तुम्हाला ब्रेड आवडतो का? मग जाणून घ्या, कोणता ब्रेड सर्वात आरोग्यदायी असतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मेलिसा हॉगेनबूम
- Role, बीबीसी विज्ञान आणि आरोग्य रिपोर्टर
ब्रेड म्हटलं की बाजारात असंख्य प्रकारचे ब्रेड उपलब्ध असतात. मात्र आपण कोणता ब्रेड खातो हे महत्त्वाचं असतं. कारण आपण खाल्लेल्या ब्रेडचा आपल्या आरोग्यावर आश्चर्यकारक परिणाम होऊ शकतो.
2020 मध्ये कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन झाल्यानंतर मी सावर डो (ब्रेडचा एक प्रकार) बनवण्यास सुरुवात केली. बीबीसीतील माझ्या सहकाऱ्यांनी ते बनवण्याचं स्टेप बाय स्टेप गाईड प्रकाशित केलं. इतर अनेकांप्रमाणे मी देखील हा ब्रेड बनवण्यास प्रेरित झाले.
मी इथे कबूल करते की मी या गोष्टीची सुरुवात अगदी शून्यापासून केली नाही. कारण माझ्या एका मैत्रिणीनं ब्रेड बनवण्याच्या स्टार्टरचा काही भाग मला दिला होता. यात वाईल्ड यीस्ट आणि जिवाणूचं जिवंत मिश्रण होतं. ज्यामुळे ब्रेड तयार होण्यास मदत होते.
अनेक प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर मला यश आलं. तो ब्रेड फक्त खाण्यायोग्यच नाही तर स्वादिष्टदेखील झाला. ब्रेड बनवण्याची माझी अगदी अचूक अशी पद्धत नाही. मात्र सहसा त्यामुळे चांगला ब्रेड बनतो.

फोटो स्रोत, Getty Images
सुरुवातीला, मी ब्रेड बनवणं सुरू ठेवलं. कारण त्याची चव चांगली होती. मात्र अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड (यूपीएफ) म्हणजे जास्त प्रक्रिया केलेल्या पदार्थांमुळे आरोग्याला असणाऱ्या धोक्याबद्दल अधिक माहीत झाल्यावर मी आणखी काही वेगळं करण्याचं ठरवलं. या पदार्थांमध्ये सहसा साखर, मीठ, चरबी आणि औद्योगिक रासायनिक पदार्थ असतात.
माझ्या ब्रेडची चव सुपरमार्केटच्या ब्रेडपेक्षा स्वादिष्ट तर होतीच. मात्र त्याचबरोबर एरवी वैज्ञानिक आपल्या आरोग्यासाठी चांगले नाहीत असं ज्या अल्ट्रा-प्रोसेस्ड घटकांबद्दल सांगतात, त्यातील कोणतेही घटक माझ्या ब्रेडमध्ये नव्हते.
पाच वर्षांनी, माझ्या सावर डोच्या म्हणजे ब्रेडच्या स्टार्टरचे अजूनही चांगले परिणाम मिळत आहेत आणि मी त्याचा नियमितपणे वापर करतो.
माझा दररोज आपल्याला लागणारा ब्रेड स्वत:च बनवणं आपल्यापैकी सगळ्यांना शक्य नसतं. पारंपारिक पद्धतीनं बनवलेला सावर डो ब्रेड खूप महाग असू शकतो. त्या तुलनेत सुपरमार्केटमध्ये मिळणारा ब्रेड स्वस्त आणि सोयीचा देखील असतो.
त्यातच सुपरमार्केटमध्ये ब्रेडचे अनेक पर्याय असतात. त्यामुळे यातील नेमका कोणत्या प्रकारचा ब्रेड खाणं आरोग्यासाठी चांगलं हे समजणं कठीण असू शकतं. मग आरोग्यासाठी सर्वात चांगला ब्रेड कोणता असतो आणि ब्रेड विकत घेताना नेमकं काय लक्षात घेतलं पाहिजे?
