कबुतरांमुळे होणारं इन्फेक्शन इतकं जीवघेणं का ठरतं? पुण्यातल्या महिलेच्या मृत्यूबद्दल डॉक्टर काय म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
मुंबईतील कबुतरखान्याचा वाद आता राज्य सरकार, बीएमसी असं करत उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे.
कबुतरखाना बंद करण्याविरोधात जैन समाजाकडून आंदोलन उभं केलं गेलंय. दुसरीकडे आरोग्याचं कारण देत तो बंद ठेवण्याची भूमिका मांडली जात आहे.
पण हा वाद सुरू असतानाच कबुतरांच्या सान्निध्यात आल्याने झालेल्या संसर्गामुळे पुण्यातील एका महिलेला जीव गमवावा लागला आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील ताडीवाला रोड परिसरातल्या शीतल शिंदेंना 2017 मध्ये खोकल्याचा त्रास सुरू झाला.
सुरुवातीला साधा वाटणारा खोकला थांबण्याचं नाव घेईना. तेव्हा त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे जाऊन तपासून घेतलं. पण त्यांच्याही औषधांनी आराम पडेना. त्यानंतर मात्र त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी त्यांना तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार त्या पुण्यातील कॅम्प परिसरात असणाऱ्या बम्किन नावाच्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्या. डॉक्टरांनी शीतल यांना पहिलाच प्रश्न विचारला तो म्हणजे त्यांच्या घराच्या आसपास कबुतरं आहेत का? आणि त्यांना खायला घातलं जातं का?
त्यामुळेच त्यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग होऊन त्यांना हा त्रास सुरू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
शीतल शिंदेंचे वडील श्याम मानकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "2017 मध्ये सुरुवातीला तिला खोकला येत होता. तो थांबत नव्हता. फॅमिली डॉक्टरांना दाखवलं होतं, मात्र, त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडे जायला सांगितलं."
"डॉक्टरांनी विचारलं की, तुमच्या सोसायटीमध्ये कबुतरं आहेत का? त्यांना खायला घातलं जातं आहे का? तशी परिस्थिती होती. त्यांनी ठामपणे सांगितलं की, कबुतरांमुळेच खोकला येत आहे आणि तिला फुफ्फुसांचा त्रास सुरू झाला आहे. मग आम्ही आणखी तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवलं."

फोटो स्रोत, Getty Images
औषधं सुरू झाली. मात्र त्रास कमी होईना. दरम्यान शीतल शिंदेंनी घरंही बदलली. मात्र, तरीही आराम पडेना. पुण्यापासून मुंबईपर्यंत अनेक डॉक्टर आणि रुग्णालयातून तपासण्या केल्या गेल्या. प्रत्येक ठिकाणी जवळपास हेच उत्तर मिळत गेलं.
यावर उपाय म्हणून फुफ्फुसाची क्षमता वाढवणारे व्यायाम करण्याचा सल्ला त्यांना दिला गेला. त्यानुसार त्यांनी घरातच जिम उभारली आणि व्यायामाला सुरुवात केली. पण त्रास वाढत गेला.
नंतर थोडं चाललं तरी धाप लागायला सुरुवात झाली. तेव्हा मात्र डॉक्टरांनी ऑक्सिजन वापरण्याचा सल्ला दिला. ऑक्सिजन लावूनही त्यांचा व्यायाम सुरू होता. मात्र, दिवसेंदिवस ऑक्सिजनची गरज वाढत होती.
मानकर सांगतात, "सुरुवातीच्या काळानंतर तिला चालल्यानंतर धाप लागू लागली. ऑक्सिजनची गरज तिला भासत आहे, हे लक्षात आल्यानंतर तिला डॉक्टरांनी सांगितलं की, तुम्ही चालण्यासाठी बाहेर जाणार असाल किंवा कार्यक्रमाला बाहेर जायचं असेल, तर तुम्ही सोबत घेऊन जाता येईल असा ऑक्सिजनचा बॉक्स घेऊन जा."
