इराणी नागरिक तेहरान सोडून कुठे जात आहेत? जाणून घ्या अशाच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

इस्रायलने 13 जूनपासून इराणच्या आण्विक ठिकाणांवर हल्ले सुरू केले. इस्रायल आणि इराण यांच्यात परस्परांवर हल्ले सुरूच आहेत. पण अमेरिका या संघर्षात उतरेल का? हा प्रश्न सध्या सर्वात मोठा आहे.

बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी याचं स्पष्ट उत्तर दिलं नाही. "कदाचित हो, कदाचित नाहीही," असं त्यांनी म्हटलं.

इस्रायल-इराण यांच्यात संघर्ष सुरू झाल्यापासून सातत्यानं विचारल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही वाचकांसाठी देत आहोत.

बीबीसीच्या प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांनी या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

इंटरनेटवर लोक या प्रश्नांची उत्तरं शोधत आहेत.

इस्रायल सध्या इराणवर बॉम्बफेक का करत आहे?

फ्रँक गार्डनर, सुरक्षा विषयक प्रतिनिधी

या प्रश्नावर "आमच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही", असं इस्रायलचं म्हणणं आहे.

गेल्या काही महिन्यांत इराणनं अण्वस्त्रं बनवण्याच्या योजनांना वेग दिला आहे, असंही इस्रायलनं सांगितलं आहे.

इराणच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंधित चर्चेतून कोणताही तोडगा निघत नव्हता. त्यामुळे इराणवर हल्ला करणं हा शेवटचा पर्याय होता, असं इस्रायलचं मत आहे.

इराणमुळे आमच्या अस्तित्वाला धोका असल्याचंही इस्रायलचं म्हणणं आहे.

इराणनं अण्वस्त्रं तयार केली तर ते त्याचा वापर करतील. कारण त्यांनी आधीच इस्रायलचा नाश करण्याची शपथ घेतली होती, असा त्यांचा यामागचा युक्तिवाद आहे.

इराण अण्वस्त्रं बनवण्याच्या जवळ होता असा दावा केला जात असला तरी, या भागातील इतर देशांनी हा मुद्दा उपस्थित केलेला नाही.

संयुक्त राष्ट्राची आण्विक देखरेख करणारी संस्था आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (आयएइए) देखील या गोष्टीशी सहमत नाही.

अमेरिकन गुप्तचर विभागाच्या मागील ओपन सोर्स रिपोर्टमध्येही इराण अण्वस्त्रं तयार करत असल्याबाबतचा उल्लेख नाही.

इराणी नागरिक कुठं जाऊ शकतात?

नफीसे कोह्नवर्द, मध्य पूर्व प्रतिनिधी

इस्रायल डिफेन्स फोर्सनं (आयडीएफ) इराणची राजधानी तेहरानमधील काही भाग रिकामा करण्यासाठी नोटीस बजावली आहे, परंतु ते भाग दाट लोकवस्तीचे आहेत.

तेहरानमधून देशाच्या उत्तरेकडे जाण्यासाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे टीव्ही फुटेज आपण पाहिले आहेत.

इराणचे लोक या भागाला सुरक्षित मानतात. पण तिथेही हल्ले झाले आहेत.

इराणमधील इस्रायलचं लक्ष्य इतकं मोठं आहे की, कोणताही भाग सुरक्षित मानला जाऊ शकत नाही.

तेहरानमध्ये एक कोटी लोक राहतात, त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की, एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांना बाहेर काढणं, प्रत्यक्षात शक्य नाही.

अमेरिका संघर्षात सहभागी झाल्यास इराण अमेरिकन तळांवर हल्ला करेल?

मायकी के, सुरक्षा ब्रीफ होस्ट, बीबीसी

निश्चितच याबाबतचा धोका आहे आणि अमेरिकेसाठी त्याचे परिणाम खूप गंभीर ठरू शकतात.

संपूर्ण मध्य पूर्वमध्ये सुमारे 19 ठिकाणी 40 ते 50 हजार अमेरिकन सैनिक तैनात आहेत.

सायप्रसमध्ये अमेरिकेचं सैन्य तैनात आहे आणि बहरीनमध्येही अमेरिकन नौदल तळ आहे.

