गॅरी सोबर्स: 12 बोटं, ओव्हरमध्ये 6 सिक्स, अन् 365 धावांची खेळी; भारतीय अभिनेत्रीशी असा होता संबंध

गॅरी सोबर्स: 12 बोटं, ओव्हरमध्ये 6 सिक्स, अन् 365 धावांची खेळी; भारतीय अभिनेत्रीशी असा होता संबंध

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अब्दुल रशीद शकूर
    • Role, बीबीसी उर्दू
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

क्रिकेट विश्वातील महान अष्टपैलू खेळाडू सर गॅरी सोबर्स यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्याबाबत बीबीसी हिंदीनं 2022 मध्ये प्रसिद्ध केलेला लेख याठिकाणी देत आहोत.

------------------------------------------------

सर गॅरी सोबर्स लहानाचे मोठे होत असताना जेव्हा समज येऊ लागली तेव्हा दोन्ही हातांना पाच बोटं आणि एक अंगठा असलेलं पाहून त्यांना तेव्हा फार काही काळजी वाटली नाही.

सोबर्स यांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या पहिल्याच प्रकरणात यावर अत्यंत सविस्तरपणे लिहिलं आहे. "खरं तर बरेच लोक म्हणतात की मी भाग्यवान होतो, कारण माझ्या हाताला दोन जास्त बोटं होती."

"कदाचित ते त्यांचं मत असेल. पण मी याबाबत फार कधी विचार केला नाही. दोन्ही हातांना सहा बोटं असल्यामुळं मला काहीही अडचण आली नाही किंवा माझ्या कामातही कोणताही अडथळा आला नाही."

त्यांच्या मते, "वेस्ट इंडिजमध्ये अजूनही असामान्य शारीरिक वैशिष्ट्ये असलेले अनेक लोक आहेत. मी स्वतः एका वेस्ट इंडिजच्या नागरिकाला भेटलो आहे, त्यालाही माझ्याप्रमाणेच दोन्ही हातांना अतिरिक्त बोटे होती."

पण गॅरी सोबर्स यांनी ही दोन अतिरिक्त बोटे कायम ठेवली नाहीत. नऊ-दहा वर्षांचे असताना, त्यांनी एका हाताचं अतिरिक्त बोट एका धारदार वस्तूने कापून टाकलं. शिवाय, पंधरा वर्षांचे असताना दुसऱ्या हाताचे अतिरिक्त बोटही एका धारदार सुरीने कापून टाकले.

सर गॅरी सोबर्स यांचा जन्म 28 जुलै 1936 रोजी ब्रिजटाऊन इथं झाला. त्यांचे वडील कॅनेडियन मर्चंट नेव्हीमध्ये होते. जर्मनांनी त्यांच्या वडिलांची बोट बुडवली, तेव्हा सोबर्स फक्त पाच वर्षांचे होते.

ओव्हरमध्ये सहा सिक्स आणि चेंडूही हरवला

क्रिकेट हा सोबर्स यांचा सर्वात आवडता छंद होता. पुढे तेच त्यांच्यासाठी सर्वकाही बनलं. ते आठ वर्षांचे असताना बार्बाडोसच्या वॉन्डरर्स मैदानावर धावफलकावर स्कोअरिंग काम करायचे.

स्कोअरिंगच्या कामाचा त्यांना अशा फायदा झाला की, त्या काळातील सर्व महान क्रिकेटपटूंना विशेषतः फ्रँक वॉरल, क्लाइड वॉलकॉट आणि एव्हर्टन वीक्स अशा क्रिकेटपटूंना त्यांना अगदी जवळून खेळताना पाहता आलं.

वॉन्डरर्सच्या मैदानांवर काम करणाऱ्या फ्रँक ग्रँट आणि बर्गेस ग्रँडिसन या दोन जणांचा त्यांच्या कारकिर्दीवर मोठा प्रभाव होता.सर गॅरी सोबर्स त्यांना खेळपट्ट्या तयार करण्यास मदत करायचे आणि मोबदल्यात त्यांना त्या मैदानावर खेळण्याची परवानगी मिळायची.

