सेलिना जेटलीचा भाऊ निवृत्त मेजर विक्रांत यूएईच्या तुरुंगात, नेमके प्रकरण काय?

भारतीय लष्करातील निवृत्त मेजर विक्रांत कुमार जेटली मागील 14 महिन्यांपासून बेपत्ता आहेत. विक्रांत कुमार हे बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीचे भाऊ आहेत.

सेलिना जेटलीनेच सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

सेलिनानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं की, एक वर्ष, दोन महिने आणि 17 दिवसांपासून भाऊ विक्रांतची भेट झालेली नाही. आधी त्याचं अपहरण केलं गेलं आणि नंतर त्याला मध्य पूर्वेत कुठेतरी तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.

सेलिनाने या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर तिच्या भावाला परत आणलं जाईल, अशी तिला आशा असल्याचं तिने म्हटलं आहे.

विक्रांत जेटलींचं आधी अपहरण केलं गेलं आणि नंतर त्यांना दुबईमध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं, असं सेलिनाचे वकील राघव कक्कर यांनी सांगितलं

याच महिन्यात परराष्ट्र मंत्रालयानं निवेदनात सांगितलं होतं की, निवृत्त मेजर विक्रांत जेटली यांना यूएईमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे आणि भारतीय अधिकारी त्यांना शक्य तितकी मदत करत आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल साप्ताहिक मीडिया ब्रीफिंगमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले होते की, "या प्रकरणावर आम्ही यूएई सरकारच्या संपर्कात आहोत.

मागील काही महिन्यांत आम्ही चार वेळा कॉन्सुलर भेटी मागितल्या आणि त्यानुसार आमच्या दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली आहे."

"आम्ही त्यांचे कुटुंबीय आणि पत्नीच्याही संपर्कात आहोत. अलीकडे, 3 नोव्हेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश आला होता आणि त्यानुसार जे-जे काही आम्ही करू शकतो, त्या सर्व गोष्टी करत आहोत," असंही त्यांनी म्हटलं.

सेलिनाने काय सांगितलं?

सेलिनाने तिच्या मीडिया अकाऊंट 'एक्स'वर आपल्या भावासोबतचा फोटो पोस्ट करून लिहिलं की, 444 दिवसांपासून तिचा भाऊ विक्रांत तिच्यापासून दूर आहे.

तिने पुढे लिहिलं की, "विक्रांतचं अपहरण केलं गेलं आणि आठ महिन्यांपर्यंत त्याच्याशी संपर्क साधता आलेला नाही. नंतर त्याला मध्य पूर्वेत कुठेतरी तुरुंगात ठेवलं गेलं. मी त्याचा आवाज ऐकण्याची, त्याला पाहण्याची वाट पाहत आहे. त्याच्याबरोबर काय झालं असेल? याची मला भीती वाटत आहे."

सेलिनाने लिहिलं, "माझं त्याच्याशी फोनवर बोलणं झालं. त्याला फक्त माझा नंबर आठवत होता. त्या फोन कॉलमध्ये शब्द कमी, वेदना जास्त होत्या. माझ्याकडे उत्तरांपेक्षा प्रश्न जास्त आहेत.

कर्तव्याच्या मार्गावर चालत असताना माझ्या भावाला प्रचंड त्रास झाला आहे. त्यानं तारुण्य, बुद्धी आणि जीवन भारतासाठी दिलं आहे. तो तिरंग्यासाठी जगला आणि रक्त सांडलं आहे."

ती म्हणाली, "हे आता फक्त वैयक्तिक प्रकरण राहिलेलं नाही. परदेशात आपल्या सैनिक आणि माजी सैनिकांचं अपहरण करण्याचा हा प्रकार, आता आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरत आहे का? आपण याचं उत्तर मागितलं पाहिजे."

तिने पोस्टमध्ये कतारचा उल्लेख करत लिहिलं की, "कतारमध्ये जशी निर्णायक कारवाई करण्यात आली होती, तशीच आता गरज आहे. माझी आशा सरकारवर टिकून आहे.

ते सैनिकाला सुरक्षित परत आणतील. ज्या पद्धतीनं नौदलाच्या जवानांना मायदेशी आणलं गेलं, तसाच निर्णय इथंही हवा आहे. आपल्या सैनिकांनाही तो अधिकार आहे."

मागील वर्षी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कतारच्या तुरुंगात असलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी जवानांची सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हे लोक दाहरा ग्लोबल कंपनीत काम करत होते. त्यांना ऑगस्ट 2022 मध्ये अटक करण्यात आली होती.

