बायकोनं जास्त पगार मिळवला की नवऱ्याचा अहंकार का दुखावला जातो?

    • Author, मेलिसा हॉगेनबूम
    • Role, बीबीसी न्यूज

आपलं आर्थिक उत्पन्न किती किंवा आपण किती कमावतो याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असं म्हटलं तर कदाचित अनेकांना ते पटणार नाही.

असं म्हटलं जातं की, जर आर्थिक स्थिती चांगली असेल, तर आपला आत्मविश्वासही वाढलेला असतो.

पण अनेकदा लोक आपल्या आर्थिक स्थितीची इतरांशी तुलना करतानाही दिसतात.

अशावेळी जर त्यांचं उत्पन्न इतरांपेक्षा किंवा ज्यांच्याशी तुलना होत असेल, त्यांच्यापेक्षा कमी असेल तेव्हा त्यांच्या मानसिक स्थितीवरही थोडा परिणाम झाल्याचं दिसून येतं.

हीच गोष्ट कमी-अधिक प्रमाणात पती-पत्नीच्या नातेसंबंधांमध्येही दिसून येते.

साधारण 70 ते 80 च्या दशकादरम्यान अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला 'अभिमान' हा चित्रपट आला होता. ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा पती-पत्नीच्या नातेसंबंधांवर आधारित होता.

गायन क्षेत्रात आपल्यापेक्षा पत्नीला मिळालेल्या यशामुळे पतीच्या अभिमानाला ठेच पोहोचते आणि मत्सर निर्माण होतो. नंतर हे संबंध टोकाला जातात. हा चित्रपट असल्यानं याचा शेवट गोड दाखवण्यात आला आहे.

या सिनेमात आर्थिक यशापेक्षा पत्नीनं आपल्यापेक्षा व्यावसायिक यश जास्त मिळवल्याचं पतीला सहन होत नाही, असं दाखवण्यात आलं आहे.

म्हणजे हा विषय थेट आर्थिक हितसंबंधाशी नसला तरी त्यातून जो संदेश जातो थोडाफार तसाच आहे.

अशीच स्थिती वास्तविक जीवनातही पाहायला मिळते. जगभरातील विविध संस्था याचा अभ्यास करत आहेत. एका संशोधनात अशा कुटुंबांचा अभ्यास करण्यात आला तेव्हा काही गोष्टी समोर आल्या.

पुरुष आणि महिलांशी बोलून महिला कमावत्या व्यक्ती असण्याचा त्यांच्या नात्यावर काय परिणाम होतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.

याबाबत सुरुवातीला आम्ही डेव्ह यांच्याशी संवाद साधला. डेव्हची त्यांच्या कुटुंबातील भूमिका सध्या बदलली आहे.

''तुमची बायको पैसा कमावते, तेव्हा तुमचा अभिमान काहीसा दुखावला जातो," असं ते सांगतात.

डेव्ह सध्या कुठंही नोकरीला नसल्यामुळे घरीच असतात. घरी राहून मुलांचा सांभाळ ते करतात.

याच विषयावर बोलताना टॉम म्हणाले की, "मी जेव्हा एखाद्याला घरीच राहतो असं सांगतो, तेव्हा त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो."

याच संशोधनात सहभागी झालेल्या ब्रेंडन यांचा अनुभव वेगळा आहे. कुटुंबातले लोकच आता त्यांना 'कामवाली' म्हणून चिडवतात.

ज्या पुरुषांना नोकरी नसते आणि ज्यांची पत्नी किंवा महिला जोडीदार हीच घरातील प्रमुख कमावती व्यक्ती असते, त्यातील ही केवळ तीन उदाहरणं आहेत.

या अभ्यासात पुरुषांनी सांगितलं की, समाजात अनेक वर्षांपासून पुरुषच कुटुंबाचे प्रमुख कमावते व्यक्ती असतात, असं गृहीत धरलं जातं.

