ट्रम्प यांचा नवा आदेश, 'व्हॉईस ऑफ अमेरिका' ही वृत्तसंस्था बंद करणार; 'हे' आहे कारण

    • Author, थॉमस मॅकिंटोश आणि मर्लिन थॉमस
    • Role, बीबीसी न्यूज

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका नव्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. 'व्हाईस ऑफ अमेरिका' (व्हीओए) या अमेरिकन सरकारच्या निधीवर चालणाऱ्या वृत्तसंस्थेचं काम बंद करण्याचा हा आदेश आहे. ही वृत्तसंस्था 'ट्रम्प-विरोधी' आणि 'कट्टरतावादी' असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

व्हाईट हाऊसनं यासंदर्भात दिलेल्या वक्तव्यात म्हटलं आहे की, या आदेशामुळे 'करदात्यांची आता कट्टरतावादी प्रचारापासून सुटका होईल' आणि त्याचबरोबर त्यामध्ये राजकारणी आणि उजव्या विचारसरणीच्या प्रसारमाध्यमांच्या 'डाव्या', 'पक्षपाती' व्हॉईस ऑफ अमेरिकाविरोधात टीका करणाऱ्या कडवट वक्तव्यांचा समावेश आहे.

व्हॉईस ऑफ अमेरिका ही अजूनही प्रामुख्यानं एक रेडिओ सेवा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझींच्या प्रचाराला तोंड देण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली होती. जगभरातील लाखो लोक या रेडिओ सेवेचा वापर करतात.

माइक अब्रामोविट्झ हे व्हॉईस ऑफ अमेरिकाचे संचालक आहेत. ते म्हणाले की, ते आणि त्यांच्या जवळपास 1,300 कर्मचाऱ्यांना पगारी रजेवर पाठवण्यात आलं आहे.

अब्रामोविट्झ म्हणाले, "ट्रम्प यांच्या आदेशामुळे व्हॉईस ऑफ अमेरिकेला त्यांचं महत्त्वाचं मिशन सुरू ठेवता येणार नाही. विशेषत: ते आज महत्त्वाचं आहे. आज जेव्हा इराण, चीन आणि रशियासारखे अमेरिकेचे शत्रू अमेरिकेला बदनाम करण्यासाठी खोटं वातावरण तयार करण्यासाठी अब्जावधी डॉलर्स ओतत आहेत, अशा स्थितीत व्हॉईस ऑफ अमेरिकेचे महत्त्व आहे."

व्हॉईस ऑफ अमेरिकाला काय आदेश दिले?

राष्ट्राध्यक्षांच्या आदेशात व्हॉईस ऑफ अमेरिकाची मूळ कंपनी असलेल्या यूएस एजन्सी फॉर ग्लोबल मीडियाला (यूएसएजीएम) लक्ष्य करण्यात आलं आहे. ही कंपनी रेडिओ फ्री युरोप आणि रेडिओ फ्री एशियासारख्या स्वयंसेवी संस्थांना निधी पुरवते. या संस्था मूलत: साम्यवादाचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आल्या होत्या.

या आदेशात व्यवस्थापकांना सांगितलं, "कायद्याच्या आवश्यकतेनुसार काम करावं आणि किमान उपस्थिती ठेवावी."

सीबीएस बीबीसीची अमेरिकेतील प्रसारमाध्यम भागीदार आहे. सीबीएसनं म्हटलं आहे की, व्हॉईस ऑफ अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांना क्रिस्टल थॉमस यांनी ईमेलद्वारे सूचित केलं आहे. क्रिस्टल थॉमस, यूएस एजन्सी फॉर ग्लोबल मीडियाचे मनुष्यबळ विभागाचे संचालक आहेत.

एका सूत्रानं सीबीएसला सांगितलं की, सर्व फ्रीलान्स कामगार आणि आंतरराष्ट्रीय कंत्राटदार यांना सांगण्यात आलं आहे की आता त्यांना देण्यासाठी पैसे नाहीत.

सीबीएसनं मिळवलेल्या ईमेलमध्ये रेडिओ फ्री एशिया आणि रेडिओ फ्री युरोप/रेडिओ लिबर्टी यांच्या प्रमुखांना कळविण्यात आलं आहे की, त्यांचं केंद्रीय अनुदान बंद करण्यात आलं आहे.

यूएस एजन्सी फॉर ग्लोबल मीडियाच्या अंतर्गत असणारे व्हॉईस ऑफ अमेरिका आणि इतर रेडिओ स्टेशन, 40 कोटीहून अधिक श्रोत्यांना सेवा पुरवतात.

