इस्रायल - इराण संघर्षामुळं पेट्रोल डिझेलसह आणखी काय महागेल?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खोमेनी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

इस्रायल-इराण संघर्षाकडे जगाचं लक्ष आहे. तेल आणि गॅस निर्मितीचं केंद्र असणाऱ्या म्हणजे मध्य-पूर्व आशिया क्षेत्रात हा संघर्ष सुरू आहे.

हा संघर्ष इतर देशांपर्यंतही पसरणार का, मिडल ईस्टमधल्या दोन शक्तीशाली सत्तांमधला हा संघर्ष युद्धाचं रूप घेणार का याविषयीची भीती व्यक्त केली जातेय.

तेल निर्मिती करणारा देश यात असल्याने कच्चा तेलाच्या किमतींकडे जगाचं लक्ष आहेच, पण या संघर्षाचे भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेवर एकूणच काय परिणाम होतील?

तेलाच्या किमतींसाठीचा जागतिक मानक आहे - ब्रेंट क्रूड.

इस्रायल-इराण संघर्ष सुरू झाल्यापासून या ब्रेंट क्रूडचे दर 16 जूनला साधारण बॅरलमागे 75 अमेरिकन डॉलर्सपर्यंत गेले होते. इस्रायलने इराणवर हल्ला केल्यापासून या दरांमध्ये सुमारे 7 टक्के वाढ झालेली आहे.

क्रूड तेलाच्या किमतींवर इतका थेट परिणाम का झाला?

तर, इराण हा एक महत्त्वाचा तेल उत्पादक देश आहे. जगभरातल्या एकूण तेल पुरवठ्यापैकी 3 टक्के इराणकडून केला जातो. शिवाय, इराण हा ओपेकचा सदस्य आहे. ओपेक म्हणजे 'ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टींग कंट्रीज'.

यासोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा इराणनं दिला आहे.

जगभरातलं 20 टक्के क्रूड ऑईल आणि नॅचरल गॅससारखी इतर महत्त्वाच्या गोष्टी याच समुद्री मार्गाने वाहून नेल्या जातात.

इस्रायल-इराण संघर्ष

फोटो स्रोत, Getty Images

या सामुद्रधुनीच्या सगळ्यात चिंचोळ्या भागाचा ताबा इराणकडे आहे. जर इराणने हा समुद्री मार्ग बंद केला, तर त्याचा मोठा फटका क्रूड ऑईलच्या (कच्चे तेल) वाहतुकीला बसेल. कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाला, तर किमती उसळी घेतील.

पश्चिम आशियातले सौदी अरेबिया, इराक, संयुक्त अरब अमिराती (यूएई), कुवेत, इराण, ओमान, कतार हे देश तेल उत्पादनावर अवलंबून आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली, तर स्वतः इराणसोबत या सगळ्या देशांना त्याचा फटका बसेल आणि त्यांच्या ग्राहक देशांनाही याचा फटका बसेल.

होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली, तर त्यामुळे क्रूडच्या किमती बॅरलमागे 100 डॉलर्सच्याही पलीकडे जातील, असं गोल्डमन सॅक्सनं म्हटलंय.

या जलमार्गासोबतच लाल समुद्रामार्गे होणाऱ्या व्यापारी वाहतुकीवरही हुथी बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे परिणाम झालेला होता. हे हल्ले हुथींनी पुन्हा सुरू केले, तर जगभरातल्या आयात-निर्यात साखळीवर याचा परिणाम होईल.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

क्रूड ऑईलच्या किमती आणि महागाईचं चक्र

कच्चा तेलाच्या किंमती जेव्हा वाढतात, तेव्हा त्यामुळे महागाईचं चक्र सुरू होतं.

क्रूड ऑईल महागलं की पेट्रोल-डिझेल महागतं. दळणवळण महाग झालं, की भाजीपाला-अन्नधान्याच्या किमती वाढतात.

दुसरीकडे ऑईल आणि गॅसवर आधारित उद्योगांसाठी उत्पादन खर्च वाढतो. परिणामी या वस्तू-सेवांच्या किमती वाढतात.

यामध्ये प्लास्टिक, केमिकल्स, खतं या सगळ्याचा समावेश आहे.

ही सगळी भाववाढ कंपन्यांकडून ग्राहकांकडे सरकवली जाते. म्हणूनच हा संघर्ष अधिक काळ चालला तर क्रूड तेल आयात करणाऱ्या जगभरातल्या देशांमध्ये महागाई वाढेल आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या प्रगतीवर होईल.

इस्रायल-इराण संघर्ष

फोटो स्रोत, Getty Images

तेलाच्या किमती 10 टक्के वाढल्या की प्रगत अर्थव्यवस्थांमधली महागाई सुमारे 0.4 टक्के वाढते, असं इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने म्हटलं होतं.