ब्रेड बनवण्याची चॉर्लीवूड पद्धत
1950 च्या दशकाच्या उत्तरार्धात, युकेतील चॉर्लीवूड फॅक्टरीमधील वैज्ञानिकांनी पूर्वीपेक्षा अधिक वेगानं मळलेलं पीठ तयार करण्याची पद्धत विकसित केली.
त्यांनी यासाठी चरबी, अतिरिक्त यीस्ट आणि एन्झाईम, ऑक्सिडंट्स (पीठाला मजबूत करण्यासाठी) आणि इमल्सिफायर (यामुळे इतर रसायनं जोडणं सोपं होतं) यासारखी रसायनं त्यात टाकली. त्यानंतर या सर्वांचं मिश्रण अतिशय जास्त वेगानं केलं.
या नाविन्यपूर्ण पद्धतीमुळे कमी प्रथिनं असलेला गहू वापरून वेगानं आणि अधिक किफायतशीरपणे ब्रेड तयार करणं शक्य झालं.

फोटो स्रोत, Getty Images
इमल्सिफायरसारख्या अतिरिक्त घटकांमुळे ब्रेड अधिक काळ टिकू लागला. त्यामुळे आज आपण खातो, त्यातील 80 टक्के ब्रेड अजूनही चॉर्लीवूड पद्धतीनंच बनवले जातात.
सुरुवातीच्या काळात, छोट्या बेकरींना मोठ्या औद्योगिक बेकरींशी स्पर्धा करता यावी म्हणून चॉर्लीवूड पद्धत विकसित करण्यात आली होती. मात्र ते यशस्वी ठरलं नाही.
वैज्ञानिकांनी ज्या हेतूनं ही पद्धत विकसित केली होती, तो मुद्दा बाजूला राहिला. मोठ्या औद्योगिक बेकरींनीदेखील ही पद्धत आत्मसात केली. परिणामी छोट्या बेकरींना स्पर्धेत टिकाव धरणं शक्य झाली नाही आणि त्या दिवाळखोर झाल्या.
सावर डो (ब्रेडचा प्रकार)
चॉर्लीवूड पद्धतीमुळे वेगानं, मऊ पाव तयार होतात. मात्र सावर डो या ब्रेडचा विचार केला तर ब्रेड बनवण्याच्या बाबतीत त्याचा वेग सर्वात कमी असतो.
जवळपास कोणताही खमीर असलेला ब्रेड (ज्यात गॅस बबल तयार होण्यासाठी यीस्ट किंवा जिवाणूंचा वापर केला जातो) तयार करण्यासाठी, अनेक पायऱ्या आवश्यक असतात.
पहिली पायरी म्हणजे, सर्व घटक एकत्र केले जातात. मग ते मळले जातात (यामुळे ग्लुटेनला लवचिक पीठ तयार होण्यास मदत होते), त्यानंतर आंबवण्याच्या पहिल्या टप्प्यात, पीठ तसंच ठेवलं जातं.
त्यावेळेस सहसा थोडंसं तापमान असतं किंवा वातावरणात आर्द्रता राखली जाते. जेणेकरून यीस्टला साखरेचं विघटन करता येईल आणि कार्बन डायऑक्साईडचे कप्पे तयार करता येतील.
त्यानंतर ब्रेड लगेच भाजला जातो (बेकिंगची प्रक्रिया) किंवा त्याला लांबलचक आकारात (लादीमध्ये) तयार केलं जातं आणि मग पुन्हा आंबवलं जातं. आंबवण्याच्या या दुसऱ्या टप्प्यात यीस्ट ब्रेडमध्ये छोटे हवेचे फुगवटे निर्माण करतं. यामुळे शेवटी तयार होणाऱ्या ब्रेडची रचना सुधारते.

फोटो स्रोत, Getty Images
एकदा का ही प्रक्रिया पूर्ण झाली की ब्रेड भाजण्यासाठी तयार असतो.
मी जेव्हा ब्रेड बनवते, तेव्हा शेवटच्या टप्प्यात ब्रेड रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवतो. त्यामुळे आंबण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी होतो आणि त्यामुळे ब्रेड अधिक स्वादिष्ट होतो.
