महाराष्ट्रातील 'महानुभव पंथ'च्या अनुयायी महिलांनी भरूचच्या जुम्मा मशिदीत 'पूजा' केल्याचा वाद? नेमके प्रकरण काय?

भरूचच्या जुम्मा मशिदीजवळ काही महिलांनी पूजा केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, भरूचच्या जुम्मा मशिदीजवळ काही महिलांनी पूजा केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
    • Author, जय शुक्ला
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

दक्षिण गुजरातमधील भरूच येथील प्राचीन जुम्मा मशीद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही महिला इथे मशिदीजवळ धार्मिक विधी आणि 'पूजा' करत असल्याचा एक व्हीडिओ नुकताच व्हायरल झाला होता, त्यामुळं वाद निर्माण झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये काही महिला मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ फुले आणि श्रीफळ (नारळ) ठेवताना दिसत आहेत.

ही जुम्मा मशीद पूर्वी एक प्राचीन हिंदू किंवा जैन मंदिर होतं, असा दावा महाराष्ट्रातील 'महानुभव पंथा'चे अनुयायी करतात. परंतु, ही मशीद अनेक शतकांपासूनचे जुने प्रार्थनास्थळ स्थळ आहे, असं मुस्लीम पक्ष सांगतात.

भरूचची ही जुम्मा मशीद पुरातत्त्व विभागाच्या म्हणजेच आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (एएसआय) संरक्षणाखाली आहे.

स्थानिक लोक त्याला जामा मशीद असंही म्हणतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये काही महिला भरूचमधील जुम्मा मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ फुले आणि श्रीफळ (नारळ) अर्पण करताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, UGC/SAJID PATEL

फोटो कॅप्शन, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये काही महिला भरूचमधील जुम्मा मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ फुले आणि श्रीफळ (नारळ) अर्पण करताना दिसत आहेत.

या प्रकरणामुळे भरूच पोलीस सतर्क झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मशिदीभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

दुसरीकडे, ही मुस्लीम मशीद असून येथे अन्य कोणत्याही धर्माचे कृत्य करणे म्हणजे मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावण्यासारखं आहे. अशा घटनेमुळे भरुचमधील शांतता भंग पावू शकते, असा आरोप मुस्लिमांनी केला आहे.

या प्रकरणी जुम्मा मशिदीचे अध्यक्ष मौलाना कुरेशी गुलाम मुस्तफा यांनी भरूच शहरातील बी डिव्हिजनमध्ये अज्ञात लोकांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

जुम्मा मशिदीत घुसून पूजा करणाऱ्या अज्ञात लोकांविरुद्ध फौजदारी कारवाई करून एफआयआर नोंदवण्याची विनंती मशिदीच्या ट्रस्टींनी पोलिसांकडे केली आहे.

प्रकरण नेमकं काय?

भरूच येथील बी-डिव्हिजन पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या अर्जानुसार ही घटना 3 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता घडली.

अर्जात म्हटलं आहे की, "भरूच पोलीस आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भरूच आणि सूरतहून आलेल्या काही महिलांनी मशिदीमध्ये पूजा सुरू केली.

तेथे उपस्थित मशीद ट्रस्टींनी त्यांना शांतपणे सांगितलं की, ही मशीद आहे आणि पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे; तुम्ही ती पाहू शकता, पण त्यात पूजा करू शकत नाही."

अर्जात म्हटल्याप्रमाणे, तिथल्या लोकांनी ट्रस्टींचं ऐकलं नाही.

"हा पूर्वनियोजित कट होता आणि या लोकांनी भरूच शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला", असंही अर्जात म्हटलेलं आहे.

भरूच येथील जुम्मा मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवलेले पूजा साहित्य दिसतं.

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, भरूच येथील जुम्मा मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवलेले पूजा साहित्य दिसतं.

या लोकांनी भरूचचे जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभागाच्या सार्वजनिक आदेशांचेही उल्लंघन केल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.

"या लोकांनी कायदा हातात घेऊन मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेमागे कोणाचा हात आहे, याचा तपास करण्यात यावा आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे."

या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये जुम्मा मशिदीत नारळ, फुलांची पाने आणि दिवेही दिसत आहेत.

अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणीही मुस्लीम समाजाने केली आहे.

'पूजा' करणाऱ्या महिला कोण होत्या?