ओव्हरमध्ये सहा सिक्स आणि चेंडूही हरवला

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बर्गेस यांनी गॅरी सोबर्समध्ये असलेली क्षमता ओळखली आणि वेस्ट इंडिजचे तेव्हाचे कर्णधार डेनिस ऍटकिन्सनला त्याबद्दल सांगितलं. त्यांनीच सोबर्सला त्यांच्यासोबत सराव करण्याची संधी दिली.

इंग्लिश काउंटी संघ नॉटिंगहॅमशायरने गॅरी सोबर्स यांच्याशी करार केला, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. प्रत्येक सिझनसाठी पाच हजार पाऊंड, त्यासोबत राहण्याची सोय, एक गाडी आणि बार्बाडोसचं तिकीट यापेक्षा अधिक काय मिळणार, असं तेव्हा त्यांना वाटलं होतं.

त्यांच्या मते ते 1968 आधीच काऊंटी क्रिकेट खेळू शकले असते, पण काऊंटी क्रिकेटसाठी पात्र होण्याकरिता दोन वर्षे इंग्लंडमध्ये राहण्याची आणि स्वतःच्या देशाचे प्रतिनिधित्व न करण्याची अट त्यांना अजिबात मान्य नव्हती.

सर गॅरी सोबर्स यांनी काऊंटी क्रिकेटमध्ये अनेक शानदार खेळी खेळल्या असल्या तरी, त्यांच्या पहिल्याच हंगामात स्वानसी येथे ग्लॅमॉर्गनविरुद्ध केलेली त्यांची नाबाद 76 धावांची खेळी एका खास कारणास्तव नेहमीच स्मरणात राहील.

याच खेळीत सोबर्स यांनी एकाच षटकात सहा षटकार मारले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीही कोणत्याही फलंदाजाने एका षटकातील प्रत्येक चेंडूवर षटकार मारला नव्हता.

सोबर्सच्या आक्रमकतेचा फटका बसलेला दुर्दैवी गोलंदाज म्हणजे डावखुरा मध्यमगती गोलंदाज मॅल्कम नॅश, पण कर्णधार टोनी लुईसने त्याला त्या सामन्यात फिरकी गोलंदाजी करण्यास सांगितले होते.

सोबर्स यांचा पहिला षटकार डीप मिडविकेटच्या दिशेने गेला. दुसरा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने तर तिसऱ्या चेंडूवर सोबर्सने एक सरळ षटकार मारला. चौथ्या चेंडूवर डीप फाइन लेगचा षटकार मारल्यानंतर पाचव्या चेंडूवर रॉजर डेव्हिसने लाँग ऑफ सीमारेषेवर त्यांचा झेल घेतला. पण तोल गेला आणि तो सीमारेषेबाहेर पडला. त्यानंतर, सोबर्स यांनी शेवटचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या पलीकडे षटकार मारत इतिहास रचला.

365 धावांची विश्वविक्रमी खेळी

फोटो स्रोत, Getty Images

शेवटच्या षटकाराच्या वेळी चेंडू सीमारेषेबाहेर गेला होता. अकरा वर्षांच्या रिचर्ड लुईस यांना तो चेंडू जवळच्याच एका बागेत सापडला आणि त्यांनी तो क्रिकेट समालोचक वुल्फ वूलर यांच्याकडे दिला. त्यांनी तो नंतर नॉटिंगहॅमशायर काऊंटी प्रशासनाकडं सुपूर्द केला, त्यामुळं तो नॉटिंगहॅमशायर काउंटी संग्रहालयाचा भाग बनला.

सर गॅरी सोबर्स म्हणतात, "माझ्या सहा षटकारांच्या व्हीडिओ रेकॉर्डिंगबद्दल एक रंजक किस्सा आहे. वुल्फ वूलर बीबीसी टीव्हीसाठी समालोचन करत होते. मी पहिला षटकार मारला, तेव्हा निर्मात्यानं त्यांना सांगितले की सामना पुढे रेकॉर्ड करण्याऐवजी, त्यांनी स्टुडिओमध्ये परत आल्याची घोषणा करावी.