याचाच अर्थ की स्टार्टर सक्रिय करण्यापासून (जेव्हा ते पीठ आणि पाण्यास मिसळलं जातं आणि वापरण्यापूर्वी आंबवलं जातं) ते ब्रेड ओव्हनमधून बाहेर काढण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेला 36 तासांपर्यंतचा वेळ लागू शकतो.
सावर डो या ब्रेडचं सर्वात मूलभूत स्वरूप लक्षात घेतलं, तर त्यात आंबवलेल्या स्टार्टरमध्ये पीठ, मीठ आणि पाणी मिसळलेलं असतं. स्टार्टर म्हणजे सहसा जिवाणू आणि यीस्टचं मिश्रण असतं.
स्टार्टर हा खमीर बनवण्याचा नैसर्गिक घटक म्हणून काम करतो. जे लोक हा ब्रेड खातात, त्यांना त्याची चव आवडते. मात्र त्याची फक्त चवच चांगली नसते, तर आरोग्यासाठी असणारे फायदे त्याहूनही चांगले असतात.
पचायला सोपा ब्रेड
सावर डो या प्रकारातील ब्रेड इतर ब्रेडच्या तुलनेत पचायला सोपा असतो. कारण यात आंबवण्याची प्रक्रिया अतिशय हळू पार पडते. त्या प्रक्रियेमुळे प्रथिनांचं विघटन होतं आणि त्यातून जीवनसत्व आणि खनिजं अधिक चांगल्या प्रकारे शोषली जातात.
सावर डो प्रकारातील ब्रेड आंबत जातो तसा, त्यातील नैसर्गिक लॅक्टिक अॅसिड पिठामधील कार्बोहायड्रेट्सचं विघटन करतं. या प्रक्रियेमुळे ब्रेडमधील पचायला जड असलेल्या साखरेचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होतं.
या साखरेला, आंबवण्यायोग्य ऑलिगोसॅकराईड्स, डायसॅकराईड्स, मोनोसॅकराईड्स आणि पॉलीऑल्स (एफओडीएमएपी) म्हणतात.
त्याचवेळी, फायबर आणि पॉलीफिनॉल्स नावाची आरोग्यदायी संयुगं आपल्या आतड्यांमधील पचन व्यवस्थेला महत्त्वाचं इंधन पुरवतात.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचप्रकारे, मंद गतीनं होत असलेली आंबवण्याची प्रक्रिया ज्या लोकांना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवायची आहे, अशांसाठीदेखील उपयुक्त ठरते.
मात्र, व्यावसायिक पद्धतीनं तयार होणारे ब्रेड सर्वसाधारणपणे यीस्टवर आधारित असतात. त्यामधूनही काही फायदे मिळतात. उदाहरणार्थ, त्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या जीवनसत्वांचं आणि खनिजांचं चांगलं प्रमाण असतं.
सावर डो प्रकारातील ब्रेड खाल्ल्यामुळे तुम्हाला अधिककाळ पोट भरल्यासारखं वाटतं असं आढळून आलं आहे.
काही अभ्यासातून दिसून आलं आहे की इतर प्रकारातील ब्रेडच्या तुलनेत सावर डो प्रकारातील ब्रेड खाल्ल्यानंतर लोकांना कमी भूक लागते. अर्थात इतरांना असा कोणताही फरक आढळला नाही.
अल्ट्रा-प्रोसेस्ड ब्रेड?
सुपरमार्केट किंवा बाजारात अनेक प्रकारचे ब्रेड मिळतात. ते चॉर्लीवूड पद्धतीनं तयार केलेले असतात. त्यात वापरण्यात आलेल्या रसायनांमुळे आणि इमल्सिफायर्समुळे ते अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड म्हणजे जास्त प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये मोडतात.
उदाहरणार्थ, अमेरिकेसारख्या काही देशांमध्ये प्रक्रिया केलेल्या ब्रेडमध्ये पोटॅशियम ब्रोमेट हा घटक असू शकतो. यामुळे ब्रेडमध्ये कार्बन डायऑक्साईड टिकवून ठेवण्यास मदत होते आणि त्यामुळे मोठ्या आकाराचे ब्रेड तयार होतात. अर्थात ते कर्करोगाचं संभाव्य कारण मानलं जातं.