पण त्यांना अटक का झाली होती, हे कधीच सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात आलं नाही. त्यांना तिथे मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

सेलिनाच्या याचिकेवर कोर्टनं काय म्हटलं?

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी याच महिन्यात सेलिना न्यायालयात गेली होती. त्यावेळी तिने मागील संपूर्ण एक वर्ष तिच्यासाठी वाईट होतं, असं म्हटलं होतं.

तिने सांगितलं की, "आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं स्थान, रुबाब वाढत आहे. परंतु, परदेशात आपल्या सैनिकांना वारंवार लक्ष्य केलं जात आहे. मला वाटतं की, आजच्या आदेशामुळे माझ्या भावाला देशात परत आणण्यास मदत होईल."

"जेव्हा एखाद्या भारतीय नागरिकाला परदेशात स्वातंत्र्यापासून वंचित ठेवलं जात असेल, तेव्हा देश मूक प्रेक्षक म्हणून राहू शकत नाही," असं सुनावणीदरम्यान न्या. सचिन दत्ता यांनी म्हटल्याचं वृत्त कायदेशीर बातम्या देणाऱ्या लॉबिट वेबसाइटने दिलं होतं.

सेलिनाचे वकील राघव कक्कर यांनी माध्यमांना सांगितलं की, "विक्रांत यांना का ताब्यात घेतलं आहे, याची आम्हाला कोणतीही माहिती नव्हती. आम्हाला फक्त हे माहीत होतं की, त्यांना दुबईमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे. मागील 14 महिन्यांपासून आम्ही पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करत आहोत."

"न्यायालयानं सरकारला (परराष्ट्र मंत्रालय) एक नोडल अधिकारी नेमण्याचा आदेश दिला आहे. हा अधिकारी सेलिना आणि निवृत्त मेजर विक्रांत यांच्यात संवाद साधून देण्यास मदत करेल. यामुळे त्यांना कायदेशीर मदत मिळू शकेल आणि आपल्याला या प्रकरणाची सर्व माहिती मिळू शकेल."

"आम्हाला आशा आहे की, भविष्यात आपण त्यांना परत आणू शकू. ते लष्करात मेजर होते. मला वाटतं की, सरकार आपल्याला मदत करेल."

या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 डिसेंबर रोजी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर या प्रकरणी स्टे्टस रिपोर्ट (सद्यस्थिती अहवाल) सादर केला जाईल, अशी त्यांना आशा आहे.

कोण आहेत निवृत्त मेजर विक्रांत?

सेलिनाने दिल्ली उच्च न्यायालयात दिलेल्या याचिकेत भारत सरकारला पक्षकार केलं आहे.

या प्रकरणी नोव्हेंबरमध्ये झालेल्या सुनावणीनंतर न्या.सचिन दत्तां यांनी दिलेल्या आदेशात सांगितलं आहे की, सेलिनाचे भाऊ विक्रांत हे 2016 पासून संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) रहिवासी आहेत.

ते तिथे मातिती ग्रुपमध्ये काम करत होते. ही कंपनी ट्रेडिंग, कन्सल्टन्सी आणि जोखीम व्यवस्थापन सेवांमध्ये काम करते.

या कंपनीच्या वेबसाइटनुसार, विक्रांत जेटली हे या कंपनीचे सीईओ आणि भागीदार आहेत.

न्या.दत्तांच्या आदेशानुसार, विक्रांत यांचं 6 सप्टेंबर 2024 रोजी यूएईत अपहरण करून ठेवण्यात आलं आहे.

बराच काळ उलटून गेल्यानंतरही परराष्ट्र मंत्रालय विक्रांतची स्थिती आणि कायदेशीर परिस्थिती समजून घेण्यात अयशस्वी ठरलं आहे, असं सेलिनाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

न्या. सचिन दत्ता यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे की, "सुनावणी दरम्यान लक्षात आलं की, यूएईमध्ये भारतीय अधिकाऱ्यांना तुरुंगात असलेल्या व्यक्तीला भेट (कॉन्सुलर ऍक्सेस) देण्याची संधी मिळाली आहे.

परंतु, भारत सरकारच्या वकिलांनी अटकेत असलेल्या व्यक्तीला (विक्रांत) ताब्यात घेतल्यापासून संभाषणासाठी काही सुविधा देण्यात आल्या आहेत की, नाही हे शोधण्यासाठी थोडा वेळ मागितला आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.