मानसिक आरोग्यावर परिणाम अन् घटस्फोटाची शक्यता'

मात्र, आता अधिकाधिक महिला पुरुष जोडीदारांपेक्षा जास्त कमावत आहेत. अशा कमावत्या महिलांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळं कोण पैसे कमावतं याचा घरगुती तसेच सामाजिक समीकरणांवर खोलवर आणि दीर्घकालीन प्रभाव पडतो.

या बदलत्या कौटुंबिक समीकरणांचा प्रभाव इतका जास्त असण्यामागचं मुख्य कारण म्हणजे पैसा आणि सत्तेचं अतूट नातं.

जेव्हा पुरुष घरात सर्वाधिक कमावणारे नसतात, पण समाजातील काही घटकांकडून त्यांच्याकडून ही अपेक्षा ठेवली जाते, तेव्हा त्यांना सत्ता गमावल्यासारखं वाटू शकतं. यामुळं त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि घटस्फोटाची शक्यता देखील वाढू शकते.

जेव्हा पुरुष बेरोजगार असतात, तेव्हा त्यांच्यात नैराश्याची पातळी बेरोजगार महिलांच्या तुलनेत जास्त असते.

एकंदरीत, पुरुष अजूनही महिलांच्या तुलनेत अधिक कमावतात आणि विवाहित जोडप्यांमध्ये मुलांची देखभाल आणि घरकाम महिलाच अधिक करतात. हा जागतिक पातळीवरील मोठा फरक आहे.

यामागं काही प्रमाणात लिंग आधारित अपेक्षा असतात. पण काही प्रसंगी हे आर्थिक गरजांमुळंही असू शकतं.

जिथे जास्त कमावणाऱ्या व्यक्तीच्या करिअरला प्राधान्य दिलं जातं आणि त्यामुळे महिलांना सहसा अर्धवेळ, लवचिक भूमिका स्वीकाराव्या लागतात.

'पुरुषांच्या आत्मसन्मान आणि आनंदावर परिणाम'

कमावणाऱ्या महिलांची संख्या वाढली असूनही, कामाच्या आणि घरातील भूमिकांविषयी लिंगाधारित दृष्टिकोन बदलण्याचा वेग कमी आहे.

काही ठिकाणी महिला जास्त कमवत असल्या तरीही त्यांच्यावरील घरगुती कामाचा ताण काही कमी झाल्याचे दिसत नाही. त्याचबरोबर आपल्या मुलांचीही देखभाल त्यांना करावी लागते.

जर पुरुषापेक्षा महिला जोडीदार जास्त कमावत असेल तर त्या पुरुषाच्या आत्म-सन्मान आणि आनंदावर परिणाम होऊ शकतो, असं संशोधनात दिसून आलं आहे.

पण ही समस्या खरोखर किती गंभीर आहे? आणि पुरुषांना त्यांच्या नवीन परिस्थितीस जुळवून घेण्यास कशी मदत करता येईल?

महिला कुटुंबाची मुख्य कमावणारी व्यक्ती असल्यास, त्याचा पुरुषांवर कसा परिणाम होतो, यावर बोलणं पुरुषांसाठी आजही वर्ज्य मानलं जातं.

पुरुष जोडीदाराच्या करिअरला पाठिंबा देत असले तरी, पारंपरिक पुरुषत्वाच्या संकल्पनांमुळे अनेकदा त्यांना घर चालवणारे (ब्रेडविनर्स) ही भूमिका नीट पार पाडत नाहीत, असं वाटतं.

जेव्हा पुरुष स्वतःच्या इच्छेनं नव्हे, तर नोकरी गमावल्यामुळे किंवा स्थलांतरामुळे घर सांभाळू लागतात, तेव्हा हे खरं ठरतं.

ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये राहणारे माजी सल्लागार आणि आता सोशल मीडियावर लोकप्रिय होत असलेले इन्फ्लुएन्सर हॅरी बंटन यांनी अलीकडेच नोकरी गमावली. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, "एक पुरुष, पती आणि वडील म्हणून माझ्या मूल्यांवर या गोष्टीचा परिणाम झाला आहे."

