संजू सॅमसन : देशाला गरज असेल तर 9 व्या क्रमांकावरही फलंदाजी करेल म्हणाऱ्या 'चेट्टा'ची गोष्ट

संजू सॅमसन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नितीन सुलताने
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

अपेक्षांचं प्रचंड ओझं असलेल्या खांद्यावरचं डोकं जर शांत असेल, तर कितीही वर्षं वाट पाहावी लागली तरी त्या एका संधीचं सोनं करण्याची क्षमता निर्माण झाल्याशिवाय राहत नाही, हे संजू सॅमसन या केरळच्या फलंदाजानं दाखवून दिलं.

टी-20 विश्वचषकात भारतासाठी गेल्या 2 निर्णायक सामन्यांमध्ये सलग दोनदा तडाखेबाज खेळी करत संजूनं त्याच्या याच क्षमतेकडं लक्ष वेधलं.

त्यामुळं भारतीय टी-20 संघात स्थान पक्कं करण्यासाठी त्याच्या 15 वर्षांपासून चाललेल्या संघर्षाला या 2 खेळींमुळं चांगलंच बळ मिळालं असणार.

संजू सॅमसनमध्ये असलेली फटकेबाजी करण्याची क्षमता आयपीएल स्पर्धांमधून सर्वांनीच पाहिली आहे. ते हेरूनच राहुल द्रविड यांनी त्याला संधी दिली होती.

पण तरीही 19 व्या वर्षी देशासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करणाऱ्या संजूला तिशी उलटून गेल्यानंतरही संघर्ष करावा लागत आहे.

पण क्रिकेटमधला फॉर्मचा चढउतार आणि भारतीय क्रिकेटमध्ये असलेलं कौशल्य पाहता वाढलेली स्पर्धा ही आव्हानं संजूसमोर होती.

त्या सगळ्यांवर मात करत पुन्हा पुन्हा त्यांनं फिनिक्स पक्षानं राखेतून पुन्हा भरारी घ्यावी तशी भरारी घेतली. त्याच्या या यशाचा भारतीय संघात टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचण्यात मोठा फायदा झाला. अखेरच्या 2 सामन्यात तो सामनावीर ठरला.

संजू सॅमसन

फोटो स्रोत, Alex Davidson-ICC/ICC via Getty Images

संजूचा संघात समावेश पण सामना न खेळणं, संघातून वगळणं, निवड यावरून काही वादही झाले. हे सगळंच सुरू असताना संजून मात्र 'एकलव्या'प्रमाणं त्याचे प्रयत्न सुरू ठेवले.

त्याची संपूर्ण कारकीर्द, क्रिकेटसाठीचा संघर्ष आणि करिअरमधील चढउतार नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या याच प्रवासाबाबत जाणून घेऊयात.

19 व्या वर्षी भारतीय संघात

नव्वदच्या दशकात जन्मलेल्या केरळच्या संजूचं बालपण मात्र दिल्लीतल्या गल्ल्यांमध्ये क्रिकेट खेळत खेळत गेलं.

वडील दिल्ली पोलिसांत होते. तेही क्रीडापटू, पण फुटबॉल खेळायचे. संजूला मात्र लहानपणापासून बॅटने फटकेबाजी करायला आवडत होतं. त्यामुळं वयाच्या 5-6 वर्षांचा असतानाच त्यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

पण त्यामागची प्रेरणा त्याला भारताच्याच दिग्गजामुळं मिळाली.

लहानपणी एकदा संजू दिल्ली पोलिसांच्या क्वार्टरध्ये बसून टीव्हीवर एक क्रिकेट सामना पाहत होता. शारजाहमध्ये तो सामना सुरू होता अन् मैदानावर सचिन... सचिनचा एकच घोष सुरू होता.

संजून ते ऐकलं आणि एक दिवस मैदानात आपल्या नावाच्याही चाहत्यांनी अशाच घोषणा द्याव्यात, अशी इच्छा संजूला झाली. तीच प्रेरणा ठरली आणि संजूचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला.

संजू सॅमसन

फोटो स्रोत, ANI

संजू क्रिकेट खेळू लागला. पण दिल्लीसारख्या शहरात क्रिकेटमध्ये प्रचंड स्पर्धा होती. त्यामुळं संजूच्या वडिलांनी केरळला जाऊन संजूच्या खेळावर लक्ष द्यायचा निर्णय घेतला. कारण केरळमध्ये त्यांचं घर होतं.

अगदी तातडीनं त्यांनी त्यावर अंमलबजावणीही केली. नोकरी सोडून संजूच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट करिअरचा मार्ग निवडला.

