भारतात बनवलेलं 'हे' नवं मेसेजिंग अ‍ॅप खरंच व्हॉट्सअ‍ॅपशी स्पर्धा करू शकेल?

    • Author, शर्लिन मोलन और नियाज फारुकी
    • Role, बीबीसी न्यूज मुंबई आणि दिल्लीहून

ज्यांच्या हातात स्मार्टफोन आहे, त्यांच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप नसेल याची शक्यता फारच कमी आहे. मेसेज देवाण-घेवाण, फोटो-व्हीडिओज शेअरिंग, चॅटिंग, यूपीआय आणि आणखी बऱ्याच गोष्टींसाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरलं जातं.

भारतासह जगभरात लोकप्रिय असलेल्या या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी भारतातील एक कंपनी मेसेंजिग अ‍ॅपमध्ये उतरली आहे.

गेल्या काही आठवड्यांमध्ये भारतीय टेक कंपनी झोहोने तयार केलेलं 'अरत्ताई' हे अ‍ॅप देशात खूप लोकप्रिय झालं आहे आणि फक्त 7 दिवसांत 70 लाख लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. मात्र, ही आकडेवारी नेमक्या कोणत्या तारखांची आहे, हे कंपनीने सांगितलेलं नाही.

मार्केट इंटेलिजन्स फर्म सेन्सर टॉवरच्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात अरत्ताई अ‍ॅपचे डाउनलोड्स हे 10 हजारांहूनही कमी झाले होते.

'अरत्ताई' या शब्दाचा अर्थ तमिळ भाषेत हसणं-खेळणं, मजा करणं किंवा गप्पा मारणं असा होतो. हे अ‍ॅप 2021 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. पण आतापर्यंत फारच कमी लोकांना याबद्दल माहिती होती.

आता या अ‍ॅपची अचानक वाढलेली लोकप्रियता ही केंद्र सरकारच्या 'स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन' देण्याच्या मोहिमेशी जोडली जात आहे.

अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे भारतात स्वदेशी वस्तू वापरण्यावर अधिक भर दिला जात आहे.

पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचे मंत्री गेल्या काही दिवसांपासून 'मेक इन इंडिया' आणि 'स्पेंड इन इंडिया' हे घोषणा देताना सातत्याने देताना दिसत आहेत.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुमारे 2 आठवड्यांपूर्वी या अ‍ॅपबद्दल एक्सवर पोस्ट केली होती. त्यांनी लोकांना स्वदेशी वापरण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर अनेक इतर केंद्रीय मंत्री आणि उद्योग क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींनीही अरत्ताई अ‍ॅपच्या समर्थनात पोस्ट्स केल्या आहेत.

सरकारकडून मिळालेल्या या पाठिंब्यामुळेच अरत्ताई अ‍ॅपच्या डाउनलोड्समध्ये अचानक वाढ झाल्याचे कंपनीचं म्हणणं आहे.

झोहोचे सीईओ मणी वेम्बू यांनी बीबीसीला सांगितलं, "फक्त 3 दिवसांत, रोजचे साइन-अप 3 हजारांहून वाढून 3.5 लाखांपर्यंत पोहोचले आहेत. अ‍ॅक्टिव्ह युजर्समध्येही 100 पट वाढ झाली आहे आणि ही संख्या सातत्याने वाढतच आहे."

त्यांनी सांगितलं, "यातून हे दिसून येतं की, युजर्स अशा स्वदेशी उत्पादनाबद्दल खूप उत्साही आहेत, जे त्यांच्या सर्व गरजा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतं."

तरीही, कंपनीने अ‍ॅक्टिव्ह युजर्सची नेमकी संख्या सांगितलेली नाही. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, ही संख्या अजूनही भारतात मेटाच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या 50 कोटी मासिक अ‍ॅक्टिव्ह युजर्सच्या तुलनेत खूपच कमी आहे.

भारत व्हॉट्सअ‍ॅपसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. हे अ‍ॅप देशात लोकांच्या जीवनाचा भाग बनलं आहे. लोक याचा वापर 'गुड मॉर्निंग' मेसेज पाठवण्यापासून ते व्यवसाय चालवण्यापर्यंतही करतात.

