हिंडनबर्ग: अदानी समूहाला दिलासा, सेबीच्या तपासात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

अदानी

उद्योगपती गौतम अदानी यांना हिंडनबर्ग प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. सेबीच्या तपासात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

आज (बुधवारी) सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने सेबीच्या तपासात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. तीन न्यायाधीशांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे.

लाईव्ह लॉच्या माहितीनुसार भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटले की सेबीच्या तपासात हस्तक्षेप करण्याबाबतीत सुप्रीम कोर्टाचे अधिकार मर्यादित आहेत.

सेबीने 24 पैकी 22 प्रकरणांचा तपास केला आहे. आम्ही उरलेल्या दोन प्रकरणांतील तपास पुढील तीन महिन्यांत करण्यास सांगितले आहे, असं ते म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

हा तपास सेबीकडून काढून घेऊन एसआयटी किंवा दुसऱ्या तपाससंस्थेला देण्यासाठी कोणताही आधार नाही, असंही कोर्टानं सांगितलं.

अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी या निकालाबाबत आनंद व्यक्त करताना सत्यमेव जयते असं म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

गौतम अदानी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की सुप्रीम कोर्टाच्या निकालाने दाखवून दिलं आहे की शेवटी सत्याचाच विजय होतो. सत्यमेव जयते. जे लोक आमच्या पाठीशी उभे होते त्यांचे आम्ही आभार मानतो.

भारताच्या विकासात आमचा जो खारीचा वाटा आहे, तो याही पुढे असाच सुरू राहील, असे अदानींनी म्हटले.

जानेवारी 2023मध्ये हिंडनबर्गने अदानी समुहासंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. अदानी समुहाने हा अहवाल नाकारला होता. मात्र त्यानंतर अदानी समुहाचे समभाग कोसळले होते.

अदानी प्रकरण : आतापर्यंत काय घडलं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

24 जानेवारी 2023 - हिंडनबर्गने अदानी यांच्यावरील संशोधनावर आधारित 'अदानी ग्रुप : हाऊ द वर्ल्ड्स थर्ड रिचेस्ट मॅन इज पुलिंग द लार्जेस्ट कॉन इन कॉर्पोरेट हिस्टरी' हा अहवाल प्रसिद्ध झाला.

26 जानेवारी 2023 - अदानी ग्रुपने हिंडनबर्गचा अहवाल फेटाळून लावला. यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचा आपण विचार करत असल्याचंही अदानी ग्रुपने म्हटलं.

26 फेब्रुवारी 2023 - हिंडनबर्गने म्हटलं की आम्ही आमच्या अहवालावर ठाम आहोत. तसंच कायदेशीर कारवाईचं स्वागत आहे, असंही त्यांनी म्हटलं.

27 जानेवारी 2023 - अदानींनी 2.5 अब्ज डॉलरचा एफपीओ बाजारात आणला.

30 जानेवारी 2023 - या दिवसापर्यंत एफपीओला केवळ 3 टक्के सबस्क्रिप्शन मिळालं. याच दिवशी अबू धाबीतील इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने म्हटलं की आपल्या सबसायडिअरी ग्रीन ट्रान्समिशन होल्डिंग आरएससी लिमिटेडच्या माध्यमातून अदानींच्या एफपीओमध्ये 40 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.

31 जानेवारी 2023 - इजराएलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना भेटण्यासाठी गौतम अदानी हायफा बंदरावर दाखल झाले होते. हिंडनबर्गचा अहवाल आल्यानंतर पहिल्यांदाच अदानी सार्वजनिक ठिकाणी दिसले.

1 फेब्रुवारी 2023 - अदानी कंपनीने आपला एफपीओ रद्द केला.

2 फेब्रुवारी 2023 - कंपनीचे मालक गौतम अदानी यांनी 4 मिनिट 5 सेकंदांचा व्हीडिओ प्रसिद्ध करून एफपीओ मागे घेण्याचं कारण स्पष्ट केलं.

2 फेब्रुवारी 2023 - गुंतवणूकदारांमधील चिंतेचं वातावरण पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कंपनीला कर्ज देणाऱ्या कंपन्यांना त्यासंदर्भातील माहिती मागितली.

3 फेब्रुवारी 2023 - एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की बँकिंग सेक्टर चांगल्या स्थितीत आहे. आर्थिक बाजारपेठा नियमांनुसारच काम करत असल्याचं सीतारामन यावेळी म्हणाल्या.

गौतम अदानी कोण आहेत, 10 वर्षांमध्ये त्यांनी उद्योगाचं साम्राज्य कसं उभं केलं?

अदानी समुहाने विमानतळं, सिमेंट, तांबे उद्योग, रिफायनरी, डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन, पेट्रोकेमिकल्स, रस्ते निर्माण आणि सौर उर्जा अशा क्षेत्रांमध्ये भरपूर गुंतवणूक केली आहे.

