अपहरण केलेल्या मुलांचे वडील म्हणतात, 'निदान मुलांना तरी यात ओढायला नको होतं'

    • Author, जॉन डॉनिसन
    • Role, बीबीसी न्यूज, इस्रायल

मध्य इस्रायलमधील त्याच्या घराच्या बागेतील ताडाच्या झाडांच्या पानांमधून डोकावणाऱ्या सकाळच्या तीव्र सूर्यप्रकाशात योनी आशेर मला त्याच्या फोनवर एक व्हीडिओ दाखवतात.

त्यांच्या दोन लहान मुली बेडवर बसून गाणं गात वाढदिवसाच्या शुभेच्छा देतायत.

अतिशय सुंदर असे लांब केस असलेली मोठी मुलगी राझ अवघ्या चार वर्षांची आहे. तिची दोन वर्षांची बहीण अवीव ही सावळ्या रंगाची आणि वडिलांसारखी दिसणारी आहे.

"जुलैमध्ये माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी हा व्हीडिओ बनवलेला”, असं योनी म्हणाले.

त्याला आता चार महिने झाले.

आता 37 वर्षांचे योनी घरात एकटेच आहेत.

7 ऑक्टोबर रोजी हमासने सीमेपलिकडे केलेल्या हल्ल्यात योनी यांची बायको डोरोन आणि दोन लहान मुलींना पकडण्यात आलं. गाझामध्ये अपहरण केलेल्या 240 ओलिसांपैकी योनी यांच्या दोन मुली सर्वात कमी वयाच्या असल्याचं मानलं जातंय.

“सुट्टीच्या निमित्ताने त्या नीर ओझ इथे आपल्या आजीला भेटायला गेल्या होत्या”, असं योनी सांगतात.

इस्रायली किबुत्झ (kibbutz) (किबुत्झ हा 1910 साली अस्तित्वात आलेला इस्रायलमधील पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेला एक समुदाय आहे.) गाझापासून अवघ्या दोन मैलांवर वसलेला आहे. हमासच्या हल्ल्यात सर्वात जास्त प्रभावित झालेल्या समुदायांपैकी हा एक समुदाय आहे, तिथे राहणाऱ्या चारपैकी एकाला हमासने मारलं किंवा त्याचं अपहरण केल्याचं मानलं जातंय.

योनी त्यादिवशी कुटुंबासोबत नव्हता. कामाच्या निमित्ताने तो घरापासून शंभर मैल दूर गेला होता.

हमासने त्याच्या कुटुंबाचे अपहरण केल्याचा पहिला पुरावा गाझामधून टिकटॉकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे मिळाला. योनीने मला तो व्हिडिओ दाखवत म्हटलं.

पाच-सेकंदाच्या क्लिपमध्ये, नाईटवेअर परिधान केलेली त्यांची पत्नी डोरॉन हिला हमासचे बंदुकधारी एका बॅटरीवर चालणा-या कारमध्ये बळदबरीने कोंबतायत असं दिसतंय.

मुलगी राझ ही तिच्या उन्हाळ्यात घालण्याच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये आहे.

"हा अवीवचा हात आहे”, आईच्या दिशेने जाणाऱ्या पाच चिमुकल्या बोटांना दाखवत योनी सांगतात.

या गोष्टीला तीन आठवड्याहून जास्त काळ उलटून गेलाय. तेव्हापासून योनीने आपल्या कुटुंबाला पाहिले किंवा त्यांचा आवाज ऐकलेला नाही. मुलींची आजी इफ्राट कॅट्झ मृतावस्थेत आढळून आली आणि त्यांचे यजमान गदी मोजेस यांचंही अपहरण झाले असून ते बेपत्ता आहेत.

"हे असं सर्व फक्त नरकातच घडू शकतं”, योनी म्हणतात. "ही नरकाची व्याख्या आहे."

"माझं कुटुंब काय खातंय हे मला माहित नसताना मी कसं काही खाऊ शकतो? त्यांना थंडीत ठेवलंय की उकाड्यात हे मला माहिती नसताना मला झोप कशी लागेल?"

“तुम्ही जर तुमच्या मुलांना बेडवर किंवा सोफ्यावर उडी मारताना पाहिलं, तर एक वडील म्हणून तुम्हाला भीती वाटते की ते पडले तर त्यांना डोक्याला दुखापत होईल. त्यामुळे या परिस्थितीत मला कसं वाटत असेल याची कल्पना करा. माझ्यासाठी हे सर्वकाही भयावह आहे."

योनीकडे सध्या केवळ आठवणी उरल्यात आणि घरात सगळीकडे त्या पसरलेल्या आहेत. भिंतीवरील मुलींची छायाचित्रे आणि त्यांनी तयार केलेल्या कलाकृती. लाल रंगाचे चिमुकल्या हाताचे ठसे.

"त्यांना चित्रकलेची खूप आवड होती. "योनीने त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या पिन बोर्डवरील व्यंगचित्रासारख्या आकृतीकडे बोट दाखवत म्हटलं की हे राझने काढलंय.”

"तिने मला सांगितले की तो एक सुपरहिरो आहे."

“त्यांचं अपहरण झालंय. ते (हमास) त्यांचा अतिशय खालच्या थराला जाऊन गैरफायदा घेतायत. ही अतिशय निंदनीय बाब असून एक प्रकारची मानसिक लढाई आहे."

37 वर्षांचे योनी आयुष्यभर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संपूर्ण बघत आले आहेत. त्यांचे आई-वडिल तर या संघर्षाचे त्याच्या आधीपासूनचे साक्षीदार आहेत.

पण त्यांच्यासाठी 7 ऑक्टोबर हा अर्थात सर्वात वाईट दिवस होता.

“ते सांगतात, तो होलोकॉस्टचा दिवस होता." आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना शब्द सापडत नाहीत आणि ते थांबतात.

"मला माहिती आहे की हा एक वाईट शब्द आहे. पण तो दिवस ज्यू लोकांच्या आणि इस्रायली लोकांच्या इतिहासातील सर्वात वाईट होता."

इस्रायल कधीतरी या सामूहिक आघातातून बाहेर पडू शकेल का?

"आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. हे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक प्रकरणासारखं आहे. एकतर लढा किंवा सोडून द्या,” ते म्हणतात.

"आपल्याला सावरायचं आहे. ते खूप कठीण आहे. पण मला विश्वास आहे की येणा-या काळात आमचं राष्ट्र यातून नक्की सावरेल.”

सध्यातरी, योनी फक्त वाट पाहणं, आशा ठेवणं आणि त्यांच्या कुटुंबाबाबतच्या गोष्टी इतरांना सांगणं एवढंच करू शकतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotifyआणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)