You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्मरणशक्तीसाठी 'या' 4 गोष्टी धोकादायक, विस्मरणाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी 'हे' करा
- Author, जुआन फ्रान्सिस्को अलोन्सो
- Role, बीबीसी न्यूज वर्ल्ड
"आपल्या आठवणी डायरीसारख्या असतात. त्या आयुष्यभर आपल्यासोबत राहतात."
आयरिश लेखक ऑस्कर वाइल्ड (1854-1900) यांनी अशा प्रकारे स्मरणशक्तीची व्याख्या करून ठेवली आहे.
पण जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपण आपल्या जीवनात अनुभवलेल्या काही गोष्टी विसरतो.
या आठवणी विसरून जाण्याचा धोका किंचित कमी केला जाऊ शकतो, असं सॅन फ्रान्सिस्को येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील डायनॅमिक मेमरी प्रयोगशाळेचे संचालक प्राध्यापक चरण रंगनाथ सांगतात.
स्मरणशक्तीचा अभ्यास करणाऱ्या आघाडीच्या न्यूरोसायंटिस्टपैकी ते एक आहेत. त्यांनी 'व्हाय वुई रिमेंबर : द न्यू सायन्स ऑफ मेमरी' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यांनी अशा चार सवयी सांगितल्या ज्या आपल्या मेंदूवर प्रभाव टाकतात आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टी लक्षात ठेवतात.
या गोष्टी त्यांनी आपल्या पुस्तकात स्पष्ट केल्या आहेत. तसेच त्या कशा दुरुस्त करायच्या हे देखील सांगितलं आहे.
1. वेळेवर झोप न लागणे
वयानुसार झोपेचे तास कमी होत जातात.
कामाचा ताण, आर्थिक समस्या आणि आजार यांचा झोपेवर परिणाम होऊ शकतो. आपल्या आरोग्यासाठी या गोष्टी अतिशय हानिकारक आहेत.
गेल्या 25 वर्षांपासून मेंदू या विषयावर काम करत असलेले रंगनाथ सांगतात, "जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही, तर मेंदूचं काम मंदावतं. लक्ष केंद्रित करणं अवघड जातं. चिडचिड वाढते, योग्य निर्णय घेऊ शकत नाही"
रात्रीच्या वेळी मेंदू केवळ हानिकारक घटकच काढून टाकत नाही तर त्याची 'बॅटरी' देखील रिचार्ज करत असतो. आपल्या आयुष्यातील घटना आपण विसरू नये यासाठी काम करत असतो.
रंगनाथ सूचवतात, जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी फोन आणि कॉम्प्युटर वापरू नका, जास्त खाऊ नका आणि अल्कोहोल आणि कॉफी पिऊ नका.
ज्यांना रात्री काही कारणाने नीट झोप येत नाही, त्यांनी दिवसभरात थोडी झोप घ्यायला हरकत नाही.
असं म्हणतात की, दिवसा झोपेमुळे स्मरणशक्ती सुधारते.
2. मल्टीटास्किंग
आजच्या स्पर्धात्मक आणि व्यस्त जगात मल्टी टास्किंगकडे एक सकारात्मक पैलू म्हणून पाहिलं जातं. पण याचा परिणाम आपल्या स्मरणशक्तीवर होऊ शकतो, असं रंगनाथ सांगतात.
याचं कारण म्हणजे मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आपल्याला आपण करत असलेली कामं पूर्ण करण्यास मदत करतो.
परंतु, एका कामातून दुसऱ्या कामात शिफ्ट होताना, प्रीफ्रंटल कॉर्टेक्समधील क्षमता कमी होते. विविध कामांमध्ये गुंतल्यावर आपल्या मेंदूमधील अनेक न्यूरॉन्समध्ये स्पर्धा होत असते.
या स्पर्धेमुळे विविध प्रकारची कामं एकाच वेळी अधिक कार्यक्षमतेने आणि योग्य पद्धतीने करणे कठीण होतं, असं रंगनाथ सांगतात.
ईमेल तपासताना आपण काही ऐकलं तर ऐकलेलं आठवत नाही, आपल्याला फक्त ईमेल ही एकच गोष्ट आठवते.
रंगनाथ सांगतात, "जेव्हा आपला कामाचा उद्देश बदलतो तेव्हा न्यूरॉन्स देखील बाजूला होतात. त्यामुळे घडणाऱ्या गोष्टी नीट लक्षात ठेवता येत नाहीत. मेंदू एकाच वेळी अनेक कामं करत असता गोष्टी लक्षात ठेवणं कठीण असतं."
