रोहितचं आयपीएलमधील करियर संपत आहे का? फलंदाजीत फॉर्म सापडत नसल्यानं मुंबई इंडियन्स अडचणीत

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फिऑन वाइन आणि कॅलम मॅथ्यूज
- Role, वरिष्ठ पत्रकार, बीबीसी स्पोर्ट्स
रोहित शर्माला यंदाच्या इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) मध्ये फॉर्म गवसलेला नाही. रोहितच्या या खराब कामगिरीमुळे त्याच्यावर टीका होत आहे. 2025 मध्ये आतापर्यंत रोहितला सूर गवसलेला नाही.
स्पर्धेत चांगला फॉर्म मिळवण्यासाठी संघर्ष करण्याचा आणि खराब कामगिरीचा गेल्या तीन वर्षांपासूनचा त्याचा ट्रेंड यंदाच्या मोसमातही कायम आहे.
भारतीय संघाच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार असलेल्या रोहितनं आयपीएलमध्ये सहा डावांमध्ये 13.66 च्या सरासरीनं फक्त 82 धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सच्या या सलामीवीरानं सनरायझर्स हैदराबादच्या संघाविरुद्धच्या सामन्यात गुरुवारी (17 एप्रिल) 16 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील त्याच्या या सर्वाधिक धावा आहेत. तीन षटकार लगावत तो फॉर्ममध्ये येत असल्याची काहीशी झलक त्यानं दाखवली होती, मात्र त्यानंतर तो पॅट कमिन्सच्या चेंडूवर सहज बाद झाला.
"फलंदाजीत सातत्य राखणं रोहितला कठीण जातं आहे", असं आयपीएलचा माजी फलंदाज अभिषेक झुनझुनवाला यानं बीबीसी स्पोर्टला सांगितलं.
रोहितच्या खात्यातील धावांचा दुष्काळ त्याच्या स्वत:च्या संघाच्या कामगिरीमध्ये देखील दिसून येतो आहे.
मुंबई इंडियन्सना विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. सात सामन्यांपैकी तीन सामने जिंकून तालिकेमध्ये ते सातव्या स्थानावर आहेत.
रोहितसाठी ही बाब खूपच वेगळी ठरते आहे. कारण 2024 मध्ये टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर आणि गेल्या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहितला आंतरराष्ट्रीय स्तरावर अजूनही भरपूर यश मिळतं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
रोहित मुंबई इंडियन्सच्या संघाचा दिग्गज खेळाडू आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये कर्णधार म्हणून त्यानं संघाला पाच विजेतेपदं जिंकून दिली आहेत. आता तर वानखेडे स्टेडियमवर त्याच्या नावानं एक स्टॅंड असणार आहे.
म्हणजेच एकीकडे रोहितच्या नावावर यशाची नोंद होत असताना, आयपीएलमध्ये मात्र त्याची सातत्यानं खराब कामगिरी होते आहे.
यश आणि प्रसिद्धीबरोबरच प्रचंड अपेक्षादेखील येतात.
बीबीसी स्पोर्ट आणि क्रिकविझे डेटा विश्लेषक सोहम सरखेल यांनी रोहितच्या फलंदाजीतील घसरणीमागील आकडेवारी तसंच रोहित आणि मुंबई इंडियन्सचा संघ पुढे काय करू शकतात याचा आढावा घेतला आहे.
रोहितच्या खेळातील घसरण दाखवणारी आकडेवारी
- आयपीएलमध्ये रोहितची सरासरी 29.30 ची आहे. मात्र 2022 पासून त्यानं फलंदाजीत वरच्या क्रमांकावर 22.89 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. 20 पेक्षा अधिक डाव खेळणाऱ्या 21 सलामीवीरांमध्ये ही दुसरी सर्वात कमी सरासरी आहे.
- आयपीएलच्या यंदाच्या मोसमात रोहितनं सहा डावांमध्ये 13.66 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. मात्र 2024 मधील शेवटच्या तीन सामन्यांची त्यात भर घातली तर ही सरासरी 12.89 इतकी आहे.
- टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मात्र रोहितच्या फॉर्ममध्ये याचप्रकारची घसरण झालेली नाही. 2022 च्या सुरुवातीपासून टी20 सामन्यांमध्ये रोहितची सरासरी 29.34 ची आहे. त्यातुलनेत आयपीएलमधील सलामीवीर म्हणून त्याची सरासरी 22.89 ची आहे.
- आयपीएलमध्ये रोहितची सर्वोत्तम कामगिरी पाचव्या (33.11 ची सरासरी) आणि चौथ्या क्रमांकावर (32.7 ची सरासरी) झाली आहे. मात्र सलामीवीर म्हणून त्याची सरासरी घसरून 27.74 वर आली आहे. फक्त 2016 आणि 2024 मध्ये तो 30 पेक्षा अधिक सरासरीनं खेळला (किमान पाच डाव).
रोहितला आयपीएलमध्ये सूर का गवसत नाही?
- 2022 पासून सहा षटकांच्या पॉवरप्लेमध्ये त्याची सरासरी 36.47 वरून 24.39 वर घसरली आहे.
- 2023 च्या सुरुवातीपासून रोहित आयपीएलमधील त्याच्या 36 डावांपैकी फक्त 12 डावांमध्ये पॉवरप्लेनंतर टिकला आहे. यावर्षी पॉवरप्लेनंतर त्यानं अद्याप फलंदाजी केलेली नाही.
- रोहित पूर्वी 'संतुलित' फलंदाजी करायचा. लेग साईडला त्यानं 51 टक्के धावा केल्या होत्या. मात्र आता त्यात वाढ होत त्या 59 टक्क्यांवर गेल्या आहेत.
- यामुळे आऊटस्विंग चेंडूंविरुद्ध खेळताना त्याच्या धावा कमी होऊ शकतात आणि इनस्विंगर चेंडूवर त्याच्या धावा वाढू शकतात.
- 2022 पूर्वी रोहितनं इनस्विंगर चेंडूंवर 27 च्या सरासरीनं आणि आऊटस्विंगर चेंडूवर जवळपास 50 च्या सरासरीनं धावा केल्या होत्या. मात्र तेव्हापासून ही सरासरी 44 आणि 19 अशी आहे.
- उजव्या हातानं जलदगती गोलंदाजी करणाऱ्यांच्या आऊटस्विंगविरुद्ध रोहित पॉवरप्लेमध्ये 63 च्या सरासरीच्या धावा करायचा. आता ही सरासरी 16 वर आली आहे.

- 2014 ते 2021 दरम्यान डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध रोहित सात वेळा वाद झाला होता. तेव्हा त्याची सरासरी 28.85 ची होती.
- 2022 पासून तो आठ वेळा बाद झाला असून त्याची सरासरी 22.37 ची आहे. त्यानं सामना केलेल्या चेंडूंपैकी 24 टक्के चेंडूइतकीच ती आहे, जी 13 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
- फिरकी गोलंदाजीविरुद्धही रोहित संघर्ष करत आहे. 2022 पासून त्याची सरासरी 15.33 ची आहे. आधी त्याची सरासरी 34.68 ची होती.
- लेग-स्पिन खेळताना त्याच्या फलंदाजीत कमतरता जाणवतात. 2022 पासून लेगस्पिन खेळताना त्याची सरासरी 7.88 ची आहे.
- स्वीप शॉट खेळतानादेखील तो अडचणीत येतो आहे. 2014 ते 2021 च्या दरम्यान त्यानं या शॉटचा वापर फक्त 7 टक्के वेळा केला आणि आठ वेळा बाद झाला. 2022 पासून तो 21 टक्के चेंडूपर्यंत वाढला आहे. तो सहा वेळा बाद झाला आणि त्याची सरासरी 15.5 होती.
- हाच ट्रेंड सर्व फॉरमॅटमध्ये आहे. सर्व फॉरमॅटमध्ये शेवटचे 30 स्वीप शॉट खेळताना रोहित सात वेळा बाद झाला आहे. त्यात त्याची सरासरी 7 होती.
