उत्तरकाशी अपघात : मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्या मार्गाचा शोध सुरू, मोहीम कधी संपणार?

उत्तराखंड बोगदा दुर्घटना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, उत्तरकाशीहून अनंत झणाणे आणि दिल्लीहून निखिला हेनरी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भूस्खलनामुळे बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना वाचवण्यासाठीच्या नव्या पर्यायांवर बचाव पथकाकडून विचार केला जात आहे.

बचाव पथकातील कर्मचारी गेल्या 12 दिवसांपासून ड्रिलिंग मशीनच्या माध्यमातून मजुरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. पण शुक्रवारी (24 नोव्हेंबर) ड्रिलिंग मशीन तुटल्यानंतर हे काम थांबलं.

या मजुरांना बाहेर काढण्याची मोहीम अत्यंत आव्हानात्मक ठरली आहे.

बोगद्यातील माती चांगलीच भुसभुशीत आहे. त्याठिकाणी दगडही सरकत आहेत. तसंच बोगदा तयार करताना वापरण्यात आलेल्या सळया कापणंही कठिण जात आहे.

शुक्रवारी (24 नोव्हेंबर) बचावकार्य योग्य दिशेनं सुरू असल्याचं वाटत होतं. पण त्याचवेळी ढिगाऱ्यातील धातूंचे तुकडे अडकल्याने ड्रिलिंग मशीन बोगद्याच्या आतच तुटली.

त्यानंतर आज सोमवारी (27 नोव्हेंबर) सकाळी हे मशीन पूर्णपणे बाजूला करण्यात आलं आहे.

यादरम्यान बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी डोंगराच्या वरून उभं ड्रिलिंग करायला सुरुवात केली आहे.

अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी हाताने खोदकाम करण्याबरोबरच इतर तंत्रांचाही विचार केलं जात असल्याचंही अधिकारी म्हणाले.

व्हर्टिकल ड्रिलिंग म्हणजे काय?

व्हर्टिकल ड्रिलिंग

फोटो स्रोत, ANI

बचावपथक उत्तरकाशीच्या सिलक्यारामधील त्या डोंगराच्या वरच्या भागातून मजुरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील अशी योजना आहे.

अधिकाऱ्यांनी डोंगरावर पोहोचण्यासाठी एक तात्पुरत्या स्वरुपाचा रस्ता आणि प्लॅटफॉर्म आधीच तयार केला आहे.

बचावपथकाला मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी 86 मीटर (282 फूट) खोल ड्रिल करावं लागेल. हा मार्ग आडव्या मार्गाच्या तुलनेत (46.6 मीटर) जवळपास दुप्पट आहे.

सोमवारी (27 नोव्हेंबर) सकाळपर्यंत अधिकाऱ्यांना बोगद्यात 31 मीटरपर्यंत खोदकाम करण्यात यश आलं आहे.

उत्तरकाशी बोगदा दुर्घटना

नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्टक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी महमूद अहमद या बचाव मोहिमेचं नेतृत्व करत आहेत.

मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पुन्हा काही अडचण आली नाही तर, आणखी 100 तासांचा वेळ लागू शकतो, असं अहमद म्हणाले.

द हिंदू वृत्तपत्राच्या वृत्तानुसार जर सर्व प्रक्रिया काहीही अडचण न येता पूर्ण झाली तर मजुरांना व्हर्टिकल ड्रिलद्वारे बादल्यांमधून वर खेचून काढलं जाईल.

वादळ आणि हिमवृष्टीचा धोका ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची बनवू शकतो, असं अधिकारी म्हणाले.

पण, तसं असलं तरी कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

उत्तरकाशी बोगदा दुर्घटना

आडवे ड्रिलिंग म्हणजे काय?

आतापर्यंत बचाव पथकातील सदस्य सरळ आडव्या मार्गाने एक लहान बोगदा तयार करून अंदाजे 60 मीटरच्या ढिगाऱ्यातून वेग-वेगळ्या रुंदीचे अनेक पाईप पाठवण्याचा प्रयत्न करत होते.

त्या माध्यमातून मजुरांना स्ट्रेचरवरून बाहेर काढता आलं असतं.

आता ते मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी एक पर्यायी मार्ग बनवण्यासाठी ड्रिलिंगच्या मुख्य ठिकाणी उभं ड्रिलिंग करत आहेत.

द हिंदूच्या वृत्तानुसार रविवारी व्हर्टिकल ड्रिलिंगच्या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म तयार केला होता.

पण अधिकाऱ्यांनी सध्या तरी व्हर्टिक ड्रिलिंगबाबत काहीही माहिती दिलेली नाही.

उत्तरकाशी बोगदा दुर्घटना

फोटो स्रोत, ANI

हाताने कसे करणार खोदकाम?

बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी 34 मीटर आडवं खोदकाम केलं होतं. ते मजुरांपासून फक्त 12 मीटर अंतरावर पोहोचले होते. पण शुक्रवारी ड्रिलिंग करणारं ऑगर मशीन मध्येच तुटलं.

त्यानंतर ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर एक आणीबाणी पथक आत गेलं आणि प्रचंड प्रयत्नांनंतर सोमवारी मशीन बाहेर काढलं.

आता या ठिकाणीही बचाव पथकातील कर्मचारी उर्वरित 12 मीटरचं खोदकाम हातानं करण्याचा प्रयत्न करतील.

पण हाताने खोदकाम केल्यानंतर या ठिकाणाहून मशीनद्वारेच पाईप टाकले जाणार आहेत.

सद्यस्थिती काय?

घटनास्थळी उपस्थित मायक्रो टनलिंग एक्सपर्ट क्रिस कूपर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, "आम्ही ऑगर मशीनचे तुटलेले तुकडे काढत आहोत. अनेक पाईप आहेत, त्यांना कापायचं आहे. त्यासाठी सुमारे तीन तासांचा वेळ लागू शकतो. त्यानंतर बोगदा हाताने कापावा लागेल."

"यात किती वेळ लागेल हे आम्ही सांगू शकत नाही. नेमक्या त्या वेळच्या स्थितीवर ते अवलंबून असेल. आर्मी या मोहिमेवर लक्ष ठेवून आहे. 30 मीटरचं उभं ड्रिलिंगही करण्यात आलं आहे."

उत्तरकाशी बोगदा दुर्घटना

फोटो स्रोत, ANI

त्याशिवाय माजी इंजिनिअर-इन-चीफ आणि बीआरओचे निवृत्त डीजी लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह म्हणाले की, "अडकलेलं ऑगर मशीन पूर्णपणे काढलं आहे. पण दीड मीटरचा डॅमेज पाईप असून तो अजूनही अडकलेला आहे. तो काढण्याचं काम सुरू आहे. ते झालं तर आम्ही हातानं खोदकाम करू. नंतर उर्वरित अंतरात हळू-हळू खोदकाम करू. ते लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी आशा आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)