारात किमान 48 आंदोलनकर्ते आणि 14 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेतील ह्यूमन राइट्स अ‍ॅक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सीने (HRANA) म्हटलं की, आतापर्यंत किमान 34 आंदोलकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 5 मुलांचा समावेश आहे.

याशिवाय 8 सुरक्षा रक्षकांचाही मृत्यू झाला असून 2 हजार 270 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

नॉर्वेतील संस्था 'इराण ह्यूमन राइट्स'ने (IHR) सांगितले आहे की, सुरक्षादलांच्या कारवाईत किमान 45 आंदोलक मारले गेले असून त्यामध्ये 8 मुलांचा समावेश आहे.

बीबीसी फारसीने 22 मृतांची ओळख पटवली आहे, तर इराणी अधिकाऱ्यांनी 6 सुरक्षा रक्षकांच्या मृत्यूची माहिती दिली.

गुरुवारी (8 जानेवारी) संध्याकाळी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या आणि बीबीसी फारसीने पडताळणी केलेल्या व्हीडिओंमध्ये देशाच्या उत्तर-पूर्वेकडील मशहद शहरातील एका प्रमुख रस्त्यावर मोठ्या संख्येने आंदोलक उतरलेले दिसत आहेत.

या व्हीडिओंमध्ये 'शाह जिंदाबाद' आणि 'ही शेवटची लढाई आहे, पहलवी परत येतील' अशा घोषणा ऐकू येतात. एका ठिकाणी काही लोक ओव्हरब्रिजवर चढताना आणि तिथे बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढताना दिसतात.

ऑनलाइन पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमध्ये पूर्व तेहरानमधील एका प्रमुख रस्त्यावरही मोठ्या संख्येने आंदोलक दिसत आहेत.

मध्यवर्ती शहर इस्फहानमधील एका व्हीडिओमध्ये आंदोलक 'हुकूमशहा मुर्दाबाद' घोषणा देत आहेत. या घोषणा इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्याशी जोडून पाहिल्या जात आहेत.

पश्चिमेकडील देझफुल शहरातून बीबीसी फारसीकडे आलेल्या फुटेजमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक दिसत आहेत. तिथे एका मध्यवर्ती चौकातून सुरक्षा रक्षक गोळीबार करतानाही दिसत आहेत.

वॉशिंग्टन डीसीमध्ये राहणारे रझा पहलवी यांनी इराणी नागरिकांना रस्त्यावर उतरून एकत्र येत आपल्या मागण्या ठामपणे मांडण्याचे आवाहन केल्यानंतर गुरुवारी (8 जानेवारी) संध्याकाळी हे आंदोलन झाले.

रझा पहलवी यांच्या वडिलांना 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर सत्तेतून हटवण्यात आले होते.

इराणमधील सरकारी माध्यमांनी काय म्हटलं?

इराणच्या सरकारी माध्यमांनी मात्र गुरूवारच्या आंदोलनाची तीव्रता कमी करून दाखवली. काही प्रकरणांत तर कुठेच आंदोलन झालं नाही, असं म्हटलं गेलं. ते सिद्ध करण्यासाठी रिकाम्या रस्त्यांचे व्हीडिओही दाखविण्यात आले.

दरम्यान, इंटरनेटशी संबंधित असलेल्या 'नेटब्लॉक्स' या संस्थेने सांगितले की त्यांच्या आकडेवारीनुसार इराणमध्ये सध्या संपूर्ण देशातच इंटरनेट बंद असण्याची परिस्थिती आहे.

या आधी काही दिवसांपूर्वी पश्चिमेकडील इलाम प्रांतातील छोट्याशा लोमार शहरातल्या व्हीडिओमध्ये लोक 'तोफ, टँक, फटाके- मौलवींना जायचंच आहे' अशा घोषणा देताना दिसले. या घोषणांचा संदर्भ धार्मिक सत्तेशी जोडून पाहिला जात आहे. अजून एका व्हीडिओमध्ये लोक एका बँकेबाहेर कागद हवेत उडवताना दिसले.

इलाम, केरमनशाह आणि लोरेस्तान प्रांतांतील कुर्द बहुसंख्याक असलेल्या अनेक शहरांमध्ये दुकानं बंद असल्याचं दिसून आलं.

कुर्द मानवाधिकार संघटना 'हेंगाव'च्या मते आंदोलनादरम्यान इलाम, केरमनशाह आणि लोरेस्तानमध्ये सुरक्षादलांच्या कारवाईत किमान 17 निदर्शकांचा मृत्यू झाला. यापैकी अनेक जण कुर्द किंवा लोर या जातीय अल्पसंख्याक समुदायातील होते.

बुधवारी (7 जानेवारी) पश्चिम इराणमधील अनेक शहरं आणि गावांमध्ये तसंच इतर भागांतही निदर्शक आणि सुरक्षादलांमध्ये हिंसक झटापटी झाल्या होत्या.

'इराण ह्यूमन राइट्स' (IHR) या संस्थेने सांगितलं की, हा आतापर्यंतचा सर्वाधिक प्राणघातक दिवस होता. या दिवशी देशभरात 13 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली.

संस्थेचे संचालक महमूद अमीरी-मोगद्दम यांनी म्हटलं की, "कारवाई दिवसेंदिवस हिंसक होत असून तिची व्याप्ती वाढत आहे."

हेंगावने सांगितलं की, बुधवारी (7 जानेवारी) रात्री उत्तरेकडील गिलान प्रांतातील खोश्क-ए-बिजार इथं सुरक्षादलांनी दोन निदर्शकांवर गोळीबार केला.

रिव्होल्युशनरी गार्ड्सशी जवळीक असलेली इराणची अर्धसरकारी वृत्तसंस्था 'फार्स'ने म्हटलं की, बुधवारी (7 जानेवारी) तीन पोलिस कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला.

संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिमेकडील लोर्देगन शहरात शस्त्रधारी लोकांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. तिसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू तेहरानच्या पश्चिमेकडील मलार्ड काउंटीमध्ये अशांतता नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असताना चाकूच्या वारामुळे झाला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)