गौतम अदानी यांची मागच्या दहा वर्षांतली प्रगती अधोरेखित करणारा हा लेख पुन्हा एकदा प्रसिद्ध करत आहोत.

गुजराती कुटुंबांमध्ये आताच्या 21व्या शतकात तसे पहिल्या पिढीचे उद्योगपती फारसे सापडत नाहीत. सगळे दुसऱ्या नाहीतर तिसऱ्या पिढीतले उद्योजक असतात.

कारण, उद्योगाची मुहुर्तमेढ वडील किंवा आजोबांनी 1970-80च्या दशकांत केलेली असते. आणि 1990च्या दशकांत अर्थव्यवस्था खुली झाल्यावर पुढच्या पिढीने छोटेखानी व्यापार वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेला असतो.

गुजराती कुटुंबातली अशी शंभर तरी उदाहरणं सापडतील. पण, यापैकी अंबानी कुटुंबीय आणि त्यानंतर 2000 पासून अदानी कुटुंबाने आपला डंका आधी देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि पुढे जागतिक पातळीवरही पिटला.

रिलायन्स उद्योगाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना अंबानी उद्योगसमुह धीरुभाई अंबानी यांच्याकडून वारसा हक्काने मिळाला. पण, गौतम अदानी यांचं वैशिष्ट्य हे की, ते वारशावर थांबले असते तर आता कापडाच्या दुकानात गल्ल्यावर किंवा फार तर कापडाच्या घाऊक व्यापारात असते. पण, त्यांनी विसाव्या वर्षीच दोन महत्त्वाचे निर्णय घेतले.

अदानी

फोटो स्रोत, Getty Images

पाठ्यक्रमातलं शिक्षण आपल्यासाठी नाही असं स्वत:चं स्वत: ठरवून त्यांनी गुजरात विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर अभ्यासक्रमाला दुसऱ्याच वर्षी सोडचिठ्ठी दिली. (म्हणजे सोप्या भाषेत ते बी कॉम दुसऱ्या वर्षाचे ड्रॉप आऊट आहेत.) दुसरं म्हणजे वडिलांचा कापडाचा व्यापार नाकारून हिरे व्यापारात उतरण्यासाठी ते थेट मुंबईला आले.

वडील शांतीलाल अदानी यांच्या सात अपत्यांपैकी गौतम एक होते. व्यवसाय ठिकठाक चालत असला तरी मुलाचं स्वप्न त्याहून मोठं होतं. त्याला मदत करण्याचं बळ शांतीलाल यांच्यात नव्हतं. त्यांनी मुलाला आशीर्वाद, शंभर रुपये आणि मुंबईतल्या काही नातेवाईकांचे पत्ते दिले.

अहमदाबादहून वीस वर्षांचे गौतम अदानी मुंबईत आले. वेळ न दवडता त्यांनी हिरे व्यापारासाठी प्रसिद्ध असलेला झवेरी बाजार गाठला.

पहिली 2-3 वर्षं हिरे वेचण्याचं काम करत असतानाच त्यांनी स्वत:ची हिरे ब्रोकरेज कंपनी थाटली. आणि विशेष म्हणजे पहिल्या तीन वर्षांतच त्यांची गणना या व्यापारातल्या लक्षाधीशांमध्ये व्हायला लागली. विशीतच अदानी 'मिलियनेअर' झाले.

अदानी

कुठल्याही धंद्यात मध्यस्थ म्हणून काम करताना माणसाला तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फाचा गोळा ठेवावा लागतो असं म्हणतात. तरंच तुम्ही माणसांचे स्वभाव हाताळू शकता आणि 'डील' घडवून आणू शकता.

गौतम अदानींसाठी ते कधीच कठीण गेलं नाही. किंबहुना त्यांच्या पुढच्या आयुष्यातही 'डीलमेकर' म्हणून ते पुढे आले. उद्योगधंद्याबाबत वाटाघाटी करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकणार नाही. आणि त्याचीच चुणूक मुंबईतल्या त्यांच्या तीन वर्षांच्या वाटचालीत दिसली.पुढे 2015मध्ये, त्यांच्या अदानी पॉवर कंपनीने उडुपी औष्णिक उर्जा प्रकल्प 6,300 कोटी रुपयांना विकत घेतला त्या वाटाघाटी फक्त 100 तासांत संपवण्याचा रेकॉर्ड अदानींनी केला. विचार करा असे निर्णय होण्यासाठी आणि ते पार पडण्यासाठी काही वर्षं लागू शकतात.

जल मार्गाने व्यापार करण्यासाठी देशातील बंदरांचा विकास करणं हे शालेय जीवनापासून त्यांनी पाहिलेलं स्वप्न होतं. कारण, शाळेत असताना कांडला बंदरावर सहलीसाठी गेले असताना तिथे चालणारा व्यापार त्यांनी बघितला होता.