केरळमध्ये संजूनं त्याच्या आवडीच्या या खेळात चांगलंच यश मिळवायला सुरुवात केली. प्रादेशिक क्रिकेटमध्ये त्याचं नाव होऊ लागलं. त्याची बॅटही तळपायला लागली. त्यामुळं कमी वयात त्यानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

संजू सॅमसन

फोटो स्रोत, ANI

क्रिकेटमधील लोकप्रियतेच्या जोरावर तो केरळमध्ये 'चेट्टा' म्हणून ओळखला जाऊ लागला. चेट्टा हे मोठ्या भावासाठी किंवा एखाद्याबद्दल आदर दर्शवण्यासाठी वापरलं जातं.

त्यामुळंच वयाच्या 19 व्या वर्षी भारतीय संघात त्याची निवड झाली आणि 20 व्या वर्षी संजूला पहिला सामना खेळण्याची संधीही मिळाली होती.

पण त्याआधी प्रादेशिक क्रिकेटमध्ये संजूनं या यशाचा पाया रोवला होता.

20 व्या वर्षी केरळचा कर्णधार

मुलाच्या करिअरसाठी दिल्लीहून केरळला शिफ्ट झाल्यानंतर संजूच्या वडिलांनी पूर्णपणे त्याच्यासाठीच वेळ दिला.

त्याच्या प्रशिक्षणाबरोबरच सामन्यांसाठी त्याला नेणं-आणणं आणि त्याच्या प्रगतीवर सातत्यानं लक्ष ठेवणं सुरू होतं.

दरम्यान संजूनंही देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचा डंका वाजवायला सुरुवात केली. ज्युनियर पातळीवर त्याच्या फलंदाजीचं तंत्र, फटके खेळण्याची अफाट क्षमता आणि भन्नाट टायमिंग या जोरावर त्याच्या नावाचा बोलबाला झाला.

संजूनं 2011-12 मध्ये केरळकडून रणजी संघात खेळत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून पदार्पण केलं.

संजू सॅमसन

फोटो स्रोत, Punit PARANJPE / AFP via Getty Images

संजूनं 2013-14 मध्ये रणजी हंगामाच्या पहिल्याच सामन्यात द्विशतकासह हंगामात एकूण 530 धावा केल्या. तर त्याच्या पुढच्या हंगामात 475 धावा करत त्याच्या क्लासचं दर्शन घडवलं.

2015-16 च्या रणजी हंगामात वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी संजू सॅमसनची केरळच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. केरळच्या संघाचं नेतृत्व करताना क्रिकेटमध्ये बरंच काही शिकण्याची संधी मिळाल्याचं संजू सांगतो.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये विजय हजारे चषकातही संजू सॅमसनची बॅट तळपली. 2019 मध्ये तर त्यानं गोव्याच्या विरोधात खेळताना 212 धावांची नाबाद खेळी केली होती.

देशात आयपीएलची धूम सुरू असताना केरळचा हा चेट्टा पारखी क्रिकेट दिग्गजांच्या नजरेतून कसा सुटणार. भारतीय क्रिकेटची भिंत राहिलेल्या राहुल द्रविड यांची नजर त्याच्यावर पडली आणि तो आयपीएलच्या झगमगाटात चमकायला लागला.

असा बनला आयपीएलमधलं मोठं नाव

रणजी चषकातील सामन्यांत संजू सॅमसनची बॅट तळपत होती. त्यामुळं आयपीलच्या संघांच्या नजराही त्याच्याकडं वळल्या.

राजस्थान रॉयल्सच्या संघानं त्यावेळी संजूला ट्रायलसाठी म्हणून बोलावलं होतं. तो ट्रायलसाठी गेला तेव्हा भारताचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविडनं त्याचं कौतुक केलं होतं.

"राहुल द्रविड यांनी माझी फलंदाजी पाहून माझं भरपूर कौतुक केलं. माझ्यात खास टॅलेंट असल्याचं सांगत मोठ्या सामन्यांमध्ये कामगिरी करण्याची क्षमता असल्याचं त्यांनी म्हटलं. माझ्यासाठी त्यापेक्षा मोठं काही नव्हतं. मरेपर्यंत तो क्षण कायम माझ्याबरोबर राहील," असं संजूनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

तरुण क्रिकेटपटूंना हेरून त्यांचं करिअर घडवण्यात हातखंडा असलेल्या राहुल द्रविडनं संजूची राजस्थान रॉयल्ससाठी निवड केली आणि त्याच्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात झाली.

संजू सॅमसन

फोटो स्रोत, ANI

2013 च्या हंगामात संजू सॅमसन पहिल्यांदा राजस्थानकडून खेळला. 11 सामन्यांत त्यानं 206 धावा केल्या. त्यात एका अर्धशतकाचा समावेश होता. या हंगमात तो 'इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन'ही ठरला. त्यावेळी तो अवघ्या 19 वर्षांचा होता.