2020 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, युकेमध्ये लोक जितक्या कॅलरीजचं सेवन करतात त्यातील जवळपास 54 टक्के कॅलरी अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमधून घेतल्या जातात.
अमेरिकेतदेखील ही आकडेवारी सारखीच आहे. अर्थात यासंदर्भातील अंदाज वेगवेगळे आहेत.
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमधील घटक ओळखणं कठीण ठरू शकतं. अनेक तज्ज्ञ यासंदर्भात एक सामान्य नियम सुचवतात. जर एखाद्या अन्नपदार्थात पाच किंवा अधिक घटक असतील, त्याव्यतिरिक्त तुमच्या स्वयंपाकघरात नसलेले घटक असतील, तर तो पदार्थ अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड असण्याची शक्यता असते.
सुपरमार्केट किंवा बाजारात आढळणाऱ्या बहुतांश ब्रेडचं उत्पादन मोठ्या प्रमाणात म्हणजे औद्योगिक स्वरुपात केलेलं असतं. त्यामध्ये वेगानं उत्पादन करणारे, ब्रेड अधिक काळ टिकवणारे, ब्रेडची चव आणि रचनेत सुधारणा करणारे घटक वापरलेले असतात.

फोटो स्रोत, Getty Images
तसंच हे घटक उत्पादनाच्या प्रक्रियेत ब्रेडमधील जे पोषक घटक गमावले जातात, त्यांची जागा घेतात.
याचा अर्थ, सुपरमार्केट किंवा बाजारातील बहुतांश ब्रेड अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडच्या श्रेणीत येतात.
मोठ्या प्रमाणात उत्पादन केलेल्या ब्रेडचं प्रमाण सामान्य आहारात जवळपास 11 टक्के असतं. आहारात अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचं प्रमाण अधिक असल्यास त्यामुळे अनेक आजार उद्भवतात.
अर्थात, हे लक्षात घेतलं पाहिजे की अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड या प्रकारात वेगवेगळ्या अन्न गटांचा समावेश आहे. त्यामुळे सुपरमार्केट किंवा बाजारात असणाऱ्या सर्व प्रकारच्या ब्रेडला अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणून बदनाम न करण्याची सावधगिरी बाळगण्याची सूचना संशोधक करतात.
एक पर्याय म्हणजे जे तुम्हाला ओळखता येत नाहीत अशा शक्य तितक्या कमी अतिरिक्त घटकांचा समावेश असलेल्या ब्रेडची निवड करणं.
जर तुम्ही पॅकेज्ड ब्रेड घेणार असाल, तर पांढऱ्या ब्रेडऐवजी पूर्ण गव्हापासून बनलेल्या ब्रेडचा पर्याय निवडा.
"वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेडचे आरोग्यासाठी वेगवेगळे फायदे असतात," असं आहारतज्ज्ञ जेन्ना होप यांनी बीबीसीच्या गूड फूड प्रोग्रॅमला सांगितलं.
"उदाहरणार्थ, बिया असलेल्या संपूर्ण धान्याच्या ब्रेडमध्ये पांढऱ्या ब्रेडच्या तुलनेत अधिक फायबर असतात आणि आरोग्यासाठी फायदेशीर चरबी असते."
संपूर्ण गव्हापासून बनलेला ब्रेड
गहू अनेक थरांनी बनलेला असतो. त्यात जंतू (प्रथिनांनी समृद्ध असलेला गव्हाचा गर्भ), बाह्या आवरण ज्याला कोंडा म्हणतात आणि मोठ्या प्रमाणात स्टार्च असलेलं एंडोस्पर्म असतात. हे एंडोस्पर्म गव्हाच्या दाण्याच्या गर्भासाठी अन्नाचा राखीव साठा म्हणून काम करतं.
