उत्तरकाशीच्या बोगद्यातून पहिला व्हिडिओ, कशा परिस्थितीत आहेत अडकलेले मजूर?

फोटो स्रोत, PTI
- Author, आसिफ अली
- Role, उत्तरकाशीहून बीबीसी हिंदीसाठी
उत्तरकाशीच्या बोगद्यातील अपघातात मजुरांना वाचवण्याच्या मोहिमेला नऊ दिवस पूर्ण झाले आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेनं बोगद्याच्या आतील एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये मजूर टनलच्या आत उभे राहून बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे.
त्यामुळे आत अडकलेल्या लोकांची परिस्थिती अद्याप ठीक असल्याची आशा वाढली आहे.
इंडोस्कोपिक कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही दृश्यं घेण्यात आली आहेत. हा कॅमेरा सहा इंचाच्या फूड पाईपलाईनच्या माध्यमातून पाठवण्यात आला होता. मजुरांनी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे हेल्मेट परिधान केले असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पाईपलाइनमधून येणारं अन्न घेत ते एकमेकांशी चर्चा करत असल्याचंही यातून दिसत आहे. हे व्हिडिओ फुटेज अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं.
नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक अंशू मनीष खालखो यांनी बोगद्याच्या आत अडकलेल्या लोकांची खुशाली कळणं हे एक मोठं यश असल्याचं सांगितलं.
"आम्ही अडकलेल्या मजुरांपर्यंत 53 मीटरचा पाईप पाठवला आहे. हे पहिलं आणि मोठं यश आहे. पुढचं पाऊल अधिक महत्त्वाचं आहे," असं अंशू मनीष खालखो यांनी म्हटलं
प्रथमच गरम अन्न पाठवलं
एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार बोगद्यामध्ये मजुरांसाठी 53 मीटर लांब आणि सहा इंच व्यासाच्या पाईपाच्या माध्यमातून गरम खिचडी पाठवण्यात आली आहे.
बोगद्याच्या एका भागात वीज आणि पाणी उपलब्ध आहे. आधी चार इंचाच्या एका कॉम्प्रेसर पाईपच्या माध्यमातून मजुरांना ऑक्सिजन, खाद्यपदार्थ आणि औषधं पाठवली जात होती.
आता नव्या पाईपलाईनमधून आत अडकलेल्या लोकांसाठी खायला नेमकं काय पाठवलं जाईल यासाठी, मजुरांच्या स्थितीचा विचार करून डॉक्टरांच्या मदतीनं एक यादी तयार करण्यात आल्याचं खालखो यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
"आम्ही मोठ्या तोंडाच्या प्लास्टिकच्या गोल बाटल्या मागवत आहोत. त्यातून सफरचंद, खिडची, दलिया आत पाठवण्याचा प्रयत्न आहे," असंही ते म्हणाले.
खिचडी गोल बाटल्यांमध्ये भरून आत पाठवण्यात आली होती. खिचडी तयार करणारे आचारी हेमंत यांनी पहिल्यांदाच मजुरांसाठी आत गरम अन्न पाठवल्याचं सांगितलं. आम्हाला जो सल्ला दिला जात आहे, तेच आम्ही तयार करत आहोत, असं ते म्हणाले.
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) चे ड्रोन आणि रोबोटही याठिकाणी आणले आहेत. अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचा मार्ग शोधण्यासाठी त्यांची मदत घेतली जात आहे.
ढिगाऱ्यामध्ये टेकडीचा भाग आल्यामुळं काम थांबवावं लागलं होतं. त्यामुळं बचावपथकाला अद्याप समोरून रस्ता तयार करण्याचं काम सुरू करता आलेलं नाही.
मदतकार्य करणाऱ्या एजन्सीनं गेल्या नऊ दिवसांमध्ये एकापाठोपाठ वेगवेगळ्या योजना आखून प्रयत्न केला. पण अद्याप त्यांना यश मिळालेलं नाही.