त्यामुळे मल्टी-टास्किंग कमी करण्यासाठी, एकावेळी एकच काम करा. शिवाय ध्येयापासून विचलित होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला रंगनाथ यांनी दिला.
कॉन्फरन्समध्ये असताना ईमेल आणि मेसेज नोटिफिकेशन्स मिळू नयेत म्हणून फोन सायलेंटवर ठेवा.
स्मार्टफोन जास्त वापरणं हा आणखीन एक गंभीर प्रश्न आहे. याचा आजच्या तरुणाईवर काय परिणाम होतोय?
यावर रंगनाथ म्हणतात, "नक्कीच याचे काही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आहेत. पण, महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुलं फोनद्वारे स्मरणशक्तीसाठी चांगल्या सवयी विकसित करू शकतात."
3. त्याच त्याच गोष्टी करणं
आपण जे विचार करतो त्याच्या विरुद्ध, आपला मेंदू सर्वकाही लक्षात ठेवण्यासाठी तयार केलेला नाहीये.
तो केवळ निवडक गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी तयार केलेला आहे.
रंगनाथ सांगतात, "आपण अनुभवलेल्या अनेक गोष्टी किंवा आपण गोळा केलेली माहिती काही दिवसांनी लक्षातून जाऊ शकते.
"केवळ भीती, राग, आशा, आनंद, आश्चर्य किंवा इतर भावनांशी संबंधित घटना किंवा अनुभव आपल्या लक्षात राहतात. कारण यामुळे आपल्या मेंदूमध्ये एड्रेनालाईन, सेरोटोनिन, डोपामाइन किंवा कोर्टिसोल सारखी रसायने स्त्रवतात. ही रसायने मेंदूच्या प्लॅस्टिसीटीमध्ये मदत करतात, जी आपल्या स्मरणशक्तीसाठी आवश्यक आहे."
कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक स्पष्ट करतात की, "मेंदूतील प्लॅस्टिसीटी आपल्याला काम करण्यास मदत करते.
"जसजसे वय वाढते तसतशी त्याची क्षमता कमी होते. जसं वय वाढेल तसं बँक खाते, सेल फोन किंवा ईमेल ऍक्सेससाठी बदललेले पासवर्ड लक्षात ठेवणे कठीण जाते.
"तुम्ही पासवर्ड बदलल्यानंतर, नवीन पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी आणि जुना पासवर्ड विसरण्यासाठी न्यूरॉन्स सक्रिय असतात."
4. अति आत्मविश्वास असणे
"काही लोकांना वाटतं की त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे. पण, असं नेहमीच होत नाही. एका टप्प्यावर, लोकांना याची जाणीव होते," असं रंगनाथ सांगतात
आपला मेंदू सर्व काही लक्षात ठेवण्यासाठी तयार केलेला नाही.
प्राध्यापक रंगनाथ यांचा अंदाज आहे की, मेंदूमध्ये दररोज सरासरी 34 गिगाबाइट्स माहिती प्रोसेस होते.
भूतकाळातील गोष्टी लक्षात ठेवणं हा स्मरणाचा उद्देश नाही. स्मृती ही भूतकाळातील महत्त्वाची माहिती घेते, वर्तमान समजून घेऊन भविष्याची तयारी करत असते, असं त्यांनी स्पष्ट केलं.
स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यासाठी कोणते मार्ग आहेत?
रंगनाथ म्हणतात, "लोकांकडे त्यांची स्मरणशक्ती टिकवून ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत. पण त्याचं ते पालन करत नाहीत. यासाठी ते एखादी गोळी किंवा औषधाच्या शोधात असतात. पण जीवनशैली बदलूनही तुम्ही स्मरणशक्ती टिकवून ठेवू शकता."
- रात्री चांगली झोप घेणे, तणावाचा सामना कसा करायचा हे शिकणे
- माइंडफुलनेस सराव या सर्व गोष्टी तुमचा मेंदू कुठे भरकटतोय हे ओळखण्यास मदत करू शकतो.
- अन्न अनेक गोष्टींमध्ये मदत करते. वनस्पती-आधारित आहार तुमचे मानसिक आरोग्य सुधारू शकते."
- शारीरिक व्यायाम, एरोबिक व्यायाम खूप चांगले आहेत. कारण ते प्लास्टिसिटी वाढवण्यास मदत करतात आणि तुमच्या मेंदूचे कार्य सुधारतात.
रंगनाथ सांगतात, अनेक अभ्यासातून असं दिसून आलंय की या प्रक्रियेद्वारे लोक वय वाढल्यानंतरही त्यांची स्मरणशक्ती टिकवून ठेवतात. यामुळे स्मृतिभ्रंशाचा धोका एक तृतीयांश कमी झाला आहे.