सूपमध्ये लघवी करणाऱ्या दोघांना अडीच कोटींहून अधिक दंड ठोठावला, जाणून घ्या संपूर्ण घटना

    • Author, केली एनजी
    • Role, बीबीसी न्यूज

चीनमधील एका प्रसिद्ध अशा हॉटपॉट रेस्टॉरंटमध्ये खळबळजनक प्रकार घडला आहे. या हॉटपॉट रेस्टॉरंटमध्ये दोन तरुणांनी सूपच्या भांड्यात लघवी केली.

त्यामुळे न्यायालयाने त्या तरुणांना दोन केटरिंग कंपन्यांना तब्बल 2.2 दशलक्ष युआन म्हणजे सुमारे 3 लाख 9 हजार डॉलर (अंदाजे 2.64 कोटी रुपये) दंड भरण्याचा आदेश दिला आहे.

फेब्रुवारी महिन्यात शांघायमधील हायडिलाओ या चीनमधील सर्वांत मोठ्या हॉटपॉट चेनमध्ये हा प्रकार घडला.

आपले कृत्य करतानाचा व्हीडिओ त्यांनी काढला.

17 वर्षीय दोन तरुणांनी दारूच्या नशेत काढलेला व्हीडिओ ऑनलाईन पोस्ट केल्यावर त्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

'रेस्टॉरंटने 4 हजार ग्राहकांना दिली नुकसान भरपाई'

कोणीही ते खराब झालेलं सूप सेवन केल्याचे संकेत मिळाले नाहीत. परंतु, तरीही हायडिलाओने त्या घटनेनंतर काही दिवसांत जे हजारो ग्राहक जेवायला आले होते, त्या सर्वांना नुकसान भरपाई देण्याची ऑफर दिली.

मार्च महिन्यात हायडिलाओने 23 मिलियन युआनपेक्षा जास्त नुकसान भरपाईची मागणी केली होती. कारण या घटनेनंतर ग्राहकांना देण्यात आलेली भरपाईची रक्कमही धरली होती.

गेल्या शुक्रवारी शांघायच्या न्यायालयाने सांगितलं की, त्या तरुणांनी त्यांच्या अपमानास्पद कृत्याने कंपन्यांच्या मालमत्तेच्या हक्कांबरोबरच प्रतिष्ठेलाही धक्का दिला.

त्यांच्या या कृतीमुळे टेबलवेअर (भांडी) खराब झाले आणि 'लोकांमध्ये मोठी अस्वस्थता आणि नाराजी' पसरली.

न्यायालयाने असंही म्हटलं की, त्या मुलांच्या पालकांनी त्यांच्या 'पालकत्वाची जबाबदारी' व्यवस्थित पार पाडलेली नाही.

त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम त्यांनाच भरावी लागेल, असं सरकारी माध्यमांनी सांगितलं.

'न्यायालयाने पालकांना दंड भरण्यास सांगितलं'

यामध्ये 20 लाख युआन व्यवसाय आणि प्रतिष्ठेच्या नुकसान भरपाईसाठी, 1.3 लाख युआन एका केटरिंग कंपनीला टेबलवेअर खराब होणं व साफसफाईसाठी आणि 70 हजार युआन कायदेशीर खर्चासाठी देण्यास सांगितलं आहे.

परंतु, न्यायालयाने स्पष्ट केलं की ग्राहकांना हायडिलाओने बिलाच्या रकमेपेक्षा जास्त दिलेली भरपाई ही त्यांच्या 'इच्छेने घेतलेला' कंपनीचा व्यावसायिक निर्णय होता. त्यामुळे ती रक्कम त्या तरुणांकडून वसूल करता येणार नाही.

हायडिलाओने 24 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान त्या शाखेत जेवायला आलेल्या 4 हजारहून अधिक ग्राहकांना नुकसान भरपाई दिली. यात त्यांना संपूर्ण बिलाची परतफेड आणि बिलाच्या रकमेपेक्षा 10 पट जास्त रोख रक्कम देण्यात आली.

रेस्टॉरंटने सर्व हॉटपॉट उपकरणं बदलली आणि साफसफाई व निर्जंतुकीकरण केल्याचं सांगितलं.

सिचुआन प्रांतातील जियानयांग शहरात पहिलं रेस्टॉरंट सुरू केल्यापासून हायडिलाओचा विस्तार झपाट्याने झाला आहे. सध्या या चेनचे जगभरात 1 हजारहून अधिक रेस्टॉरंट आहेत.

ही कंपनी ग्राहकसेवा आणि कुटुंबासाठी अनुकूल वातावरणासाठी ओळखली जाते. टेबल मिळेपर्यंत महिलांना मॅनिक्युअर दिलं जातं आणि मुलांना कँडी फ्लॉस दिली जाते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.