भरूचमधील जुम्मा मशिदीत प्रवेश करणाऱ्या महिला या महाराष्ट्रातील चक्रधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या महानुभव पंथाच्या अनुयायी आहेत.

जुम्मा मशीद एकेकाळी त्यांच्या महानुभव पंथाचे संस्थापक स्वामी चक्रधर यांचे जन्मस्थान होते, असा त्यांचा दावा आहे.

महाराष्ट्रातील महानुभव पंथाच्या महिला अनुयायी भरूचमधील मशिदीत बसलेल्या दिसतात.

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, महाराष्ट्रातील महानुभव पंथाच्या महिला अनुयायी भरूचमधील मशिदीत बसलेल्या दिसतात.

हा पंथ महाराष्ट्रात खूप सक्रिय आहे. छत्रपती संभाजीनगर येथील महानुभव देवस्थान ट्रस्टचे सचिव सुदर्शन नागराज बाबा कपाटे यांनी बीबीसी गुजरातीला दिलेल्या मुलाखतीत दावा केला आहे की, "याच ठिकाणी आमचे गुरुजी स्वामी चक्रधर यांचा जन्म झाला होता."

सुदर्शन नागराज बाबा कपाटे हे स्वामी चक्रधर जन्मभूमी आंदोलनही चालवतात.

त्यांचा दावा आहे की "ही मशीद नाही तर एक प्राचीन हिंदू वारसा स्थळ आहे. 3 मार्च रोजी मशिदीत प्रवेश करून पूजा करणारे लोक आमच्या पंथाच्या महिला साधक आहेत," असा त्यांचा दावा आहे.

"आम्ही गेल्या चार वर्षांपासून यासाठी आंदोलन करत आहोत. हे ठिकाण 12 व्या शतकातील आमचे प्रार्थनास्थळ आहे. ते प्रार्थनास्थळ पाडून ही मशीद येथे बांधण्यात आली आहे."

भरुच

फोटो स्रोत, SAJID PATEL

फोटो कॅप्शन, छत्रपती संभाजीनगर येथील महानुभव देवस्थान ट्रस्टचे सचिव सुदर्शन नागराज बाबा कपाटे (उजवीकडे) आणि मुक्तानंद स्वामी उर्फ ​​भावेश पटेल (मध्यभागी) जुम्मा मशीद हे जैन मंदिर किंवा हिंदू मंदिर असल्याचा दावा करत उपोषणाला बसलेले दिसत आहेत.

हे चक्रधर स्वामींचं जन्मस्थान असल्याचा तुमच्याकडे कोणता पुरावा आहे?, असं आम्ही त्यांना विचारलं.

उत्तरात ते म्हणाले, "स्वामी चक्रधरांच्या हस्तलिखित पुस्तकांमध्ये जसं की लीळाचरित्र, स्थानपोथी इत्यादींमध्ये याचा उल्लेख आहे. ही सर्व पुस्तकं पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर अभ्यासक्रमात शिकवली जातात."

तुम्ही असा दावा केल्यामुळं पुरातत्व विभागाच्या संरक्षित जागेवर हिंदू-मुस्लीम वाद उद्भवू शकतो आणि दोन्ही समुदायांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो?, असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला.

त्यावर त्यांचं उत्तर होतं की, "आम्हाला हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करायचा नाही. पण जर येथील पुरातत्व विभाग मुस्लिमांना नमाज अदा करण्याची परवानगी देत ​​असेल, तर त्यांनी हिंदूंनाही पूजा करण्याची परवानगी द्यावी."

"आमचा वाद मुसलमानांशी नाही, एएसआयशी आहे. त्यांनी आम्हाला येथे पूजा करण्याचा अधिकार द्यावा," असं सुदर्शन नागराज बाबा कपाटे म्हणतात.

पोलीस काय म्हणतात?

बीबीसी गुजरातीशी बोलताना भरूचचे डीवायएसपी सी.के. पटेल म्हणाले की, "लोकांनी मशिदीच्या आत घुसून पूजा केली हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. मशिदीमध्ये आधीपासून एक पोलीस ठाणे आहे."

"जेव्हा त्यांनी लोकांना श्रीफळ आणि फुले यांसारख्या वस्तू घेऊन जाताना पाहिलं तेव्हा त्यांनी त्वरीत कारवाई केली आणि या सर्व गोष्टी मशिदीच्या बाहेर ठेवल्या. तुम्ही व्हीडिओ पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, या सर्व गोष्टी मशिदीच्या बाहेर होत्या."