सर्वसाधारण ब्रेडमध्ये, हा प्रथिनांचा गाभा आणि कोंडा काढले जातात. त्यामध्ये फक्त एंडोस्पर्म राहतो.
तर दुसऱ्या बाजूला, संपूर्ण धान्याच्या ब्रेडमध्ये गव्हाच्या दाण्यातील सर्व भागांचा वापर केला जातो. ज्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.
त्यात पॉलीफिनॉल्स (अँटिऑक्सिडंट गुणधर्म असलेली रसायनं), व्हिटामिन ई, फोलेट आणि मॅग्नेशियमसारखे आवश्यक पोषक घटक तसंच फायबर, प्रथिनं आणि आरोग्यासाठी फायदेशीर चरबी असते.
त्याउलट, पांढऱ्या पिठामध्ये गव्हाचा प्रथिनांनी समृद्ध असलेला भाग आणि कोंडा दोन्ही नसतात.
संपूर्ण धान्यापासून बनलेल्या ब्रेडमध्ये अधिक फायबर, जीवनसत्वं आणि खनिजं असतात. तशी ती रिफाईंड किंवा पॉलिश केलेलन्या धान्यांमध्ये नसतात.
संपूर्ण धान्यापासून बनलेल्या ब्रेडमध्ये असलेले हे फायदे सुचवतात की पांढऱ्या ब्रेडऐवजी संपूर्ण धान्यापासून बनलेल्या ब्रेडचं सेवन केल्यास त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. तसंच आतड्यांमधील सूक्ष्मजीवांमध्ये सुधारणा होऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images
संपूर्ण धान्यापासून बनलेला ब्रेड खाल्ल्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
संपूर्ण धान्यापासून बनलेल्या ब्रेडमधील फायबरमुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं. कारण तो अधिक हळूहळू पचतो. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण हळूहळू वाढू शकतं.
त्याऐवजी व्हाईट ब्रेडमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण एकदम वाढतं. तसंच व्हाईट ब्रेड खाल्ल्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागू शकते.
एका अभ्यासात आढळलं आहे की ज्यांनी दिवसातून तीन वेळा संपूर्ण धान्याचा ब्रेड खाल्ला, त्यांचा बॉडी मास इंडेक्स आणि पोटावरील चरबीचं प्रमाण पांढऱ्या किंवा पॉलिश केलेल्या धान्याचा ब्रेड खाणाऱ्यांपेक्षा कमी होतं.
यातून दिसून आलं की संपूर्ण धान्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे लोकांना योग्य ते वजन राखण्यास मदत होऊ शकते.
यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे बाजारात काही ब्रेडवर 'सीडेड' असं म्हटलेलं असतं. ते ब्रेड संपूर्ण गव्हाच्या पिठापासून बनलेले असतातच असं नाही. जरी ते तपकिरी किंवा ब्राऊन रंगाचे असले तरी.
जर तुम्हाला व्हाईट ब्रेड खाणं थांबवता येत नसेल. तर तुम्ही तुमच्या आहारात इतर पदार्थांच्या माध्यमातून संपूर्ण धान्यांचा समावेश करू शकता. यात संपूर्ण गव्हाचा पास्ता, ब्राऊन राईस, ओटमील आणि पॉपकॉर्नचा समावेश आहे.
आरोग्यदायी व्हाईट ब्रेड
जगाच्या विविध भागात व्हाईट ब्रेड हा सर्वात लोकप्रिय ब्रेड असल्याचं दिसून येतं. यात संपूर्ण गव्हापासून बनलेल्या ब्रेडसारखे पोषक घटक नसले तरीदेखील लोकांना तो आवडतो. मात्र लवकरच हे चित्र बदलू शकतं.
संशोधकांनी, संपूर्ण धान्यापासून बनलेला एक नवीन ब्रेड तयार केला आहे. त्याची चव पांढऱ्या ब्रेडसारखी असते आणि तो दिसतोही तसाच.
यासाठी त्यांनी ब्रेडमध्ये थोड्या प्रमाणात वाटाणे, बीन्स आणि विविध धान्यं वापरण्याचा विचार करत आहेत. तसंच पांढऱ्या ब्रेडच्या पिठामधून काढून टाकला जाणारा कोंडा आणि गव्हाच्या प्रथिनांचा समृद्ध भाग वापरून त्या ब्रेडमधील पोषक घटक वाढवण्याची योजना आखत आहेत.
कॅथरीन होवार्थ, अॅबेरिस्टविथ विद्यापीठातील, या प्रकारचा ब्रेड विकसित करणाऱ्या संशोधकांपैकी एक आहेत. यासंदर्भातील संशोधन सुरुवातीच्या टप्प्यात असलं तरी, कॅथरीन होवार्थ यांनी 2024 मध्ये सांगितलं होतं की या प्रक्रियेत एक नाजूक संतुलन साधायचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
संशोधकांची टीम संपूर्ण गव्हापासून (व्होल व्हिट) तयार होणाऱ्या ब्रेडमधील पोषक घटक आणि पांढऱ्या ब्रेडची चव यांचा मिलाफ यात साधण्याचा प्रयत्न करते आहे.
संशोधकांची टीम यात टेफ, ज्वारी आणि मिलेट तसंच किनोआसारख्या पोषण घटकांनी समृद्ध बियांचा देखील यात समावेश करते आहे.
ते अतिरिक्त प्रथिनांसाठी वाटाणे आणि हरभरा यांचादेखील विचार करत आहेत.
"इतर धान्यांचा वापर करून, आम्ही लोह, झिंक आणि जीवनसत्वांचं प्रमण वाढवू शकतो. तसंच फायबरचं प्रमाण वाढवू शकतो. कारण पांढऱ्या ब्रेडमध्ये फायबरचं प्रमाण खूपच कमी असतं. फायबर आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचं असतं," असं होवार्थ यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं.
माझे सहकारी, बीबीसीचे विज्ञान प्रतिनिधी पल्लब घोष यांनी या नव्या ब्रेडचा सुरुवातीचा एक नमुना खाऊन पाहिला. त्यांना तो अतिशय स्वादिष्ट वाटला. आणखी दोन वर्षांनी हे नवं उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतं.
तुम्ही कोणत्या ब्रेडची निवड करावी?
शेवटी बहुतांश निवड ही वैयक्तिक पसंत, सोय आणि किमतीवर अवलंबून असते.
सावर डो ब्रेड महागडा असतो, त्यामुळे तो अनेकांच्या आवाक्याबाहेरचा असू शकतो. तर कमीत कमी प्रक्रिया केलेला ब्रेड व्यावहारिक नसतो किंवा परवडणारा नसतो. असं असलं तरी ब्रेड विकत घेताना त्यातील घटक तपासणं योग्य ठरतं.
नेमकं त्यात काय पाहावं, हे जाणून घेतल्यास तुम्हाला ब्रेडची निवड अधिक योग्यप्रकारे करता येईल.

फोटो स्रोत, Melissa Hogenboom / BBC
उदाहरणार्थ, स्थानिक सुपरमार्केट किंवा बाजारात मला खूप आरोग्यदायी वाटणाऱ्या एका ब्रेडमध्ये दाणेदार साखर आणि प्रिझर्वेटिव्ह घातलेले होते.
काही ठिकाणी पॅकेज्ड आणि स्लाईस केलेले सावर डो ब्रेड विकले जातात. त्यात वापरण्यात आलेल्या घटकांची यादी छोटी असते. त्यामुळे ते ब्रेड अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडच्या श्रेणीतील स्लाईस्ड ब्रेडपेक्षा वेगळे ठरतात.
ज्यांना अधिक काळ टिकणारे ब्रेड हवे असतात, त्यांच्यासाठी ब्रेडला फ्रीजमध्ये ठेवण्याचा देखील पर्याय आहे.
(मेलिसा हॉगेनबूम या 'ब्रेडविनर्स' (2025) आणि 'द मदरहूड कॉम्प्लेक्स' या आगामी पुस्तकांच्या लेखिका आहेत.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











