You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मनमोहन सिंग ते नरेंद्र मोदींचे खासगी सचिव, आता ट्रोलचे लक्ष्य ठरलेले विक्रम मिस्री कोण आहेत?
विक्रम मिस्री हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. आधी भारत-पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान वेळोवेळी भारताच्या ऑपरेशन सिंदूरबद्दल पत्रकार परिषदेतून माहिती देणारे अधिकारी म्हणून आणि आता सोशल मीडियावर त्यांचं होणाऱ्या ट्रोलिंगमुळे चर्चेत आले आहेत.
विक्रम मिस्री हे भारतीय परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ अधिकारी असून, सध्या ते भारताचे परराष्ट्र सचिव आहेत.
त्यांचं ट्रोलिंग नेमकं का होतंय, त्यावर काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत आणि त्यांचा आजवरचा प्रवास कसा आहे, हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
10 मे 2025 च्या संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 मे रोजी विक्रम मिस्री यांचं 'एक्स' या सोशल मीडियावरील अकाऊंट 'प्रोटेक्टेड मोड'मध्ये असल्याचं आढळून आलं.
याचा अर्थ असा की, त्यांच्या अकाऊंटवरून केलेल्या कोणत्याही पोस्ट दिसणार नाहीत आणि परिणामी त्यांवर कुणीही टिप्पणी करू शकत नाही.
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान विक्रम मिस्री हे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्या सोबतीनं सरकारची बाजू माध्यमांसमोर मांडत होते.
10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधींबाबतच्या सहमतीची घोषणाही विक्रम मिस्री यांनीच केली होती. मात्र, त्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलकडून त्यांना लक्ष्य करण्यात आलं.
सोशल मीडियावर मिस्रींची ट्रोलिंग सुरू झाल्यानंतर अनेकजण मिस्रींच्या समर्थनार्थही पुढे आले.
यूएईमधील भारताचे माजी राजदूत नवदीप सुरी यांनी म्हटलं की, "परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना आणि त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य केलं जात आहे, हे पाहणं अत्यंत त्रासदायक आहे. ते प्रभावीपणे काम करणारे, शांत, संयमी, नेमकं आणि स्पष्ट बोलणारे आहेत. परंतु, त्यांचे हे गुण आपल्या समाजातील काही लोकांसाठी पुरेसे नाहीत आणि हे लाजिरवाणं आहे."
विक्रम मिस्रींना अनेकांनी दिला पाठिंबा
दरम्यान, परराष्ट्र धोरणांच्या विश्लेषक इंद्राणी बागची यांनी लिहिलंय की, "विक्रम मिस्री हे एक प्रतिष्ठित राजनयिक अधिकारी आहेत, जे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिनिधीत्व करतात. तुम्ही तुमच्या कल्पनेत एक वेगळा भारत-पाकिस्तान व्हीडिओ गेम खेळत आहात. म्हणून त्यांच्या कुटुंबाला ट्रोल करणं हे केवळ वाईटच नाही, तर ते अशा घाणेरड्या मानसिकतेचं दर्शन घडवतं. देश या मानसिकतेशिवायही चालू शकतो."
ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांनी लिहिलं आहे की, "या संघर्षाच्या काळात उत्तम काम करणाऱ्या सचिव विक्रम मिस्री यांना ट्रोल करणारे लोक माणूस म्हणून कचरा आहेत."
खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही सोशल मीडियावर विक्रम मिस्री यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे.
ओवैसींनी लिहिलं आहे की, "विक्रम मिस्री हे सभ्य आणि प्रामाणिक आहेत. ते एक मेहनती राजनयिक अधिकारी आहेत, जे देशासाठी अथक परिश्रम करत आहेत."
ओवैसी यांनी पुढं म्हटलं आहे की, "आपले राजनयिक अधिकारी सरकारच्या अखत्यारीत काम करतात. त्यामुळे त्यांना सरकारच्या किंवा देश चालवणाऱ्या राजकीय नेतृत्वाच्या निर्णयांसाठी लक्ष्य केलं जाऊ नये हे लक्षात ठेवलं पाहिजे."
केरळ काँग्रेसनंही या विषयावर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, गेल्या आठवड्यात एका सैनिकाची पत्नी हिमांशी नरवाल हिला सोशल मीडियावर 'द्वेष आणि हिंसाचार पसरवू नका असं आवाहन केल्याबद्दल' लक्ष्य करण्यात आलं होतं.
केरळ काँग्रेसनं असंही लिहिलंय की, "आता हे लोक परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना लक्ष्य करत आहेत. जणू काही मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह किंवा जयशंकर यांनी हा शस्त्रसंधीचा निर्णय घेतला नसून, तो विक्रम मिस्री यांनीच घेतलाय."
विक्रम मिस्री कोण आहेत?
परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, विक्रम मिस्री यांनी 15 जुलै 2024 रोजी भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
विक्रम मिस्री हे भारतीय परराष्ट्र सेवेतील 1989 च्या बॅचचे अधिकारी आहेत.
त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात राजनयिक अधिकारी म्हणून विविध पदांवर काम केलं आहे. यामध्ये युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील भारताच्या वेगवेगळ्या मोहिमांसाठी त्यांनी काम केलं आहे.
विक्रम मिस्री यांनी परराष्ट्र मंत्रालयात पाकिस्तान डेस्कवर काम केलं आहे. या शिवाय त्यांना भारताचे दोन माजी परराष्ट्र मंत्री इंद्र कुमार गुजराल आणि प्रणव मुखर्जी यांच्या टीममध्येही कामाचा अनुभव आहे.
विक्रम मिस्री यांनी पंतप्रधान कार्यालयातही काम केलं आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालयात संयुक्त सचिव म्हणून काम केलं.
विक्रम मिस्री यांनी इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणूनही काम केलं आहे.
विक्रम मिस्री यांनी ब्रुसेल्स, ट्युनिस, इस्लामाबाद आणि वॉशिंग्टन डीसी इथेही काम केलं आहे. त्यांनी श्रीलंकेत भारताचे उपउच्चायुक्त आणि म्युनिकमध्ये भारताचे कॉन्सुल जनरल म्हणूनही काम पाहिलं आहे.
2014 मध्ये मिस्री यांची स्पेनमध्ये भारताचे राजदूत, 2016 मध्ये म्यानमारमध्ये भारताचे राजदूत आणि जानेवारी 2019 मध्ये चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. चीनमध्ये 2021 पर्यंत त्यांनी हे काम केलं होतं.
अलिकडेच विक्रम मिस्री हे भारताचे धोरणात्मक व्यवहारांसाठी उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करत होते. त्यांनी 1 जानेवारी 2022 ते 30 जून 2024 पर्यंत हे पद भूषवलं.
विक्रम मिस्री यांचा जन्म श्रीनगरमध्ये झाला आणि त्यांचं सुरुवातीचं शिक्षण श्रीनगर आणि उधमपूरमध्ये झालं.
नंतर त्यांनी ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून इतिहास विषयात पदवी प्राप्त केली.
यानंतर विक्रम मिस्री यांनी जमशेदपूरच्या XLRI येथून MBA केलं. सरकारमध्ये येण्यापूर्वी त्यांनी जाहिरात निर्मिती क्षेत्रातही काम केलं आहे.
विक्रम मिस्री हिंदी, इंग्रजी आणि काश्मिरी चांगलं बोलतात. त्यांना फ्रेंचही चांगलं येतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)