"माझ्या दृष्टीने, त्या गटात नैराश्याचे, आणि त्याहूनही वाईट टप्प्यांचे प्रमाण का जास्त आहे, याचं कारण स्पष्ट आहे. जेव्हा गोष्टी अपेक्षेप्रमाणे होत नाहीत, तेव्हा ते अत्यंत धक्कादायक ठरू शकतं आणि 'पुरुष' असण्याची कल्पना देखील हादरवून सोडते," असं बंटन यांनी लिहिलं.

"मी हे शेअर करण्याचं कारण म्हणजे, इतरांनाही तसं वाटत असेल तर त्यांच्या भावना याद्वारे समोर येतील."

बंटन यांनी या बदलाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तरी त्यांच्या उदाहरणातून दिसून येतं की, महिला जोडीदाराच्या तुलनेत पुरुषाचं उत्पन्न किती आहे? याचा त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

उदाहरणार्थ, स्वीडनमधील एका अभ्यासात विषमलिंगी जोडप्यांच्या 10 वर्षांच्या उत्पन्नाचा आणि मानसिक आरोग्यासंबंधी नोंदींचा अभ्यास करण्यात आला.

त्यात असं आढळलं की, पत्नीने नवऱ्याच्या तुलनेत अधिक कमवायला सुरुवात केल्यानंतर पुरुषांमध्ये मानसिक आरोग्यासंबंधी समस्यांचं प्रमाण वाढलं.

ज्या पुरुषांच्या किंवा महिलांच्या जोडीदाराचं उत्पन्न जास्त होतं, त्यांच्या मानसिक समस्यांत 8 टक्केपर्यंत वाढ दिसून आली, पण पुरुषांमध्ये हा आकडा अधिक म्हणजे तो सुमारे 11 टक्के पर्यंत होता.

'तर विवाहबाह्य संबध ठेवण्याची जास्त शक्यता'

माझ्या आगामी 'ब्रेडविनर्स' या पुस्तकाच्या लेखनादरम्यान मी डरहम विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डेमिड गेटिक यांच्याशी बोललो. ते हा अभ्यास करणाऱ्या पथकाचं नेतृत्व करत होते.

त्यांनी मला सांगितलं की, आज पुरुषानंच अधिक कमावलं पाहिजे असं स्पष्टपणे कोणी म्हणत नसलं तरीही समाजात अजूनही अशाच अपेक्षा मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे.

अशा पुरुषांमधील मानसिक समस्यांमधील वाढ जोडीदारानं अधिक पैसे कमवायला सुरुवात केल्यामुळे नात्यात आलेल्या तणावाचे संकेत देऊ शकते, असं गेटिक सांगतात.

मात्र, त्यांच्या डेटामध्ये नातेसंबंधातील समाधानाचे विशेष मूल्यांकन केलेलं नव्हतं.

दरम्यान, इतर संशोधनातून असंही दिसून आलं आहे की, अधिक कमावणाऱ्या महिलांच्या पतींकडून विवाहबाह्य संबंध ठेवण्याची जास्त शक्यता असते.

संशोधकांच्या मते, ही कृती पुरुषांचा वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा एक मार्ग असू शकतो. कारण त्यांची ओळख ब्रेडविनर पत्नीमुळे धोक्यात आली आहे, असं त्यांना वाटतं.

संशोधनातून असंही सूचित होतं की, 'घर चालवणारी' व्यक्ती असण्याचा दबाव पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे.

पुरुष बेरोजगार असतात, तेव्हा त्यांच्यात नैराश्याचं प्रमाण महिलांच्या तुलनेत अधिक असल्याचं दिसून येतं.

यामागचं एक संभाव्य कारण म्हणजे, महिलांकडे नोकरीशिवायही मजबूत सामाजिक नाती असतात, ती त्यांना पुरुषांपेक्षा अधिक आधार देतात. त्यामुळं घरी राहणारे वडील (स्टे-अ‍ॅट-होम डॅड्स) हे घरी राहणाऱ्या आईंपेक्षा अधिक एकटे पडतात.

मानसिक आरोग्य उत्पन्नाशी इतकं का जोडलेलं आहे, हे जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा गैरसमज दूर करणं आवश्यक ठरतं.

