You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मिग-21 निवृत्त: 'उडणारी शवपेटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विमानाची संपूर्ण कहाणी
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तरुण वैमानिकानं मिग-21 जेट संपूर्ण ताकदीनिशी उडवलं, तेव्हा ते ध्वनीच्या दुप्पट वेगानं पृथ्वीपासून 20 किमी उंचीवर उड्डाण घेतं झालं. त्या क्षणांमध्ये त्या तरुण वैमानिकाला पूर्णपणे हलकं वाटू लागलं होतं. जणू काही आकाशानंच त्याला पूर्णपणे मुक्त संचार करण्याची परवानगी दिली होती.
"मॅक 2 वर (ध्वनीच्या दुप्पट वेग) तुम्हाला तुमच्या पोटात हलकेपणा जाणवू लागतो. त्या वेगाने मिग-21 ला वळण्यासाठी मोठी जागा लागते आणि एक वळण पूर्ण करण्यापूर्वी विमानानं बदललेली दिशाही अनेक किलोमीटर अंतर पार करणारी असते," निवृत्त एअर मार्शल पृथ्वी सिंग ब्रार यांना त्यांचे मिग-21 जेट विमानातील दिवस आठवले.
ब्रार 1960 मध्ये हवाई दलात सामील झाले होते. 1966 मध्ये त्यांनी सोव्हिएत मिग-21 विमान उडवण्यास सुरुवात केली होती. त्यांनी 26 वर्षे ते उडवले.
पुढे ते सांगतात की, "जसं एखाद्या पक्ष्याला आकाशातला मुक्तसंचार आवडतो, तसंच मला मिग-21 उडवणं खूपच आवडतं. युद्धामध्ये मिग-21 ने मला सुरक्षितता दिली."
पुढे या विमानाची तुलना घारीपासून वाचत उडणाऱ्या एखाद्या लहानशा चतूर पक्ष्याशी करत त्यांनी म्हटलं की, "मिग-21 ने मला त्याच प्रकारे धोकादायक परिस्थितीतून चतुराईनं मार्ग काढण्यास मदत केली. मिग-21 विमान माझ्यासाठी अगदी असंच होतं."
मिग-21 विमानाचं 60 वर्षांपासून कौतुक झालं. पण नंतर नंतर ते कुप्रसिद्धही झालं. आज (26 सप्टेंबर) त्याचं भारतातलं शेवटचं उड्डाण असेल.
उडणारी शवपेटी पडलं टोपणनाव
मिग-21 विमानाच्या उत्कर्षाच्या काळात ते भारतीय हवाई दलाचा कणा होतं. इंडियन एअर फोर्समधील सर्व लढाऊ विमानांच्या संख्येपैकी त्याची संख्या दोन तृतीयांश इतकी होती. त्याचे वैमानिक त्याच्याशी खूप निष्ठावान बनले होते.
परंतु नंतरच्या काळात, अनेक प्राणघातक अपघातांच्या मालिकेमुळे त्याला "उडणारी शवपेटी" असंच टोपणनाव प्राप्त झालं.
अधिकृत आकडेवारीनुसार, 1966 ते 1980 पर्यंत भारतानं विविध प्रकारच्या 872 मिग विमानांची खरेदी केली. 1971-72 ते एप्रिल 2012 दरम्यान एकूण 482 मिग विमानं अपघातग्रस्त झाली.
या सर्व अपघातांमध्ये 171 वैमानिक, 39 नागरिक, 8 सेवा कर्मचारी आणि 1 एअर क्रू सदस्य इतके लोक मृत्युमुखी पडले.
मानवी चुका आणि तांत्रिक समस्या अशा दोन्ही गोष्टींमुळे हे अपघात झाले. 2012 नंतर, कोणताही नवीन अधिकृत डेटा शेअर करण्यात आलेला नाही.
"मिग-21 हे एक असं लढाऊ विमान आहे ज्याचा इतिहास संमिश्र स्वरुपाचा आहे. 30 वर्षांहून अधिक काळ हे भारतीय हवाई दलाचं (IAF) मुख्य विमान होतं.
1965 च्या पाकिस्तानशी झालेल्या युद्धापासून ते भारताच्या सर्व युद्धांमध्ये मिग-21 चा वापर अनेक प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींसाठी करण्यात आला," असं युरेशिया ग्रुपचे (जिओ-पॉलिटीकल रिस्क कन्सल्टींग फर्म) विश्लेषक राहुल भाटिया सांगतात.
"2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासून, मिग-21 मोठ्या संख्येनं होणाऱ्या अपघातांसाठी अधिक प्रसिद्ध झालं. वैमानिकांना मिग-21 ची आठवण आपुलकीनं येते. या विमानाबाबत त्यांच्याकडे चांगल्या आठवणी नक्कीच आहेत. मात्र, हे विमान अपेक्षेपेक्षा खूप जास्त काळ सेवेत राहिलं," असंही ते पुढे सांगतात.
50 हून अधिक देशांनी वापरले
मिग-21 हे विमान सोव्हिएत संघाने डिझाइन केलेलं होतं. ते पहिल्यांदा 1963 मध्ये सादर करण्यात आलं.