अमेरिका या संघर्षात कशा प्रकारे आणि कितपत सहभागी होण्याचा निर्णय घेणार, यावर सर्व गोष्टी अवलंबून असतील.

संघर्षात इराणचे प्रॉक्सी (समर्थक) त्यांना पाठिंबा देतील का?

फ्रँक गार्डनर, सुरक्षा विषयक प्रतिनिधी

मला असं वाटत नाही, आता तर आणखीच कठिण आहे नाही.

7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासनं इस्रायलवर हल्ला केल्यापासून इस्रायलनं योजनाबद्धपणे इराणच्या संरक्षण प्रणालीच्या बहुतांश भागाचं नुकसान केलं आहे.

इस्रायलनं गाझामध्ये हमासचा पूर्ण नाश केला आहे. त्यांनी लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्र साठवणुकीची ठिकाणं मोठ्या प्रमाणावर नष्ट केली आहेत.

सीरियाही आता इराणचा मित्र राहिलेला नाही, कारण तेथे बशर अल-असद यांना सत्तेतून हटवण्यात आलं आहे. मात्र, हे काम इस्रायलनं केलेलं नाही.

येमेनचे हुती बंडखोर तुलनेने कमी आहेत, त्यामुळे त्यांचा समन्वय फारसा चांगला नाही.

इराणच्या नेत्यांना किती पाठिंबा आहे?

नफीसे कोह्नवर्द, मध्य पूर्व प्रतिनिधी

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी आहेत. इराणच्या राष्ट्राध्यक्षांपेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्ती असणारे ते एक धार्मिक व्यक्तिमत्व आहेत.

ते सुरक्षा दलांचे कमांडर-इन-चीफ आहेत. अमेरिकेशी चर्चा आणि इतर विषयांवर निर्णय घेणारे खामेनी हे मुख्य व्यक्ती आहेत.

पण त्यांना संपूर्ण इराणचा पाठिंबा नाही. इराणमध्ये लोक विभागलेले आहेत आणि हा फरक वाढताना दिसत आहे.

अवघ्या दोन वर्षांपूर्वी इराणच्या लोकांनी सर्वोच्च नेत्याच्या सत्तेविरुद्ध अनेक मोठी आंदोलनं पाहिली.

महिलांनी या आंदोलनामध्ये त्यांच्या स्वातंत्र्य आणि हक्कांची मागणी करत सहभाग नोंदवला होता.

पण, आपण हेही दुर्लक्षित करू शकत नाही की, या राजवटीचे अजूनही समर्थक आहेत. त्यात या शासनाशी संबंधित सशस्त्र दलाचाही समावेश आहे.

इराणमध्ये सत्तेची उलथापालथ झाली तर काय होईल?

नफीसे कोह्नवर्द, मध्य पूर्व प्रतिनिधी

याचं कोणतंही स्पष्ट उत्तर नाही.

सरकार बदलण्यासाठी एकत्र काम करणारा एकही विरोधी पक्ष इथे नाही, हे आपण गेल्या काही वर्षांत पाहिलं आहे.

सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यात इराणच्या माजी शाहांचा निर्वासित मुलगा रझा पहलवीही आहे, जो सध्या परदेशात राहतो.

इराणमध्ये आणि बाहेरही त्यांचे समर्थक आहेत, पण त्यांच्या समर्थकांची नेमकी संख्या सांगता येत नाही.

त्यांचे विरोधकही आहेत, ज्यामध्ये देशातील सुधारणावाद्यांचाही समावेश आहे. कदाचित इराणमध्ये पुन्हा राजेशाही परत यावी, अशी त्यांची इच्छा नसणार. कारण सुमारे 40 वर्षांपूर्वी ती उलथवून टाकण्यात आली होती.

त्यामुळे पर्याय आहे की नाही हे स्पष्ट होत नाही.

फोर्दो कुठं आहे आणि ते नेमकं काय आहे?