महिलाच घर चालवणाऱ्या असल्या की, त्या नेहमीच अत्यंत यशस्वी आणि करिअर-केंद्रित असतात, असा एक समज आहे.

पण प्रत्यक्षात, अशा अनेक जोडप्यांमध्ये हे परिस्थितीनुसार असतं, जसं की पुरुषाने नोकरी गमावलेली असते, ज्यामुळे आर्थिक तणाव निर्माण होतो.

संशोधनानुसार, ज्या जोडप्यांमध्ये फक्त महिला कमावत्या असतात, तिथे एकूण घरगुती उत्पन्न पुरुष कमावत्या जोडप्यांपेक्षा कमी असतं. हे लिंग वेतन विषमतेशी सुसंगत आहे.

सगळंच वाईट नाही

परंतु, जेव्हा पुरुष पगाराच्या नोकरीतून माघार घेतात, तेव्हा त्याचा कुटुंबावर सकारात्मक परिणामही होऊ शकतो.

यूकेमध्ये, वडील मुलांबरोबर पूर्वीपेक्षा अधिक वेळ घालवत आहेत आणि संशोधनात दिसून आलं आहे की, घरात राहणारे वडील आपल्या मुलांसोबत अधिक चांगला वेळ घालवतात.

घरात राहणारे वडील प्रामुख्यानं मुलांच्या संगोपनात अधिक सहभागी होतात, पण ते घरकामातील त्यांचा वाटा तितका वाढवत नाहीत.

इतर सर्व परिस्थितींमध्ये, महिलाच अधिक घरकाम करतात, असं 2023 मध्ये अमेरिकेतील प्यू रिसर्चच्या अहवालात दिसून आलं आहे.

अनेक देशांमध्ये पितृत्व रजा कमी असली तरी, जेव्हा वडील ही रजा घेतात, तेव्हा वैवाहिक समाधान वाढू शकतं आणि मुलांच्या संगोपनात वडिलांचा सहभागही वाढतो. अगदी वडील कामावर परतल्यानंतरही.

पितृत्व रजा घेतलेल्या वडिलांचे मुलांशी जास्त जवळचे संबंध तयार होतात. समान घरकाम महिलांना त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करते आणि त्यांच्या कमाईची क्षमताही वाढवते.

पण या सामाजिक बदलांमुळे महिलांना होणारे फायदे अधिक व्यापक आहेत. मेक्सिकोमधील घरांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात, असं आढळलं की जास्त कामाच्या संधी असलेल्या महिलांना घराबाहेर केवळ नोकरीच नव्हे तर इतर क्षेत्रांमध्येही अधिक शक्ती मिळते.

म्हणजेच, ते मोठ्या आर्थिक निर्णयांवर अधिक वाटाघाटीची क्षमता निर्माण करतात. हे इतर संशोधनांशी जुळणारं आहे.

जिथे ऐतिहासिकदृष्ट्या महिला असहाय्य असत, तिथे त्या आर्थिकदृष्ट्या सशक्त झाल्या तर त्याचा त्यांच्या कमाईवर, स्वातंत्र्यावर आणि करिअरवर सकारात्मक परिणाम होतो.

जेव्हा सामाजिक रूढी, परंपरा बदलतात आणि पुरुष कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नोकरीतून माघार घेतात, तेव्हा कुटुंबातील सर्वांचेच मानसिक आरोग्य सुधारतं.

उदाहरणार्थ, स्वीडनमधील आकडेवारीनुसार, 1995 मध्ये जेव्हा पितृत्व रजा (डॅडी मंथ) सुरू झाली, तेव्हा रजा घेतलेल्या सुरुवातीच्या पुरुषांमध्ये वैवाहिक स्थैर्यात घट आणि विभक्त होण्याची शक्यता वाढली.

पण 2002 मध्ये जेव्हा ही रजा दोन महिन्यांपर्यंत वाढवली गेली, तेव्हा ही समस्या राहिली नाही.

आज स्वीडिश पालकांना वापरा किंवा गमवा (यूज इट ऑर लुज इट) अशा धोरणाद्वारे प्रत्येकी तीन महिने रजा उपलब्ध आहे, आणि वडिलांनी ही रजा घेण्याचा दर अपेक्षेनुसार जास्त आहे.