हा वाद का झाला?, असं आम्ही सी.के. पटेल यांना विचारलं.

ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील काही लोक हे ठिकाण त्यांच्या चक्रधर स्वामींचे जन्मस्थान असल्याचा दावा करतात. पण हे ठिकाण पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे."

"पर्यटक म्हणून, हिंदू-मुस्लीम, कोणीही इथे जाऊन ते पाहू शकतो. पण 3 तारखेला घडलेल्या घटनेत, आम्ही कोणालाही मशिदीत प्रार्थना करण्याची परवानगी दिली नाही."

यामुळे कुठला तणाव वाढला आहे का?, असं आम्ही त्यांना विचारलं.

भरुच

फोटो स्रोत, SAJID PATEL

सी.के. पटेल म्हणाले, "आम्हाला दिलेल्या अर्जाचा भाग म्हणून, आम्ही दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे आणि या प्रकरणाची चौकशी करत आहोत. कोणताही तणाव नाही, येथे पूर्वीही पोलीस तैनात होते आणि पुढेही राहतील."

या प्रकरणी आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे, असं भरूच बी-डिव्हिजनचे पोलीस निरीक्षक व्ही.एस. वंजारा यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं

वंजारा म्हणाले, "आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून भरूचमधील हातीखानाजवळ राहणारे दर्पण भूपेंद्रभाई चौहान आणि गौरांग प्रवीणचंद्र राणा यांना ताब्यात घेतले."

"त्यांना मामलतदार कार्यालयात हजर करण्यात आले, तिथून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली."

पुरातत्व विभागाचं काय म्हणणं आहे?

खबरदारीचा उपाय म्हणून, पुरातत्व विभागाला ही बाब कळताच, त्यांनी भरूच जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आवश्यक ती कारवाई करण्यासाठी लेखी कळवलं आहे.

"आम्ही आवश्यक ती सर्व पावलं उचलत आहोत. या वादाबद्दल मला काही बोलायचं नाही," असं वडोदरा येथील पुरातत्व विभागाचे अधिकारी रिज्जू घोष यांनी बीबीसी गुजरातीला सांगितले.

भरुच

फोटो स्रोत, SAJID PATEL

आम्ही त्यांना विचारलं की, काही लोक असा दावा करतात की ही जुम्मा मशीद हिंदू स्थळ आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं, "स्मारक आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, 1958 अंतर्गत आल्यापासून ते मशिदीच्या स्वरूपात आहे. त्यापूर्वीचं मी काहीही सांगू शकत नाही."

भरूचमधील जुम्मा मशिदीत काम करणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे (एएसआय) मल्टीटास्किंग कर्मचारी राहुल परमार यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, "आम्ही लोकांना मशिदीत पूजा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्या सर्व महिला होत्या, त्यामुळे आम्ही थांबवू शकलो नाही."

"महाराष्ट्रातील महानुभव पंथाचे अनुयायी असा दावा करतात की, हे ठिकाण त्यांचे गुरू चक्रधर स्वामी यांचे जन्मस्थान आहे. परंतु हे ठिकाण सध्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे."

स्थानिक मुस्लीम काय म्हणतात?

भरूचच्या जुम्मा मशिदीचे अध्यक्ष मौलाना कुरेशी गुलाम मुस्तफा यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, "भरूचमध्ये सध्या शांतता आहे. हिंदू आणि मुस्लीम बंधुभावाने राहतात. परंतु काही लोकांनी कट रचून जातीय सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे."

"आम्ही पोलीस, पुरातत्व विभाग आणि प्रशासनाला त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती करतो."

मुस्लीम नेते अब्दुल कामठी बीबीसी गुजरातीला सांगितलं, "यापूर्वी, हे लोक भरूचमधील जुम्मा मशीद पाहण्यासाठी आले होते. त्यात दोन स्थानिक पुरुष आणि काही महिलांचा एक गट होता."

भरुच

फोटो स्रोत, SAJID PATEL

"या लोकांनी अगरबत्ती, नारळ इत्यादींनी पूजा करायला सुरुवात केली. हे समाजकंटक या मशिदीला लक्ष्य करण्याचा आणि ती वादग्रस्त बनवण्याचा कट रचत आहेत."

मुस्लीम नेते इम्रान पटेल म्हणाले की, "असा प्रयत्न यापूर्वीही झाला आहे. येथील मशिदीवर हिंदू स्थळ म्हणून दावा करण्याचे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत."