मिग-21 ला सुईच्या आकाराचं नाक आणि अतिशय निमूळतं असं शरीर होतं. ते उंचावर अत्यंत वेगानं उडू शकत होतं. ते खूप लवकर चढाईदेखील करु शकत होतं.
हे विमान जेव्हा त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर होतं, तेव्हा 50 हून अधिक देशांच्या हवाई दलांनी मिग-21 चा वापर केला आहे.
यामध्ये सोव्हिएत संघ, चीन, भारत, इजिप्त, इराक आणि व्हिएतनाम या देशांच्या हवाई दलांचा समावेश आहे. त्यामुळे मिग-21 इतिहासातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या सुपरसॉनिक विमानांपैकी एक बनलेलं आहे.
भारतात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीने (HAL) 1960 च्या दशकाच्या मध्यावधीत परवान्याअंतर्गत मिग-21 ची निर्मिती सुरू केली.
मिग-21 हे भारतीय हवाई दलाच्या (IAF) तुकड्यांसाठी मुख्य विमान बनलं होतं. अनेक वेगवेगळ्या लढाऊ भूमिका पार पाडण्यास सक्षम असल्यानं वेळोवेळी त्याचं कौतुकही करण्यात आलं.
वैमानिक सांगतात की, मिग-21 चा कॉकपिट फारसा आरामदायी नव्हता. शिवाय, आत फक्त एकच सीट होती. उड्डाण करताना वैमानिकांना सर्व बाजूंनी आकाशाकडून दबाव जाणवायचा.
'एका उड्डाणात एक किलो वजन कमी व्हायचं'
मिग-21 चे एअर कंडिशनिंग हे रशियातील अतिथंड वातावरणासाठी डिझाइन करण्यात आलं होतं. भारतातील कडक उन्हाळ्यांसाठी हे डिझाईन अर्थातचं अपुरं पडत होतं.
कमी उंचीवर कॉकपिट अनेकदा खूप गरम व्हायचं आणि त्यामुळे आतमध्ये प्रचंड अस्वस्थता जाणवायची.
त्यामुळे, एकाच उड्डाणादरम्यान वैमानिकांचं कधीकधी एक किलो किंवा त्याहून अधिक वजन कमी व्हायचं, अशी आठवण एअर मार्शल (निवृत्त) विनोद के. भाटिया सांगतात.
भाटिया सांगतात की, "माझी बहुतेक उड्डाणं जवळपास 30 मिनिटांची होती. उड्डाणं लहान असल्यानं कॉकपिटमधील अस्वस्थता सहन करण्याजोगी होती. सरतेशेवटी, मिग-21 उडवणं हे एखाद्या गेमसारखं होतं आणि तरीही ते आनंददायी होतं."
मिग-21 मुळात हाय-अल्टीट्यूड इंटरसेप्टर म्हणून डिझाइन केलेलं होतं. ते वेगासाठी आणि शत्रूंच्या विमानांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी अंतरावर जलद चढाई करण्यासाठी बनवण्यात आलेलं होतं.
भारतीय हवाई दलानं (IAF) अटीतटीच्या आणि अगदी नजीकच्या लढाईसाठी आणि जमिनीवरील हल्ल्यांसाठीदेखील मिग-21 ला आपलंसं केलेलं होतं.
पाकिस्तानात जाऊन कमी उंचीवरून हल्ले
1971 च्या पाकिस्तानशी झालेल्या युद्धापर्यंत, मिग-21 एक शक्तिशाली असं बहुभूमिका पार पाडणारं लढाऊ विमान बनलेलं होतं. 1965 च्या युद्धादरम्यान त्याचं नाविन्य अद्यापही टिकून होतं आणि ते प्रामुख्यानं इंटरसेप्टर म्हणून वापरलं जात होतं.
मिग-21 नं रशियासोबत असलेल्या भारताच्या संरक्षण संबंधांना अधिक आकार दिला. त्यामुळे भारताला स्वतःच्या एरोस्पेस इंडस्ट्रीची सुरुवात करण्यास देखील मदत झाली.
एअर मार्शल ब्रार सांगतात की, "आपण मिग-21 ला भारतीय परिस्थितीनुसार अत्यंत उल्लेखनीय पद्धतीनं जुळवून घेतलं. या विमानाच्या डिझाइनमध्ये काही मर्यादा नक्कीच होत्या आणि ते मुळात नजीकच्या अटीतटीच्या लढाईसाठी बनवलं गेलेलं नव्हतं.
असं असूनही, भारतीय वैमानिकांनी रशियन टेस्ट पायलट्स आणि मॅन्युअलनं वर्णन केलेल्या मर्यादेपलीकडे हे विमान आणखी पुढे नेलं. त्यांनी अतिशय प्रभावी पद्धतीनं नजीकच्या अटीतटीच्या लढाईतदेखील उड्डाण करण्यामध्ये प्रभुत्व मिळवलं."