अधिकारी आणि मंत्र्यांचं येणं-जाणंही सुरुच आहे. आदेश आणि सूचनांच्या गदारोळात ही मोहीम पूर्ण कधी होणार याचं उत्तर मात्र कुणाकडंही नाही.
बोगद्यात अडकलेल्यांना कधी वाचवलं जाणार? हा प्रश्न बोगद्याबाहेर बसलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यांवर स्पष्टपणे जाणवत आहे. काही अघटीत घडू नये हीच भीती सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे.
नातेवाईकांची ही भीती रास्तही आहे. त्याचं कारण म्हणजे, अद्याप या नातेवाईकांना काहीही ठोस असा दिलासा मिळालेला नाही. त्यात सोमवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना एनएचआयडीसीएलच्या संचालकांनी एक आश्चर्यकारक विधान केलं.
16 नोव्हेंबरच्या भूकंपाची भीती
एनएचआयईडीसीएलचे संचालक अंशू मनीष खालखो यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना एक महत्त्वाची माहिती दिली.
"16 नोव्हेंबरला भूकंपामुळं बोगद्यातून क्रॅक्सचा आवाज आला होता. त्याभीतीनं मजूर काम करायला तयार नव्हते त्यामुळं बचावकार्याचा वेग दोन दिवस अत्यंत कमी होता."
"आता बाहेर पडण्यासाठी बोगदा तयार केला जात आहे. त्यामुळं भूस्खलन किंवा दुसरी काहीही घटना तरी काम करणाऱ्यांना सुखरुप बाहेर काढता येईल," असंही ते म्हणाले.
त्यांनी मजुरांना बाहेर काढण्याच्या पर्यायाबाबत म्हटलं की, "मजुरांना वाचवण्यासाठी सर्व पर्यायांवर अत्यंत वेगानं काम सुरू आहे. बचावकार्याचा वेग वाढवण्यासाठी सर्व तज्ज्ञांच्या टीमन याठिकाणी बोलावण्यात आल्या आहे."
"आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञही उपस्थित आहेत. त्यांच्याकडून वेळोवेळी सल्ला घेतला जात आहे. टनलच्या आतला आढावा घेण्यासाठी ड्रोन मागवले आहेत. पण ड्रिलिंगमुळं यश मिळालं नाही. आता एंडोस्कोपी कॅमेरा मागवण्यात आला आहे," असं त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, ASIF ALI
मदतकार्यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासूनच काही ना काही अडचणी येत आहेत. त्यावरून एक बाब स्पष्ट आहे. ती म्हणजे बचावकार्य करणाऱ्या संस्थांना आतापर्यंत कोणत्याही एका योजनेवर ठोसपणे काम करता आलेलं नाही.
आता उभं ड्रिल करण्याची तयारी
बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी बोगद्याच्या वर एक शाफ्ट (गोल मार्ग) तयार करण्यासाठी मशीन आणल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याद्वारे 80 मीटरपर्यंत खोल खोदकाम करावं लागेल.
हे मशीन डोंगरावर पोहोचवण्यासाठीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. तर ओएनजीसी इतर उपकरणांची व्यवस्था करत आहे.

फोटो स्रोत, ASIF ALI
पण मोठ्या टेकड्या आणि उंच झाडं कापून तयाप करण्यात आलेल्या या उभ्या मार्गावरून या मशून शाफ्ट तयार करण्याच्या ठिकाणी पोहोचायला किती वेळ लागणार आहे.
त्याचवेळी बोगड्याच्या दुसऱ्या बाजुनंही ड्रिलिंग सुरू करण्यात आलं आहे.
एसजेव्हीएनएलच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं काय?
सतलज जलविद्युत प्रकल्पाचे महाव्यवस्थापक जसवंत कपूर यांच्याकडून बीबीसीनं माहिती घेतली.