त्यानंतर संजूनं आयपीएलमध्ये मागे वळून पाहिलं नाही. राजस्थान रॉयल्सकडून 177 सामने खेळत त्यानं 4 हजार 704 धावा केल्या. त्यात 3 शतकांसह 26 अर्धशतकांचा समावेश आहे. पुढं त्यानं राजस्थानच्या संघाचं नेतृत्वही केलं आणि त्यांना 2022 मध्ये फायनलपर्यंतही पोहोचवलं.

आधी 2012 मध्ये कोलकाता नाईट राईडर्सच्या संघातून त्याची सुरुवात झाली होती, पण तो त्यांच्यासाठी एकही सामना खेळला नाही.

राजस्थान रॉयल्सच्या संघावर 2 वर्षांची बंदी असताना संजू दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळला होता. तर या हंगामात धोनीच्या चेन्नईकडून संजू मैदानात उतरणार आहे.

आंतरराष्ट्रीय करिअरमधील चढउतार

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सची निळी जर्सी परिधान केली त्याचवेळी संजूला भारतीय संघाची निळी जर्सी परिधान करण्याची संधीही मिळाली.

2015 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी संजूची भारतीय टी-20 संघात निवड झाली. झिम्बाब्वेविरोधात हरारे येथील सामन्यात त्याचं आंतरराष्ट्रीय पदार्पणही झालं.

या सामन्यात त्याला 19 धावाच करता आल्या. पण त्याच्याबाबतीत घडलेली त्याहीपेक्षा वाईट बाब म्हणजे, त्यानंतर पुढचा सामना खेळण्यासाठी संजूला तब्बल साडेचार वर्षं वाट पाहावी लागली.

फक्त या एका सामन्याच्या कामगिरीवर त्याला पुढची उमेदीची अनेक वर्षं संधीच मिळाली नाही. 2020 मध्ये आणि त्यानंतर त्याला संधी मिळत गेल्या. पण त्यातही सातत्य नव्हतं आणि संजूच्या कामगिरीतही मग सातत्य येत नव्हतं.

संजू सॅमसन

फोटो स्रोत, ANi

पण 2024 मध्ये बरंच काही बदललं. या वर्षाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही, पण वर्ष सरत आलं आणि संजूची बॅट तळपली.

आधी बांगलादेशच्या विरोधात एक आणि नंतर दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात एकाच मालिकेत 2 शतकं संजूनं ठोकली. 5 सामन्यांमध्ये केलेल्या 3 शतकी खेळींमुळं संजू काय करू शकतो, हे सगळ्यांच्याच लक्षात आलं.

श्रीलंकेच्या विरोधात संजू 2024 मध्ये सलग 2 सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला होता. त्यावेळी तो प्रचंड निराश झाला होता. मिळालेल्या संधीचं सोनं करता येत नसल्याचं शल्य त्याला जाणवत होतं.

पण तेव्हा गौतम गंभीर यांनी दाखवलेला विश्वास संजूसाठी मोलाचा ठरला.

संजू सांगतो, "मी निराश होऊन बसलो होतो तेव्हा गंभीर माझ्या जवळ आले आणि काय झालं असं विचारलं. मी त्यांना सांगितलं की, मी सलग दोनदा शून्यावर बाद झालो. त्यावेळी गंभीर यांनी अगदी ठामपणे मला सांगितलं होतं की, तू जेव्हा 21 वेळा शून्यावर बाद होशील तेव्हा तू संघाबाहेर होशील. त्यामुळं काळजी करू नको आणि खेळत राहा."

त्यानंतरच संजूनं 5 सामन्यांमध्ये 3 शतकी खेळी केल्या होत्या.

मोक्याच्या क्षणी गाजवला वर्ल्ड कप

त्यांनंतर पुन्हा संजूला बॅड पॅच पाहावा लागला. क्रिकेटपटूच्या कारकीर्दीत बॅडपॅच येत असतात, पण संजूला त्याच्या करिअरच्या अत्यंत मोक्याच्या क्षणी ते पाहायला मिळालं.

अनेक मालिका, स्पर्धांमध्ये संजू संघात असायचा, पण अंतिम 11 मध्ये त्याला स्थानच मिळत नव्हतं. त्यामुळं सतत डगआऊटमध्ये बसून संघाची कामगिरी पाहणंच त्याला क्रमप्राप्त ठरलं.

अगदी भारतानं जिंकलेल्या 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप संघातही संजूचा समावेश होता. पण तो एकही सामना खेळला नाही. संपूर्ण स्पर्धा तो अंतिम 11 मध्ये आलाच नाही.

पण त्यानंतर मात्र भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला.

2026 च्या विश्वचषकात सलामीचा फलंदाज म्हणून संजूची निवड झाली. पण यातही तो पूर्ण सामने खेळला नाही. पण सलामीच्या जोडीची कामगिरी भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरल्यानंतर, पुन्हा संजूकडं पाहावं लागलं.