"तुम्हाला तो 4 तास चालेल. त्यापेक्षा जास्त चालणार नाही. हे असं 3-4 वर्षे चाललं. तिला असं वाटायचं की 1 तास लावला, 1 तास लावू नये. डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे अनेक प्रकार तिने केले."
याच दरम्यान त्यांच्या लंग ट्रान्सप्लांट करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू झाले.
डी. वाय. पाटील रुग्णालयात नोंदणी करण्यात आली. मात्र, दोन वेळा फुफ्फुसं उपलब्ध होऊनही ती मॅच न झाल्यानं त्यांना वाट पहावी लागली. याच दरम्यान पाठ दुखण्याचं निमित्त झालं आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.
रुग्णालयात नेल्यावर त्यांचा कार्बन डायऑक्साईड शरीरातून बाहेर पडत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर डॉक्टरांनी छोटं ऑपरेशन करून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडण्याची सोय केली. मात्र, त्यांची तब्येत बिघडत गेली आणि जानेवारी 2025 मध्ये वयाच्या 43 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
कबुतरांमुळे होणारं इन्फेक्शन इतकं जीवघेणं का ठरतं?
शीतल शिंदे यांच्याप्रमाणे अनेक जणांना असा त्रास होत असल्याचं डॉक्टर नोंदवतात.
याबाबत आम्ही पुण्यातील पल्मनॉलॉजिस्ट डॉ. महावीर मोदी यांच्याशी बोललो. त्यांच्याकडे असे अनेक पेशंट येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
डॉ. मोदी यांनी स्पष्ट केलं की, कबुतर, पारवे यांच्या सान्निध्यात आल्यानं फुफ्फुसांना 'फायब्रॉसिस' होतो. हाच त्रास इतर केमिकल किंवा इतर कणांच्या सान्निध्यात येणाऱ्या लोकांमध्येही होऊ शकतो, असंही त्यांनी नोंदवलं.
या संसर्गामुळे फुफ्फुसांना काय त्रास होतो, हे स्पष्ट करताना डॉ. मोदी म्हणाले, " फायब्रॉसिस होतो म्हणजे फुफ्फुसांना आतून जाळी तयार होते. फुफ्फुसांचं काम काय, तर श्वास घेतला की फुफ्फुस प्रसरण पावतं आणि श्वास सोडला की लहान होतं. या प्रक्रियेतून प्राणवायु शरीरात जातो."
"कबुतरांच्या सान्निध्यात येणाऱ्या लोकांमध्ये त्यांची विष्ठा किंवा पिसं यामुळे जाळी तयार होते आणि फुफ्फुसांमध्ये जखम होते. त्यातून ऑक्सिजन शरीरात पूर्णपणे मिसळणं बंद होतं आणि फुफ्फुसं छोटी होऊन त्यांची क्षमता घटते. सामान्यपणे 80 टक्के ऑक्सिजन शरीरात जायला हवा. त्याचं प्रमाण कमी होत 60 टक्के, 40 टक्के असं होणं सुरू होतं. जर याची तपासणी वेळीच होऊन निदान झालं, तर उपचार होऊ शकतात," असंही डॉ. मोदी नमूद करतात.

फोटो स्रोत, Getty Images
यासाठीही विशिष्ट प्रकारचा सीटी स्कॅन होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोव्हिडनंतर आपण वारंवार ऐकलेला शब्द म्हणजे एचआरसीटी- म्हणजेच हाय रेझोल्युशन सीटी स्कॅन. फुफ्फुसांमधल्या या संसर्गासाठी हाच स्कॅन विविध प्रकारे म्हणजे पाठीवर झोपून, छातीवर झोपून असा करण्यात येतो. तो स्कॅन नीट झाल्यास फक्त निदान नाही, तर इन्फेक्शन होण्याचं नेमकं कारणही ओळखणं शक्य होत असल्याचं डॉ. मोदी यांनी स्पष्ट केलं.
