दागिने घ्यायचे की बाँड्स नेमकं काय खरेदी करायचं? सोन्यातील गुंतवणुकीचे 'हे' आहेत 3 पर्याय

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, getty images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय. थोडीफार तरी बचत करत असालच. वाचवलेल्या पैशांचा उपयोग साधारणपणे आपण गुंतवणूक करण्यासाठी करतो. ही गुंतवणूक सोने-खरेदीमध्येच सर्वाधिक केली जाते.

सोन्याचे दागिने खरेदी करण्याची परंपरा भारतात जुनी आहे. सोन्यात केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही, असं म्हटलं जातं.

सोन्याचे दागिने अंगावर परिधान करता येतात. पण अडचणीच्या काळात ते आपल्याला प्रचंड उपयोगीही ठरतात.

कोरोना व्हायरसच्या काळातही सोनं एक सुरक्षित पर्याय म्हणून समोर आला. रुपयाची किंमत घसरल्यानंतरसुद्धा सोन्याचा दर वाढतो. शिवाय, रुपया मजबूत झाला तरी सोन्याची किंमत तशीच राहते.

पण बदलत्या काळात सोन्यात गुंतवणूक करण्यासाठीचे नवे पर्याय समोर आले आहेत.

1) प्रत्यक्ष दागिन्यांची खरेदी

प्रत्यक्ष दागिने म्हणजेच सोन्याला तुम्ही स्पर्श करू शकता. उदाहरणार्थ, सोन्याचे कोणतेही दागिने, सोन्याची नाणी, किंवा बिस्किट यांचा समावेश होतो.

दागिन्यांच्या तुलनेत नाणी किंवा बिस्किट यांच्या खरेदीत फरक असतो. यामध्ये मजुरी (मेकिंग चार्ज) वगैरे लागतं.

दागिन्यांची मजुरी 20 ते 22 टक्क्यांपर्यंत असते. म्हणजेच एक लाखांचं सोनं खरेदी केल्यानंतर तुम्हाला 20 हजार अधिकचे द्यावे लागतात. पण नाणी किंवा बिस्किटांच्या खरेदीवरची मजुरी दोन ते चार टक्के असते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, GETTY IMAGES

पण सोनं विकताना मजुरी विचारात घेतली जात नाही. त्यामुळे प्रत्यक्ष सोनं विकताना आपल्याला नुकसान होऊ शकतं.

शिवाय, सोन्याच्या सुरक्षेबाबतही तुम्हाला काळजी घ्यावी लागते. पण गोल्ड बाँड किंवा इतर पद्धतींमध्ये सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होत नाही.

जाणकारांच्या मते, तुम्हाला सोनं परिधान करायचं असेल तर प्रत्यक्ष दागिने खरेदी करणंच उत्तम. दागिन्यांमुळे गुंतवणूक आणि वापर हे दोन्ही करता येऊ शकतं.

पण तुम्हाला फक्त सोन्यात गुंतवणूक करायची आहे, तर बाँडचा पर्याय तुमच्यासाठी चांगला ठरेल.

2) गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF)

गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक ही शेअर बाजाराशी मिळतीजुळती आहे. यामध्ये तुम्ही शेअर खरेदी करता त्याप्रमाणेच ही खरेदी करू शकता.

यामध्ये डिमॅट अकाऊंट उघडणं गरजेचं आहे. यामध्ये ETF ची खरेदी करता येऊ शकते. याची विक्री रोजच्या रोज होत असते.

काही कंपन्या गोल्ड ETF जारी करतात. तुम्ही ते विकत घेऊ शकतात. याची सिक्युरिटी म्हणजेच सोनं हीच असते. जेव्हा तुम्हाला गरज असते किंवा ETF चे भाव वाढले आहेत, हे तुमच्या निदर्शनास येताच तुम्ही ते विकू शकता.

यामध्ये फक्त एकच समस्या आहे. ती म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी ETF विकायचे आहेत, त्याच वेळी ते विकले जातील किंवा नाही, हे महत्त्वाचं ठरतं.

म्हणजे तुम्हाला सोनं विकायचं आहे, पण खरेदी करणारा कुणीच नसल्यास समस्या निर्माण होते.

पण शेअर बाजारात अशा प्रकारची समस्या जास्त येत नाही. कित्येक कंपन्या अशा प्रकारची खरेदी विक्री नेहमी करत असतात.

भारतात ETF जास्त लोकप्रिय नाही. अमेरिकेसारख्या देशांमध्ये हे जास्त प्रचलित आहे.

3) म्युच्युअल फंड्स

म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून तुम्ही गोल्ड फंडमध्ये पैसे गुंतवू शकता. 500 पासून ही गुंतवणूक करता येऊ शकते. छोट्या गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

म्युच्यूअल फंड्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या कित्येक कंपन्या गोल्ड फंड्सच्या क्षेत्रात आहेत.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, GETTY IMAGES

या कंपन्या तुमचा पैसा गोल्ड फंडमध्ये गुंतवतात. बाजारातील चढ-उतारानुसार तुम्हाला त्याचा परतावा मिळू शकतो.

या प्रकारात ETF सारखी समस्या कधीच येत नाही.

म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीत पैसे गुंतवले. दोन वर्षांनी तुम्हाला त्या पैशांची गरज असल्यास कंपनीला ते पैसे परत द्यावेच लागतात. तेव्हा खरेदीदार नाही वगैरे कारण सांगता येत नाहीत.

यामध्ये कंपनीला काही शुल्कही द्यावा लागतो. हा दर एक ते दोन टक्के असू शकतो.

सोन्यात गुंतवणुकीचे फायदे

राजेश रोशन सांगतात, "प्रत्येक गुंतवणुकीचे फायदे-तोटे असतात. व्याजदरात घट-वाढ होत असते. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीत विविधता राखणं गरजेचं असतं."

"सर्व गोष्टी विचारात घेतल्यास आपल्या एकूण गुंतवणुकीच्या पाच ते दहा टक्के गुंतवणूक सोन्यात करणं योग्य राहील. बाजार कोसळल्यानंतरही सोन्याचा दर वाढतो. बाजार पूर्ववत झाला तरी सोन्याचा दर आहे तितकाच राहतो. त्यामुळे सोन्यात कमी जोखीम आहे."

महिलांच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास दोन गोष्टी पाहाव्या लागतील.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, GETTY IMAGES

काही महिला घरखर्चानंतर उरलेले पैसे घरात ठेवण्याऐवजी गुंतवणूक करू इच्छितात. तर काही महिलांना आपल्या उरलेल्या पैशांचा वापर करून आणखी पैसे कमवायचे असतात.

रोशन यांच्या मते, लहान रकमेची बचत करणाऱ्या महिलांसाठी जास्त मोठी जोखीम घेणं शक्य नसतं. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक त्यांच्यासाठी योग्य असते. जास्त जोखीम घेणाऱ्यांसाठी इतर पर्याय खुले आहेत.

तसंच नोकरी अथवा व्यवसाय करणाऱ्या महिलांना किती प्रमाणात जोखीम घेता येईल, यावर सर्वकाही अवलंबून आहे.

पण कोणतीही गुंतवणूक करण्याआधी मोठी जोखीम कधीही घेऊ नये. सुरुवात ही छोट्या स्वरुपाच्या गुंतवणुकीने केल्यास त्याचा आपल्याचा चांगला उपयोग होतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)