संजू सॅमसन

फोटो स्रोत, ANI

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

संजूला अत्यंत महत्त्वाच्या अशा सुपर 8 फेरीतल्या शेवटच्या 2 सामन्यांमध्ये संधी मिळाली. त्यापैकी एका सामन्यात तो फटकेबाजी करत लवकर बाद झाला. पण त्यानं संघाला चांगली सुरुवात करून दिली.

त्यानंतर वेस्ट इंडिजच्या विरोधातील 'करा किंवा मरा' अशी परिस्थिती असलेल्या सामन्यात संजूनं नाबाद 97 धावांची खेळी केली आणि भारताला एकहाती विजय मिळवून दिला. संजूनं ती खेळी केली नसती, तर कदाचित भारत उपांत्य सामन्यातही पोहचू शकला नसता.

संजूच्या जीवनातली ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. शतक हुकलं असलं, तरी देशासाठी ही खेळी अत्यंत खास ठरली.

या सामन्यानंतर बोलताना संजूनं संघर्षालाही तो कशाप्रकारे सकारात्मकपणे सामोरं जातो हे दाखवून दिलं.

"गेली अनेक वर्षे मी संघात असायचो पण खेळत नव्हतो. बेंचवर बसून मी सिनियर्सनी देशाला वेळोवेळी कसं यशापर्यंत नेलं हे मी जवळून पाहिलं. त्यातून मी खूप शिकलो आहे. सामन्यांमध्ये या सिनियर्सला पाहण्याचा अनुभव माझ्या कामी आला आणि आज मला हे करता आलं," असं संजू म्हणाला.

त्यानंतर उपांत्य सामन्यातही संजूनं तडाखेबाज 89 धावांची खेळी केली. त्या जोरावर भारतानं धावांचा डोंगर उभारला आणि इंग्लंडला पराभूत करत फायनल गाठली.

'संधी, स्पर्धा, कामगिरी', नेमकं काय घडलं?

संजू सॅमनला संघात स्थान न मिळणं, त्याला खेळण्याची संधी न मिळणं यावर अनेकदा चर्चा झाली. त्यावरून चाहत्यांनी टीका केल्या. बरंच काही बोललं गेलं.

पण भारतीय क्रिकेटमध्ये असलेली स्पर्धा, भारतीय संघातील आणि बेंचवर असलेल्या खेळाडुंचं कौशल्य पाहता अनेक कारणं यामागं असल्याचं पाहायला मिळालं.

संजू यष्टीरक्षक फलंदाज आहे. फक्त फलंदाज म्हणून विचार करायचा तर विराट, रोहित, सूर्यकुमार, राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन, अलिकडच्या काळात शुभमन अशा स्पर्धक फलंदाजांच्या यादीतून समोर संघात स्थान मिळवणं हे संजूच नव्हे, तर अनेकांसाठी अशक्यच होतं.

शिवाय संजू यष्टीरक्षक म्हणून खेळत असला, तरी त्यातही ऋषभ पंत, इशान किशन झालंच तर के. एल. राहूल ही नावंही होतीच.

शिवाय कोणत्या स्थानावर खेळायचं, डावखुऱ्या, उजव्या हातानं फलंदाजी करणाऱ्यांची गणितं या सगळ्याचा विचार करून संघ व्यवस्थापनाला निर्णय घ्यावे लागत होते. त्यात अनेकदा संजूवर अन्याय झाल्याची भावना सहाजिकच चाहत्यांमध्ये निर्माण व्हायची.

संजू सॅमसन

फोटो स्रोत, Alex Davidson-ICC/ICC via Getty Images

त्यामुळंच 'जस्टिस फॉर संजू सॅमसन' असा टॅगही बराच काळ सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये होता. पण रोहित आणि विराट निवृत्त झाल्यानंतर संजूला मिळणाऱ्या संधी वाढल्या.

यासगळ्या गोष्टी असल्या तरी संजू सॅमसनला संधी मिळाल्याच नाहीत, असंही नाही. त्याला काही स्पर्धा आणि मालिकांमध्ये सातत्यानं संधीही मिळाल्या. पण त्यावेळी संजूलाही त्यांचं सोनं करता आलं नाही, हेही तेवढंच खरं आहे.

"तुम्ही इंडियन जर्सी परिधान करता तेव्हा तुम्ही कशालाही नाही म्हणून चालत नाही. अगदी नवव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली तरी त्यात काही हरकत नाही," असं संजू एका मुलाखतीत म्हणाला होता.

हे फक्त बोलण्यापुरतं न राहता संजू खरंच याला जागला आणि अखेर योग्यवेळी त्याला संधीही मिळाली आणि त्याचं सोनं करण्यात त्याला आता यशही आलंय, असं म्हणायला हरकत नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)