"यात अजमेर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी भावेश पटेलही सहभागी आहे. तो आता स्वामी मुक्तानंद म्हणून फिरत आहे. न्यायालयाने त्याला दोषी घोषित केलं होतं."

"पण जयपूर उच्च न्यायालयाने आता त्याच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. तो या कटात सहभागी आहे."

हिंदू संघटनांचं म्हणणं काय?

आम्ही या प्रकरणातील संशयित आरोपी भावेश पटेल उर्फ ​​स्वामी मुक्तानंद यांच्याशी बोललो.

हे आरोप फेटाळत ते म्हणाले की, "मशिदीत पूजा करण्यासाठी मी कोणाला तरी पाठवले हे आरोप खोटे आहेत."

"मला संपूर्ण वाद माहीत नाही. जर हे हिंदूं ठिकाण असेल तर हिंदू जाऊन पाहू शकतात, आणि जर मुसलमानांचे ठिकाण असेल तर मुस्लीम जाऊ शकतात, मला काहीही फरक पडत नाही."

"ते महानुभाव पंथाशी जोडलेले आहेत का?" या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले, "माझा त्यांच्याशी काही संबंध नाही आणि मशिदीमध्ये पूजा सुरू करण्याची माझी कोणतीही योजना नाही."

परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, भावेश पटेल उर्फ ​​स्वामी मुक्तानंद हे याआधीही या चळवळीत सहभागी होते, त्यांनी ही मशीद हिंदूंचे स्थान असल्याचा दावा केला होता.

स्वामी मुक्तानंद उर्फ भावेश पटेल (फाइल फोटो)
फोटो कॅप्शन, स्वामी मुक्तानंद उर्फ भावेश पटेल (फाइल फोटो)

काही आठवड्यांपूर्वी, अखिल भारतीय संत समितीचे पदाधिकारी अविचलदासजी आणि स्वामी मुक्तानंद यांनी या मशिदीला भेट दिली होती. ते हिंदू धार्मिक स्थळ असल्याचा त्यांनी दावा केला तेव्हाही वाद निर्माण झाला होता. काही साधुसंतांनी या मुद्द्यावर उपोषणही केले होते.

हे 'समली विहार जैन मंदिर' आहे, असाही त्यांनी दावा केला होता.

या वादाबद्दल बोलताना सुदर्शन नागराज बाबा कपाटे बीबीसी गुजरातीला म्हणाले की, "चक्रधर स्वामी हे भरूचच्या राजघराण्यातील विशालदेव यांचे पुत्र होते. त्यांचे मूळ नाव हरिपालदेव होते."

"जेव्हा त्याचा मृत्यू झाला, तेव्हा द्वारकेचे महान संत चांगदेव राऊळ यांचा आत्मा त्यांच्या शरीरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात महानुभाव पंथाची स्थापना केली. हे त्या स्वामी चक्रधरांचे जन्मस्थान आहे."

मुक्तानंद स्वामी उर्फ ​​भावेश पटेल

फोटो स्रोत, SAJID PATEL

फोटो कॅप्शन, यापूर्वीही मुक्तानंद स्वामी उर्फ ​​भावेश पटेल यांनी या जुम्मा मशिदीला जैन मंदिर म्हणून घोषित करण्यासाठी आंदोलन केले होते.

ते म्हणतात की, हरिपालदेव यांचा जन्म जैन परंपरेचचं पालन करणाऱ्या कुटुंबात झाला, त्यामुळे हे ठिकाण 'समली विहार जैन मंदिर' म्हणूनही ओळखले जाते.

परंतु, त्याच्या या कथेला पुरातत्वशास्त्रीय आधार नाही. भरुच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जुम्मा मशीद 14व्या शतकात बांधण्यात आल्याचे सांगितले जाते.

वेबसाइटवर लिहिल्याप्रमाणे, "मशिदीचा एक उल्लेखनीय पैलू म्हणजे ती जैन मंदिराच्या अवशेषांपासून बांधली गेली आहे. बांधकाम शैलीचा विचार केला तर, ही मशीद पारंपारिक मशिदीसारखीच आहे."

विश्व हिंदू परिषदेने या संपूर्ण वादावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

बीबीसी गुजरातीने भरूच येथील विश्व हिंदू परिषदेचे नेते अजय व्यास यांना या प्रकरणाबद्दल विचारले असता ते म्हणाले, "मी संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करेन आणि नंतरच यावर बोलेन."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.