ते ठोबळमानानं बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या समतुल्य आहेत. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला ब्रिटिश सरकारकडून अंशत: निधी दिला जातो.

इलॉन मस्ककडून व्हॉईस ऑफ अमेरिका बंद करण्याची मागणी

अब्जाधीश आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रमुख सल्लागार असलेल्या इलॉन मस्क यांनी व्हॉईस ऑफ अमेरिका बंद करण्याची मागणी करण्यासाठी एक्स या त्यांच्या मालकीच्या सोशल मीडियाचा वापर केला आहे.

इलॉन मस्क अमेरिकन सरकारमधील मोठ्या प्रमाणातील कर्मचारी कपात, खर्चातील बचत या गोष्टींवर देखरेख करत आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इतर अनेक केंद्रीय संस्थांच्या निधीमध्ये देखील कपात केली आहे. यामध्ये नागरिक बेघर होण्यापासून रोखणाऱ्या, संग्रहालय आणि ग्रंथालयांना निधी पुरवण्याची जबाबदारी असलेल्या संस्थांचाही समावेश आहे.

ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या त्यांच्या पहिल्या कार्यकाळात व्हॉईस ऑफ अमेरिकावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. अलीकडेच त्यांनी त्यांचे कट्टर निष्ठावंत कारी लेक यांची नियुक्ती यूएस एजन्सी फॉर ग्लोबल मीडियाच्या विशेष सल्लागारपदी केली आहे.

व्हॉईस ऑफ अमेरिकावरील टीका आणि आरोप

मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमं त्यांच्याविरोधात पक्षपाती आहेत, असं ट्रम्प नियमितपणे सांगत असतात. न्याय विभागात भाषण देताना त्यांनी सीएनएन आणि एमएसएनबीसी यांना कोणतेही पुरावे न देता 'भ्रष्ट' आणि 'बेकायदेशीर' म्हटलं.

व्हाईट हाऊसचं यासंदर्भातील वक्तव्यं, व्हॉईस ऑफ अमेरिकाच्या कथित पक्षपातीपणाबद्दल अनेक टीकाकार आणि उजव्या विचारसरणीच्या प्रसारमाध्यमांमधील वृत्तांशी जोडलेलं होतं.

व्हाईट हाऊसनं त्यात डॅन रॉबिनसन यांनी उजव्या विचारसरणीच्या वॉशिंग्टन टाइम्ससाठी लिहिलेल्या एका लेखाला उदधृत केलं होतं. डॅन, व्हॉईस ऑफ अमेरिकाचे व्हाईट हाऊसमधील माजी प्रतिनिधी आहेत. डॅन यांनी त्यात म्हटलं होतं, "मूलत: ही एक अत्यंत अहंकारी बदमाश संस्था आहे, जी अनेकदा डाव्या विचारसरणीकडे झुकलेली असते."

त्यात इतर लेखांचाही उल्लेख करण्यात आला होता. व्हॉईस ऑफ अमेरिकाच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना हमासचं वर्णन 'दहशतवादी संघटना' म्हणून करू नका असं सांगितलं होतं. तसेच इराणबद्दलची नकारात्मक वृत्तं दडपण्यास सांगितलं होतं, असा आरोप या लेखांमध्ये करण्यात आला होता.

इतर संदर्भ, 2020 च्या अमेरिकेतील निवडणुकीच्या दैनंदिन वार्तांकनाशी संबंधित होते. जे ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडन यांना अनुकूल असल्याचं त्यात म्हटलं होतं.

नाझी आणि जपानी प्रोपगांडाला तोंड देण्यासाठी 1942 मध्ये व्हॉईस ऑफ अमेरिकाची सुरुवात करण्यात आली होती. त्याचं पहिलं प्रसारण एका सामान्य उद्देशानं झालं होतं. बीबीसीनं अमेरिकेला कर्जाच्या रुपात दिलेल्या ट्रान्समीटरवर व्हॉईस ऑफ अमेरिकाचं ते पहिलं प्रसारण झालं होतं.

1976 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांनी व्हॉईस ऑफ अमेरिकाच्या संपादकीय स्वांतत्र्याला संरक्षण देण्यासाठी सार्वजनिक सनदेवर सही केली होती.

1994 पर्यंत, बिगर लष्करी प्रसारणावर देखरेख करण्यासाठी ब्रॉडकास्ट बोर्ड ऑफ गव्हर्नर्सची स्थापना करण्यात आली.

2013 मध्ये कायद्यात झालेल्या बदलामुळे व्हॉईस ऑफ अमेरिका आणि तिच्या संलग्न संस्थांना अमेरिकेत प्रसारण सुरू करण्याची परवानगी मिळाली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)