पण त्यांनी निर्मात्याकडं अधिक वेळ मागितला. जेव्हा मी सलग तिसरा षटकार मारला, तेव्हा वूलरनं निर्मात्याला सांगितलं की काहीही झालं तरी, हा सामना रेकॉर्ड केला जाईल, स्टुडिओमध्ये परत जाता येणार नाही."

सोबर्स म्हणाले, "जर या खेळीची नोंद झाली नसती, तर जगावर त्याचा तेवढाच प्रभाव पडला नसता. विशेषतः त्या झेलचा, ज्यामध्ये क्षेत्ररक्षक रॉजर डेव्हिस सीमारेषेबाहेर पडलेला स्पष्टपणे दिसत होता."

365 धावांची विश्वविक्रमी खेळी

गॅरी सोबर्स यांनी 1954 मध्ये कसोटी पदार्पण केलं असले तरी, पहिल्या कसोटी शतकासाठी त्यांना चार वर्षे वाट पाहावी लागली. पण त्यांनी ही प्रतीक्षा शतकाने नव्हे, तर आपल्या 17 व्या कसोटीतील त्रिशतकाने संपली.

सर गॅरी सोबर्स यांना पहिलं शतक करायला खूप वेळ लागल्याबद्दल लोक टीका करायचे. पण ते हे विसरायचे की सोबर्स यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात गोलंदाज म्हणून केली होती.

संघ व्यवस्थापक बर्कले गॅस्किन आणि क्रिकेट समालोचक रॉय लॉरेन्स एकदा गॅरी सोबर्सबद्दल म्हणाले होते की, "जेव्हाही सोबर्स आपले पहिले शतक झळकावेल तेव्हा तो तिथेच थांबणार नाही. उलट त्याचे द्विशतक किंवा त्रिशतकात रूपांतर करेल. नेमके तसेच घडले."

1958 मध्ये पाकिस्तानविरुद्ध किंग्स्टन कसोटीत त्यांनी 365 धावांची नाबाद अविस्मरणीय खेळी करून सर लिन हटन यांचा 364 धावांचा विश्वविक्रम मोडला.

सोबर्स यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक खेळीचा विक्रम 36 वर्षे टिकून होता. तो ब्रायन लाराने 375 धावा करून मोडला.

यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने 380 धावांची खेळी केली, पण ब्रायन लाराने 400 धावा करून पुन्हा या विश्वविक्रमावर नाव कोरले आणि हा विक्रम आजही कायम आहे.

365 धावांची विश्वविक्रमी खेळी

फोटो स्रोत, BETTMANN/GETTY IMAGES

सोबर्स त्यांच्या पुस्तकात लिहितात की, "त्या डावादरम्यान रात्री मला फार कमी झोप लागली होती. मला आठवतं, जेव्हा मी त्रिशतक पूर्ण केलं, तेव्हा क्लाइड वॉलकॉटने मला सांगितलं की, विश्वविक्रम मोडण्यासाठी मी आणखी 65 धावा करण्याचा प्रयत्न करावा. वॉलकॉट असंही म्हणाला की, माझ्या कारकिर्दीत मला पुन्हा 300 धावा करता येणार नाहीत, त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत विश्वविक्रमासाठी प्रयत्न करायला हवा."

सोबर्सच्या खेळीबद्दल परस्परविरोधी माहितीही आहे. त्यात ते दोनदा बाद झाले होते पण पंचांनी बाद दिले नाही, असंही म्हटलं जातं. अब्दुल हाफीज करदार यांच्या 'ग्रीन शॅडोज' या पुस्तकात म्हटलं आहे की, तो 334 धावांवर असताना फजल महमूदच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक इम्तियाज अहमदने त्याचा झेल घेतला, पण पंचांनी त्याला बाद दिले नाही.

याउलट, हनिफ मोहम्मद त्यांच्या आत्मचरित्रात स्पष्टपणे नमूद करतात की, सोबर्सने खेळीदरम्यान गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. सोबर्स स्वतः सांगतात की, त्या डावात बाद होण्याची त्यांना फक्त एकच संधी होती, जेव्हा त्यांनी खान मोहम्मदचा चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळून एक धाव घेतली आणि सुदैवाने वकार हसनचा थ्रो चुकीच्या बाजूला गेला.

