गायन तुमच्या आरोग्यासाठी आणि आजारांवर मात करण्यासाठी चांगलं का असतं? संशोधनातून समोर आले आश्चर्यकारक फायदे

    • Author, डेव्हिड कॉक्स
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

इतरांसोबत गाणं गायल्यानं तुमच्या मेंदूला चालना मिळण्यापासून ते वेदना कमी होण्यापर्यंत असंख्य फायदे होऊ शकतात.

वर्षअखेर म्हणजे लोक नाताळ आणि न्यू इअरच्या निमित्ताने एकत्र येतात. गाणी गातात. नाताळच्या काळात जी गाणी गायली जातात त्याला कॅरोल म्हणतात. ही पारंपरिक गीते असतात.

या गाण्यांमुळे वातावरण भारावल्यासारखे, आनंदी आणि चैतन्यमय होते.

या गाण्यांमुळे सणाची चाहूल लागते आणि सर्वत्र एक उत्साहाचे वातावरण दिसते.

रेल्वे स्टेशन, शॉपिंग सेंटर, रस्ते या ठिकाणी अनेक लोक सुंदर कपडे परिधान करुन ही गाणी गातात. पण तुम्हाला माहितीये का, हे लोक गाणं गाण्यापलीकडे अनेक महत्त्वाच्या गोष्टी करत आहेत.

कदाचित हे त्यांना देखील ठाऊक नसेल पण त्यांच्या गाण्याचा फायदा वातावरण निर्मितीला तर होतच आहे, पण त्याच वेळी त्यांचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी देखील या गाण्यांची मदत होत आहे.

समूह गायनाचे फायदे

जे लोक गाणी गातात त्यांना मेंदूपासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत विविध फायदे होतात, असं आढळून आलं आहे. विशेषकरून जेव्हा आपण समूहात गाणी म्हणतो तेव्हा त्याचा अधिक फायदा होतो.

यामुळे लोक जवळ येऊ शकतात, रोगांशी लढण्यासाठी आणि अगदी वेदना कमी करण्यासाठी आपल्या शरीराला चालना मिळू शकते. तर मग आनंदात, उत्साहानं गीत गाणं, तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकेल का?

"गायन ही एक आकलनाशी निगडीत, शारीरिक, भावनिक आणि सामाजिक कृती आहे," असं ॲलेक्स स्ट्रीट म्हणतात. ते केंब्रिज इन्स्टिट्यूट फॉर म्युझिक थेरेपी रिसर्चमध्ये संशोधक आहेत.

मुलं आणि प्रौढांना मेंदूच्या दुखापतीतून बरं करण्यासाठी संगीताचा वापर कशा प्रकारे करता येईल यावर ते अभ्यास करतात.

मानसशास्त्रज्ञांना बऱ्याच काळापासून या गोष्टीचं आश्चर्य वाटत आलं आहे की एकत्र गाणाऱ्या लोकांमध्ये सामाजिक एकतेची शक्तिशाली भावना कशी काय निर्माण होऊ शकते.

अगदी गाणं गाण्यास उत्सुक नसलेल्यांमध्ये देखील गाणं गाताना एकवाक्यता येते. संशोधनातून असं दिसून आलं आहे की, एक तासभर एकत्रितपणे गायल्यानंतर पूर्णपणे अनोळखी लोकदेखील एकमेकांच्या अतिशय जवळ येऊ शकतात.

किंबहुना या आश्चर्य नाही की गायनामुळे फुफ्फुस आणि श्वसनसंस्थेला अतिशय स्पष्ट असे फायदे होतात. उदाहरणार्थ, काही संशोधक गायनाचा वापर फुप्फुसाचे आजार असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी करत आहेत.

चांगली, आरोग्यदायी कंपनं

गायनामुळे इतकेच फायदे होत नाहीत, तर त्यामुळे मोजता येण्याजोगे शारीरिक फायदेदेखील होतात. असं दिसून आलं आहे की त्यामुळे लोकांच्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाबात सुधारणा होते. समूहामध्ये गायल्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये जशी वाढ होते, तसं फक्त संगीत ऐकल्यामुळे होत नाही.

यासाठी वेगवेगळी स्पष्टीकरणं आहेत. जीवशास्त्राच्या दृष्टीकोनातून असं मानलं जातं की गायनामुळे व्हॅगस मज्जातंतू सक्रिय होतात. हे मज्जातंतू घशाच्या मागच्या बाजूस असलेल्या स्वरयंत्र आणि स्नायूंना थेट जोडलेले असतात.

