तैवान : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत 'चीनविरोधी' नेते विल्यम लाई विजयी

विल्यम लाई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विल्यम लाई

तैवानमधील सार्वत्रिक निवडणुकीत 'चीनविरोधी' समजले जाणारे सत्ताधारी डीपीपी पक्षाचे उमेदवार विल्यम लाई यांचा विजय झाला आहे. लाई हे तैवानचे विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष आहेत. आता ते राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील.

चीनकडून मिळणाऱ्या धमक्या आणि सततच्या धोक्यापासून तैवानचं संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं लाई यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं. परिस्थिती जैसे थे ठेवणार असल्याचंही ते म्हणाले.

निवडणुकीपूर्वी चीननं मतदारांना लाई यांच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. पण मतदारांनी चीनचं आवाहन आणि धमक्यांकडं दुर्लक्ष केल्याचं निकालातून समोर आलं आहे.

मतमोजणीमध्ये लाई यांना विजयी मताधिक्य मिळाल्यानंतर विरोधातील दोन्ही उमेदवारांनी पराभव मान्य केला आहे.

तैवानला आपला भाग समजणाऱ्या चीनचा पारा लाई यांच्या विजयामुळं आणखी चढणार असल्याचं मानलं जात आहे.

विजयानंतर सावध भूमिका

विल्यम लाई यांनी विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. पण बोलताना ते चीनबरोबरच्या नात्याच्या मुद्द्यांवर बोलताना अगदी सावधपणे बोलत असल्याचं स्पष्टपणे जाणवलं.

त्यांनी अत्यंत सावधपणे शब्दांची निवड केली आणि चीनबरोबर परस्पर आदरासह संवाद आणि सहकार्य करण्याची तयारी दाखवली.

विल्यम लाई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विल्यम लाई

समर्थकांना संबोधित करताना लाई म्हणाले की, "तैवानच्या जनतेनं निवडणुकांमध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाह्यशक्तींचा आणि त्यांच्या प्रयत्नांचा यशस्वीपणानं सामना केला आहे. तैवाननं लोकशाहीची बाजू निवडली आहे."

तैवानमध्ये शांतता आणि स्थैर्य टिकवणं हे मोठं आव्हान असल्याचंही लाइ यांनी म्हटलं आहे. चीन बरोबरचा संघर्ष चर्चेतून सोडवण्यासाठी त्यांचं सरकार प्रयत्न करेल, असंही ते म्हणाले आहेत.

तरुणपणी लाई यांनी तैवानच्या स्वातंत्र्याची वकिली केलेली आहे. त्यामुळं चीननं कायम त्यांच्यावर तैवानच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असल्याचा आरोप केला आहे.

पण लाई यांनी तैवान बरोबरच अमेरिकेसारख्या त्यांच्या सहकाऱ्यांनादेखील त्यांचे मावळते राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांच्याप्रमाणे सावध आणि संतुलित भूमिका घेण्याचं आश्वासन दिलं आहे.

तणावपूर्ण भूराजकीय स्थितीत जल्लोष

लाई यांनी मिळवलेला विजय हा अगदीच एकतर्फीही नव्हता. निवडणुकीत अनेक तास अटीतटीची लढत पाहायला मिळाली. त्यामुळं मतदारांमध्येही काहीसा तणाव निर्माण झाला होता. पण आता शांतपणे झोप लागेल, असं एका मतदारानं सांगितलं.

अतिशय तणावाचं वातावरण असलेल्या भूराजकीय परिस्थितीमध्ये हा जल्लोष होत आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रामध्ये वर्चस्व मिळवण्यासाठीचा अमेरिका आणि चीन यांचा संघर्ष हा या निवडणुकांच्या केंद्रस्थानी आहे.

तैवानचे मावळते राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांनी गेल्या आठ वर्षांमध्ये तैवानला चीनपासून दूर आणि अमेरिकेच्या अधिक जवळ नेलं आहे. त्यामुळं चीनचा राग वाढल्याचं पाहायला मिळतं.

विल्यम लाई हेदेखील स्वतःच्या जोरावर सरकार चालवण्याच्या पक्षाच्या भूमिकेवर कायम राहणार असल्याची शक्यता आहे. तर चीननं आधीच तैवानला स्वातंत्र्यासाठीच्या हालचालींच्या विरोधात इशारा दिलेला आहे.

मतदारांना आकर्षित करण्यात विरोधक अपयशी

विरोधी पक्ष केएमटी यांनी तिसरा पक्ष असलेल्या तैवान पिपल्स पार्टीमुळं पराभवाचा सामना करावा लागल्याचा दावा केला आहे.

पण ते पुन्हा एकदा त्यांची शक्ती असलेल्या मतदारसंघांशिवाय इतर मतदारसंघांमध्ये प्रचार करण्यात आणि मतदारांना आकर्षित करण्यात कमी पडले. जुन्या समर्थकांपर्यंत त्यांना पोहोचता आलं नाही.

