डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तान लष्करप्रमुख मुनीर यांच्या भेटीतून भारताला नेमका काय संदेश?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रियंका
- Role, बीबीसी प्रतिनिधी
संपूर्ण जगाचं लक्ष सध्या इस्रायल-इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाकडे आहे. या संघर्षात अमेरिकेचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेही लागलेल्या आहेत.
त्याचदरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (18 जून) व्हाइट हाऊसमध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत दुपारचं जेवण केलं. असीम मुनीर यांची भेट घेतल्यानंतर ट्रम्प यांना प्रसारमाध्यमांनी याबद्दल विचारणा केली.
"मुनीर यांनी युद्धात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला, यासाठी मी त्यांचे आभार मानू इच्छित होतो. त्यामुळे त्यांना आमंत्रित केलं होतं," असं त्यांनी यावेळी सांगितलं.
या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांनी 'माझं पाकिस्तानवर प्रेम आहे', असं म्हटलं होतं.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसच्या कॅबिनेट रूममध्ये असीम मुनीर यांच्यासाठी लंचचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी पत्रकारांना प्रवेश नव्हता.
बंद दाराआड या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध नाही. मात्र, ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून असा अंदाज लावता येतो की, त्यांच्या अजेंड्यावर भारत-पाकिस्तानमधील संघर्ष आणि इस्रायल-इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
मात्र ट्रम्प यांची ही कृती भारतासाठी अस्वस्थता निर्माण करणारी ठरू शकते, असं जाणकारांना वाटतं.
ट्रम्प यांनी असीम मुनीर यांना का बोलावलं?
भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षानंतर त्याच्या दुसऱ्याच महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात ही भेट झाली.
पाकिस्तान आणि भारत यांच्यातील युद्ध टाळल्याबद्दल आभार मानण्यासाठी असीम मुनीर यांना व्हाइट हाऊसमध्ये बोलावलं होतं, असं ट्रम्प यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं.
ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. "जनरल असीम मुनीर यांनी भारत-पाकिस्तान युद्ध टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची भेट घेणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
काही आठवड्यांपूर्वी आपण भारताचे पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेतली होती, असंही ट्रम्प यांनी यावेळी नमूद केलं.
ट्रम्प म्हणाले की, पाकिस्तान आणि भारत दोन्ही मोठ्या अणू शक्ती आहेत. त्यांच्यामध्ये अणू युद्ध होऊ शकलं असतं. परंतु "दोन समजूतदार लोकांनी युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला."
2006 मध्ये तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी पाकिस्तानचे लष्करी शासक आणि तेव्हाचे राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांची भेट घेतली होती.

पाकिस्तान आणि भारत दोघांशीही व्यापार करारांवर चर्चा सुरू आहे, असं ट्रम्प पुढे म्हणाले.
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना भेटण्याच्या काही तास आधी ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुमारे 35 मिनिटे फोनवर संवाद साधला होता. यात 'ऑपरेशन सिंदूर' या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली होती.
22 एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या कट्टरतावादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. भारताने या हल्ल्याबद्दल पाकिस्तानला जबाबदार धरलं आणि त्यांच्याविरुद्ध 'ऑपरेशन सिंदूर' नावाची लष्करी कारवाई केली होती.
चार दिवस चाललेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली.
या भेटीतून ट्रम्प यांचा भारताला काय संदेश?
एकीकडे ट्रम्प यांनी या लष्करी कारवाईवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली, तर दुसरीकडे याच लष्करी कारवाईनंतर बढती मिळालेल्या पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचं त्यांनी यजमानपद भूषवलं.
असीम मुनीर यांना भेटून ट्रम्प हे भारताला एक संकेत देत आहेत, असं इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्सचे फेलो डॉ. फज्जुर्रहमान सिद्दीकी यांनी म्हटलं.
ते म्हणाले, "ट्रम्प यांनी असीम मुनीर यांच्याशी घेतलेल्या भेटीतून हे दिसून येतं की, अमेरिकेसाठी भारत आणि पाकिस्तान दोघेही समान सहयोगी आहेत. त्यांनी न भारताला वरचढ ठरवलं ना पाकिस्तानला कमजोर दाखवलं."
"आपल्या धोरणात किंवा गेम प्लॅनमध्ये पाकिस्तानला आम्ही मागे ठेवू शकत नाही, असा अमेरिकेचा स्पष्ट संदेश आहे."
इराण-इस्रायल संघर्षाचा या बैठकीशी काय संबंध?
जनरल असीम मुनीर यांच्याशी इराणच्या मुद्द्यावरही चर्चा केल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांना दिली.
ते म्हणाले, "ते (जनरल मुनीर) इराणला फार चांगल्या प्रकारे ओळखतात, इतर अनेक देशांपेक्षा चांगलं. त्यांनाही काही गोष्टी आवडलेल्या नाहीत. असं नाही की ते इस्रायलविरोधात आहेत."
"त्यांना दोन्ही देशांची चांगली माहिती आहे, पण कदाचित इराणबाबत अधिक माहिती आहे. काय चाललं आहे, हे ते पाहत आहेत आणि या मुद्द्यावर जनरल मुनीर माझ्याशी सहमत होते."