गाणं गाताना दीर्घकाळ आणि नियंत्रित स्वरूपात श्वास सोडल्यामुळे एंडोर्फिनदेखील स्रवतात. ते प्रसन्नता, आनंद आणि वेदना कमी होण्याशी संबंधित असतात.

गायनामुळे आपल्या मेंदूच्या दोन्ही बाजूंना असलेल्या न्युरॉन्सचं एक विस्तृत नेटवर्कदेखील सक्रिय होतं. त्यामुळे मेंदूमधील भाषा, हालचाली आणि भावनांशी संबंधित भाग ताजेतवाने आणि सक्रिय होतात.

गायनामध्ये मेंदूच्या अनेक भागांचा वापर होतो आणि त्यामुळे तुमचं श्वासावर लक्ष केंद्रित होतं. परिणामी तुमचा तणाव कमी होण्यास मदत होते.

"लोकांच्या चांगल्या आवाजात, आनंदी चेहऱ्यांवर आणि शिथिल, निवांत शारीरिक स्थितींमधून हे 'छान वाटण्याचे' प्रतिसाद दिसून येतात," असं स्ट्रीट म्हणतात.

या फायद्यांमागे काही खोलवर रुजलेली कारणंदेखील असू शकतात.

काही मानववंशशास्त्रज्ञांना वाटतं की आपले पूर्वज बोलण्याआधी गाऊ लागले होते. ते स्वरांचा वापर करून निसर्गातील आवाजाची नक्कल करत असत किंवा त्यांच्या भावना व्यक्त करत असत.

गुंतागुंतीचं मानवी वर्तन, भावनांची अभिव्यक्ती आणि विधी यांचा विकास होण्यात याची महत्त्वाची भूमिका ठरली असावी.

स्ट्रीट नमूद करतात की गायन प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा भाग आहे ही अपघाताची बाब नाही. मग ते संगीताच्या बाबतीत असो की नसो, आपलं शरीर आणि मेंदू जन्मापासूनच गाण्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी सुसंगत असतात.

"लहान मुलांसाठी अंगाई गीतं गायली जातात, तसंच अंत्यसंस्काराच्या वेळेस गाणी गायली जातात. आपण आपलं वेळापत्रक जप करून किंवा विशिष्ट लयीत म्हणत पाठ करतो आणि आपली बाराखडी लयीबद्द आणि मधुर रचनेतून शिकतो," असं ते म्हणतात.

एकत्र येण्यास आणि आजारांसाठी फायदेशीर

मात्र सर्व प्रकारची गाणी किंवा गायन सारख्याच प्रमाणात फायदेशीर नसतात. उदाहरणार्थ, एकट्यानं गाण्यापेक्षा, गटामध्ये किंवा कोरसमध्ये गायल्यामुळे मानसिक आरोग्याला अधिक फायदा होतो, असं आढळून आलं आहे.

या कारणामुळेच, शिक्षण क्षेत्रातील संशोधकांनी मुलांमध्ये सहकार्य वाढवणं, भाषेचा विकास करणं आणि भावना हाताळणं या गोष्टींसाठी गायनाचा वापर एक साधन म्हणून केला आहे.

"किंबहुना गायनाचा सर्वाधिक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यामुळे मेंदूला झालेल्या एखाद्या अपायापासून मेंदूला स्वत:च बरं होण्यास मदत होते असं दिसतं."

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञदेखील वेगवेगळे आजार असलेल्या लोकांचं जीवनमान सुधारण्याचा एक मार्ग म्हणून गायनाकडे वळत आहेत.

जगभरातील संशोधकांनी कर्करोग आणि स्ट्रोकमधून वाचलेल्या लोकांसाठी तसंच पार्किन्सन आणि डिमेंशियाचा आजार झालेल्या लोकांसाठी आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांसाठी स्थापन झालेल्या कोरसमध्ये (सामुदायिक गायन मंडळ) सहभागी होण्याचे परिणाम अभ्यासले आहेत.

उदाहरणार्थ, गायनामुळे पार्किन्सनच्या रुग्णांची स्पष्टपणे विचार मांडण्याची, भावना व्यक्त करणयाची किंवा बोलण्याची क्षमता सुधारते. हा आजार वाढत असताना या रुग्णांना याच बाबतीत संघर्ष करावा लागतो.

गायनामुळे सामान्य आरोग्यदेखील सुधारतं. जलद चालण्यापेक्षा त्याकडे कमी दर्जाचा व्यायाम म्हणून पाहिलं गेलं आहे.

"गायन ही एक शारीरिक क्रिया आहे आणि त्याचे व्यायामाप्रमाणेच काही समांतर फायदे असू शकतात," असं ॲडम लुईस म्हणतात. ते साउथहॅम्प्टन विद्यापीठात श्वसनाच्या फिजिओथेरेपीचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.

