'मॅलिन 1' ने किती आकाशगंगा केल्या गिळंकृत? पुण्यातील शास्त्रज्ञांचं महत्त्वाचं संशोधन

फोटो स्रोत, NRAO/AUI/NSF/S. DAGNELLO
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
मॅलिन 1 ही आकाशगंगा नवीन ताऱ्यांच्या निर्मितीसाठी चक्क लहान आकाशगंगा गिळंकृत करत आहे. पुण्याच्या आयुकामधील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.
आत्तापर्यंत आकाशगंगेतले तारे निर्माण होत असताना हायड्रोजन वायू आणि धुळीचे विशाल ढग म्हणजे नेब्युला स्वत: भोवती कोसळतात. त्यातून निर्माण झालेल्या दाबातून तारे निर्माण होत असल्याचं मानलं जात होतं.
आता या संशोधनामुळे दूरवरच्या आकाशगंगेतला हा नवा पैलू समोर आला आहे.
आयुकामधील शास्त्रज्ञ डॉ. कनक साहा आणि पीएचडी संशोधक मनीष कटारिया यांनी हे संशोधन केलं आहे.
मॅलिन 1 ही आकाशगंगा साधारण 40 वर्षांपूर्वी शोधली गेली. मात्र त्यानंतरही गेली अनेक वर्ष खगोलशास्त्रीय संशोधकांसाठी हे एक गूढच राहिलं होतं.
या आकाशगंगेची निर्मिती नेमकी कशी झाली? त्यात ताऱ्यांची निर्मिती कशी होत आहे? याविषयी खगोलशास्त्रज्ञांनी अनेक शक्यता मांडल्या होत्या.
मॅलिन ही अत्यंत मोठी आकाशगंगा असून त्याचा फक्त मध्यवर्ती भाग हाच आपल्या आकाशगंगेच्या तारकीय डिस्कच्या आकाराचा आहे. तर त्याच्या अत्यंत कमकुवत सर्पिल भुजा जवळजवळ तीन लाख प्रकाशवर्षांपर्यंत पसरलेल्या आहेत.
ही आकाशगंगा अलिप्त आणि अबाधित दिसत असूनही, आतून बदलत राहिली आहे. म्हणजेच यात नव्या ताऱ्यांची निर्मिती होत आहे.

या आकाशगंगेच्या आकारमानाबाबत सांगताना कटारिया म्हणाले की, "ही आकाशगंगा आपल्या आकाशगंगेच्या साधारण 6 पट मोठी अशी आहे. म्हणजे समजा आपली आकाशगंगा जर एक व्यवस्थित प्रकाश असणारं लहान गाव असेल तर त्याच्या तुलनेत मॅलिन हे अत्यंत कमी प्रकाश असलेलं पण मोठं शहर आहे, असं म्हणावं लागेल."
या आकाशगंगेचं आकारमान लक्षात घेता डॉ. साहा आणि कटारिया त्याबद्दल उपलब्ध असणाऱ्या माहितीवर आधारित संशोधन करत होते. पण हा शोध मात्र अपघातानेच लागल्याचं ते सांगतात.
कटारिया म्हणाले, " आम्ही या दिशेने विचार करत नव्हतो. या आकाशगंगेबाबत जी माहिती उपलब्ध आहे त्यावर आधारित चार ते पाच संशोधनं प्रकाशित झाली आहेत.
आम्ही देखील उपलब्ध माहितीचं अँनलिसिस करत होतो. त्याचवेळी डॉ. साहा यांना यातला सी 1 हा एक गुच्छ (कल्म्प) दिसला. या कल्मपच्या बाबतीत काहीतरी वेगळं असल्याचं त्यांना जाणवलं आणि मग आमचं संशोधन त्या दिशेने सुरू झालं"
संशोधन कसं झालं?
मॅलिन आकाशगंगेचं अंतर आणि त्याच्या बाबत उपलब्ध माहिती पाहता इन्फ्रारेड इमेजिंग मधून उपलब्ध माहिती मिळू शकत नव्हती.
त्यामुळे शास्त्रज्ञांनी अँस्ट्रोसॅट वरच्या अल्ट्राव्हॉयलेट इमेजिंग टेलिस्कोपचा वापर यासाठी केला. यावरून मिळालेल्या माहितीचे या शास्त्रज्ञांनी चिली मधल्या मल्टी युनिट स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सप्लोरर (MUSE) या उपकरणाच्या आधारे विश्लेषण केले.
यात या तारका गुच्छाच्या भोवतीचा म्हणजे C1 चा भाग जवळजवळ 150 किमी/सेकंद वेगाने फिरत आहे. याचा अर्थ या भागात अशांतता आहे जो बाह्य उत्पत्तीचे संकेत देतो. तसेच यात सहा अब्ज वर्षांहून अधिक जुनी तारकीय लोकसंख्या असल्याचेही आढळले.