आज महिलांच्या सक्षमीकरणाचं महत्त्व वाढत असलं तरी, मानसिकतेत अजूनही दोन वेगळे गट दिसतात.

किंग्स कॉलेज लंडनच्या इप्सॉस सर्वेक्षणानुसार, 18 ते 28 वयोगटातील जनरेशन झेड (जेन झी) हे सर्वात अधिक विभागलेले होते.

जवळपास 24,000 लोकांच्या जागतिक सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार, घरी बसून मुलांची काळजी घेणाऱ्या पुरुषांत कमतरता असल्याचं अनेकांना वाटतं.

जेन झी गटातील 28 टक्के पुरुषांनी असं मत मांडलं. तर फक्त 19 टक्के महिला सहमत होत्या. इतर वयोगटांमध्ये ही टक्केवारी कमी होती.

"पुरुषांकडून समानतेसंदर्भात खूप अपेक्षा आहेत" या विधानाला 60 टक्के जेन झी पुरुषांनी आणि 38 टक्के जेन झी महिलांनी सहमती दर्शवली. तुलनेत, बेबी बूमर वयोगटात ही टक्केवारी अनुक्रमे 44 टक्के आणि 31 टक्के इतकी होती.

हीजुंग चुंग, किंग्स कॉलेज लंडनमधील वर्क आणि ऍम्प्लॉयमेंटच्या प्राध्यापिका आणि या अहवालातील लेखकांपैकी एक आहेत.

त्या म्हणाल्या की, ही मानसिकता वाढण्यामागं एक कारण म्हणजे, तरुण महिला आता तरुण पुरुषांपेक्षा विद्यापीठात शिक्षण अधिक घेऊ लागल्या आहेत.

याचा परिणाम म्हणून, वीस वर्षांच्या वयोगटातील महिलांचे उत्पन्न पुरुषांच्या तुलनेत थोडे अधिक आहे. यूकेमध्ये पहिल्यांदाच पुरुष डॉक्टरांपेक्षा महिला डॉक्टरांची संख्या जास्त आहे.

"काही क्षेत्रांत आपण लैंगिक समानतेची बरीच चिन्हे पाहतो," असं चुंग स्पष्ट करतात. या तरुणांना कदाचित आजही अनेक महिलांना भेडसावणारी व्यापक विषमता अनुभवायला मिळत नाही, ज्यामुळे काही मुलं "मागे पडत आहेत" असा दृष्टिकोन तयार होतो.

'शाळेतच मुलांना समानता शिकवावी'

समतेबद्दलच्या दृष्टीकोनातील या विभागणीचं आणखी एक कारण म्हणजे पुरुषत्व काय असावं याबाबतच्या कल्पना बदलत आहेत, पण ही परिस्थिती सगळीकडे सारखी नाही.

किंग्स कॉलेज लंडनमधील राजकारणाच्या प्राध्यापिका रॉझी कॅम्पबेल यांनी केलेल्या संशोधनात तरुण पिढीमध्ये पुरुषत्वाविषयी वाढत असलेले मतभेद दिसून आले आहेत.

उदाहरणार्थ, आज पुरुष होणं स्त्री होण्यापेक्षा कठीण आहे का? यावर पुरुष आणि महिलांमध्ये मतभिन्नता दिसून आली.

त्या म्हणतात, "स्त्रीवाद हा पुरुष आणि स्त्री यांच्यातील लैंगिक समतेसाठी असावा असं गृहीत धरलं जातं. मात्र त्यात 'फेमिनिन' (स्त्रीलिंगी) हा शब्द असल्यामुळे तो काहीसा बहिष्कृत वाटू शकतो."

म्हणूनच कॅम्पबेल यांचा आग्रह आहे की, तरुणांशी विशेषतः शाळांमध्ये स्त्रीवाद आणि पुरुषत्व या संकल्पनांबद्दल अधिक खुलेपणाने संवाद व्हायला हवा.