एका अभ्यासातून तर असंही आढळून आलं की, प्रशिक्षित गायक ताल आणि स्वर सुधारण्यासाठी विविध प्रकारचे स्वरांचे व्यायाम करतात. अशा व्यायामांबरोबरच गायन हा हृदय आणि फुप्फुसासाठीचा चांगला व्यायाम आहे. तो ट्रेडमिलवर मध्यम गतीनं चालण्याइतकाच परिणामकारक आहे.

मात्र त्याचबरोबर संशोधन आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधण्याबाबत उत्सुक आहेत. ते म्हणजे, दीर्घकाळापासून असलेल्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांच्या मानसिकतेसाठी गायनाच्या गटात किंवा कोरसमध्ये सहभागी होण्याच्या फायद्यांना अनेकदा कमी लेखलं जातं.

स्ट्रीट म्हणतात की गायनामुळे हे लोक ते काय करू शकत नाहीत, यापेक्षा ते काय करू शकतात, यावर लक्ष केंद्रित करू शकतात.

"यामुळे खोलीत अचानक समानता येते. तिथे आता रुग्णांची काळजी घेणारे लोक काळजी घेणारे राहिलेले नाहीत. वैद्यकीय कर्मचारीदेखील तेच गाणं त्याचप्रकारे गात आहेत. असं फार थोड्या गोष्टींमुळे होऊ शकतं," असं स्ट्रीट म्हणतात.

तुम्ही घेत असलेला प्रत्येक श्वास आणि गायन

गायनामुळे ज्यांना सर्वाधिक फायदा झाल्याचं दिसून आलं आहे, त्यात श्वसनाचे दीर्घकालापासून आजार असलेल्या लोकांचा समावेश आहे.

केयर फिलिप यांचं संशोधन मुख्यत: यावरच केंद्रित आहे. ते इम्पेरियल कॉलेज लंडनमधील रेस्पिरेटरी मेडिसिनमध्ये क्लिनिकल प्राध्यापक आहेत.

फिलिप सावध करतात की गायनामुळे हे आजार बरे होणार नाहीत. मात्र त्याचा उपयोग पारंपरिक उपचारांना पूरक असा प्रभावी समग्र दृष्टीकोन होऊ शकतो.

फिलिप म्हणतात, "काहीजण ज्यांना श्वास थांबल्यासारखं किंवा कोंडल्यासारखं वाटतं, त्यांच्या बाबतीत त्यांच्या श्वास घेण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो. ज्यामुळे श्वसन अनियमित आणि अकार्यक्षम होतं."

"गायनाचा वापर करून करण्यात येणाऱ्या काही उपचारांमुळे यात स्नायूंचा वापर, लय आणि श्वासोच्छवासाची खोली याबाबतीत मदत होते. त्यामुळे लक्षणं सुधारण्यास मदत होऊ शकते."

त्यांच्या सर्वात उल्लेखनीय अभ्यासांपैकी एक म्हणजे श्वासोच्छवासाचा एक कार्यक्रम घेणं. इंग्लिश नॅशनल ओपेरामधील व्यावसायिक गायकांसोबत काम करून हा कार्यक्रम विकसित करण्यात आला होता.

त्याचा वापर दीर्घकाळापासून कोरोना असलेल्या रुग्णांमध्ये निश्चित स्वरूपात नसलेल्या नियंत्रित चाचणीचा भाग म्हणून करण्यात आला होता.

या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षांमधून असं दिसून आलं की त्यामुळे त्यांच्या जगण्याचा दर्जा सुधारला आणि त्यांना श्वासोच्छ्वासासंदर्भात येणाऱ्या काही अडचणी कमी झाल्या.

त्याचवेळी, आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांसाठी गायन हे काही जोखीममुक्त नसतं. गटामध्ये किंवा कोरसमध्ये गाण्याचा संबंध कोरोनाच्या साथीच्या सुरूवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याशी जोडला गेला होता. कारण गायनामुळे मोठ्या प्रमाणात हवेत विषाणू उत्सर्जित होऊ शकतात.

"जर तुम्हाला श्वसनाशी संबंधी संसर्ग झाला असेल, तर इतरांना त्या संसर्गाचा धोका उद्भवू नये म्हणून तुम्ही त्या आठवड्यात गटामध्ये गायनाचा सराव न करणंच योग्य ठरेल," असं फिलिप म्हणतात.