पुढे अदानी एक्सपोर्ट्स आणि अदानी पोर्ट्स च्या माध्यमातून या क्षेत्रात उतरल्यावर रेल्वेमंत्री नितिश कुमार यांनी देशातली प्रमुख बंदरं रेल्वेमार्गाने जोडण्याचं महत्त्व पटवून दिलं होतं. तसं झालं तर व्यापाराला कशी चालना मिळेल हे प्रात्यक्षिकासह दाखवल्यावर पुढच्याच अर्थसंकल्पात नितिश कुमार यांनी देशातल्या सहा बंदरांना एकमेकांशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गाची घोषणा केली होती. हे अदानी यांनी केलेलं आणखी एक डील. ते ही अगदी कमी वेळात.

थोडक्यात आपला मुद्दा महत्त्वाच्या लोकांना पटवून देण्याची हातोटी गौतम अदानींकडे होती आणि त्याच्या जोरावरच त्यांनी काही राजकीय धोरणं आणि निर्णय आपल्या बाजूने वळवून त्याचा औद्योगिक फायदा करून घेतला. बिझिनेस क्षेत्रात यालाच 'व्हिजन' किंवा 'दूरदृष्टी' म्हणतात.

अदानी

फोटो स्रोत, Getty Images

पुन्हा एकदा अदानींच्या सुरुवातीच्या दिवसांकडे जाऊया. मुंबईत हिरे व्यापारात त्यांचा जम बसत असतानाच त्यांचा मोठा भाऊ मनसुखलाल यांनी अहमदाबादमध्ये प्लास्टिक व्यवसाय सुरू केला. त्यांनी गौतम यांना मदतीसाठी बोलावलं.

गौतम यांनी अधिकृतपणे एका संघटित उद्योग क्षेत्रात 1981 मध्ये हे असं पाऊल ठेवलं.पण, ही फॅक्टरी सांभाळतानाही त्यांना या धंद्यातलं भवितव्य दिसू लागलं. त्यांनी प्लास्टिक व्यवसायाला पॉलीमर आणि पीव्हीसी आयात करणाऱ्या कंपनीमध्ये बदललं.

कंपनीच्या माध्यमातून छोट्या उद्योगांसाठी लागणारं पीव्हीसी आयात करायला त्यांनी सुरुवात केली. आणि अदानी एक्सपोर्ट्स या अदानी साम्राज्याच्या पहिल्या आणि होल्डिंग कंपनीचा श्रीगणेशा झाला. याच कंपनीला आता अडानी एंटरप्रायझेस असं म्हणतात. ही समुहाची मुख्य कंपनी आहे.

1991मध्ये अर्थव्यवस्था खुली झाल्यावर आणि खाजगीकरण शक्य झाल्यावर अदानी यांना विस्ताराची नवीन स्वप्नं दिसू लागली. किंवा असं म्हणूया त्यांची स्वप्न पूर्ण व्हायला लागली.

कारण, एक्स्पोर्ट बरोबरीने खाजगी जेट्टी स्थापन करण्याचं त्यांचं स्वप्न गुजरात सरकारने पूर्ण केलं. मुंद्रा बंदराची व्यवस्था सांभाळण्याचं खाजगी कंत्राट गुजरात सरकारने 1995मध्ये काढलं. आणि ते गौतम अदानी यांनाच मिळालं. बंदर व्यवस्थापनाच्या व्यवसायावर त्यांची नजर पहिल्यापासून होती.

आताच्या घडीला अदानी पोर्ट्स ही देशातली सगळ्यात मोठी खाजगी बंदर व्यवस्थापन कंपनी आहे. मुंद्रा हे खाजगीरित्या सांभाळलं जाणाऱ्या बंदरातून वर्षाला 21 कोटी टनाइतक्या वस्तू आणि मालाचा व्यापार होतो. तर 1996मध्ये स्थापन झालेली अदानी पॉवर ही कंपनी देशातली सगळ्यात मोठी खाजगी उर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे.म्हणता म्हणता 1991 पासून गौतम अदानी यांनी 78 बिलियन अमेरिकन डॉलरचं साम्राज्य उभं केलं आहे. हा आकडा 14 जूनला कंपनीचे शेअर पडण्यापूर्वीचा आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार, ते आशियातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. आणि जगातले तेराव्या क्रमांकाचे.

पण, या सगळ्यात एक मेख आहे. ही सगळी संपत्ती आणि उद्योग जगतात त्यांची भरभराट मागच्या दहा वर्षांत झाली आहे. पहिल्या फळीचे उद्योजक ते होते. पण, 2012 पासून त्यांच्या कंपन्यांचे शेअर अगदी सरळ रेषेत वर चढले आहेत. त्यांमध्ये 400% ची वाढ झाली आहे. आणि देश पातळीवर महत्त्वाचे असे प्रकल्प मिळवण्यामध्ये अदानी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेली जवळीक कारणीभूत ठरल्याचा आरोप वारंवार होत आला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)