1971 च्या युद्धात खऱ्या अर्थानं मिग-21 च्या या जुळवून घेण्याच्या क्षमतेनं त्याची भूमिका निश्चित केली, असं म्हणता येईल.
या मिग-21 विमानांनी रात्री पाकिस्तानच्या हद्दीत अगदी आतमध्ये जाऊन अत्यंत कमी उंचीवरुन हल्ले केले.
मिग-21 विमानांच्या एका गटानं ढाकामधील गव्हर्नर हाऊसवर हल्ला केला. त्यांनी त्याच्या छतावरील व्हेंटिलेटरमधून रॉकेटचा स्फोट केला.
एअर मार्शल ब्रार सांगतात, "प्रत्येक मिग-21 मध्ये 500 किलोचे दोन बॉम्ब होते. मी अशा प्रकारे तीन ते चार मोहिमा उडवल्या. आम्ही अमृतसरहून उड्डाण केलं होतं आणि 35 मिनिटांच्या आत आम्ही पाकिस्तानच्या आत होतो.
आम्ही शत्रूच्या प्रदेशात 250 किमी खोलवर जाऊन तिथल्या लक्ष्यांवर हल्ला केला. त्यानंतर आम्ही राजस्थानमधून परतलो. हाच लवकर परतण्यासाठी सर्वात कमी अंतराचा मार्ग होता."
प्रत्येक लढाऊ विमानाची स्वतःची वैशिष्ट्यं असतात आणि मिग-21 देखील त्याला अपवाद नव्हतं.
जलद गतीनं उतरणं आणि अगदी हाय-स्पीड स्टॉल्स हे मिग-21 च्या वैशिष्ट्यांचा भाग होतं, असं एअर मार्शल भाटिया सांगतात.
पुढे ते सांगतात की, "जर तुम्ही या विमानावर प्रभुत्व मिळवलं आणि त्याचा आदर केला तर ते नक्कीच उडण्यासाठी एक सुंदर विमान होतं."
मिग-21 उडवणाऱ्या वैमानिकांना नंतरच्या काळात त्याच्या प्रतिष्ठेमध्ये झालेली घसरण अयोग्य वाटत होती. एका वैमानिकानं सांगितलं की, "मीडियानं या विमानाबद्दल खूप निर्दयीपणा दाखवला."
संरक्षण विश्लेषक राहुल बेदी म्हणतात की, "मिग-21 बद्दल खूपच चुकीच्या आठवणी आहेत. हे विमान अनेकांच्या मृत्यूंसाठी जबाबदार होतं." अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, वारंवार होणारे अपघात जुन्या एअरफ्रेममुळे झाले. तर, इतर काहींचं म्हणणं आहे की, दोन मेंटेनन्समधील दीर्घकाळाचा अवकाश यामुळे हे अपघात झाले.
बेदी सांगतात की, "मिग-21 चं सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याचे इंजिन आणि उच्च लँडिंग स्पीड. यामुळे लहान धावपट्टीवर उतरणं कठीण होतं. या आव्हानांमुळे अनेक अपघात झाले.
त्यामागचं कारण अनेकदा वैमानिकाच्या चुकीमुळे ठरवलं जात असे. अकार्यक्षमता आणि नोकरशाहीच्या विलंबामुळे मिग-21 निवृत्त करण्याचे प्रयत्नदेखील वारंवार लांबणीवर पडले."
अखेरच्या दोन तुकड्या होणार निवृत्त
भारतीय हवाई दलाला मिग-21 चे आयुष्य वाढवत रहावं लागलं कारण त्याची जागा घेणारी दुसरी विमानं उपलब्ध नव्हती.
मिग-21 ची जागा घेण्यासाठी एक हलकं लढाऊ विमान 1981 मध्ये प्राप्त करण्यात आलं होतं. त्याने पहिल्यांदा 2001 मध्ये उड्डाण केलं. आताही, जवळपास कित्येक दशकांनंतरही, या बदली विमानाच्या फक्त दोन तुकड्या कार्यरत आहेत.
भारताने त्यांच्या शेवटच्या दोन मिग-21 च्या तुकड्या आता निवृत्त केल्या आहेत. यानंतर, भारताची मंजूर मर्यादा 42 ची असली तरी सध्या भारताकडे 29 लढाऊ विमाने असतील.
मिग-21 उडवणाऱ्या वैमानिकांसाठी ते कधीही फक्त एक यंत्र नव्हतं. ते त्याला आकाशातील साथीदार मानत असत.
एअर मार्शल ब्रार यांनी वैयक्तिकरित्या या गोष्टीचा अनुभव घेतला. जुलै 2000 मध्ये निवृत्त होण्याच्या दोन दिवस आधी, त्यांनी उत्तर भारतातील चंदीगड शहरातून शेवटचं उड्डाण केलं.
ते म्हणाले की, "उड्डाण करताना मला अगदी शेवटचं उडणाऱ्या एखाद्या पक्ष्यासारखं वाटलं. जेव्हा मी उतरलो आणि कॉकपिटमधून बाहेर पडलो तेव्हा मला पूर्णपणे समाधान वाटत होतं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)