"पीएमओच्या निर्देशांनंतर आम्हाला इथं पाठवण्यात आलं आहे. आम्ही आमची योजना सांगितली आहे. त्यानुसार 1.2 डायमीटरचे अंदाजे 90 मीटर उभे ड्रिल केले जाईल. त्यानंतर टनलमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवलं जाईल," असं त्यांनी म्हटलं.
"ते मशीन इथं आणण्यासाठी ज्या सुविधा हव्या आहेत, त्या आम्ही तयार करत आहोत. दुसरं ड्रील त्यापासून काही अंतरावर 24 इंचाचं असेल. ते मजुरांना खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी असेल. व्हर्टिकल ड्रिलिंगसाठी आता गुजरातच्या वलसाड आणि ओडिशाच्या हिराकोटहून मशीन मागवण्यात आल्या आहेत," अशी माहितीही त्यांनी दिली.

फोटो स्रोत, ASIF ALI
सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या बचाव मोहिमेत सहकार्य करण्यासाठी भारत सरकारच्या विनंतीवरून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्सदेखील उत्तरकाशीला घटनास्थळी पोहोचले आहेत.
सतलज जल विद्युत प्रकल्पाचे अधिकारी जसवंत कपूर म्हणाले की, "पीएमओच्या निर्देशांनंतर आम्हाला इथं पाठवण्यात आलं आहे. आम्ही आमची योजना सांगितली आहे. त्यानुसार 1.2 डायमीटरचे अंदाजे 90 मीटर उभे ड्रिल केले जाईल. त्यानंतर टनलमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवलं जाईल."
अर्नोल्ड डिक्स इंटरनॅशनल टनलिंग अँड अंडरग्राऊंड स्पेस असोसिएशन (आयटीए) चे अध्यक्ष आहेत.
जगभरात जमिनीखालील बोगद्यांची निर्मिती आणि धोक्यांचा सामना करण्याची क्षमता असलेले आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ प्रो. अर्नोल्ड डिक्स यांनी सिलक्यारा (उत्तरकाशी) इथं पोहोचून बोगद्याचं निरीक्षण केलं.
त्यानंतर त्यांनी बचावकार्यात सहभागी असलेल्यांशी चर्चा केली. अर्नोल्ड डिक्स यांनी याठिकाणी भूभागातील माती आणि दगडांचा अभ्यास केल्यानंतर एसजेव्हीएनएलच्या अधिकाऱ्यांच्या साथीनं दोन ठिकाणं निश्चित केली आहेत.
बोगद्यावरून ड्रिलिंग करणं योग्य ठरेल आणि त्याद्वारे मजुरांना लवकर सुरक्षितपणे बाहेर काढलं जाईल, असं अर्नोल्ड म्हणाले.
जियो फिजिक्स सर्वे टीमनं काय सांगितलं?
बोगद्याच्या वरच्या भागात जिओ फिजिकल सर्वेअंतर्गत रेझिस्टिव्हिटी सर्व्हे करण्यासाठी दिल्लीहून आलेले चेन्दूर यांनी बीबीसीला सांगितलं की, "आम्ही ड्रिलिंगपूर्वी याठिकाणी अभ्यास करण्यासाठी आलो आहोत. याठिकाणी कोणत्या दिशेनं अधिक करंट पास होतो हे आम्ही पाहणार आहोत."
"ज्या दिशेनं अधिक करंट पास होतो, त्या दिशेनं पाणी मिळण्याची शक्यता अधिक असते. ज्या दिशेनं पाणी असेल त्या बाजुला भूस्खलन होण्याची भीती असते."

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, सोमवारी (20 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी फोनवरून चर्चा करत बचावकार्याची माहिती घेतली. अडकलेल्या मजुरांचं मनोधैर्य टिकवणं गरजेचं असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं.
या बचाव मोहिमेसाठी केंद्र सरकार उपकरणं आणि इतर सुविधा उपलब्ध करून देत आहे.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








