अमेरिका आणि इराण : कुणाची ताकद किती? युद्ध लांबल्यास कोणाला जास्त नुकसान होईल?

27 फेब्रुवारी 2026 रोजी अरबी समुद्रात तैनात केलेल्या निमित्झ-क्लास विमानवाहू जहाज यूएसएस अब्राहम लिंकन (सीव्हीएन 72) चा फ्लाइट डेक.

फोटो स्रोत, U.S. Central Command via Getty Images

    • Author, जोनाथन बील
    • Role, संरक्षण प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आहे की, त्यांच्या देशाकडे महत्त्वाच्या शस्त्रास्त्रांचा 'अमर्याद पुरवठा' आहे. तर इराणच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे शत्रूचा दीर्घकाळ सामना करण्याची पूर्ण क्षमता आहे.

परंतु केवळ शस्त्रास्त्रांचा साठा आणि त्यांचा पुरवठा याच गोष्टी युद्धाचा निकाल ठरवत नाहीत.

युक्रेनचं उदाहरण आपल्यासमोर आहे. रशियाच्या तुलनेत कमी सैन्य आणि कमी शस्त्रं असूनही युक्रेन आजही झुंज देतोय. मात्र, कोणत्याही युद्धात शस्त्रांचा पुरवठा वेळेवर होणं खूप महत्त्वाचं असतं.

इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील या लढाईत सुरुवातीपासूनच लष्करी कारवायांचा वेग वाढलेला आहे. चिंतेची बाब अशी की, ज्या वेगाने शस्त्रं वापरली जात आहेत, त्या वेगाने त्यांचं उत्पादन होत नाहीये.

तेल अविव येथील 'इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडीज'च्या (INSS) अंदाजानुसार, अमेरिका आणि इस्रायलने आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त हल्ले केले आहेत. यात अनेक अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे.

आयएनएसएस (INSS) या संस्थेच्या आकडेवारीनुसार, इराणने आतापर्यंत 571 क्षेपणास्त्रे आणि 1391 ड्रोन डागले आहेत. यापैकी बरेचसे ड्रोन आणि क्षेपणास्त्रं हवेतच नष्ट करण्यात आली आहेत.

मात्र दोन्ही बाजूंनी ज्या तीव्रतेने हल्ले सुरू आहेत ती पाहता ही लढाई अशीच दीर्घकाळ सुरू ठेवणे दोन्ही देशांसाठी कठीण होत जाणार आहे.

इराणची क्षेपणास्त्र ताकद

पाश्चात्य देशांच्या अधिकाऱ्यांचे असे निरीक्षण आहे की, इराणकडून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या संख्येत आता घट होऊ लागली आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी इराणने शेकडो क्षेपणास्त्रं डागली होती. मात्र, आता हा आकडा डझनांवर आला आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

युद्धापूर्वी असा अंदाज होता की, इराणकडे 2000 पेक्षा जास्त 'कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा' साठा होता. कोणतेही सैन्य त्यांच्याकडे किती शस्त्रं उपलब्ध आहेत याची अचूक आकडेवारी जाहीर करत नाही, कारण शत्रूला अंधारात ठेवण्यासाठी असे आकडे गुप्त ठेवले जातात.

अमेरिकेचे सर्वोच्च कमांडर जनरल डॅन केन यांनी बुधवारी (4 मार्च) सांगितले की, शनिवारी (28 फेब्रुवारी) युद्धाच्या पहिल्या दिवसाच्या तुलनेत इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणात 86 टक्के घट झाली आहे. यूएस सेंट्रल कमांडनुसार, गेल्या 24 तासांतच यात 23 टक्के घट झाली आहे.

युद्ध सुरू होण्यापूर्वी असा अंदाज होता की, इराणने हजारो 'शाहेद' (Shahed) नावाचे 'वन-वे अटॅक' म्हणजेच आत्मघाती ड्रोन तयार केले आहेत. हे ड्रोन एकदा लक्ष्याकडे झेपावले की तिथे जाऊन स्वतःचा स्फोट घडवून आणतात.