'दोन्ही हातांनी गोलंदाजी कर'

या डावात गॅरी सोबर्स यांची धावसंख्या 363 वर पोहोचली, तेव्हा कर्णधार अब्दुल हाफीज करदारने चेंडू हनिफ मोहम्मदकडं सोपवला. सोबर्स यांनी पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली आणि वॉलकॉटने पुढच्या चेंडूवर एक धाव काढली.

तेव्हा हनिफ मोहम्मद यांनी पंचांना विचारलं की चे डाव्या हाताने गोलंदाजी करू शकतात का? पंचांनी सोबर्सला विचारलं, तेव्हा त्यांचं उत्तर होतं: "माझा काय आक्षेप असू शकतो? हनिफ मोहम्मदची इच्छा असेल, तर तो दोन्ही हातांनी गोलंदाजी करू शकतो."

'दोन्ही हातांनी गोलंदाजी कर'

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर सोबर्स यांनी कव्हरच्या दिशेने खेळून एक धाव घेतली आणि सर लेन हटनचा 365 धावांचा विश्वविक्रम मोडला.

सोबर्सचे यांचं अभिनंदन करण्यासाठी हजारो प्रेक्षक मैदानात घुसले होते, त्यामुळे खेळ सुमारे 20 मिनिटे थांबवण्यात आला. प्रेक्षकांमुळे खेळपट्टीच्या काही भागाचे नुकसानही झाले आणि तिची दुरुस्ती होईपर्यंत पाकिस्तानी संघाने खेळण्यास नकार दिला.

पाकिस्तानी पंचांवर आरोप

सर गॅरी सोबर्स यांनी त्यांच्या आत्मचरित्रात असा आरोप केला आहे की, 365 धावांच्या संस्मरणीय मालिकेनंतर जेव्हा ते पाकिस्तानात गेले, तेव्हा त्यांना खराब पंचगिरीचा सामना करावा लागला.

सोबर्स म्हणतात, "कराची कसोटीच्या पहिल्या डावात, फजल महमूदचा लेग स्टंपच्या बाहेरच्या बाजुला असलेला चेंडू पॅडला लागला, पण पंचांनी मला एलबीडब्ल्यू दिले.

मला आश्चर्य वाटले, पण मी काही बोललो नाही. मग दुसऱ्या डावात, फजल महमूदचा चेंडू बॅटची कड घेऊन लेग स्लिपला उभ्या असलेल्या इजाज बटच्या दिशेने गेला, तेव्हा तो चेंडू त्याच्या हातात येण्याऐवजी त्याच्यासमोर जमिनीवर पडला. जेव्हा फजल महमूदच्या अपिलावर पंचांनी बोट वर केले, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले. मी इजाज बटच्या दिशेने पाहिले आणि त्याने मला विचारले, काय झाले? आम्हाला दोघांनाही माहीत होतं की, मला झेलबाद दिलं नव्हतं. हा निर्णय केवळ पायचीत (LBW) असू शकला असता."

सोबर्स पुढे म्हणतात, "मला आठवतं की मी अशाप्रकारे बाद झाल्यानंतर, नॉन-स्ट्राइक एंडला उभा असलेला कॉली स्मिथनं फजल महमूदला रागात काहीतरी म्हटलं. मी ड्रेसिंग रूममध्ये आलो आणि माझी बॅग तयार करू लागलो, कारण मला वेस्ट इंडिजला परत जायचे होते."

सोबर्स म्हणतात, "पाकिस्तान संघातील काही खेळाडूंनी मला आधीच सांगितलं होतं की, माझ्यासोबत हे सर्व घडणार आहे याची त्यांना कल्पना होती. खरं तर, माझ्या कारकिर्दीतील तो सर्वात वाईट पंचगिरीचा अनुभव होता."

या मालिकेतील ढाका कसोटीच्या पहिल्या डावातही फजल महमूदच्या गोलंदाजीवर सोबर्स यांना पायचीत (LBW) देण्यात आलं होतं.