मायकी के, सुरक्षा ब्रीफ होस्ट, बीबीसी

फोर्दो हे तेहरानपासून सुमारे 200 किलोमीटर दक्षिणेला आहे आणि इराणच्या दोन महत्त्वाच्या अणू संवर्धन केंद्रांपैकी एक आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने हे एका डोंगराच्या आत बांधण्यात आलं आहे. मुळात इराण त्यांच्याकडे असलेला समृद्ध युरेनियम साठा वाढवण्यासाठी वापरत असलेल्या प्रमुख केंद्रांपैकी हे एक आहे.

फोर्दोवर यापूर्वीच इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) हल्ला केला आहे.

असं मानलं जातं की, हे हल्ले इराणच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांवर आणि फोर्दोच्या आजूबाजूच्या हवाई संरक्षण क्षमतेवर लक्ष केंद्रित करून करण्यात आले.

त्या भागाला अधिक असुरक्षित करण्याचा उद्देश त्यामागे होता.

इराण अणुबॉम्ब मिळवण्याच्या किती जवळ आहे?

फ्रँक गार्डनर, सुरक्षा विषयक प्रतिनिधी

इराण अणू बॉम्ब तयार करण्याच्या दिशेने काम करत होता की नाही, हे फक्त इराणचे सर्वात विश्वासू अणुशास्त्रज्ञ, सुरक्षा अधिकारी आणि सर्वोच्च नेते यांनाच माहिती आहे. बाकी सर्व काही अंदाज आहेत.

पण या महिन्याच्या सुरुवातीला संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा एजन्सीला (आयएइए) इराणनं अणू प्रसार प्रतिबंधांचे पालन केले नसल्याचं आढळून आलं, तेव्हा चिंता वाढली. 20 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं.

इराणने सुमारे 400 किलोग्राम युरेनियम 60 टक्क्यांपर्यंत संवर्धित करून जमा केले आहे. ते नागरी अणू उद्दिष्टांसाठी आवश्यक असलेल्या स्तरापेक्षा खूप जास्त आहे.

संयुक्त राष्ट्र एजन्सीनं म्हटलं की, इराण पूर्णपणे सहकार्य करत नसून अणू साहित्याचा वापर अण्वस्त्रं तयार करण्यासाठी झालेला नाही, हे त्यांना सिद्ध करता आलेलं नाही.

"इराण अण्वस्त्रं मिळविण्याच्या जवळ गेला आहे. गेल्या काही महिन्यांतील गोपनीय माहितीवरुन हे दिसून आल्याचं," इस्रायली लष्करानं मागील आठवड्यात म्हटलं होतं.

पण ही गोपनीय माहिती कुणाची आहे? कदाचित इस्रायलचा सर्वात जवळचा सहयोगी देश अमेरिका तर नाही.

मार्चमध्ये अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी काँग्रेसला सांगितलं होतं की, "इराणने शस्त्रास्त्रं बनवण्यायोग्य युरेनियम जमा केले आहे, पण ते अणू बॉम्ब तयार करत आहेत, असं वाटत नाही."

दरम्यान, इराणने नेहमीच आपला आण्विक कार्यक्रम शांततपूर्ण असल्याचं म्हटलं आहे.

इस्रायलकडे अण्वस्त्रं आहेत का?

मायकी के, सुरक्षा ब्रीफ होस्ट, बीबीसी

इस्रायलकडे सुमारे 90 अण्वस्त्रं असल्याचा अंदाज आहे. पण खरं उत्तर कोणालाच माहिती नाही.

इस्रायलने त्यांच्या अण्वस्त्र क्षमतेला कधी दुजोरा दिला नाही किंवा कधी ते नाकारलंही नाही.

इस्रायल हा अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचा भाग नाही. जगातील देशांना अणुबॉम्ब मिळवण्यापासून रोखण्यासाठीचा जागतिक करार आहे.

अण्वस्त्रं बाळगण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. पहिली - 90 टक्क्यांपर्यंत समृद्ध युरेनियम, दुसरी - वॉरहेड तयार करण्याची क्षमता आणि तिसरी - ते वॉरहेड लक्ष्यापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग किंवा प्रणाली.

या तिन्ही बाबतीत इस्राइलनं स्पष्टपणे कोणतीही घोषणा केलेली नाही.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.