भारताने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एकूण गरजेच्या 89.1 टक्के क्रूड ऑईल आयात केलं होतं. त्या आधीच्या आर्थिक वर्षात हे प्रमाण होतं 88.6 टक्के.

इस्रायल-इराणसोबत भारताचे व्यापारी संबंध

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

भारताचे इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांशी व्यापारी संबंध आहेत. त्यांच्यामधल्या संघर्षाचा परिणाम भारताच्या व्यापारावर होईल.

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताने इराणला 1.24 अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती, तर 441.9 दशलक्ष डॉलर्सची आयात केली.

इस्रायलसोबतचा भारताचा व्यापार यापेक्षा मोठा आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताने इस्रायलला 2.15 अब्ज डॉलर्सची निर्यात केली, तर 1.61 अब्ज डॉलर्सची आयात इस्रायलकडून केली होती.

भारताकडून इराणला बासमती तांदूळ, चहा, साखर, ताजी फळं, औषधं, सॉफ्टड्रिंक्स, डाळी यांची निर्यात केली जाते.

तर भारत इराणकडून मिथेनॉल, पेट्रोलियम बिटुमेन, लिक्विड प्रोपेन, खारीक, सफरचंद, बदाम, ऑरगॅनिक केमिकल्सची आयात करतो.

दुसरीकडे भारत इस्रायलला मोती आणि मौल्यवान खडे, ऑटोमोटिव्ह डिझेल, केमिकल आणि खनिज उत्पादनं, मशिनरी, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, प्लास्टिक, टेक्स्टाईल आणि कपडे, शेती उत्पादनांची निर्यात करतो.

भारत इस्रायलकडून केमिकल्स आणि फर्टिलायझर उत्पादनं, मशिनरी - इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, पेट्रोलियम ऑईल, संरक्षण विषयक मशिनरी आयात करतो.

सोन्याचे दर, स्टॉकमार्केट्सवर परिणाम

कोणतीही मोठी नैसर्गिक आपत्ती, भू-राजकीय घडामोडींचे पडसाद क्रूड ऑईलच्या किमती, सोन्याचे दर आणि जगभरातली स्टॉक मार्केट्स यावर नक्की पहायला मिळतात.

इस्रायल-इराण संघर्ष

फोटो स्रोत, Getty Images

इस्रायल-इराण संघर्ष सुरू झाल्यापासून सोन्याच्या किमती वाढलेल्या आहेत. कारण अनिश्चिततेच्या काळात सोनं सुरक्षित पर्याय मानला जातो.

तर जगभरातल्या स्टॉक मार्केट्समध्ये या अनिश्चिततेमुळे घसरण पहायला मिळतेय.

विमान कंपन्यांना फटका

या इराण-इस्रायल संघर्षाचा विमान कंपन्यांना वेगवेगळ्या पातळीवर फटका बसतोय.

पहिलं म्हणजे जर तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला किंवा कच्चं तेल महागलं, तर त्याचा थेट परिणाम म्हणून विमानं वापरत असलेलं एव्हीएशन टर्बाईन फ्यूएल महागेल.

परिणामी, विमान कंपन्यांचा खर्च वाढेल. दुसरीकडे इराण-इस्रायलची हवाई हद्द बंद झाल्याने विमान कंपन्यांना आपल्या रूट्समध्ये बदल करावा लागतोय, तर काही फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत.

या सगळ्याचा परिणाम म्हणून स्टॉक मार्केटमध्ये विमान कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होतेय.

खतं निर्मिती, प्लास्टिक निर्मितीवर परिणाम

रंगांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या क्रूड ऑईलपासूनच तयार होणाऱ्या सॉल्व्हंट्स अँड रेझिन्सचा वापर करत असतात. क्रूडच्या किमती वाढल्या, तर या क्षेत्रावरही त्याचा परिणाम होईल.

प्लास्टिक, सिंथेटिक फायबर आणि अनेक केमिकल्सच्या निर्मितीसाठी नाप्था, इथे, प्रोपेन या क्रूड ऑईलवर प्रक्रिया करताना तयार होणाऱ्या उत्पादनांची गरज असते. त्यामुळे याही क्षेत्रांवर क्रूड ऑईलचा पुरवठा - भाववाढ याचा परिणाम होईल.

नायट्रोजन, लिक्विफाईड नॅचरल गॅसवर (एलएनजी) आधारित खतनिर्मिती करणंही महाग होईल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी जाहीर केलेलं टॅरिफ, त्याबद्दलची आणि इतर बदलती धोरणं यामुळे जागतिक बाजारपेठेत यापूर्वीच अनिश्चितता निर्माण झालेली आहे. इराण-इस्रायल संघर्षाने त्यात भर पडलीय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)