विशेषतः तरुण मतादारांना आकर्षित करण्यात त्यांना अपयश आलं आहे. कारण या तरुण मतदारांमध्ये त्यांच्यामध्ये चिनी नव्हे तर आपण तैवानी असल्याची भावना आहे.

तसंच या तरुण मतदारांना एकीकरणापेक्षाही अर्थव्यवस्थेसारख्या मुद्द्यांची अधिक चिंता आहे. त्यांनी प्रामुख्यानं मोठ्या संख्येनं मतदान केल्याचं पाहायला मिळालं.

विल्यम लाई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विल्यम लाई

चिनी सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

दरम्यान चीनच्या दृष्टीनं सर्वात कमी आवडीचे उमेदवार असलेले लाई विजयी झाल्याची बातमी येताच चीनमधील सोशल मीडियावर या संबंधी प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं.

"Taiwan election" हा हॅशटॅग सेन्सर करण्यात आला असला तरी याठिकाणी "Taiwan" आणि "Taiwan region" असे हॅशटॅग यूझर्स वापरत आहेत. त्यात "Taiwan"या हॅशटॅगला लोकप्रियता मिळाल्याचं दिसून आलं असून एका दिवसात त्याला 19 दशलक्ष व्यूज मिळाले आहेत.

निकालाबाबतच्या बातम्यांखालील एका कमेंटमध्ये यूझरनं म्हटलं की, "मला काहीगी आश्चर्य वाटलं नाही. दर चार वर्षांनी असेच घडते. तैवानचे लोक काय विचार करतात हे अगदी स्पष्ट आहे."

तैवानच्या राजकारणाबद्दल जे काही समोर आलं ते खरं आहे का? असा प्रश्न काही जण उपस्थित करत आहेत.

जवळपास 80 हून अधिक लाइक असलेल्या एका कमेंटमध्ये यूझरनं म्हटलं की, "आमचा मीडिया नेहमी उलटं बोलत असतो. तैवानचे लोक ज्यांचा तिरस्कार करतात तेच जिंकतात असं ते नेहमी सांगतात. असं वाटतं की आमचा मीडिया आमच्याशी खोटे बोलते."

तैवान

तैवान निवडणुकीचा भारतावर परिणाम

तैवान आणि भारतामध्ये कुठलं अधिकृत नातं नाही. भारतानं 1950 साली चीनला अधिकृत मान्यता दिली, तेव्हापासून तैवानसोबत राजनैतिक संबंध ठेवलेले नाहीत.

पण भारत आणि तैवानमध्ये आर्थिक, सांस्कृतिक नातं मात्र आहे आणि ते अलीकडच्या काळात आणखी दृढ बनलं आहे.

तैपेई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तैपेई

तैवानची राजधानी तैपेईतील इंडिया-तैपेई असोसिएशन आणि दिल्लीतील तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर या दोन संस्थांमार्फत भारत आणि तैवानमधले बिनसरकारी संबंध, व्यापार, लोकांमधली वैयक्तिक देवाणघेवाण, वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्य अशा गोष्टींना प्रोत्साहन दिलं जातं.

2002 साली भारत आणि तैवानमध्ये व्यापारी करारही झाला. भारतात मोठ्या प्रमाणात तैवानमधून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात होते तसंच तैवानच्या कंपन्यांची भारतात गुंतवणूकही आहे.

एकीकडे भारत आणि चीनमधल्या संबंधांत अधूनमधून तणाव येत असतानाच गेल्या काही वर्षांत तैवानशी भारताची मैत्री मात्र वाढते आहे. साहजिकच तिथल्या निवडणुकीत भारतालाही रस आहे.

जागतिक व्यापारात तैवानचं महत्त्व

दरवर्षी जगातल्या मालवाहू जहाजांपैकी जवळपास निम्मी जहाजं तैवानच्या सामुद्रधुनीतून जातात. त्यामुळे हे बेट आंतरराष्ट्रीय व्यापारातलं एक महत्त्वाचं केंद्र आहे.

जगभरातल्या इलेक्ट्रॉनिक उद्योगांसाठीही तैवान महत्त्वाचा आहे. कार, रेफ्रीजरेटर्सपासून अगदी फोनपर्यंत ज्या ज्या गोष्टी आपलं आधुनिक आयुष्य सुकर करतात, त्यातल्या बहुतांश इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधले सेमीकंडक्टर्स हे तैवानमध्येच बनवले जातात.

तैवानमध्ये बनणाऱ्या सेमीकंडक्टर्सवर जगभरातले इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उद्योग अवलंबून आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तैवानमध्ये बनणाऱ्या सेमीकंडक्टर्सवर जगभरातले इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उद्योग अवलंबून आहेत.

या सेमीकंडक्टर्सचा पुरवठा मंदावला किंवा थांबला, तर त्याचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या जगण्यावरही होऊ शकतो. कोव्हिडच्या काळात त्याची झलक पाहायला मिळाली होती.

थोडक्यात, तैवानमध्ये संघर्ष पेटला आणि तिथून जाणाऱ्या व्यापारी जहाजांच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला तर त्याचा थेट परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होईल.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)