मटण सूपचे काय फायदे असतात? ते कोणी पिऊ नये?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, के सुभगनम
- Role, बीबीसी तामिळ
मटण सूप म्हटलं की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र, मटण सूप फक्त चवीलाच छान नसतं, तर त्याचे आरोग्यासाठीदेखील फायदे असतात.
जर एखादं हाड मोडलं, तर घरातील वडीलधारी मंडळी मटण सूप बनवण्याचा आणि ते दररोज पिण्याचा आग्रह धरतात.
घरात कोणाला सर्दी आणि ताप झाला असेल तरीदेखील ते घरात मेंढीचं किंवा बोकडाचं (मटण) सूप बनवतात.
या सूपात असं काय असतं की, आपल्याला अनेक गोष्टींसाठी मटणाचं सूप (लेग सूप) पिण्यास सांगितलं जातं?
बोकड किंवा मेंढीच्या पायाच्या सूपमुळे खरोखरंच आपल्या आरोग्याला फायदा होतो का? त्यामुळे आपल्या हाडांना आणि सांध्यांना ताकद मिळते का? ते आपल्या आरोग्यासाठी खरोखरंच चांगलं असतं का? या मुद्द्यांबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही आहारतज्ज्ञांशी बोललो.
मटण सूप पिण्याचे काय फायदे असतात?
हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थनं प्रकाशित केलेल्या एका लेखात म्हटलं आहे की, शेळीच्या दुधात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक यासारखे पोषक घटक असतात. ते आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकार क्षमतेसाठी आवश्यक असतात.
दिव्या सत्यराज एक आहारतज्ज्ञ आहेत. त्या म्हणतात, शेळीच्या मांसामध्ये म्हणजे मटणामध्ये आणि विशेषकरून त्याच्या पायाच्या हाडांमध्ये जे पोषक घटक असतात, ते अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आपली हाडं, सांधे, केस, त्वचा, ऊर्जा आणि रोगप्रतिकार शक्ती यासाठी ते फायदेशीर असतात.
रम्या अशोक या आणखी एक आहारतज्ज्ञ आहेत. त्या म्हणतात की, शेळीच्या दुधात कोलेजन आणि जिलेटिन मोठ्या प्रमाणात असतं. त्या नमूद करतात की कोलेजन आणि जिलेटिनमुळे आपल्या आरोग्याला फायदा होतो आणि सांधेदुखीची समस्या कमी होते.
त्याव्यतिरिक्त रम्या म्हणतात की, कोलेजनमुळे आपल्या त्चवेचं आरोग्यदेखील चांगलं राहतं.

रम्या यांच्या दाव्याचं समर्थन करताना दिव्या सत्यराज म्हणतात की, मेंढीच्या पायात असणारं कोलेजन सांध्यांसाठी वंगणाचं काम करतं. त्याशिवाय, कोलेजनमुळे त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणंदेखील कमी होतात. नियमितपणे मेंढीच्या पायाचं सूप प्यायल्यामुळे त्वचा टवटवीत आणि तरुण राहण्यास मदत होते.
आहारतज्ज्ञ रम्या पुढे सांगतात की, मटण सूप प्यायल्यामुळे फक्त आपली हाडं आणि त्वचेलाच फायदा होत नाही, तर शरीराच्या इतर क्रियांमध्ये देखील त्याचा फायदा होतो.
रम्या यांच्या मते, ग्लिसरिन आणि प्रोलिनसारखी अमिनो अॅसिड आतड्याचं काम व्यवस्थित चालू राहण्यास फायदेशीर असतात. तसंच त्यामुळे यकृताचं काम योग्यरितीनं होऊन शरीरातील डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया (विषारी पदार्थ किंवा द्रव्यं शरीराबाहेर टाकण्याची प्रक्रिया) होण्यास मदत होते.
"तामिळनाडूत पारंपारिकरित्या, ज्या लोकांना ताप येणं, हाडं मोडणं इत्यादी समस्या होतात, त्यांना मटण सूप पिण्याचा सल्ला दिला जातो. मटणाच्या सूपमध्ये पोषक घटक असतात, ताकद असते आणि भरपूर ऊर्जा असते. त्यामुळे आजारपणातून लवकर बरं होता येतं," असं रम्या सांगतात.
मटण सूप कोणासाठी चांगलं नसतं?
रम्या म्हणतात की, जरी मटण सूपचे आरोग्याला अनेक फायदे असले तरी ज्या लोकांना ह्रदयविकार आहे, लठ्ठपणा आहे आणि आरोग्याच्या इतर समस्या आहेत, अशा लोकांनी ते टाळलं पाहिजे. कारण मटण सूपमध्ये चरबीचं प्रमाण अधिक असतं.
तसंच मटण सूप नेमकं कसं शिजवलं जातं आहे, याकडे लक्ष देणंदेखील महत्त्वाचं असतं, या गोष्टीवर त्या भर देतात.
"जर सूप बनवण्यापूर्वी त्या हाडांना नीट स्वच्छ करण्यात आलं नाही, तर त्यात साल्मोनेला किंवा ई. कोलायसारख्या जिवाणूंच्या संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे त्यांना खूप काळजीपूर्वक स्वच्छ केलं पाहिजे," असं रम्या सांगतात.
तसंच, कमी शिजवलेलं किंवा व्यवस्थित न शिजवलेलं मटण खाण्यामुळे देखील असेच धोके उद्भवू शकतात, असा इशारा त्या देतात.
आहारतज्ज्ञ रम्या अशोक म्हणतात की, ज्या लोकांच्या शरीरात युरिक अॅसिडचं प्रमाण जास्त आहे, ज्यांना संधिवात (रूमेटाईड आर्थरायटिस) यांच्या समस्या आहेत आणि ज्यांना आधीच मूत्रपिंडाची समस्या आहे अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंच मटण सूप प्यायलं पाहिजे.
त्या म्हणतात, सर्वसाधारणपणे, शेळीच्या पायाच्या किंवा मटण सूपचे संपूर्ण फायदे मिळण्यासाठी ते मंद आचेवर 10 ते 12 तास शिजवले पाहिजेत.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी पुढे सांगितलं की, "आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत ते शक्य नाही. नेहमीच्या इतर स्वयंपाकामधून देखील त्यातील काही पोषक घटक मिळतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नियमितपणे मटण सूपचं सेवन केल्यामुळे आरोग्याला फायदा होऊ शकतो."
"जर मटण सूप जवळपास 10 तास मध्यम आचेवर सतत शिजवलं तर त्यातील पोषक घटकांपैकी जवळपास 95 टक्के पोषक घटक आपल्याला मिळतात. मात्र तुम्ही ते याप्रकारे शिजवून त्याचं सेवन करू नये."
"मटणाचे पाय किंवा मटण सूप योग्यप्रकारे शिजवलं, तर आपलं शरीर, त्यातील 50 ते 75 टक्के पोषक घटक शोषून घेऊ शकतं. त्यामुळे ते योग्यप्रकारे शिजवणं चांगलं. तसंच ते 10 तास शिजवावं लागतं, म्हणून ते टाळण्यापेक्षा मटण सूप नियमितपणे पिणं योग्य ठरतं," असं दिव्या म्हणतात.
मटण सूपची आवश्यकता कोणाला असते?
दिव्या सत्यराज म्हणतात, शेळीच्या किंवा बोकडाच्या गुडघ्यावरील किंवा गुडघ्याजवळील भागात अधिक चरबी असते. त्यामुळे जे लोक लठ्ठ किंवा स्थूल आहेत अशांना मटण सूप पिण्याचा सल्ला दिला जात नाही.
दिव्या पुढे नमूद करतात की शेळी किंवा बोकडाच्या पायाच्या या भागाचं सूप फक्त हाडांसाठीच नव्हे तर जवळपास संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठीच चांगलं असतं.

त्या म्हणतात की ज्या लोकांना कर्करोग आहे आणि जे केमोथेरेपी घेत आहेत, अशा लोकांनी त्यांच्या आहारात मटण सूपचा समावेश करावा.
"सर्वसाधारणपणे, केमोथेरेपीचे अनेक दुष्परिणाम असतात. जे लोक केमोथेरेपी घेत असतात ते जास्त खाऊ शकत नाहीत. मात्र त्यांनी नक्कीच सकस आहार घेतला पाहिजे. मटण सूपमध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात. त्यामुळे मटण सूप प्यायल्यानं आरोग्याला फायदा होईल," असं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
दिव्या म्हणतात की, केमोथेरेपीमुळे रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. मटण सूप प्यायल्यामुळे त्यात सुधारणा होऊ शकते. हे देखील एक कारण आहे, ज्यामुळे त्या मटण सूप पिण्यास सांगतात.
दिव्या म्हणतात की जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांच्या शरीराला अधिक मजबूत करण्यास मटण सूप खूप फायदेशीर ठरू शकतं. प्रोटीन पावडरपेक्षा मटण सूपमुळे अधिक फायदा होतो.
दिव्या असंही सांगतात की जे लोक कुपोषित आहेत, ज्यांचं वजन कमी आहे, ज्यांना सायनसची समस्या आहे आणि ज्यांची हाडं कमकुवत आहेत, अशांना आवश्यक असणारे पोषक घटक मटण सूपमधून मिळू शकतात.
फक्त इतकंच नाही, तर त्या असंही नमूद करतात की, केस गळतीच्या समस्येवर देखील हे फायदेशीर असतं. त्या पुढे म्हणतात की शेळी किंवा मेंढीच्या पायामध्ये असलेल्या कोलेजनसह इतर महत्त्वाच्या घटकांमुळे आपल्या शरीराला विविध फायदे होतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











