इराणच्या 'धोकादायक' हल्ल्यांमुळे आखाती देश युद्धात ओढले जाऊ शकतात का?

फोटो स्रोत, Reuters
- Author, बार्बरा प्लेट-अशर
- Role, बीबीसी प्रतिनिधी, दोहा, कतार
- वाचन वेळ: 3 मिनिटे
इराणच्या हल्ल्यांमुळे आखाती प्रदेशात तणाव वाढला आहे. आखाती देश आता एकजूट दाखवत आहेत आणि आपल्या नागरिकांवर, भूमीवर आणि संसाधनांवर होणाऱ्या हल्ल्यांना उत्तर देण्याची तयारी करत आहेत.
इच्छा नसतानाही हे देश आता युद्धाच्या अग्रभागी आले आहेत.
इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून शेकडो क्षेपणास्त्रं आणि ड्रोन आपल्या अरब शेजाऱ्यांवर डागले. त्यांनी त्या देशातील अमेरिकन सैन्य तळांसोबतच नागरी आणि ऊर्जा केंद्रांनाही लक्ष्य केलं.
सुरक्षित प्रवास, पर्यटन आणि महत्त्वाचे आर्थिक केंद्र अशी आखाती देशांची प्रतिमा आहे. त्या प्रतिमेलाच इराणकडून लक्ष्य केलं जात आहे. त्याचबरोबर त्या देशातील तेल आणि गॅस उद्योगातही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे.
हे युद्ध अरब राष्ट्रांना नको होतं आणि त्यांनी याला रोखण्याचा प्रयत्नही केला. परंतु, प्रश्न असा आहे की, इराणच्या 'धोकादायक' हल्ल्यांमुळे ते या युद्धात ओढले जातील का?
"सर्व मर्यादा आधीच ओलांडल्या गेल्या आहेत," असं कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल अन्सारी यांनी मंगळवारी (3 मार्च) पत्रकार परिषदेत म्हटलं.
"आमच्या सार्वभौमत्वावर सातत्याने हल्ले होत आहेत," असं त्यांनी पत्रकारांना सांगितले.
इराणचा दबाव आणण्याचा प्रयत्न?
"आमच्या पायाभूत सुविधा आणि निवासी भागांवर हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांचे परिणाम स्पष्ट आहेत. प्रत्युत्तर देण्याबाबत सर्व निर्णय आमच्या नेतृत्वाकडे आहेत. पण हे स्पष्ट करणं आवश्यक आहे की, या हल्ल्यांना नक्कीच प्रत्युत्तर दिलं जाईल."
बहुतांश इराणची क्षेपणास्त्रं परिसरात इंटरसेप्ट (हवेतच पाडली जाणं) केली जात आहेत, पण त्याच्या पडलेल्या तुकड्यांमुळे, ढिगाऱ्यांमुळे आग लागली आणि लोकांचा मृत्यू झाला. ड्रोन हवाई संरक्षण भेदून सहजतेने प्रवेश करू शकतात, ते सहसा कमी नुकसान करतात, पण तरीही त्याचा व्यापार आणि प्रवासावर परिणाम होतोच.
आपल्या अरब शेजाऱ्यांवर दबाव वाढवल्यास ते अमेरिकेला युद्ध थांबवायला भाग पाडतील, अशी इराणची रणनीती असू शकते.

फोटो स्रोत, Getty Images
फायनान्शिअल टाइम्सनुसार, इराणने ज्या प्रमाणात इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले आणि ड्रोन हल्ले केले. तितकेच हल्ले त्यांनी संयुक्त अरब अमिरातीवर (यूएई) केले आहेत. यूएई हा आखाती प्रदेशातील प्रमुख व्यापार आणि पर्यटन केंद्र असलेला देश आहे.
इराण या प्रदेशातील महत्त्वाच्या तेल आणि वायू उद्योगाला शस्त्र बनवू शकतो. ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो.
याचा अर्थ इराणची योजना उलटू शकते. इराणमुळे आखाती देश अमेरिकेजवळ येऊ शकतात, अगदी काही भागात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात युद्धात सहभागीही होऊ शकतात.
आखाती देश मोठा निर्णय घेऊ शकतात
आतापर्यंत या देशांनी अमेरिकेला त्यांच्या आकाशाचा (हवाई क्षेत्राचा) आणि जमिनीचा वापर करून इराणवर हल्ले करण्याची परवानगी दिलेली नाही.
हे बदलू शकतं. कधी ना कधी, ते लष्करी कारवायांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेऊ शकतात.
ते अद्याप युद्धात सहभागी झालेले नाहीत - सध्या अरब देश संरक्षणावर लक्ष केंद्रित करत आहेत. पण हे युद्ध किती काळ चालेल यावर बरंच काही अवलंबून आहे.
काही लोकांना युद्धात ते इस्रायलच्या बाजून आहेत, हे दाखवायला आवडणार नाही.
इस्रायलने ऑक्टोबर 2023 मध्ये हमासच्या हल्ल्यांना उत्तर देताना गाझावर घातक आणि विनाशकारी हल्ले केले होते. लेबनॉन, सिरियासारख्या देशांमध्येही लष्करी कारवाई केली. त्यामुळे अरब देशांशी त्यांचं नातं ताणलेलं आहे. गेल्या वर्षी हमासच्या नेतृत्त्वाची हत्या करण्याच्या प्रयत्नात इस्रायलने कतारवर बॉम्बहल्ला केला होता, त्यावेळी त्यांनी संतापही व्यक्त केला होता.
मात्र हे स्पष्ट आहे की, इराणच्या हल्ल्यांमुळे आखाती देशांमधील एकता मजबूत झाली आहे.
'... तर सर्व पर्याय खुले'
गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलच्या सहा सदस्यांनी - सौदी अरेबिया, कुवेत, कतार, बहरीन, संयुक्त अरब अमिरात आणि ओमान यांनी 1 मार्च रोजी झालेल्या तातडीच्या बैठकीत एकजूट दाखवली.
या सर्वांनी प्रतिज्ञा केली की, "ते आपल्या सुरक्षा आणि स्थिरतेसाठी, तसेच आपला प्रदेश, नागरिक आणि रहिवाशांचे संरक्षण करण्यासाठी, आवश्यक ती सर्व पावलं उचलतील, ज्यात आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याच्या पर्यायाचाही समावेश आहे."

फोटो स्रोत, U.S. Navy via Getty Images
यूएईच्या अध्यक्षांचे वरिष्ठ राजनैतिक सल्लागार अन्वर गर्गाश यांनी इराणला समजूतदारपणा दाखवण्याचं आवाहन केलं आहे.
आपल्या एक्सवरील पोस्टवर त्यांनी म्हटलं की, "तुमचं युद्ध तुमच्या शेजाऱ्यांशी नाही, आपल्या सभोवतालच्या परिसराला पाहा, या आणि शेजाऱ्यांशी जबाबदारीने वागा, नाहीतर एकाकीपणाचा आणि दहशतीचा परीघ मोठा होऊ शकतो."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