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा पाकिस्ताननं निषेध केला होता. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असून त्यामुळे प्रादेशिक स्थैर्य धोक्यात येऊ शकतं, असं पाकिस्ताननं म्हटलं होतं.
असीम मुनीर यांच्यासोबत ट्रम्प यांची भेट इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षाशीही जोडली जात आहे.
पाकिस्तान आणि इराण यांच्यात आंतरराष्ट्रीय सीमा आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणचा दौरा केला होता आणि तेथील सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी यांची भेट घेतली होती.
जर इराणविरुद्ध कारवाईसाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची गरज भासली, तर अमेरिकेला सहज परवानगी मिळू शकेल, असा ट्रम्प यांचा मुनीर यांच्याशी या भेटीमागील हेतू असू शकतो, असंही मानलं जात आहे.
उद्या ट्रम्प पाकिस्तानकडे त्यांचे लष्करी तळ वापरण्याची मागणी करतील हे नाकारता येणार नाही, असं फज्जुर्रहमान सिद्दीकी यांना वाटतं. पण यामुळे पाकिस्तानची कोंडी होऊ शकते.

यासंदर्भात फज्जुर्रहमान सिद्दीकी म्हणतात, "बोलणं वेगळी गोष्ट आहे. परंतु, पाकिस्तानची परिस्थिती पाहता, मला वाटतं की जर अमेरिकेनं दबाव टाकला, तर पाकिस्तानकडे आपले लष्करी तळ देण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. मात्र, येथे पाकिस्तान चीनला हे कसं पटवून सांगेल, हे पाहावं लागेल. पण तरीही या प्रकरणात अमेरिका आघाडीवर आहे."
इराणमधील कारवाईनंतर कोणत्याही प्रकारची अराजक परिस्थिती निर्माण झाली, तर अमेरिकेला पाकिस्तानची गरज भासेल, असं सिद्दीकी यांचं म्हणणं आहे.
2001 मध्ये अमेरिकेनं दहशतवादाविरुद्ध मोहीम सुरू केली, तेव्हा त्यात सहभागी झालेल्या पहिल्या देशांपैकी पाकिस्तान एक होता. अमेरिकेच्या धोरणांना विरोध करू शकेल किंवा त्याबाबत काही निर्णय घेण्याइतकी मुभा पाकिस्तानकडे नाही, असं सिद्दीकी यांना वाटतं.
त्यांच्या मते, या भेटीनंतर पाकिस्तानकडे एक चांगली संधी आहे, ज्यामुळे इतकी वर्षे एकटा पडलेल्या देशाला आता एक मजबूत सहयोगी मिळू शकतो.
भारतासाठी याचा अर्थ काय?
असीम मुनीर आणि ट्रम्प यांच्या भेटीवरुन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.
"फील्ड मार्शल असीम मुनीर कोणत्याही देशाचे प्रमुख नाहीत, ना कोणत्याही सरकारचे प्रमुख. ते पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आहेत. तरीही त्यांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये जेवणासाठी आमंत्रित केलं आणि त्यांचं भरभरून कौतुक केलं," असं त्यांनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

फोटो स्रोत, Reuters
जयराम रमेश यांनी लिहिलं, "ही तीच व्यक्ती आहे, जिच्या प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये क्रूर दहशतवादी हल्ला घडला. त्या लष्करी यंत्रणेचे ते स्वतः प्रमुख आहेत. हा भारतीय मुत्सद्देगिरीला (मिठी मारण्याच्या मुत्सद्देगिरीसाठी देखील) एक मोठा धक्का आहे!"
ही बैठक मुख्यतः भारताला डोळ्यासमोर ठेवून आयोजित केली जात आहे, असं युद्धनीतिविषयक तज्ज्ञ ब्रह्म चेलानी यांनी या भेटीपूर्वी सोशल मीडियावर लिहिलेल्या एका सविस्तर पोस्टमध्ये म्हटलं होतं.
"भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर काही आठवड्यांत पाकिस्तानच्या सर्वात शक्तिशाली व्यक्तीचं स्वागत करण्याचा ट्रम्प यांचा निर्णय पाकिस्तानमधील परिस्थिती सामान्य करण्याच्या प्रयत्नांविषयी संदेश देतो.
त्यामुळे कदाचित शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील धोरणात्मक सहकार्याचे पुनरुज्जीवन होईल. ही बैठक भारत आणि पाकिस्तानसोबतच्या अमेरिकेच्या नात्यांना संतुलित करण्याच्या जुन्या अमेरिकन धोरणाच्या परतीचे संकेत देऊ शकते," असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं.
पाकिस्तानवर सैन्य कारवाईनंतर भारत आपल्या मित्र राष्ट्रांसमोर आपला मुद्दा ठामपणे मांडण्यात अपयशी ठरला, असं फज्जुर्रहमान सिद्दीकी यांना वाटतं.
असीम मुनीर आणि ट्रम्प यांची भेट कुठंतरी भारताच्या धोरणात्मक कमकुवतपणाचं दर्शन घडवते, असं ते म्हणतात.
"कदाचित भविष्यात परिस्थिती बदलू शकते. पण प्रतिमा सांभाळण्याच्या दृष्टीनं हे भारतासाठी नुकसानकारक आहे. ज्यांच्याशी तुम्ही लढलात आणि ज्यांनी भारताविरोधी वक्तव्यं केली आहेत, त्यांचं जगातील सगळ्यात शक्तिशाली देशाकडून स्वागत केलं जात असेल, तर ते भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या योग्य नाही," असं त्यांनी म्हटलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