जर लवकर निदान झालं, तर त्या स्थितीला अँक्युट न्युमोनायटीस म्हणतात, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मात्र उपचारांना उशीर झाला, तर मात्र हा संसर्ग जीवघेणा ठरू शकत असल्याचं त्यांनी सांगितलं.
डॉ. मोदी पुढे म्हणाले, "कुणी कबुतरांना दाणे टाकत असेल, विष्ठा साफ करत असेल, तर अँण्टीजेन शरीरात जाऊन संसर्ग होऊ शकतो. ते जर कळालं आणि उपचार झाले, तर मृत्यूचं प्रमाण कमीत कमी असतं. जर पारवे किंवा कबुतरांमुळे संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं, तर त्यांना पूर्णपणे दूर ठेवणंच योग्य आहे."
"काही वेळा एकदा झालेला त्रास बरा होतो. मात्र, पुन्हा त्यांच्या सान्निध्यात आल्यानं पुन्हा संसर्ग होऊन फायब्रॉसिस वाढत जातो. त्याला आपण क्रोनिक स्टेट म्हणतो. या प्रकारात फुफ्फुसात जखम होते. अशा वेळी घरी ऑक्सिजन देण्याची वेळ येऊ शकते."
"शीतल शिंदेंच्या प्रकरणात तेच झालं. त्यांनाही ऑक्सिजन द्यावा लागत होता. मग कार्बन डायऑक्साईड बाहेर न पडण्याचा त्रास होतो. कधी कधी व्हेंटिलेटर किंवा बायपॅप लावण्याची वेळ येऊ शकते. अशावेळी ट्रान्सप्लांटशिवाय उपाय नसतो. यात काही वेळा ते पेशंटच्या मृत्यूपर्यंत जाऊ शकतं," असंही ते नमूद करतात.
वाद नेमका का सुरू झाला?
मध्य मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाजवळील प्रसिद्ध कबुतरखान्यावर 2 ऑगस्टला रात्री उशिरा मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली.
संपूर्ण कबुतरखाना पालिका प्रशासनाकडून ताडपत्रीनं झाकण्यात आला. मात्र, याला काही स्थानिकांकडून विरोध करण्यात येत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कबुतरांमुळे किंवा त्यांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत असून मुंबईसह राज्यातील अशी कबुतरखान्यांची सर्व ठिकाणं तत्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी पावसाळी अधिवेशनात करण्यात आली होती.
मुंबईत एकूण 51 कबुतरखाने आहेत. कबुतरखाने तत्काळ बंद करण्याचे निर्देश दिले जातील, असं उत्तर मंत्री उदय सामंत यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान दिलं होतं. यानंतर कारवाई सुद्धा सुरू झाली.
2 ऑगस्टला महानगरपालिकेने दादर येथील कबुतरखाना बंद केला. यासाठी संपूर्ण कबुतरखान्याला ताडपत्रीने झाकण्यात आलं. याविरोधात मुंबईत पक्षीप्रेमी आणि जैन समाजाकडून 3 ऑगस्टला विरोध प्रदर्शन करण्यात आलं. यात जैनमुनीही सहभागी झाले होते.
न्यायालयाने काय आदेश दिले?
मुंबईच्या कबुतरखान्यांवरून सुरू असलेला वाद उच्च न्यायालयात गेला.
सुनावणीमध्ये न्यायालयानं कबुतरखान्यांवर बंदी कायम ठेवण्याचे आदेश देतानाच लोकांची भूमिका विचारात घेऊन निर्णय घ्या, असंही सांगितलं.
दरम्यान मुंबई महापालिकेनं सकाळी 6 ते 8 दरम्यान अटी-शर्थींसह कबुतरांना अन्न खाऊ घालण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे.
आता समितीची स्थापना करून त्याच्या अहवालाच्या आधारे निर्णय घेतला जाणार आहे.
मात्र, लेक गमावलेल्या मानकर यांनी संशोधनाच्या आधारे सिद्ध झालेल्या बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