इराणने हे ड्रोन तंत्रज्ञान रशियालाही दिले आहे ज्याचा वापर रशिया सध्या युक्रेन विरुद्धच्या युद्धात करत आहे. विशेष म्हणजे या ड्रोनच्या प्रभावी डिझाइनची दखल घेत अमेरिकेनेही त्याच्यासारखेच ड्रोन तयार केले आहेत

इराणचा शाहेद-136 ड्रोन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'शाहेद-136' रडारला चकवा देणारा इराणचा हा खतरनाक ड्रोन 2,500 किलोमीटर दूरवरच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकतो

जनरल केन यांच्या माहितीनुसार, युद्धाच्या पहिल्या दिवसाच्या तुलनेत इराणच्या ड्रोन हल्ल्यांमध्ये आता 73 टक्क्यांनी घट झाली आहे.

असे दिसते की, इराणला ज्या वेगाने त्याने सुरुवात केली होती त्याच वेगाने हल्ले सुरू ठेवणे आता कठीण जात आहे. मात्र, याचे दुसरे कारण असेही असू शकते की, इराण आपले शस्त्रास्त्रे वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक हल्ले कमी करत आहे. कारण एकदा साठा संपला की, पुन्हा तितक्याच वेगाने उत्पादन करणे त्यांच्यासाठी खूप कठीण ठरणार आहे.

अमेरिका आणि इस्रायलच्या लढाऊ विमानांनी आता इराणच्या आकाशात आपली पकड मजबूत केली आहे. इराणची बहुतांश 'एअर डिफेन्स सिस्टीम' (हवाई संरक्षण यंत्रणा) आता उद्ध्वस्त झाली असून त्यांची वायू सेनाही आता फारशी मजबूत राहिलेली नाही.

सेंटकॉमचे म्हणणे आहे की, युद्धाचा पुढचा टप्पा इराणचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन लाँचर्स, त्यांचा शस्त्रास्त्रांचा साठा शोधून काढण्यावर आणि त्यांचे उत्पादन करणारे कारखाने नष्ट करण्यावर केंद्रित आहे.

इराणची लढण्याची क्षमता कमी करणे आता अमेरिका आणि इस्रायलसाठी सोपे होऊ शकते. परंतु त्यांचे सर्व शस्त्रास्त्र साठे नष्ट करणे कठीण असेल.

इराणचा भौगोलिक विस्तार फ्रान्सच्या तुलनेत जवळपास तीनपटीने मोठा आहे. इतक्या मोठ्या देशात शस्त्रास्त्रे आकाशातून न दिसतील अशा ठिकाणी जमिनीखाली किंवा डोंगरांमध्ये सहज लपवून ठेवली जाऊ शकतात.

गेल्या काही वर्षांमधील घडामोडींमधून हवाई युद्धाच्या मर्यादा देखील समोर आल्या आहेत. 3 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या बॉम्बवर्षावानंतरही इस्रायलचे सैन्य गाझामध्ये हमासचा पूर्ण बिमोड करू शकलेले नाही.

येमेनमधील हुथी बंडखोर अमेरिकेच्या वर्षभर चाललेल्या बॉम्बफेकीतून वाचले आणि त्यांची काही शस्त्रं देखील वाचली.

अमेरिकन शस्त्रसाठा

अमेरिकेचे सैन्य हे अजूनही जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे यात शंका नाही. पारंपरिक शस्त्रास्त्रांचा विचार केला, तर त्यांचा साठा जगातील कोणत्याही देशापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.

परंतु अमेरिकन सैन्य अजूनही मोठ्या प्रमाणावर महागड्या 'प्रिसिजन-गायडेड' म्हणजे अचूक मारा करणाऱ्या शस्त्रांवर अवलंबून आहे ज्यांचे उत्पादन मर्यादित प्रमाणात होते.

ट्रम्प यांनी या आठवड्याच्या उत्तरार्धात संरक्षण कंत्राटदारांची बैठक बोलावून त्यांना उत्पादन वेगवान करण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे. यातून हाही संकेत मिळतो की, अमेरिकेच्या संसाधनांवरही ताण येऊ शकतो.

आता अमेरिकेला जवळून हल्ले करण्याची संधी मिळाल्याने काहीसा दबाव कमी झाला असावा.

28 फेब्रुवारी 2026 रोजी समुद्रात सुरू असलेल्या 'ऑपरेशन एपिक फ्युरी' साठी 'निमिट्झ-श्रेणी'च्या यूएसएस अब्राहम लिंकन (CVN 72) या विमानवाहू युद्धनौकेवर अमेरिकन सैनिक शस्त्रास्त्रे चढवताना

फोटो स्रोत, U.S. Navy via Getty Images

फोटो कॅप्शन, 28 फेब्रुवारी 2026 रोजी समुद्रात सुरू असलेल्या 'ऑपरेशन एपिक फ्युरी' साठी 'निमिट्झ-श्रेणी'च्या यूएसएस अब्राहम लिंकन (CVN 72) या विमानवाहू युद्धनौकेवर अमेरिकन सैनिक शस्त्रास्त्रे चढवताना

जनरल केन यांनी माहिती दिली की, अमेरिका आता 'टॉमहॉक' सारख्या अत्यंत महागड्या आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर कमी करत आहे.