व्हॉट्सॲपशी स्पर्धा करणं कितपत शक्य?

अरत्ताईमध्ये व्हॉट्सअ‍ॅपसारखेच फिचर्स आहेत. यात लोक मेसेज पाठवू शकतात आणि व्हॉइस व व्हीडिओ कॉलही करू शकतात. दोन्ही अ‍ॅप काही व्यवसायिक साधनं (बिझनेस टूल्स) पण ऑफर करतात.

व्हॉट्सअ‍ॅपसारखं, अरत्ताईही हे अ‍ॅप कमी फिचर्स असलेले फोन्स आणि कमी इंटरनेट स्पीडवरही चांगलं चालतं असा दावा करतं.

काही युजर्सनी सोशल मीडियावर अरत्ताईचं कौतुक केलं आहे. काहींना याचा इंटरफेस आणि डिझाइन आवडलं, तर काहींनी हे वापरण्याच्या दृष्टीने व्हॉट्सअ‍ॅपसारखंच असल्याचं सांगितलं.

बर्‍याच लोकांना हे एक भारतीय अ‍ॅप असल्याचा अभिमान आहे आणि ते इतरांनाही हे अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगत आहेत.

अरत्ताई हे पहिलं भारतीय अ‍ॅप नाही ज्याने मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना आव्हान देण्याचं स्वप्न पाहिलं.

यापूर्वीही कू आणि मोज सारख्या भारतीय अ‍ॅप्सना एक्स आणि टिकटॉकचा पर्याय म्हणून वापरण्यात आलं होतं. परंतु, सुरुवातीच्या यशानंतर हे अ‍ॅप्स फार पुढे जाऊ शकले नाहीत.

शेअरचॅटला देखील एकवेळी व्हॉट्सअ‍ॅपचा मोठा प्रतिस्पर्धी मानलं गेलं होतं. पण त्यांना सुद्धा आपल्या फार पुढे जाता आलं नाही.

दिल्लीतील टेक (तंत्रज्ञान) लेखक आणि विश्लेषक प्रसांतो के रॉय म्हणतात की, अरत्ताईसाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या इतक्या मोठ्या युजरबेसला ओलांडणं कठीण होईल. विशेषतः मेटाच्या या प्लॅटफॉर्मवर बऱ्याच व्यावसायिक आणि सरकारी सेवा चालतात.

अरत्ताईचं यश फक्त नवीन युजर्सना आकर्षित करून नाही तर त्यांना टिकवून ठेवण्यावरही अवलंबून आहे. हे फक्त राष्ट्रवादी भावनेवर शक्य नाही, असं प्रसांतो के रॉय म्हणतात.

ते म्हणाले, "अ‍ॅप छान असलं तरीही, जगात कोट्यवधी युजर्स असलेल्या अ‍ॅपची जागा घेणं कठीण आहे."

डेटा प्रायव्हसीचीही चिंता

काही तज्ज्ञांनी अरत्ताई अ‍ॅपच्या डेटा गोपनीयतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हे अ‍ॅप व्हीडिओ आणि व्हॉइस कॉलसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन देतं. पण सध्या मेसेजसाठी ही सुविधा उपलब्ध नाही.

भारतातील टेक पॉलिसीवर वृत्त करणाऱ्या वेब पोर्टल मीडियानामाचे मॅनेजिंग एडिटर शशिधर केजे म्हणतात, "सरकार सुरक्षा कारणांचा हवाला देऊन मेसेजेस ट्रॅक करू इच्छिते. आणि हे एंड-टू-एंड एन्क्रिप्शनशिवाय सहज करता येऊ शकतं."

टेक्स्ट मेसेजसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन लागू करण्यासाठी वेगानं काम करत असल्याचं अरत्ताईने सांगितलं आहे.

मणी वेम्बू म्हणाले, "सुरुवातीला आम्ही हे अ‍ॅप एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह लॉन्च करण्याची योजना आखली होती. काही महिन्यांत हे सुरूही होणार होतं. परंतु, वेळापत्रक पुढे ढकललं गेलं. आम्ही काही महत्त्वाचे फिचर्स आणि सपोर्ट लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करत आहोत."