कॉली स्मिथच्या मृत्यूचा परिणाम

सर गॅरी सोबर्स आणि त्यांचे सहकारी क्रिकेटपटू कॉली स्मिथ हे खऱ्या अर्थानं अगदी जवळचे मित्र होते. त्यामुळंच एका अपघातात झालेल्या स्मिथ यांच्या मृत्यूने सर गॅरी सोबर्स यांच्या मनस्थितीत खोलवर परिणाम झाला. त्याचं कारण म्हणजे, ज्या अपघातात स्मिथ यांचा मृत्यू झाला त्यावेळी गाडी सोबर्सच चालवत होते.

गॅरी सोबर्स आणि कोली स्मिथ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गॅरी सोबर्स आणि कॉली स्मिथ

ही घटना 6 सप्टेंबर 1959 रोजी घडली होती. त्यावेळी गॅरी सोबर्स, कॉली स्मिथ आणि आणखी एक क्रिकेटपटू टॉम ड्यूडनी हे लँकेशायर लीगचा सामना सोडून लंडनला निघाले होते. तिथे त्यांना एक धर्मदाय सामना खेळायचा होता. सुरुवातीला कॉली स्मिथ गाडी चालवत होते आणि नंतर सोबर्स यांनी गाडी चालवण्याची जबाबदारी घेतली.

सकाळचे पावणे पाच वाजले होते. समोरून येणाऱ्या गुरांच्या ट्रकच्या प्रखर प्रकाशाने सोबर्सला यांची नजर हटली आणि गाडीवरील ताबा सुटला. सोबर्सला यांना शुद्ध आली, तेव्हा त्यांनी त्यांचे दोन्ही सहकारी गाडीबाहेर पडलेले पाहिले. सोबर्स यांनी कॉली स्मिथला यांना कसा आहेस असं विचारलं. तेव्हा त्यांनी मी ठिक आहे तू ड्यूडनीची काळजी घे, असं म्हटलं.

तिघांनाही रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आलं. सोबर्स म्हणाले की, कॉली स्मिथच्या मणक्याला गंभीर इजा झाल्याचं ऐकून त्यांना धक्का बसला आणि तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.

अपघातामुळं सोबर्स इतके हादरले होते की सावरण्यासाठी बराच काळ लागला. या काळात, ते प्रचंड दारू पिऊ लागले आणि जिवलग मित्राच्या मृत्यूसाठी स्वतःला दोष देत राहिले.

भारतीय अभिनेत्रीशी साखरपुडा

1966 मध्ये वेस्ट इंडिज संघाच्या भारत दौऱ्यादरम्यान गॅरी सोबर्स यांची भेट अभिनेत्री अंजू महेंद्रू यांच्याशी झाली आणि ते तिच्या प्रेमात पडले. त्यांचा साखरपुडाही झाला होता.

साखरपुड्याच्या समारंभासाठी पाचशेहून अधिक लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं आणि ही माध्यमांसाठी एक मोठी बातमी होती.

भारतीय अभिनेत्रीशी साखरपुडा

फोटो स्रोत, STRDEL/AFP via Getty Images

सोबर्स म्हणतात, "मी माझ्या कारकिर्दीच्या शिखरावर होतो आणि हे सर्व अशा वेळी घडत होतं जेव्हा भारतात क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांचा अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी विवाह झाल्याचा इतिहास होता."

"मला अंजूला लग्न सोहळ्यासाठी लंडनला घेऊन जायचे होते, पण काही अडचणी निर्माण झाल्या. आमच्यातील अंतर हाच सर्वात मोठा अडथळा ठरला."

ती माझ्यासोबत इंग्लंडला येऊ शकली नाही आणि मग माझ्या लक्षात आलं की हे लग्न टिकणार नाही. काही वर्षांनंतर जेव्हा माझा प्रोफेसर किर्बी नावाच्या एका ऑस्ट्रेलियन मुलीशी साखरपुडा झाला, तेव्हा मला अंजू महेंद्रूला फोन करून तिची परवानगी घ्यावी लागली."

ते लिहितात, "तिनं मला परवानगी दिली असली तरी, मी तिच्या कुटुंबाचा भाग होऊ शकलो नाही याचे तिला खूप दुःख झाले होते, हे मला नंतर कळले."

(हा लेख सर्वप्रथम 29 जुलै 2022 रोजी बीबीसी हिंदीवर प्रकाशित झाला होता.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.