त्याऐवजी अमेरिकन वायुसेना आता 'जेडॅम'सारख्या कमी खर्चाच्या बॉम्बचा वापर करत आहे. हे बॉम्ब थेट शत्रूच्या लक्ष्यावर अचूकपणे डागता येतात.

वॉशिंग्टनस्थित 'सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज'मधील (CSIS) अमेरिकन मरीनचे माजी कर्नल मार्क कॅन्सियन म्हणतात की, सुरुवातीच्या मोठ्या आणि लांब पल्ल्याच्या हल्ल्यांनंतर आता अमेरिका कमी खर्चाच्या क्षेपणास्त्रांचा आणि बॉम्बचा वापर करू शकते.

ते म्हणतात की, अमेरिका या स्तरावरील लढाई जवळपास अनिश्चित काळासाठी" चालू ठेवू शकते. एकदा शत्रूचे महत्त्वाचे तळ उद्ध्वस्त झाले की, हल्ला करण्यासाठी फारसे काही उरत नाही. म्हणजेच लष्करी कारवायांचा वेगही हळूहळू मंदावतो.

हवाई संरक्षण

मार्क कॅन्सियन म्हणतात की, अमेरिकेकडे हजारो JDAM बॉम्ब आहेत, परंतु महागड्या हवाई संरक्षण यंत्रणांचा पुरवठा कमी आहे. संघर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात इराणच्या प्रतिहल्ल्यांचा धोका हाणून पाडण्यासाठी या यंत्रणा अत्यावश्यक ठरल्या आहेत.

पॅट्रिएट क्षेपणास्त्रांना मोठी मागणी आहे. केवळ अमेरिकेकडूनच नाही, तर त्यांचे अरब मित्र देश आणि युक्रेनकडूनही. प्रत्येक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची किंमत 40 लाख डॉलरपेक्षा जास्त आहे आणि अमेरिका सध्या वर्षाला सुमारे 700 क्षेपणास्त्रांचे उत्पादन करते, असे मानले जाते. जर इराण अजूनही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यास सक्षम असेल, तर त्यामुळे या मर्यादित साठ्यावर परिणाम होईल.

अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध

फोटो स्रोत, Fatemeh Bahrami/Anadolu via Getty Images

फोटो कॅप्शन, तेहरानमधील बहारिस्तान स्क्वेअर येथे 27 सप्टेंबर 2025 मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे.(फाईल फोटो)

CSIS तज्ज्ञ कॅन्सियन यांच्या अंदाजानुसार, अमेरिकेकडे सुमारे 1600 पॅट्रिएट क्षेपणास्त्रांचा साठा असू शकतो जो गेल्या काही दिवसांत कमी झाला असेल.

ते म्हणतात की, अमेरिका हवाई हल्ले तर बराच काळ सुरू ठेवू शकते, पण शत्रूचे हल्ले हवेतच रोखण्याची 'एअर डिफेन्स'ची लढाई मात्र काहीशी अनिश्चित आहे. कारण क्षेपणास्त्रे संपली, तर स्वसंरक्षण करणे कठीण होऊ शकते.

कर्नल मार्क कॅन्सिअन यांच्या मते, "जर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या 'पॅट्रियट' क्षेपणास्त्रांचा साठा खर्च करण्याची तयारी दर्शवली, तर आपण इराणविरुद्धच्या युद्धात बराच काळ तग धरू शकतो. मात्र, यामुळे प्रशांत महासागर क्षेत्रात भविष्यात होणाऱ्या संभाव्य संघर्षासाठी मोठा धोका निर्माण होईल."

ट्रम्प या आठवड्यात अमेरिकन संरक्षण कंपन्यांना भेटणार आहेत, हे शस्त्रास्त्रांच्या साठ्याबाबत काही प्रमाणात चिंता असल्याचे लक्षण आहे. असे असले तरी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी ठामपणे सांगितले आहे, "इराण शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आपल्याला मागे टाकू शकत नाही." या बाबतीत त्यांचे म्हणणे कदाचित योग्यच असावे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन)