'सर्वांत सुरक्षित' मानले गेलेल्या ड्रीमलायनरचा मोठा अपघात का झाला? बोईंगच्या माजी कर्मचाऱ्याने या विमानाबद्दल काय सांगितलं होतं?

- Author, थियो लेगेट
- Role, आंतरराष्ट्रीय व्यापार प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेत किमान 270 लोकांचा मृत्यू झाला.
बोईंग कंपनीच्या सर्वाधिक नावाजलेल्या आणि लोकप्रिय विमानांपैकी एक असलेल्या विमानाचा हा दुर्दैवी अपघात झाला. आतापर्यंत हे विमान अत्यंत सुरक्षित मानलं जात होतं.
फ्लाईट 171 हे विमान उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदात का आणि कसं कोसळलं हे अद्याप आपल्याला समजलेलं नाही. तपास अधिकारी आता फ्लाईट रेकॉर्डर डेटा (विमानाचा डेटा) मिळवून त्याचा अभ्यास करत आहेत.
परंतु, या दुर्घटनेमुळे ज्यांचं विमान होतं त्या बोईंग कंपनीच्या 787 ड्रीमलायनर या विमानाकडे आता सर्वांचं लक्ष गेलं आहे. नवीन तंत्रज्ञान आणि इंधनाची बचत करणाऱ्या आधुनिक विमानांच्या पहिल्या पिढीतील हे विमान आहे.
या अपघाताच्या आधी 787 विमानाने सुमारे 15 वर्षे कोणत्याही मोठ्या अपघाताशिवाय आणि एकाही जीवितहानीशिवाय सेवा दिली होती.
बोईंगनं दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण काळात, 787 प्रकारच्या विमानांमधून आतापर्यंत एक अब्जांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला होता. सध्या जगभरात 1,100 पेक्षा जास्त 787 विमाने कार्यरत आहेत.
तरीही, या विमानाला अनेक वेळा गुणवत्ता नियंत्रणाच्या (क्वॉलिटी कंट्रोल) समस्यांचा सामना कराव्या लागल्या आहेत.
या विमानावर काम केलेल्या काही कर्मचाऱ्यांनी (व्हिसलब्लोअर्स) उत्पादनाच्या दर्जाबाबत अनेकवेळा चिंता व्यक्त केली आहे. काही जणांनी असंही म्हटलं आहे की, काही धोकादायक त्रुटी किंवा सदोष असलेली विमाने वापरात आणली गेली आहेत. मात्र हे सर्व आरोप कंपनीने कायम नाकारले आहेत.
सोनिक क्रूझर आणि 9/11 चा परिणाम
डिसेंबर 2009 च्या एका गारठलेल्या सकाळी सिएटलजवळील पेन फील्ड विमानतळावर एक नवीन विमान धावपट्टीवर आलं. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या उत्साही लोकांच्या टाळ्यांच्या गजरात ते विमान आकाशात झेपावलं.
हे उड्डाण अनेक वर्षांच्या मेहनतीचं आणि अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीचं फळ होतं.

फोटो स्रोत, Getty Images
787 विमानाची कल्पना 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला मांडण्यात आली. त्यावेळी इंधनाचे दर झपाट्याने वाढत होते आणि त्याचा ताण विमान कंपन्यांवर जाणवत होता.
तेव्हा बोईंगनं एक असं लांब पल्ल्याचं विमान तयार करायचं ठरवलं, जे इंधन कार्यक्षमतेत नवीन मापदंड स्थापित करेल.
"1990 च्या दशकाच्या अखेरीस बोईंग 'सोनिक क्रूझर' नावाच्या एक नवीन विमान डिजाईनवर काम करत होतं," असं विमान इतिहासतज्ज्ञ शिया ओकली यांनी सांगितलं.
हे विमान प्रगत साहित्य आणि नवीन तंत्रज्ञान वापरून सुमारे 250 प्रवाशांना ध्वनीच्या वेगाच्या थोडं कमी वेगाने घेऊन जाईल, अशी सुरुवातीला या विमानाची कल्पना होती.
सुरुवातीचा भर इंधन बचतीपेक्षा प्रवासाचा वेळ कमी करण्यावर आणि वेगावर होता.
"परंतु, 9/11 च्या घटनेचा जागतिक विमान वाहतूक उद्योगावर खूपच गंभीर परिणाम झाला," असं ओकली सांगतात.
"विमान कंपन्यांनी बोईंगला सांगितलं की, त्यांना आता जास्त इंधन-बचत करणाऱ्या आणि किफायतशीर लांब पल्ल्याच्या जेट विमानांची गरज आहे. त्यांना सोनिक क्रूझरसारखीच प्रवासी क्षमता हवी होती, पण वेग जास्त नको होता."
बोईंगने आपली सुरुवातीची संकल्पना बाजूला ठेवली आणि त्यांनी ज्या विमानावर काम सुरू केलं, त्याला पुढे 787 म्हटलं गेलं. हे करताना, त्यांनी विमान कंपन्यांसाठी एक नवा व्यावसायिक नमुना (बिजनेस मॉडेल) निर्माण करण्यास मदत केली.
मोठ्या संख्येने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या महाकाय विमानांचा वापर करून त्यांना मोठ्या 'हब' विमानतळांवर उतरवून पुढे दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या कनेक्टिंग फ्लाईट्सवर पाठवण्याऐवजी, आता विमान कंपन्या लहान प्रवासी क्षमतेची विमाने वापरून थेट कमी गर्दीच्या मार्गांवर उड्डाण करू शकत होत्या.
ही विमाने अशा लहान शहरांमध्ये जातील जिथे पूर्वी थेट विमान सेवा देणं शक्य नव्हतं.
एअरबसचं सुपरजम्बो विमान विरूद्ध बोईंगची इंधन कार्यक्षमता
त्या काळात बोईंगची सर्वांत मोठी स्पर्धक एअरबस ही कंपनी होती. एअरबस नेमकं उलट दिशेने काम करत होतं.
ते A380 सुपरजम्बो नावाचं प्रचंड मोठं विमान तयार करत होते. जे खास करून जगातील सर्वात मोठ्या आणि व्यस्त विमानतळांदरम्यान जास्तीत जास्त प्रवासी एकाच वेळी नेण्यासाठी बनवले जात होतं.
आता मागे वळून पाहिल्यास लक्षात येतं की, बोईंगची पद्धत अधिक हुशारीची ठरली. जास्त इंधन लागणाऱ्या A380 चे उत्पादन 2021 मध्ये बंद करण्यात आलं आणि त्याची निर्मिती बंद करण्यापूर्वी फक्त 251 विमानेच तयार झाले होते.
"एअरबसला वाटत होतं की, भविष्यात प्रवासी नेहमी फ्रँकफर्ट, हिथ्रो किंवा नारिटा सारख्या मोठ्या 'हब' विमानतळांवर विमान बदलण्यास प्राधान्य देतील," असं विमान क्षेत्राचे विश्लेषक आणि एरोडायनॅमिक अॅडव्हायझरीचे मॅनेजिंग डायरेक्टर रिचर्ड अबॉलाफिया सांगतात.
"बोईंगने असं म्हटलं की 'लोकांना थेट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायला आवडतं'. आणि बोईंगचं म्हणणं अगदी बरोबर ठरलं."

फोटो स्रोत, Getty Images
787 हे खरंच एक क्रांतिकारी विमान होतं. प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानांमध्ये ते पहिलं विमान होतं, जे प्रामुख्याने अॅल्युमिनियमऐवजी कार्बन फायबरसारख्या हलक्या कंपोझिट्सपासून तयार करण्यात आलं होतं.
ज्यामुळे विमानाचं वजन कमी होऊ शकेल. यामध्ये हवेचा विरोध (ड्रॅग) कमी करण्यासाठी अत्याधुनिक एअरोडायनॅमिक डिजाईन वापरण्यात आलं होतं.
या विमानात जनरल इलेक्ट्रिक आणि रोल्स रॉयस कंपनीचे अतिशय कार्यक्षम आधुनिक इंजिन्स वापरण्यात आले होते. तसेच, अनेक जड यांत्रिक आणि वायुप्रेरित (न्यूमॅटिक) प्रणालींच्या जागी हलक्या वजनाच्या इलेक्ट्रिक प्रणाली वापरण्यात आल्या.
बोईंगच्या मते, या सर्व बदलांमुळे 787 हे त्याच्या आधीच्या बोईंग 767 विमानापेक्षा 20 टक्के अधिक कार्यक्षम ठरेल. हे विमान आवाजाच्या बाबतीतही खूपच शांत होतं.
विमानाच्या आवाजामुळे जमिनीवर जेवढा भाग त्रस्त होतो (नॉइज फूटप्रिंट), तो एखाद्या पारंपरिक विमानाच्या तुलनेत 60 टक्के पर्यंत कमी असल्याचं कंपनीने सांगितलं.
तत्काळ आपत्कालीन लँडिंग आणि विमानातील आग
मात्र, या विमानाची सेवा सुरू झाल्यानंतर काही काळातच गंभीर अडचणी समोर आल्या. जानेवारी 2013 मध्ये, बोस्टनच्या लोगान आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेटवर थांबलेल्या 787 विमानात लिथियम-आयन बॅटरीने पेट घेतला.
साधारण एका आठवड्यानंतर, जपानमध्ये देशांतर्गत उड्डाणादरम्यान एका 787 विमानातील बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे त्याला आपत्कालीन लँडिंग करावं लागलं.
या समस्येमुळे 787 विमानांची उड्डाणे जगभरात काही महिन्यांसाठी बंद करण्यात आली होती. या कालावधीत बोईंगने यावर उपायही शोधून काढला.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर, दररोजची उड्डाणं तुलनेनं सुरळीत झाली. पण उत्पादन प्रक्रियेमध्ये मोठ्या अडचणी येत राहिल्या.
काही विश्लेषक म्हणतात की, यामागचं एक कारण म्हणजे बोईंगने 787 साठी नवीन असेंब्ली लाईन सिएटलपासून तब्बल 2000 मैल दूर, साऊथ कॅरोलिनामधील नॉर्थ चार्ल्सटन इथे सुरू करण्याचा घेतलेला निर्णय असू शकतो.
हे पाऊल उचलण्यामागे तिथल्या कामगार संघटनांची कमी सदस्यसंख्या आणि राज्य सरकारकडून मिळणारा पाठिंबा ही दोन मुख्य कारणं होती.
"तेथे विकास प्रक्रियेत अनेक गंभीर अडचणी होत्या," असं अबौलाफिया सांगतात. "विशेषतः बोईंगने प्युजेट साउंड भागाबाहेर पहिल्यांदाच उत्पादन लाईन सुरू करण्याचा घेतलेला निर्णय, ही काही ठळक उत्पादन समस्यांची मुख्य कारणं होती."
व्हिसलब्लोअरचे गंभीर आरोप
2019 मध्ये बोईंगला उत्पादनातील पहिला मोठा दोष आढळून आला, जो विमानाच्या विविध भागांना एकत्र बसवण्याच्या प्रक्रियेशी संबंधित होता.
पुढे आणखी त्रुटी आढळल्यानंतर कंपनीने तपासाची व्याप्ती वाढवली आणि त्यामध्ये नंतर इतर अनेक समस्या उघडकीस आल्या.
याचा विमानांच्या डिलेव्हरीवर मोठा परिणाम झाला, आणि मे 2021 ते जुलै 2022 या काळात त्या पूर्णपणे थांबवण्यात आल्या. त्यानंतर पुढच्या वर्षी त्या पुन्हा एकदा थांबवाव्या लागल्या.
मात्र, 787 च्या प्रोग्रामबाबतचे सर्वात गंभीर आणि नुकसानकारक आरोप बोईंगच्या स्वतःच्या सध्याच्या आणि माजी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले आहेत.
या आरोपांमध्ये सर्वात ठळक नाव होतं दिवंगत जॉन बार्नेट यांचं. ते साउथ कॅरोलिनामधील 787 विमान कारखान्यात गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थापक होते.
त्यांनी असा आरोप केला होता की, 'लवकर विमाने तयार करण्याच्या दबावामुळे सुरक्षेच्या बाबतीत गंभीर तडजोड झाली.'

फोटो स्रोत, AFP via Getty Images
2019 मध्ये त्यांनी 'बीबीसी'ला सांगितलं होतं की, त्या कारखान्यातील कामगारांनी सुटे भाग योग्य प्रकारे ट्रॅक करण्यासाठी आखून दिलेल्या कडक प्रक्रियेचे पालन केलं नव्हतं, त्यामुळे काही वेळेस खराब भाग गहाळ होण्याची शक्यता होती.
काही प्रकरणांमध्ये तर त्यांनी सांगितलं की, उत्पादनात उशीर होऊ नये म्हणून काही कामगारांनी स्क्रॅपमधून निकृष्ट दर्जाचे भाग जाणीवपूर्वक विमानात बसवले होते.
त्यांनी असंही सांगितलं की, विमानाचा डेक (मजल्याचा भाग) सुरक्षित करण्यासाठी खराब फिक्सिंग्ज वापरण्यात आले. त्या भागांना स्क्रूने घट्ट बसवताना धारदार धातूचे कण तयार होत होते, जे काही वेळा डेकच्या खाली जमा होत आणि तिथे मोठ्या प्रमाणात वायरिंग असलेल्या भागांमध्ये जमा होत असत.
त्यांनी केलेले आरोप याआधीच अमेरिकेचे विमानतळ प्राधिकरण, फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनकडे (एफएए) पाठवले गेले होते, आणि त्यांनी काही अंशी हे आरोप मान्यही केले होते. तपासानंतर त्यांनी कारखान्यात किमान 53 'नियमांनुसार न बसणारे' सुटे भाग गायब आहेत, असा निष्कर्ष काढला.
एफएएच्या तपासणी अहवालातही हे स्पष्ट करण्यात आलं की, अनेक विमानांच्या फ्लोअरखाली धातूचे कण (मेटल शेव्हिंग्ज) आढळले होते.
बोईंगने सांगितलं की, त्यांच्या संचालक मंडळाने या समस्येचा अभ्यास केला आहे आणि असा निष्कर्ष काढला की, यामुळे 'विमानाच्या सुरक्षिततेस कोणताही धोका निर्माण होत नाही.'
मात्र, त्यानंतर त्या फिक्सिंग्जचे नवे डिझाइन तयार करण्यात आले. नंतर कंपनीने असंही सांगितलं की, एफएएने निष्कर्षांच्या निराकरणाबाबत केलेल्या निरीक्षणांवर उपाययोजना केल्या आहेत आणि अशा समस्या पुन्हा होऊ नयेत म्हणून सुधारणाही लागू केल्या आहेत.
'काहीतरी मोठं घडेल पण वेळ माहिती नाही'
बार्नेट यांना सतत चिंता होती की, जे 787 विमाने आधीच सेवेत आहेत, त्यांच्यात अशा काही लपलेल्या त्रुटी किंवा दोष असू शकतात ज्या एखाद्या मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतात.
2019 मध्ये त्यांनी मला सांगितलं, "माझा विश्वास आहे की, 787 संदर्भात काहीतरी मोठं होणार, फक्त त्याची वेळ माहीत नाही."
पुढे ते म्हणाले, "मी प्रार्थना करतो की माझं म्हणणं चुकीचं ठरो."
2024 च्या सुरुवातीला बार्नेट यांनी आत्महत्या केली. त्यावेळी ते कंपनीविरोधात सुरू असलेल्या एका दीर्घकाळ चाललेल्या व्हिसलब्लोअर (अंतर्गत माहिती उघड करणाऱ्या) खटल्यात साक्ष देत होते.
ज्यामध्ये त्यांचा आरोप होता की, त्यांच्या तक्रारीमुळे बोईंगने त्यांना त्रास दिला. बोईंगने मात्र हे आरोप फेटाळले होते.
त्यांनी केलेल्या अनेक आरोपांची पुनरावृत्ती या कारखान्यातील आणखी एक माजी गुणवत्ता व्यवस्थापक सिंथिया किचेन्स यांनी पूर्वीच केली होती.
2011 मध्ये, सिंथिया किचेन्स यांनी नियामकांकडे तक्रार केली होती की, उत्पादन लाइन सुरू ठेवण्यासाठी मुद्दाम निकृष्ट दर्जाचे सुटे भाग क्वारंटाईन (तपासणीसाठी बाजूला ठेवलेल्या) डब्यातून काढून विमानात बसवले जात होते.
सिंथिया किचेन्स या 2016 मध्ये बोईंगमधून बाहेर पडल्या होत्या. त्या असंही म्हणाल्या की, कामगारांना निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष करण्यास सांगण्यात आले होते.
त्यांचं म्हणणं होतं की, काही विमानांमध्ये मुद्दाम अशा वायरिंग बंडल्स बसवण्यात आल्या होत्या, ज्यांच्या आवरणामध्ये धातूचे बारीक कण होते आणि त्यामुळे शॉर्ट-सर्किट होण्याचा धोका निर्माण झाला होता.
बोईंगने या विशिष्ट आरोपांवर काही प्रतिक्रिया दिली नाही, पण त्यांनी असं म्हटलं की, 2016 मध्ये सिंथिया किचेन्स यांना 'परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट प्लॅनवर ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिल्यानंतर' त्यांनी राजीनामा दिला.
कंपनीने असंही सांगितलं की, त्यानंतर किचेन्स यांनी बोईंगविरोधात एक खटला दाखल केला होता, ज्यामध्ये 'गुणवत्तेशी संबंधित नसलेल्या भेदभाव आणि सूडबुद्धीचे आरोप' करण्यात आले होते, आणि हा खटला फेटाळण्यात आला होता.

फोटो स्रोत, Getty Images
अगदी अलीकडे, तिसऱ्या एका व्हिसलब्लोअरने गेल्या वर्षी अमेरिकेच्या सिनेट समितीसमोर साक्ष दिल्यानंतर त्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर गाजल्या.
सॅम सालेहपूर, जे सध्या बोईंगमध्ये काम करतात, त्यांनी अमेरिकन खासदारांना सांगितलं की, "मी पुढे येण्याचा निर्णय घेतला. कारण बोईंगमध्ये मी जे सुरक्षा संबंधित प्रश्न पाहिले आहेत, ते जर दूर केले नाहीत तर प्रवासी विमानाचा मोठा अपघात होऊ शकतो आणि शेकडो जीव गमवावे लागू शकतात."
या गुणवत्ता अभियंत्याने सांगितलं की, 2020 च्या शेवटी 787 वर काम करत असताना त्यांनी पाहिलं की, कंपनीने विमानांचे उत्पादन आणि वितरण वेगाने पूर्ण करण्यासाठी असेंब्ली प्रक्रियेत शॉर्टकट्स वापरायला सुरुवात केली होती.
यामुळे, त्यांच्या मते, "787 विमानांच्या ताफ्यात काही दोषयुक्त भाग आणि चुकीच्या फिटिंग्ज होण्याची शक्यता निर्माण झाली होती."
ते म्हणाले की, त्यांनी पाहिलेल्या बहुतेक विमानांमध्ये, फ्यूजलेजच्या (विमानाच्या मुख्य शरीराच्या) वेगवेगळ्या भागांना जोडणाऱ्या सांध्यांमध्ये छोटे-छोटे अंतर (गॅप्स) होते, जे योग्य पद्धतीने दुरुस्त करण्यात आले नव्हते.
त्यांचा दावा होता की, यामुळे हे सांधे वेळेच्या आधीच तुटू शकतात आणि यामुळे 'विमानासाठी अत्यंत असुरक्षित परिस्थिती' निर्माण होते, ज्याचे परिणाम 'अत्यंत धोकादायक' ठरू शकतात.
त्यांनी सुचवलं की 1,000 पेक्षा अधिक विमाने म्हणजेच 787 ताफ्याचा मोठा हिस्सा या समस्येने प्रभावित झाले असण्याची शक्यता आहे.
बोईंगचा आग्रह आहे की, '787 विमानाच्या रचनात्मक मजबुतीबाबतचे आरोप चुकीचे आहेत.' कंपनी म्हणते, "उपस्थित केलेले मुद्दे अमेरिकन फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या देखरेखीखाली कठोर तपासणीच्या प्रक्रियेत गेले आहेत. या तपासणीत सिद्ध झालं आहे की, हे विमान अनेक दशकांपर्यंत टिकाऊपणा आणि सेवा आयुष्य राखू शकेल, आणि या मुद्द्यांमुळे कोणताही सुरक्षा धोका निर्माण होत नाही."
'गंभीर समस्या असत्या तर आतापर्यंत समोर आल्या असत्या'
अलीकडच्या काही वर्षांत बोईंगवर त्यांच्या कामकाजाच्या पद्धती आणि उत्पादनाच्या दर्जाबाबत मोठा दबाव आला आहे, हे नक्कीच स्पष्ट आहे.
कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या 737 मॅक्स विमानाच्या दोन जीवघेण्या अपघातांनंतर, आणि गेल्या वर्षी घडलेल्या आणखी एका गंभीर घटनेनंतर, बोईंगवर अनेकदा असा आरोप झाला आहे की, त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेपेक्षा नफ्यावर अधिक लक्ष दिलं आहे.
असा म्हटलं जात आहे की, गेल्या वर्षी कंपनीत दाखल झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी केली ऑर्टबर्ग, हा समज बदलण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत.
त्यांनी कंपनीच्या अंतर्गत प्रक्रियांमध्ये मोठे बदल सुरू केले आहेत आणि सुरक्षा व गुणवत्ता नियंत्रणासाठी सखोल योजना तयार करण्यासाठी नियामक संस्थांबरोबर काम करत आहेत.
पण 787 विमानाला पूर्वीच्या चुका आणि अपयशांमुळे आधीच धोका निर्माण झाला आहे का? ज्यामुळे आजही सुरक्षेचे प्रश्न कायम राहिले असतील?

फोटो स्रोत, Reuters
रिचर्ड अबॉलाफिया यांना असं वाटत नाही. ते म्हणतात, "माहिती आहे ना, 16 वर्षं सेवा सुरू आहे, 1,200 विमाने आणि एक अब्जांहून अधिक प्रवासी प्रवास करूनही आजपर्यंत एकही अपघात झाला नव्हता." ते पुढे म्हणतात, "हा एक अत्यंत चांगला सेफ्टी रेकॉर्ड आहे."
त्यांना वाटतं की, जर एखादी मोठी समस्या असती, तर ती आतापर्यंत समोर आली असती.
"माझ्या मते उत्पादनातील समस्या या तात्पुरत्या काळासाठीच चिंता निर्माण करणाऱ्या आहेत," असं ते म्हणतात.
"गेल्या काही वर्षांपासून 787 विमानाच्या उत्पादनावर अधिक कठोर देखरेख ठेवण्यात येत आहे."
"माझ्या मते, जुन्या विमानांमध्ये जर काही गंभीर समस्या असती, तर ती आत्तापर्यंत समोर आली असती."
अहमदाबादमध्ये कोसळलेलं एअर इंडियाचं विमान 11 वर्षांहून अधिक जुने होते, या विमानाने 2013 मध्ये पहिल्यांदा उड्डाण केले होते.
परंतु, फाउंडेशन फॉर एव्हिएशन सेफ्टी ही अमेरिकेतील संस्था, जी माजी बोईंग व्हिसलब्लोअर एड पियर्सन यांनी स्थापन केली आहे. ही संस्था पूर्वीपासूनच बोईंगवर तीव्र टीका करत आली आहे, त्यांनी अलीकडच्या अपघातापूर्वीही 787 विमानांबाबत चिंता व्यक्त केली होती.
"होय, यामध्ये संभाव्य सुरक्षा धोका होता," असा दावा पियर्सन करतात. "आम्ही अपघातांची अहवाल आणि नियामक दस्तऐवजांचे सतत निरीक्षण करत असतो.
उड्डाणासाठी योग्यतेसंबंधी सूचना (एअरवर्थिनेस डायरेक्टिव्ह्स) येतात, ज्या वेगवेगळ्या समस्यांबद्दल सांगतात, आणि त्यामुळे शंका येणं साहजिकच आहे."

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या मते, अशाच एका गंभीर समस्येमध्ये बाथरूममधील नळांमधून गळणारे (लीकेज) पाणी इलेक्ट्रिकल उपकरणांच्या भागात जाण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी एफएएने विमान कंपन्यांना नियमित तपासण्या करण्याचे आदेश दिले, कारण काही 787 मॉडेल्समध्ये ही गळती लक्षात न येण्याच्या तक्रारी आल्या होत्या.
तरीही, ते स्पष्टपणे सांगतात की, अलीकडील दुर्घटनेचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. ही चौकशी लवकरात लवकर पुढे नेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून समस्या कुठेही असोत विमानात, विमान कंपनीत किंवा दुसरीकडे त्या शोधून काढता येतील आणि त्यावर उपाय करता येईल.
सध्या तरी 787 विमानाचं सुरक्षिततेचं रेकॉर्ड मजबूत आहे.
"आता या क्षणी आपल्याला एअर इंडिया अपघाताचं नेमकं कारण माहिती नाही," असं एव्हिएशन कन्सल्टिंग फर्म लीहॅम कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक स्कॉट हॅमिल्टन म्हणतात.
"पण या विमानाबद्दल आपल्याला जे काही माहीत आहे, त्यावरून मी 787 मध्ये बसण्याबाबत अजिबात संकोच करणार नाही," असंही ते स्पष्ट करतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