त्या म्हणतात, "आपण तरुण मुलांशी आजच्या काळात 'पुरुष' असणं म्हणजे काय, याविषयी आणि त्यांच्या आयुष्यात असलेल्या आदर्श व्यक्तींबद्दल संवाद कसा साधतो, याचा अधिक विचार करायला हवा."

जेव्हा ऑनलाईन माध्यमांमधून स्त्रीद्वेष पसरवणाऱ्या प्रभावांचं प्रमाण वाढतं आहे, हे तेव्हा विशेष महत्त्वाचं ठरतं. जसं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नेटफ्लिक्सवरील 'अ‍ॅडलसेन्स' या सिरीजमध्ये दाखवलं आहे.

या निष्कर्षांनंतरही, चुंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अलीकडील सर्वेक्षणात बहुतेक लोकांनी मान्य केलं आहे की, लैंगिक समानता साधणं महत्त्वाचं आहे. तसेच एक छोटं पण वाढत चाललेलं संशोधन दर्शवतं की, पुरुष आता पुरुषत्व आणि वडिलकी या संकल्पनांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहू लागले आहेत.

त्यात काळजी घेणं, सहानुभूती आणि इतर सौम्य कौशल्यांचा समावेश आहे, जी पारंपरिकरित्या स्त्रीलिंगी मानली जातात. फक्त 'पुरुष म्हणजे घरासाठी कमावणारा' ही जुनी व्याख्या बदलून. या नव्या दृष्टिकोनाला 'काळजीवाहू पुरुषत्व' (केअरिंग मॅसक्युलिटिज) असं नाव देण्यात आलं आहे.

'कमावत्या महिलांच्या संख्येत वाढ'

मेलबर्नमधील मोनॅश विद्यापीठातील लैंगिक अभ्यासक (जेंडर स्कॉलर) कार्ला इलियट स्पष्ट करतात की, या नव्या पुरुषत्वाच्या कल्पना समाजात रुजवायच्या असतील, तर पुरुषांनी केवळ काळजीचं काम स्वीकारणं पुरेसं नाही, त्यांना वर्चस्व आणि असमानतेपासूनही दूर व्हावं लागेल.

धोरणात्मक बदलांचे परिणाम दिसून यायला वेळ लागू शकतात, त्यामुळे आपण सर्वांनी लगेच अंमलात आणू शकणारा एक उपाय म्हणजे समाजातील आपल्या भूमिकांविषयी बदलणाऱ्या अपेक्षांबद्दल सकारात्मक संदेश देणं.

"पुरुषांना त्यांच्या जोडीदाराच्या कमाईमुळे आत्मसन्मानावर परिणाम झाल्यासारखे वाटत असेल, तर हे स्वतःकडे पाहण्याची आणि लिंगभेदाच्या खोलवर रुजलेल्या कल्पनांना आव्हान देण्याची उत्तम संधी ठरू शकते," असं इलियट म्हणतात

कमावत्या महिलांची संख्या वाढत चाललेली असल्यामुळे, काळानुसार हा आर्थिक बदल सामान्य मानला जाईल.

त्यामुळे मुलं असलेल्या जोडप्यांमध्ये पुरुषांनी अधिक लवचिक काम आणि काळजीवाहू जबाबदाऱ्या स्वीकारणं गरजेचं ठरेल. यामुळे त्यांच्या अधिक कमाई करणाऱ्या पत्नीला करिअर पुढे नेण्यासाठी अधिक संधी मिळू शकते.

आणि जरी या बदलत्या विचारसरणीला वेळ लागणार असला, तरी हे परिवर्तन पारंपरिक 'पुरुष कमावतो, स्त्री घर सांभाळते' या अपेक्षेला कमी करू शकते, नातेसंबंधात समाधान वाढवू शकते आणि सशक्त पण संतुलित सत्ता-संबंध निर्माण करू शकते.

* मेलिसा हॉगेनबूम या बीबीसीच्या आरोग्य आणि विज्ञान पत्रकार आहेत. आगामी पुस्तक 'ब्रेडविनर्स (2025) आणि द मदरहुड कॉम्प्लेक्स'च्या त्या लेखिका आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)