मेंदूच्या दुखापतीतून सावरण्यामध्ये गायनाचं महत्त्व

मात्र कदाचित गायनाचा सर्वात मोठा फायदा असा की मेंदूला झालेल्या नुकसानापासून स्वत:च बरं होण्यास त्यामुळे मदत होते, असं दिसतं. अमेरिकेतील माजी काँग्रेसमन गॅब्रिएल गिफोर्डस यांच्या उदाहरणातून ते स्पष्ट झालं.

2011 मध्ये हत्येच्या एका प्रयत्नात गॅब्रिएल यांच्या डोक्यात गोळी लागली, मात्र त्या वाचल्या. त्यांचा त्यांच्यावर मोठा परिणाम झाला. अनेक वर्षांच्या कालावधीत, गॅब्रिएल गिफोर्ड्स चालण्यास, वाचण्यास, बोलण्यास आणि लिहिण्यास पुन्हा शिकल्या.

डॉक्टरांनी यासाठी त्यांच्या बालपणीच्या गाण्यांचा वापर करून त्यांची बोलण्याची क्षमता पुन्हा मिळवण्यास मदत केली.

स्ट्रोकमधून वाचलेल्या लोकांना पुन्हा बोलता येण्यासाठी मदत करणाऱ्या संशोधकांनी अशाच पद्धतींचा वापर केला आहे. कारण मेंदूच्या दोन गोलार्धांमध्ये नव्यान संपर्क वाढवण्यासाठी तासनतासांची पुनरावृत्ती आवश्यक असते. ती गायनातून साधली जाऊ शकते.

तीव्र स्वरूपाच्या स्ट्रोकमुळे मेंदूच्या या गोलार्धांवर परिणाम होतो. गायनामुळे मेंदूची न्यूरोप्लास्टिकिटी वाढण्यास मदत होते, असंदेखील मानलं जातं. यामुळे मेंदूला त्यातून सावरून नवीन न्यूरोलॉजिकल नेटवर्क तयार करता येतात.

असेही काही सिद्धांत आहेत, ज्यात गायनामुळे कदाचित, आकलन क्षमतेत घट होत जाणाऱ्या लोकांना मदत होऊ शकते. कारण त्यामुळे मेंदूवर तीव्र स्वरूपाचा दाब निर्माण होतो, सतत लक्ष द्याव लागतं आणि शब्द शोधावे लागतात आणि मौखिक स्मरणशक्ती उत्तेजित करावी लागते.

टेप्पो सार्कमो हेलसिंकी विद्यापीठात न्युरोसायकोलॉजीचे प्राध्यापक आहेत.

ते म्हणतात, "वृद्धांमध्ये गायनामुळे आकलन क्षमता सुधारण्याचे फायदे हळूहळू वाढत आहेत. गायनामुळे आकलन क्षमतेत घट होण्याची क्रिया मंदावण्याच्या किंवा ती घसरण रोखण्याचा फायदा होण्याबद्दल आपल्याला अजूनही फारसं माहित नाही. कारण त्यासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात अभ्यास करण्याची आवश्यकता आहे."

स्ट्रीट यांना वाटतं की सर्व संशोधनातून दिसून येतं की गायनाचे किती प्रभावी फायदे आहेत. ते सामाजिकृष्ट्या आणि मेंदूसाठीदेखील आहेत. संशोधनातून दिसून येतं की गायन मानवी जीवनाचा इतका सार्वत्रिक भाग का आहे.

मात्र त्यांना एक चिंता वाटते, ती म्हणजे लोक गायनासारख्या कृतींद्वारे एकमेकांशी जोडून घेण्याऐवजी तंत्रज्ञानाशी जोडून घेण्यात अधिकाधिक वेळ घालवत आहेत. त्यामुळे तुलनेने कमी लोकांना गायनाचे फायदे अनुभवता येत आहेत.

ते पुढे म्हणतात, "यासंदर्भात आपण बरंच शोधत आहोत. विशेषकरून मेंदूच्या दुखापतीतून सावरण्यासंदर्भात अभ्यास केला जातो आहे. गायनामुळे हे सकारात्मक परिणाम होऊ शकतात, हे दाखवणारे अभ्यास आता समोर येऊ लागले आहेत."

"अगदी गंभीर स्वरूपाची दुखापत झालेल्या लोकांच्याबाबतीत ते होऊ शकतात. आपल्याला गायनामुळे खूप फायदा होऊ शकतो यात अर्थ आहे. कारण समुदायांना जोडण्यात गायनानं नेहमीच मोठी भूमिका बजावली आहे."

कदाचित, यावर्षी नाताळच्या सणात काही कॅरोलचा (नाताळची गाणी) आनंद घेण्यासाठी हे आणखी एक कारण ठरेल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.