'संयमानं खेळावं लागेल' - पुढे काय होऊ शकतं?
मुंबई इंडियन्सनं आयपीएलचं यापूर्वीचं विजेतेपद 2020 मध्ये जिंकलं होतं. त्याच्या आधीच्या वर्षीदेखील तेच विजेते होते.
2024 मध्ये रोहितच्या जागी हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद देण्यात आलं होतं. मात्र या अष्टपैलू खेळाडूच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ शेवटच्या स्थानावर राहिला.
रोहितच्या संघातील नावामुळे त्याला त्याच्या फलंदाजीतील समस्या दूर करण्यासाठी जास्त कालावधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, जर रोहित सूर गवसला नाही आणि मुंबई इंडियन्सच्या संघाच्या कामगिरीतदेखील सातत्य राहिलं नाहीतर संघाला धाडसी निर्णय घ्यायची वेळ येऊ शकते.
"त्याच्यावर प्रचंड दबाव असतो. विशेषकरून तो जेव्हा भारतासाठी खेळत असतो," असं झुनझुनवाला पुढे म्हणाला.
"आयपीएलमध्ये ते खूपच कठोरपणे खेळतात. अनेक खेळाडूंच्या बाबतीत आपण ते पाहिलं आहे. आपण ते मुंबई इंडियन्सबरोबर देखील पाहिलं आहे."
"त्याच्याबाबतीत संयम ठेवावा लागेल, विशेषकरून मुंबई इंडियन्सच्या संघाला. कारण गेल्या काही वर्षांमध्ये त्यानं संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे."
"तो अजूनही उत्तम खेळू शकतो. मला वाटतं की, कदाचित त्याचा डोळे आणि हातांचा समन्वय थोडासा बिघडला आहे आणि ते होऊ शकतं. मात्र त्यामुळे तुमची कारकीर्द झपाट्यानं उतरणीला लागू शकते. त्याला अनेक गोष्टींवर काम करावं लागेल, खासकरून त्याच्या फिटनेसवर."

फोटो स्रोत, ANI
इंग्लंडचा माजी गोलंदाज टायमल मिल्स 2022 मध्ये रोहितबरोबर मुंबईच्या संघात होता. त्यानंदेखील रोहितला त्याचा सर्वोत्तम फॉर्म गवसेल असा पाठिंबा दिला.
"तो जगातील सर्वाधिक अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. तो अनेक वर्षांपासून खेळतो आहे आणि सर्वोच्च पातळीवर त्यानं चांगला खेळ केला आहे," असं मिल्सनं बीबीसी स्पोर्टला सांगितलं.
"तो त्याच्या सरावात सातत्य ठेवतो. तो अनेक चेंडू खेळतो, नेहमीच लवकर सरावाला जाताना दिसतो आणि इतर सर्वजण सरावाला येण्यापूर्वी त्यानं अतिरिक्त सराव केलेला असतो."
"रोहित जितका प्रदीर्घ काळ खेळला आहे, तितका काळ खेळल्यानंतर, चढउतारांना तोंड द्यावंच लागतं."
"अधिक काळ मिळण्याचा त्याला अधिकार आहे, कारण त्याची कारकीर्द प्रचंड यशस्वी आहे आणि तो गोलंदाजींसाठी एक दु:स्वप्न ठरत आला आहे."
मिल्सनं आयपीएलमधील बदली किंवा सबस्टिट्यूट खेळाडूच्या नियमाचाही प्रश्न उपस्थित केला.
सहापैकी पाच सामन्यांमध्ये रोहित सबस्टिट्यूट होता. त्यातील तीनवेळा तो दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता.
मिल्सला वाटतं की या बदली खेळाडूच्या नियमाचाही अडथळा असू शकतो. कारण त्यामुळे तुम्हाला खेळाशी जुळवून घेण्यासाठी थोडा अधिक वेळ लागू शकतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