कटारिया सांगतात की, "या गुच्छात 200 मेगा वर्ष जुने तारे होते. निरिक्षण करताना असं आढळलं की, या गुच्छात धातूचं प्रमाण अधिक होतं. मात्र या ताऱ्यांमध्ये मात्र धातूचं प्रमाण कमी होतं.
जर हे तारे याच गुच्छात तयार झाले असतील, तर त्यात धातू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असायला हवा. याचाच अर्थ हे या गुच्छात तयार झालेले तारे नाहीत".
यानंतर साहा आणि कटारिया यांनी याची कारणं शोधायला सुरुवात केली. हे तारे असे वेगळे का आहेत? याचा शोध त्यांनी घ्यायला सुरुवात केली. यातच त्यांना ही बाब आढळली की, हे तारे या गुच्छाचा भाग नसून या आकाशगंगेने गिळंकृत केलेल्या इतर लहान आकाशगंगा मधून आले आहेत."
या प्रक्रियेबाबत संशोधकांनी सांगीतलं की, यापूर्वी धडकेतून आकाशगंगा मोठ्या होत असल्याचं मानलं जात होतं. मात्र या संशोधनातून लहान आकाशगंगा गिळंकृत करून त्याला आपल्या आकाशगंगेचा भाग बनवलं जात असल्याचं दिसलं आहे.
एखाद्या मोठ्या दगडावर लहान दगड मारला तर काय परिणाम होऊ शकतो? तशाच पद्धतीने या लहान आकाशगंगा मोठ्या आकाशगंगेत समाविष्ट होत असल्याचं त्यांनी सांगीतलं.
संशोधनाचे महत्व काय?
आयुकाच्या गटाने या आकाशगंगेच्या मध्यभागात तरुण तारा तयार करणारे अनेक गुच्छ ओळखले. यातील एक सी1 नावाचा गुच्छ हा इतरांच्या तुलनेत मोठा आणि चमकदार होता. मॅलिन 1 मध्ये मध्यवर्ती भागात ताऱ्यांच्या निर्मितीची प्रक्रिया थांबली आहे.
मात्र सी 1 चा वेग आणि इतर वैशिष्ट्यांमुळे तो या आकाशगंगेच्या बाहेरचा आहे असे सुचित झाले. त्यावरून मॅलिन 1 या आकाशगंगेने एखादी आकाशगंगा गिळंकृत केल्याचे दिसले.
अशा गिळंकृत करण्यामुळं या आकाशगंगेची वाढ होत असल्याचं सुचित होत असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. साहा म्हणाले, "आपली आकाशगंगा म्हणजेच 'मिल्की वे' हीपण अशाच पद्धतीने लहान आकाशगंगा गिळंकृत करत असल्याचं दिसतं.
आपल्या जवळची आकाशगंगा म्हणजे अँड्रोमेडाही आकाशगंगा गिळंकृत करत असल्याचे पुरावे आहेत. मात्र 2013 पर्यंत मिल्की वे मध्ये अशा फक्त 3 आकाशगंगा गिळंकृत केल्याचं आढळलं होतं."
"आता मात्र अशा 41 आकाशगंगा असल्याचं संशोधनात दिसत आहे. पण हे झालं जवळच्या आकाशगंगांच्या बाबत ज्याच्या निर्मितीपासूनची निरीक्षणं आणि त्यावर संशोधनं उपलब्ध आहेत.
जेव्हा लांबवरच्या आकाशगंगेच्या बाबत हा अभ्यास करायचा असतो तेव्हा मात्र हे अवघड होते. त्यामुळे मॅलिन 1 बाबतचं हे संशोधन महत्वाचं ठरतं".
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