व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आणि कॉलसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन देतो. पण त्यांच्या धोरणानुसार, मेसेज किंवा कॉल लॉगसारखा मेटा डेटा फक्त कायद्याने वैध परिस्थितीतच सरकारशी शेअर केला जातो.

भारताचा कायदा काय सांगतो?

भारताचे इंटरनेटशी संबंधित काही कायदे विशिष्ट परिस्थितींमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला युजर्सचा डेटा सरकारशी शेअर करण्यास सांगतात. परंतु, आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून हा डेटा मिळवणं कठीण आणि वेळखाऊ असतं.

मेटा आणि एक्ससारख्या मोठ्या जागतिक कंपन्यांकडे कायदेशीर आणि आर्थिक पाठबळ असतं. ज्यामुळे त्या सरकारच्या अशा मागण्यांशी किंवा नियमांशी लढू शकतात, जे त्यांना अन्यायकारक वाटतं.

2021 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपने भारताच्या नवीन डिजिटल नियमांविरुद्ध खटला दाखल केला होता. हे नियम सोशल मीडिया आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील कंटेंटवर नियंत्रण ठेवतात.

व्हॉट्सअ‍ॅपने असा युक्तिवाद केला होता की, हे नियम त्यांच्या गोपनीयता संरक्षणाचे उल्लंघन करतात. एक्सनेही भारत सरकारच्या कंटेंट ब्लॉक करण्याच्या किंवा हटवण्याच्या अधिकारांना कायदेशीर आव्हान दिलं आहे.

म्हणूनच तज्ज्ञ असा सवाल करत आहेत की, भारतीय अ‍ॅप अरत्ताई युजर्सची प्रायव्हसी राखत सरकारच्या मागण्यांना कसं तोंड देईल?

तंत्रज्ञान कायद्याचे तज्ज्ञ राहुल मत्थन म्हणतात की, जोपर्यंत अरत्ताईची गोपनीयतेशी संबंधित संरचना आणि झोहोचा सरकारसोबत युजर-निर्मित कंटेंट शेअर करण्याचं धोरण स्पष्ट होत नाही. तोपर्यंत अनेकांना हे अ‍ॅप वापरताना सुरक्षित वाटणार नाही.

प्रसांतो के रॉय म्हणतात की, झोहोला सरकारबद्दल जबाबदारी वाटू शकते, खास करून जेव्हा केंद्रीय मंत्री या अ‍ॅपचा प्रचार करत आहेत.

ते असंही म्हणतात की, जेव्हा देशाच्या तपास एजन्सींकडून अशा मागण्या येतात, तेव्हा एका भारतीय स्टार्टअपसाठी ठामपणे विरोध करणं सोपं नसतं.

अशाप्रकारची मागणी झाल्यास अरत्ताई काय करेल, असं जेव्हा मणी वेम्बू यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी म्हटलं की, "कंपनीला त्यांच्या युजर्सच्या डेटावर पूर्ण नियंत्रण हवं आहे. त्याचवेळी देशाचे माहिती तंत्रज्ञान नियम आणि कायद्यांचे पालन देखील करायचं आहे."

त्यांनी सांगितलं, "जेव्हा पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन लागू होईल, तेव्हा आम्हाला युजर्सच्या अ‍ॅपवरील चर्चांपर्यंत जाता येणार नाही. आम्ही युजर्सशी कोणत्याही कायदेशीर जबाबदाऱ्यांबाबत स्पष्ट आणि पारदर्शक राहू."

मागील अनुभवातून दिसतं की, भारतीय अ‍ॅप्ससाठी परिस्थिती सोपी नाही, विशेषतः जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकसारख्या मोठ्या आणि लोकांना सवय झालेल्या कंपन्यांचा दबदबा असतो.

पण आता पाहायचं आहे की, अरत्ताई यशस्वी होईल की, आधीच्या अनेक अ‍ॅप्ससारखं त्यांचीही हळूहळू लोकप्रियता कमी होईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)